सोमवार, ३१ मे, २०२१

कला अवस्थांतरांचा माध्यम विचार

  

- डॉ. सुधीर रा. देवरे

              प्रास्ताविक: कला आणि साहित्य यांचे चिंतन करत असताना लिहून झालेले टिपण इथे देत आहे. साहित्य ही एक कलाच असून प्रत्येक कलेचे एक खास वैशिष्ट्य असते, तसे साहित्याचेही आहे. प्रत्येक कलेचे साधन भिन्न असते. साहित्य कलेचे साधन शब्द आहे तर चित्रपट या कलेचे माध्यम कॅमेरा हे आहे. साहित्य एकांतात उपभोगण्याची कला तर चित्रपटाचा आस्वाद समुहाने घेतला जातो. (अलीकडे एकट्यानेही घेता येतो.) चित्रपटात शब्द असतात पण ते वाचावे लागत नाहीत, ऐकावे लागतात; पात्रे डोळ्यांनी पहावे लागतात. म्हणून चित्रपट या कलेला दृकश्राव्य कला म्हटले जाते. जेव्हा आपल्याला माहीत असलेली एका माध्यमातील कला दुसर्‍या माध्यमात आविष्कृत होऊन सामोरी येते, तेव्हा तिच्या आस्वादाचा आनंद व्दिगुणीत होतो. अशाच एक कथावस्तू असलेल्या पण भिन्न कलाविष्कारातून सामोर्‍या आलेल्या कलाविष्कारांचा पोत संकल्पनेच्या उपयोजनातून घेतलेला हा वेध. (पोत हा सिध्दान्त मराठीत प्रथमत:  द. ग. गोडसे यांनी मांडला आहे.)   

कादंबरी आणि चित्रपट - माध्यमदृष्ट्या विचार :

               श्याम मनोहर यांची 'शीतयुध्द सदानंद' (१९८७) ही मूळ कादंबरी आणि याच कादंबरीवर आधारीत 'लिमिटेड माणुसकी' (१९९५) हा चित्रपट या कलाकृती तुलनेसाठी घेतल्या आहेत. चित्रपटाची पटकथा लेखक श्याम मनोहर आणि दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन या दोघांनी मिळून लिहिली आहे. 

              कादंबरीचे आणि चित्रपटाचे कथासूत्र एकच असले तरी आविष्काराचे माध्यम मात्र भिन्न आहे, त्यामुळे 'पोत' सूत्राच्या अनुषंगाने तुलना करण्यासाठी मुद्दाम या कलाकृती येथे निवडल्या आहेत. येथे पटकथा लेखनात मूळ लेखकाचा सहभाग असल्यामुळे चित्रपटाचे कथानकही कादंबरीच्या सूत्रानुसारच पुढे सरकत राहते. परंतु जिथे 'माध्यम' आड येते अशा काही ठिकाणी कथानकातल्या प्रसंगात बदल वा तडजोड झालेली दिसते. उदाहरणार्थ, कादंबरीत सदानंद बोरसे या नायकाला लॉटरी लागल्याचे 'निवेदन' आहे तर चित्रपटात निवेदन टाळून सदानंदला स्वप्नात खिशातून पैसे खाली पडण्याचा भास होत असल्याचे 'दृश्य' दाखविण्यात आले आहे. सदानंदला शेअर्स वगैरेंसारख्या गोष्टींत पैसे गुंतवणुकीची आकडेमोड करताना, किती वर्षात किती पट पैसे होतील याविषयी अंदाज बांधताना चित्रपटात दाखविले आहे. राहत्या जागेत मोठी बिल्डिंग बांधून प्लॅट सिस्टीम उभी करण्याची कल्पना मूळ कादंबरीत एक काँट्रॅक्टर मांडतो. 'इथे मोठी इमारत उठवा' असे म्हणत असतानाचे दृश्य येते. कादंबरीत आणि चित्रपटातही सदानंदची बायको नेहमी श्रीरंग- गोविंद प्रकरण कसे मिटवावे या विवंचनेचे पुन्हा पुन्हा  कथन करताना दिसते. पण चित्रपटात मात्र या कथन- निवेदनापेक्षा वेगळ्या 'फँटसी' तंत्राचा वापर केला आहे. उर्मिलेच्या स्वप्नात श्रीरंग- गोविंद हे दोन्ही तिची मुलं होऊन तिच्या कह्यात येतात, असे फँटसी मूलक 'दृश्य' दाखवून तिच्या मनातील ताण मनाच्या नेणिवेपर्यंत कसा भिडला आहे याचे उत्कट दर्शन घडते. (कथानकात उर्मिला गर्भारशी दाखविली असल्याने हा प्रसंग चित्रपटात सुचकतेने आणि योग्य वेळी येतो.) जे वास्तवात करता येत नाही, ते ती स्वप्नात प्राप्त करुन घेते. आपल्या नवर्‍य‍ाला- सदानंदला हिंदी चित्रपटातल्या हिरोचे अवसान देऊन त्य‍ाकरवी श्रीरंग- गोविंदला ती मारही देते. आणखी एक प्रसंगात, उर्मिला किराणा दुकानात गेल्यावर महिला दुकानदार कुत्सितपणे उर्मिलेला विचारते, ‘‘तुमच्य‍ा वाड्यासमोर पहिलवान बसायचे ते प्रकरण मिटले का हो?’’

          दुकानदार महिलेचा खवचटपणा ऐकून प्रथम उर्मिलेला काय बोलावे ते सुचत नाही. नंतर मात्र ती खवचटपणेच उत्तर देते, ‘‘तुमच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडली होती, ते प्रकरण मिटले का? तुमची मुलगी नवर्‍याकडे नांदायला जात नव्हती, ती आता नांदते का हो?’’

              कथन- निवेदनाऐवजी समोरासमोर घडणार्‍या थेट संवादांतून मनुष्यस्वभावाचे 'दर्शन' घडविणारा हा प्रसंग कादंबरीत नाही. पण या दृश्य चित्रणामुळे चित्रपटात सामाजिक विकृत मनोवृत्तीचे दर्शन उत्तमरित्या घडविले गेले आहे.

            कादंबरीचा शेवट श्याम मनोहरांनी अनेक शक्यता असलेला (Open End) असा केलेला आहे. शेवटाच्या शक्यता वाचकाने अजमावून पहावयाच्या आहेत. कारण कादंबरीचा कथाबंध हा स्वस्थ, चिंतनशील वाचनातून उलगडणारा असतो. मात्र चित्रपटाचा कथाबंध सुस्पष्ट आणि दृश्यरुपात समोर उभा ठाकणारा असतो. त्यामुळेच चित्रपटाचा शेवट सूचक निवेदनाने होत नाही. चित्रपटात श्रीरंग आणि गोविंद हे सदानंदला फटके मारण्याऐवजी मिठ्या मारण्याच्या दर्शनाने शेवट केला जातो. ही कलाटणी दृश्य घटनेतून सूचकता प्रसविण्याचे यथोचित कार्य करते. सारांश, आशय तोच असला तरी माध्यम बदलले की आविष्काराचे रुप बदलते. येथे युगधर्म एकच आहे. त्यामुळे युगजाणिवा बदलत नाहीत. परिणामात मात्र फरक पडतो.

            निवेदनप्रधान गद्य आणि हलत्या छाया प्रकाश तुकड्यांची मालिका या माध्यमभेदामुळे अविष्काराचे दर्शनी रुप बदलते. आंतरिक जाणिवा मात्र बदलत नाहीत. टेक्चर बदलले तरी स्ट्रक्चर कायम राहते. माध्यमामुळे दर्शन बदलले तरी जाणिवा बदलल्या नाहीत. कारण जाणिवा या स्थितीसापेक्ष जीवनाशी संवादी असतात. म्हणूनशीतयुद्ध सदानंद ही कादंबरी आणि लिमिटेड माणुसकी हा चित्रपट एकाच कथेच्या सूत्राने समांतर असे दोन समकालीन, परंतु माध्यमाच्या दृष्टीने भिन्न अविष्कार आहेत. त्या जशा दोन भिन्न कलाकृती आहेत तशाच त्या एकाच कथावस्तूवर आधारलेल्या आणि माध्यम बदललेल्या अशा परस्परपूरक पण स्वतंत्र कलाकृती आहेत. या दोन्ही कलाकृतींची माध्यमे भिन्न असली तरी अविष्काराचा पोत मात्र सारखाच आहे. कारण पोतचा संबंध समकालीन जीवननिष्ठांशी व कलावंताच्या जीवन- जाणिवांशी आहे. एकाच कालखंडातील एकाच लेखकाच्या अनुभवाचा विषय झालेल्या जीवननिष्ठा समान जीवन- जाणिवांतून परंतु भिन्न माध्यमातून व्यक्त झाल्या तर त्या आविष्कारांचे दर्शनी आकृतीबंध भिन्न राहूनही आंतरिक पोत समान राहतो.

          श्याम मनोहर हे शब्द माध्यमातून आपल्या विशिष्ट तिरकस शैलीत मानवी व्दंव्द कादंबरीत प्रभावीपणे दाखवतात. यात ते आपल्या खास घडविलेल्या भाषेचाही वापर करतात. परस्पर प्रेम, द्वेष, मत्सर, शेजारवृत्ती, प्रवृत्ती, आनंद, चहाटळपणा, कुटाळक्या, टवाळक्या, निंदा, नालस्ती, भांडणे आदी आदिम विकृत वृत्तीचे शब्द माध्यमातून प्रभावी दर्शन घडवतात. मात्र चित्रपटात असे मानसिक व्दंव्द प्रभावीपणे दाखविता आलेले नाही. उदाहरणार्थ, मूळ कादंबरीत भविष्य पाहायला जाताना उर्मिला ज्या गल्लीबोळांतून जाते त्या बोळींची विशिष्ट पारलौकीक नावे आणि उर्मिलेचे स्वगत चिंतन कादंबरीत विशेष परिणामकारक ठरले आहे;  तर चित्रपटात हा ज्योतिषी अतिशय ढोबळपणे दाखविलेला आहे. तसेच शहाणपण नको वाटतं. ही सृष्टी नीट पाहिली तर शहाणपण यील माणसाला. हे श्रीरंग या पात्राचे कादंबरीतील चिंतन मनाला खोल जाऊन भिडते.  चित्रपटात ते तितकेसे प्रभावी ठरत नाही, मनाला भिडत नाही. अखेर माध्यमांच्या आविष्कारक्षमतेचा परिणाम त्या त्या निर्मितीवर होत असतोच. त्यामुळे आशयाच्या मांडणीची तंत्रे व कौशल्य यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामकारकतेवर कमी-अधिक प्रमाणात फरक पडणे स्वाभाविक आहे. आणखी एका उदाहरणाने हा मुद्दा अधिक स्पष्ट होऊ शकेल.

             संपूर्ण चित्रपटात सदानंदच्या चाळीकडे येणाऱ्या रस्त्यावरच्या कोपऱ्यावर असलेल्या कचऱ्याच्या ढिगार्‍यावर दोन वेळा बराच वेळ कॅमेरा स्थिर राहतो. चाळ संस्कृतीतील कुठेही कचरा फेकण्याची प्रवृत्ती, हातगाडी, श्रीरंग- गोविंद यांची खाण्याची पद्धत, भंगारवाला, सार्वजनिक संडासासाठी निघणारा मोर्चा आदी बाबींशी मध्यमवर्गीय संस्कृतीचा येणारा संबंध या चित्रपटातील चित्रीकरणाने दृढ होतो. हे प्रसंग मूळ कादंबरीत नाहीत. कारण दृश्य तुकड्यांच्या मालिकेतून आशयाचे दर्शन घडविणे हे चित्रपट माध्यमाचे वैशिष्ट्य असते. या उलट कादंबरीत संथ निवेदनातून जीवन विषयक भाष्य संज्ञापित केले जाते. माध्यमांच्या या तंत्रवैशिष्ट्यामुळे एकच वास्तव भिन्न शैलीत आविष्कृत होते. माध्यमाची आकृतीबंधावरील पकड घट्ट असते. म्हणूनच माध्यम बदलले की दर्शन बदलते. मात्र दर्शन बदलले तरी पोत कायम राहतो. आशयामागील जीवननिष्ठा, त्या व्यक्त करणाऱ्या जीवन जाणिवा आणि आविष्काराची तंत्रे व यंत्रणा यांच्या सम्यक न्यासातून पोत घडत असते. म्हणूनच केवळ माध्यमाने अंशत: दर्शन बदलले तरी जीवन- जाणिवा आणि जीवननिष्ठा यांचा मूलाधार कायम राहतो. हे वरील दोन कलाकृतींच्या तुलनेतून स्पष्ट होते. माध्यमाच्या अंगाने अशाच प्रकारच्या अजून काही तुलना करता येतील.

       उदाहरणार्थ म्हणून एकाच कथावस्तूंवरील भिन्न माध्यम आविष्कारांचे सहज जाता जाता अजून काही नावे घेता येतील. बनगरवाडी कादंबरी आणि याच कादंबरीवरील बनगरवाडी हा चित्रपट. सूर्य ही कथा आणि या कथेवरील अर्धसत्य हा चित्रपट.  संध्याछाया ही कादंबरी आणि या कादंबरीवरील संध्याछाया हे नाटक. गाईड कादंबरी आणि या कादंबरीवरील गाईड हा चित्रपट. डॉक्टर झिवॅगो ही कादंबरी आणि या कादंबरीवरील चित्रपट. अशा काही कलाकृती अभ्यासल्या तर कलाकृतींचे पोत अभ्यासला येते.

             (लिखाण: 1996,  कला आणि संस्कृती : एक समन्वय या पुस्तकातील हा लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

          © डॉ. सुधीर रा. देवरे

          ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

शनिवार, १५ मे, २०२१

'शेतकर्‍याविरुद्ध आरोपपत्र' : आदिम सृष्टीतत्व


- डॉ. सुधीर रा. देवरे

 

तू आधी नुसताच होता
शिकारी; मग बनला गुराखी

 

पावसापाण्याचे गणित शोधून करीत
राहिलास गाळपेर; वेळ साधून नद्या हटवून
आणि पाडलास मुडदा तू एका
प्राकृतिक व्यवस्थेचा
उगवून आल्या रोपांना तू केली आळी
पडत्या पावसाला घातले सरी- वरंबे
आणि झाली सुरु तुझी
सत्ता निसर्गाच्या चक्राविरुद्ध

तू फोडलेस आपसूक उमलणारे
फुलणारे लयाला जाणारे घड्याळ
आणि लागलास फिरवू काटे मनमानी

तुझे कष्ट सोपे करायला
काढलेस शोधून नांगर वखर जुंपले जुवाला बैल
तू बांधले अंदाज पिकाचे, समृद्धीचे
केलास सुरु सृष्टीवर अनन्वित अत्याचार
की त्याचा झाला नाही अजून कुठल्या ठाण्यात रिपोर्ट

हा तुझा सृजनाच्या मातीवरचा
प्रयोग नाही बलात्कार आहे बलात्कार

तुझा नांगर लिंगाच्या तयारीचा
ज्ञानियाच्या मार्दव असलेल्या
मातीत खसकन घुसतो.

तू काही कोणी पर्यावरणवादी नाही
की निसर्गाचा अभिजात सेवकपण नाही,
कुंडीत रोपे लावून झारीने
पाणी ओतत बसायला

तुला व्यवस्थेने करुन टाकले माफ
कारण तुझ्या भाकरीवरच
इथल्या प्रेषितांचे झाले भरणपोषण,
आणि त्यांनी पण तुझी केली
अन्नदाता म्हणून भरमसाठ स्तुती

राज्य ताब्यात आल्यावर सोनं- नाणं
स्त्रिया यांच्या आधी तुझ्या उपजावू
जमिनीवरच डोळा होता सार्‍यांचा
बुद्धीने तुला केले परावृत्त
यज्ञाला पुरवायला धनधान्य
पुष्ट जनावरांचे खिल्लार मटण
केवढा केला तुझा सन्मान
त्याने पदापदातून

आखरीस तू झालास लुटारुंना सामील
तू नसता झाला सामील या व्यवस्थेला

तर तू काढतोस
भुईमूग मातीतून
तसा तुला
त्यांनी उपटून फेकला असता मुळांसकट

जनावरांचे दूध ‍असते प्रायोरिटी
त्यांच्या करडं वासरु पारडूंसाठी
तू लावलं तिथं शेराचं माप पदरचं पाणी वाढवून
तसं माणसानी कुठं केलं आपल्या
माद्यांच्या दूधाचं मार्केटींग
तुला पासलं पाडून प्याले कोळून ते नीरक्षीरविवेक
कणसं पिकतात पुढच्या कैकपटीनं
फुलण्या फळण्याची अपेक्षा ठेऊन
तू काढलीस त्यांना खुडण्या- भरडण्याची कला
तू लावलेस एका साहजिक परंपरेला नख
असूरी हाव सुटल्याप्रमाणे
लागला वाढवू जीवांना
तू टाकल्या प्रत्येक फळाफुलांवर किंमती
धान्याच्या राशीवर लागले तुझ्यामुळं किंमतींचे बोर्ड
तू लुटलेस भूईला
आणि आता सारे लुटू लागले तुला,
तुझ्याकडचे फुकटात मिळविण्याचा घातला घाट
कुणी आले धर्माच्या नावानी,
कुणी पूर्वजांच्या,
सार्‍यांनी मिळून तुला कोंबले कोपर्‍यात

तुला सांगण्यात आल्या दातृत्वाच्या गोष्टी
वसा दिला तुला मातीत राबून सडायचा
तू घेतलास महारोगाचा चट्टा स्वतःला चिटकवून
आता हा कायमचा रोग
म्हणून रडतो कशापायी?

तु गुलाम केलंस हवा पाण्याला, माणसाला
गाय, बैल, शेळ्या खेचरं, कोंबड्या, घोड्यांना.
या सार्‍यांनी तुलाच जुंपलंय आता घाण्याला
आणि पाडतायेत तुझ्यातून तेल
जे नव्हतंच तुझ्यात कधी
सूर्यबापा- पृथ्वीच्या नात्यात
तू घातला औत अडसराचा
तू तोडला दोन तत्त्वांचा संबंध मग
पोटपुजकांनी ओरपला तुझा घाम
आणि चवीला रक्‍ताचा खरपूस खर्डा
घेतला कालवून.

हजारो वर्षे खपल्या तुझ्या पिढ्या
तुझ्या आयाबायांच झालं शेण
तुझ्या शक्‍तीचं झालं कंपोस्ट
विकलीस मातीमोल किंमतीला तुझी वंशावळ
तुझ्यावर भरला पाहिजे अधिकचा खटला
स्वतःची फसवणूक केल्याचा
आता तू निघालास यातून सुटून निघायला

मात्र तू अडकलेला शेंबडातल्या माशीगत
हीच तुझी सक्‍तमजूरी हेच तुझे कारागृह
तुझ्या जमिनीचे पट्टे तुझ्याभोवती गुंडाळून
तुझे पाळीव प्राणी तुझ्याच पाळतीवर

पाऊस कधी येईल जाईल


तुला दाणागोटा मागणार खाणारी तोंड
नाहीतर तुला ठरवणार देशद्रोही
काढून घेणं चाललंय
तुझ्या पेरीचा वारसा तुझ्याकडून
देतायेत तुझ्या हाती विमानाची तिकीटं
भरतायेत तुझे खिसे नोटांच्या बंडलांनी
तुझ्या पोरासोरांना दाखवलीय त्यांनी
स्वप्नातच उत्तान फिल्लम

आता येऊन रस्त्यावर बोंबल
मोर्च्याला चला, आंदोलनाला
लोक मग्न झालेयत आता घरातल्या थेटरात
तुच त्यांचा महानायक
जो घडवणार आता रस्त्यात काही चमत्कार
तू निसर्ग व्यवस्थेचा पहिल्यांदा खून केलेला
तुलाच पुढल्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी
तू तर ठेवलीय गिलोटीनखाली मान
आता पडेल पातं
चांडाळांच्या हातून

 

ते पिटतील पिटात टाळ्या
बघतील लाईव्ह तमाशा तुझ्या मरणाचा,
वाहतील श्रद्धांजली तुला
'बाईट' देताना
सांगतील मेला आमचा पिकविणारा
करतील आनंदानं सह्या
शेतमाल आयातीच्या कायमस्वरुपी करारावर

तू भारतवर्षातला शेतकरी
झाल्याचे तुला तेव्हा सगळ्यात
मोठे दुःख होईल
तू बिनसरणाचा पेटून उठशील
उभा आहे तिथंच राख होऊन जाशील.

                              - संतोष पद्माकर पवार (खेळ दिवाळी अंक २००७)

         (प्रस्तावना: आडवं धरुन बोलणं असा बोलीभाषेत एक वाक्प्रचार आहे. या कवितेत शेतकर्‍याला असं आडवं धरुन बोलताना शेतकर्‍याचीच बाजू कवी भक्कमतेनं मांडतो.)          

                    खेळदिवाळी २००७ चा दिवाळी अंक वाचतानाशेतकर्‍याविरुद्ध एक आरोपपत्र' ह्या संतोष पद्माकर पवार यांच्या कवितेने माझे लक्ष वेधून घेतले. कवितेचे वेगळेपण लक्षात येताच ती त्याच वेळी  दोनतीनदा वाचली. कवितेतला आदिम वास्तवतेचा मुद्दा महत्वाचा वाटला. त्यानंतर केव्हातरी 'पंख गळून गेले तरी!' या माझ्या पुस्तकावर प्रतिक्रिया देण्यासाठी संतोष पवारांचा फोन आला. तेव्हा या कवितेबद्दलही त्यांच्याशी बोललो. प्रत्यक्ष कविता वाचताना उठलेले विचारांचे तरंग आणि संतोषशी बोलत असताना त्यावेळी माझ्याकडून तात्काळ उच्चारले गेलेले शाब्दीक अभिप्राय यातूनच कवितेवर थोडक्यात टिपण लिहायचे ठरुन गेले.
                    अलीकडे शेतकरी आत्महत्या करताहेत. गेल्या चोवीस तासात अमूक इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या अशा बातम्या ऐकून आत्महत्या तासात मोजाव्या लागाव्या इतक्या वाढल्या. शेतकर्‍यांसाठी काही करता आले नाही तरी सहानुभूतीने बोलणे सगळ्यांनाच जमू लागले. त्यातल्यात्यात काही वर्षांपासून शेतकरी संघटनाअस्तित्वात आल्यामुळे शेतकरी जीवनावर कविता, कथा, कादंबर्‍या लिहिणे पुर्वीपेक्षा वाढले. अशा कलाकृती उचलल्याही गेल्या. अशा सगळ्या सहानुभूती वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कवी संतोष पवारांनी शेतकर्‍यावर आरोपपत्र ठेवावे हाच एक मोठा गुन्हा ठरु शकतो. तरीही त्यांनी तो धोका पत्करत शेवटी शेतकर्‍याचीच बाजू घेतली आहे.
                    आदिमतेचा वसा आणि परंपरेविरुद्धचा उपहासात्मक शाब्दीक धबधबा म्हणजे ही कविता. रांगडी बोलीभाषेतील गतिमान शैली व रोखठोकपणा कवितेत उठून दिसतो. कवितेत शेतकर्‍याच्या मूलगामी वृत्तीचा धिक्कार केलेला आहे. हा धिक्कार केवळ पारंपरिक रुढीग्रस्त समाजाला धक्का देण्यासाठी आला नसून जे आदिम सृष्टीतत्व आहे त्या सृष्टीतत्वाच्या बाजूने उभे राहून शेतकर्‍याला धिक्कारले आहे. कविता लिहिताना कवी ज्या जागेवर उभा आहे (point of view), ती जागा खूप महत्वाची वाटते. ह्या जागेचाच इथे विचार केलाय. कवितेत शेकर्‍यावर हे आरोपपत्र कवी ठेवत नाही, तर खुद्द सृष्टीच ठेवते आहे की काय, इतकी ही जागा अचूक आहे. कवितेतल्या शैलीने अचूक फटके मारत खरोखर शेतकर्‍याला वास्तवात फैलावर घेतल्याचे जाणवते तर केव्हा शेतकर्‍याचा आतून कैवार घेत त्याला व्यवस्थेविरुध्द उपहासात्मक फैलावर घेतल्याचे नाटक ही शैली करताना दिसते.
                    मानवाची जशी उत्क्रांती झाली, त्या उत्क्रांतीचा माग काढत कविता पुढे सरकते. कवितेच्या सुरुवातीलाच आजचा शेतकरी हा शेतकरी बनण्यापूर्वी कोण होता, त्याचा हा प्रवास कवी दोनच ओळीत सांगतो,
                ‘‘तू आधी नुसताच होता
                 शिकारी, मग बनला गुराखी’
                    एखाद्या अभ्यासकाला तात्विक विवेचन करीत हा इतिहास दोनशे पृष्ठांतही मांडता आला नसता, ते कवीने एका (खूप दीर्घ नसलेल्या) कवितेत नेमकं सांगून टाकलं. म्हणूनच ही कविता एक वस्तुनिष्ठ आविष्कार म्हणून भावली. पहिल्या काही ओळीतच कवी जी शब्दांवरची पकड घेतो ती गतिमान शैलीने शेवटपर्यंत पकडून कवी शेतकर्‍याचा तिरकस निषेध करीत राहतो.
                 ‘‘पावसापाण्याचे गणित शोधून
                  करीत राहिलास गाळपेर;
                  वेळ साधून नद्या हटवून पाडलास मुडदा
                  तू एका प्राकृतिक व्यवस्थेचा
                  उगवून आल्या रोपांना तू केली आळी
                  पडत्या पावसाला घातले सरी वरंबे
                  आणि झाली सुरु तुझी
                  सत्ता निसर्गाच्या चक्राविरुद्ध’’

पुन्हा तिसर्‍या कडव्यात जोरदार चपराक दिल्यासारखी शब्दांची आतषबाजी पाहण्यासारखी आहे...

                 ‘‘तू फोडलेस आपसूक उमलणारे
                   फुलणारे लयाला जाणारे घड्याळ
                  आणि लागलास फिरवू काटे मनमानी...’’

                    शेतकरी पिढ्यान् पिढ्या सृष्टीवर अनन्वित अत्याचारकरीत असल्याची यादी कवी देत राहतो. शेतकर्‍यानेच पहिल्यांदा सृष्टीवर अत्याचार करायला सुरुवात केली. नंतर इतरांनी. माणूस शेतकरी होऊ लागला तेव्हा त्यानेच जंगल तोडायला सुरुवात केली. पिकांचे अंदाज घेत सृष्टीतत्वाला धक्का देणार्‍या शेतकर्‍याला कवी सुनावतो, ‘हा तुझा सृजनाच्या मातीवरचा प्रयोग नाही, बलात्कार आहे बलात्कार’. कवी बलात्कार शब्दाची द्विरुक्‍ती करुन बलात्कार संज्ञेवर जोर देतो. हा केवळ बलात्कारच आहे हे अधोरेखीत करण्यासाठी कवीने बलात्काराचे द्वित्व मुद्दाम वापरले आहे.
                    शेतकर्‍याला अन्नदाता संबोधून त्याचे उदात्तीकरण करण्यामागे इथल्या राजांचेच नव्हे तर प्रेषितांनीही त्याची तात्पुरती स्तुती केली आणि शेतकरी पुन्हा सृष्टी खोदत राहिला. धर्माच्या नावाने यज्ञात जाळले जाणारे अन्न आणि शेतकरी पाळत असलेल्या प्राण्यांच्या आहुत्या वाचवून बुद्धाने शेतकर्‍याचा सन्मान केला. तरीही शेतकरी प्रवाहपतीत होत लुटारुंना जाऊन मिळाला, म्हणजे व्यवस्थेला शरण गेला. प्राण्यांचे दूध त्यांच्या करडं, वासरू, पारडूंसाठी असले तरी शेतकर्‍याने तिथे लबाडी केली. आधी विकण्यासाठी दुधाला शेराचं माप लावलं आणि नंतर उरल्यासुरल्या दुधावर करडं, वासरु, पारडू यांची भूक भागवली. काढलेलं दूधही तो शुद्ध स्वरुपात विकत नाही. तिथेही पाणी वाढवून लबाडी करतो. मात्र हाच शेतकरी असलेला माणूस आपल्या माद्यांच्या दुधाचं मार्केटींग करत नाही. अशा दांभिक समाजाने- व्यवस्थेने शेतकर्‍यालाही या भ्रष्ट व्यवस्थेत ओढून नीरक्षीरविवेकाने त्याला कोळून प्याले. लबाडी करुनही वरुन गोंडस नाव द्यावे नीरक्षीरविवेक’.  हा शब्द कवीने खूप काटेकोरपणे कवितेत वापरला आहे. रांगड्या बोलीभाषेला संस्कृतातली प्रबोधनाची टोपी घालून. फुलं, फळं, कणसं, पिकणं, खुडणं, धान्य भरण्याची कला ह्या सगळ्यांचे मार्केटींग म्हणजे सृष्टीविरुद्धचे कटकारस्थान असल्याचे कवी सारखं सांगत राहतो.
                    एवढं सगळं करुनही शेतकरी थांबलेला नाही. तो सगळ्यांनाच गुलाम करुन आपल्या दावनीला बांधून राबवू लागला. जनावरांना तर शेतकर्‍याने गुलाम केलंच पण हवा, पाणी आणि माणसालाही राबवून घेतलं.
                     ‘‘तू गुलाम केलंस हवा पाण्याला, माणसाला
                     गाय, बैल, शेळ्या, खेचरं, कोंबड्या, घोड्यांना.

          या सार्‍यांनी तुलाच जुंपलंय आता घाण्याला
           आणि पाडतायेत तुझ्यातून तेल
           जे नव्हतंच तुझ्यात कधी
           सूर्यबापा - पृथ्वीच्या नात्यात
           तू घातला औत अडसराचा
           तू तोडला दोन तत्त्वांचा संबंध...’’

                    असे सर्व प्रकारचे आरोप करुन झाल्यावर सृष्टी शेतकर्‍यावर रोखठोक आसूड मारते,  तू निसर्ग व्यवस्थेचा पहिल्यांदा खून केलेला... शेतकर्‍याने उतून मातून होतं तोवर ओलं जाळून घेतलं. आणि आता शेतकरी परिस्थितीने पिचला. त्याच्या परिस्थितीला तो स्वत:च कसा जबाबदार आहे हे सांगण्यासाठी सृष्टी त्याला आरसा दाखवत त्याचा पाणउतारा करत तिरकस उपहासात्मक फटकारते...

          हजारो वर्षे खपल्या तुझ्या पिढ्या
          तुझ्या आयाबायांच झालं शेण
          तुझ्या शक्‍तीचं झालं कंपोस्ट
          विकलीस मातीमोल किंमतीला तुझी वंशावळ
          तुझ्यावर भरला पाहिजे अधिकचा खटला
          स्वतःची फसवणूक केल्याचा... 
                    कर्जबाजारी होत शेतकरी दशोधडीला लागला. निसर्गही त्याच्या विरुध्द गेला आणि ज्या व्यवस्थेने त्याला शेतात अडकवले ती व्यवस्थाही त्याच्या विरुध्द उभी राहिली. शेतकरी आता अन्नधान्य पिकवायला कमी पडला तर व्यवस्था बाहेर तडजोडीला तयारच आहे... (अलीकडे तयार झालेला कायदा आपण इथे आठवू शकतो.)

          ‘…मेला आमचा पिकविणारा

          करतील आनंदानं सह्या

          शेतमाल आयातीच्या कायमस्वरुपी करारावर

          तू भारतवर्षातला शेतकरी
          झाल्याचे तुला तेव्हा सगळ्यात
          मोठे दुःख होईल
          तू बिनसरणाचा पेटून उठशील

पण हा शेतकरी कोणाचाच नसणार. ना धर्माचा, ना व्यवस्थेचा, ना सृष्टीचा. आणि म्हणून तो (तू) उभा आहे तिथंच राख होऊन जाशील.                 

                    हा झाला या कवितेचा कलाविष्कारांतर्गत मध्यवर्ती आशय, घाट आणि विषय. बाकी सगळं क‍वीने इतिहास सांगावा इतक्या ठळक, स्पष्ट आणि धडधडीत सोपं करुन कवितेत सांगितलं आहे. मुद्दा होता वेगळ्या, वास्तव व आदिम सृष्टीतत्वाचा. जो या विवेचनात बराचसा स्पष्ट झालेला आहे.

          (लिखाण: डिसेंबर 2007,  कविता-रती, मार्च-एप्रिल व मे-जून 2020 च्या अंकात प्रकाशित आणि वर्णमुद्रा प्रकाशनाच्या ‘आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ या पुस्तकातील हा लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

          © डॉ. सुधीर रा. देवरे

          ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

शनिवार, १ मे, २०२१

‘आदिम तालाचं संगीत’ (“Melodies with a Primitive Rhythm”)

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

        Melodies with a Primitive Rhythm” आदिम तालाचं संगीत ही दोन्ही पुस्तके चेन्नईच्या नोशन प्रेस प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झालीत, त्या निमित्ताने हा लेख:

                 सांगायला आनंद होत आहे, की 2000 साली प्रकाशित झालेल्या आदिम तालनं संगीत या माझ्या अहिराणी कवितासंग्रहाचं नुकतंच इंग्रजी भाषांतरातलं पुस्तकMelodies with a Primitive Rhythm” या नावाने  चेन्नईच्या नोशन प्रेस प्रकाशनाकडून प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर पुण्याच्या (आणि आता दिल्लीत वास्तव्य) प्रा. राजीव कुलकर्णी यांनी केलं आहे. मूळ अहिराणी कवितासंग्रह डॉ. गणेश देवी यांनी स्वप्रस्तावनेसह बडोद्याच्या भाषा केंद्रांतून प्रकाशित केला होता.

                आदिम तालनं संगीत या अहिराणी कवितासंग्रहात समाविष्ट झालेल्या माझ्या कविता म्हणजे १९८२ पासून २००० या काळात लिहिलेल्या अहिराणी कवितांमधल्या निवडक कविता आहेत. पैकी माझ्या दहा मराठी कवितांचा मीच केलेला अहिराणी अनुवाद आहे. (म्हणजे मुळात या दहा कवितासुध्दा अहिराणीच होत्या, पण त्यांचा मराठी अनुवाद काही मराठी नियतकालिकांत प्रकाशित झाला होता म्हणून त्यांना मराठी म्हणायचं.)

                 आदिम तालनं संगीत हा अहिराणी भाषिक कवितासंग्रह वाचून (कवितेतल्या वैश्विक पडसादांमुळे) अनेक बहुभाषिक मित्रांनी या कवितांचा लवकरात लवकर इंग्रजीत अनुवाद व्हावा असं वेळोवेळी सुचवलं होतं. पण आपण होऊन भाषांतरासाठी कोणी पुढं येत नव्हतं. आणि मी ही तसा कधी प्रयत्न केला नाही. पण अचानक आधी कोणताही परिचय नसताना प्रा. राजीव कुलकर्णी यांनी साहित्य दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या माझ्या एका मराठी कवितेचा (कुठंतरी पाठवण्यासाठी) परस्पर इंग्रजी अनुवाद केला होता. आणि नंतर माझा ठावठिकाणा लागल्यावर त्यांनी मला ते पत्रानं कळवलं होतं. ते इंग्रजी साहित्याचे शिक्षक व अभ्यासक आहेत. परिचय झाल्यानंतर खूप दिवसांनी त्यांना आदिम तालनं संगीत वाचायला सुचवलं. वाचून होताच त्यांनी या कवितांचा स्वत: आनंद घेत इंग्रजीत अल्पावधीत भाषांतर केलं.

                प्रा. कुलकर्णी हे अहिराणी भाषिक नसल्याने त्यांना ह्या अहिराणी कवितांचं माझ्याकडून मराठी भाषांतर हवं होतं. ते मी त्यांना तात्काळ करुन दिलं. यामुळे या अहिराणी कवितासंग्रहाचा इंग्रजीसोबत मराठी अनुवादाचंही पुस्तक तयार झालं. विशेष म्हणजे इंग्रजी व मराठी भाषांतराची दोन्ही पुस्तके चेन्नईच्या नोशन प्रकाशनाकडून सोबतच प्रकाशित झाल्याने सुखद धक्का मिळत आनंद व्दिगुणीत झाला.

                आनंदाची अजून एक गोष्ट अशी, की श्री. कुलकर्णी यांनी केलेलं इंग्रजी भाषांतर व मूळ अहिराणी आदिम तालनं संगीतातल्या कविता माझे कवी मित्र श्री. महेश लिला पंडित यांनी पुन्हा बारकाईने वाचून याच कवितांचा अहिराणीतल्या सूक्ष्म सांस्कृतिक संदर्भांसह नव्याने इंग्रजी अनुवाद करण्याचं काम आता स्वानंदानं सुरु केलं आहे. इंग्रजीतला हा दुसरा आणि तितकाच दर्जेदार वेगळा अनुवादही ते लवकरच पुस्तक स्वरुपात प्रकाशित करणार आहेत. तब्बल एकवीस वर्षांनंतर या अहिराणी कवितांची एकाचवेळी दोन दर्जेदार इंग्रजी भाषांतरांची पुस्तकं प्रकाशित होत आहेत, म्हणून आनंद होणं साहजिक.               

पावसाचा आवाज:

               पाऊस आणि पावसाच्या आवाजाचं मला लहानपणापासून प्रचंड कुतुहल मिश्रित आकर्षण आहे. आमच्या गावी पाऊस सुरु झाला, की मी अभ्यास करणं बंद करुन पावसाची गंमत पहात - पावसाचा आवाज ऐकत घराच्या दारात उभा रहायचो. (आजही पावसाचं स्वागत मी असंच काहीसं करत असतो.) पाऊस पडत असतानाचा, पावसाच्या वेळी वाहणार्‍या वार्‍याचा, आकाशात चमकणार्‍या विजा आणि गरजणार्‍या ढगांच्या समग्र आवाजाला मी आदिम तालाचं संगीत म्हणतो. या शीर्षकाची एकच कविता या संग्रहात असली तरी एकूण कवितांत संखेने पावसाच्या कविताच बहुतांशपणे दिसून येतील.

                पाऊस कोणताही असो, म्हणजे पावसाळ्यातला मोसमी असो, झडीचा असो, अवकाळी असो की मान्सूनपूर्व असो, मला तो आकर्षून घेतो. पावसांतून आदिम तालाचं संगीत मला ऐकू येत राहतं...

                आदिम तालनं संगीत या कवितासंग्रहात ही सर्व अहिराणी भाषेतली कविता. या कवितेचा मुख्य घटक म्हणजे भाषा आणि भाषेतली परिभाषा. या कवितेतली परिभाषा वाचून ही नक्की कोणती भाषा आहे, असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो.

                भाषा कोणतीही असो त्या भाषेत आविष्कृत होताना कवीची स्वत:ची एक भाषा तयार होत जाते. म्हणून व्यक्तीपरत्वे भाषा बदलते असं म्हटलं तर वावगं होणार नाही. म्हणून केवळ भाषा, परिभाषा वा विशिष्ट बोली समजून घेतली की कविता समजली, असं होत नाही. कोणतीही कविता अजून एक नवीच परिभाषा ठरते.

                हे विवेचन म्हणजे या कवितासंग्रहातील समग्र कवितेची निर्मिती प्रक्रिया नाही, आस्वाद नाही आणि मर्मग्रहण - समीक्षणही नाही. फक्त  प्रास्ताविक. संग्रहातील पहिल्या आवृत्तीतल्या एकशे त्रेपन्न आणि आता (२००१  ते २०२० या काळात लिहिलेल्या) ब्यायशी कविता अशा एकूण दोनशे पस्तीस कविता या इंग्रजी व मराठी आवृत्तीत समाविष्ट आहेत.

                अनुक्रमे इंग्रजी व मराठी भाषांतरीत कवितासंग्रहांतील पहिली कविता:

 

1. I Approach My Poems

 

A friend visits, 

speaks his chaste, 

sophisticated, urbane language, 

and tries to teach me the same. 

I, too, try to imitate it

in his company.... 

Intoxicated by the flavour 

of his own tongue, 

the friend misses out on life. 

When he leaves, 

I shake off his language 

and approach my poems…

0

 

. मी कवितेजवळ जातो...

 

शुध्द भाषा बोलणारा

माझा मित्र घरी येतो

आणि मला

शुध्द भाषा शिकवण्याचा

प्रयत्न करतो...

 

तो आला की

मी त्याच्याशी शुध्द भाषा

बोलण्याचा काटेकोर प्रयत्न करतो...

 

शुध्द भाषेच्या धुंदीत

मित्र जीवनाला सहज विसरुन जातो...

तो उठून गेला की मग मी

भाषा फेकून

कवितेजवळ जातो...

0

 

पुस्तके पाहण्यासाठी व मागवण्यासाठी लिंक:

Melodies with a Primitive Rhythm: Aadim Talna Sangeet (इंग्रजी)

Amazon:

https://www.amazon.in/dp/163886022X/ref=cm_sw_r_wa_apa_glt_fabc_YENWJB96M330NNM6RVWY

Notion Press:

https://notionpress.com/read/melodies-with-a-primitive-rhythm

आदिम तालाचं संगीत’ - Aadim Talachh Sangeet' (मराठी)

Amazon:

https://www.amazon.in/dp/163886151X/ref=cm_sw_r_wa_apa_glt_fabc_T2E6Q1MD044V284FP5W3

Notion Press:

https://notionpress.com/read/aadim-talachh-sangeet

        (अप्रकाशित लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

        © डॉ. सुधीर रा. देवरे

        ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/