बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८

गावातली चावडी




-    डॉ. सुधीर रा. देवरे

     गाव तिथं चावडी असायचीच. चावडीवर गावातले अनेक प्रश्न सोडवले जात. वार्षिक भाडे मिळवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे काही लिलावही चावडीवर होत असत. चावडीवर पंचायत भरायची. पंचायत बोलवणे म्हणजे गावातल्या लोकांची बैठक. आजच्या भाषेत मिटींग. गावात दवंडी देऊन चावडीवर लोक बोलवले जात. गावाच्या भल्यासाठी एखादा निर्णय घ्यायचा झाला तर गावातल्या चावडीवर लोक जमत. चावडीत उलट सुलट चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाई.
     गावगाड्याचा सर्व प्रकारचा कारभार चावडीत होत असे. चौ वाडी म्हणजे चारचौघेजण जमण्याचे ठिकाण ते चावडी. चव्हाटी- चावडी. चावडीवर नुसते सरकारी व सार्वजनिक व्यवहारच होत नसत. खाजगी वाद, भानगडीसुध्दा चावडीवरच येत आणि हे वाद पो‍लीसपाटील सोडवत असे. दोन्ही बाजूच्या व्यक्‍तींचं काय म्हणणं आहे ते गावकर्‍यांसमक्ष ऐकलं जायचं. योग्य तो मधला मार्ग काढून न्यायदानाचं कामही या चावडीवर होत असे. पण जातपंचायतीची पध्दत वेगळी आणि चावडीवर सोडवायचे प्रश्न वेगळे. आज चर्चेत असणारी जातपंचायत म्हणजे चावडी नव्हे. जातपंचायतीत परंपरागत अंधश्रध्देतून अनेक प्रतिगामी निर्णय घेतले जातात. तसं चावडीचं कधी झालं नाही. चावडीही गावातल्या व्यक्‍तीगत भांडणात लक्ष घालत नाही. चावडी ही शासकीय यंत्रणेची व्यवस्था होती. जातपंचायत ही बेकायदेशीर आहे.
     आज चावडीवर गावातले प्रश्न हाताळले जात नसले तरी आमच्या गावात चावडी नावाचं विशिष्ट स्थळ अजूनही सुरक्षित- शाबूत आहे. चावडीजवळ असणारी ग्रामपंचायत आता दुसरीकडे गेली. पंचायतीची ही खोलीवजा वास्तू काही काळ धर्मशाळा म्हणूनही कार्यरत होती. आज धर्मशाळा कालबाह्य झाल्या. एखादी वास्तू धर्मशाळा म्हणून अस्तित्वात ठेवली तरी तिचा उपयोग आज कोणी करणार नाही. (पूवीँ लोक धर्मयात्रा करण्यासाठी लांबच्या प्रवासाला निघत. दरम्यान रात्री जे गाव रस्त्यात लागेल‍ तिथल्या धर्मशाळेत असे प्रवाशी विश्राम करत. सकाळ होताच आपला पुढचा प्रवास सुरू करत. आताच्या गतिमान युगात धर्मशाळेत थांबण्याइतका कोणाला वेळ नाही. आणि कुठं थांबायची वेळ आलीच तर अलिशान हॉटेलीत थांबण्याइतके पैसेही आज लोकांच्या हाती आहेत.) या धर्मशाळेत मध्यंतरी हायस्कूलचे वर्गही भरत होते. हायस्कूलची स्वतंत्र इमारत झाल्याने ही खोली आता भग्न अवस्थेत गेली.
     चावडीवर निमची भली मोठी चार झाडी होती- अजूनही आहेत. म्हणजे गल्लीच्या एका बाजूला दोन व दुसर्‍या बाजूला दोन. म्हणून इथं निमच्या चार झाडांचा चौरस तयार झाला. ही झाडं प्रचंड वाढली की पंचायतीतर्फे त्यांची थोडी डहाळणी करण्यात येते. पुन्हा काही दिवसांनी ती झाडी पहिल्यासारखी बहारदार होतात. या झाडांवर अधून मधून हवापालट म्हणून रानावनातून वांदरं येऊन राहायचे. माकडांची गंमत पाहण्यासाठी गावातले पोरे- बाळे चावडीत जमा व्हायची. कोणाच्या घराजवळ माकड आलं तर घरांतून त्याला काही खायलाही दिलं जात होतं.
     चावडीवरच्या झाडांखाली घनदाट सावली असायची- अजूनही असते. म्हणून काही किरकोळ विक्रेते या सावलीत आपली दुकानं थाटायची. कल्हईवाला, बुढ्ढीचे बालवाला, चप्पल सांदणारे चर्मकार लोक इथं येऊन बसायचे. गावाच्या वरच्या बाजूला राहणार्‍या कोकणा पाड्यातून काही बाया चावडीजवळ करवंद, आवळा, पेरू, जांभूळ, सीताफळ, चिंचा, बोरं, टेंभरं, अंजीर विकायला येत असत. ही सर्व फळं अन्नधान्याच्या बदल्यात मिळायची.
     सारांश, ग्रामीण भागातली चावडी नावाची संज्ञा आजही सामान्यनाम म्हणून अस्तित्वात आहे. तरीही चावडीचं चावडीपण आजच्या चावडीच्या जागेला राहिलं नाही. उलट चावडी नावाचा उच्चार हा आज तिरकस, उपहासात्मक वा अशिष्ट पध्दतीने केला जातो. उदाहरणार्थ, काही तरूण विशिष्ट जागी कायम गप्पा करत बसले तर त्यांचा उल्लेख चावडी असा केला जातो. एखाद्या खाजगी प्रश्नाची चावडी करून टाकणे, असा वाक्प्रचार भाषेत उपयोजित झाला तर खाजगी गोष्टींचा बोभाटा केला असं समजलं जातं. म्हणूनच चावडीवर जाणे असा वाक्प्रचार अजूनही भाषेत रूढ आहे.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

बाजार – बजारना याळ




-    डॉ. सुधीर रा. देवरे

     ग्रामीण भागात आठवडी बाजार भरतो. मात्र प्रत्येक गावात बाजार भरत नाही. आजूबाजूच्या दहा पंधरा खेड्यांच्या मध्यभागी असलेल्या थोड्या मोठ्या खेड्यात बाजार भरत असतो. आजूबाजूच्या गावांचे हे बाजार भरणारं गाव केंद्रच समजलं जातं.
     बाजाराभोवती देण्याघेण्याचे अनेक व्यवहार होत आले आहेत. ‍विशिष्ट बाजाराच्या गटातल्या गावांत मजूर लोकांची मजूरी प्रत्येक आठ दिवसांनी बाजाराच्या दिवशी चुकती करायची असते. बाजाराच्या दिवशी शेतमजूर दुपारपर्यंत एक पारग शेतात काम करतात. बाजारासाठी दुपारून सुट्टी घेतात. (अन्य खाजगी मजूरही बाजारदिवशी दुपारून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतात.) आपली आठ दिवसाची मजूरी शेतकर्‍यांकडून घेऊन ते बाजारात येऊन पुढील आठ दिवस पुरेल असा सगळ्या जिनसांचा बाजार करून ठेवतात.
     शेतकरी आपला विशिष्ट भाजीपाला, अन्न धान्य,ळे विकण्यासाठी बाजारात आणतो. व्यापारीही आपली दुकाने बाजारात लावतात. म्हणून आठवडी बाजारात सगळ्या जिनसा एकाच जागी उपलब्ध होतात. शेतकरी आपला भाजीपाला बाजारात उघड्यावर बसून विकतात तर व्यापारी तात्पुरता तंबू उभारून दुकान लावून माल विकतात. आजूबाजूच्या खेड्यापाड्यांवरचे लोक बाजाराला येतात. व्यवहारात बाजाराच्या दिवशीचा वादा होत असल्याने या दिवशी खेड्यापाड्यावरचे लोक बाजाराच्या आजूबाजूला बसून आपले एकमेकांचे देण्याघेण्याचे हिशोब चुकते करतात.
     बाजारात विविध प्रकारचा भाजीपाला, फळे, अन्नधान्य, मासे, खेकडी, बोंबील, सोडे, झिंगे, अंडे, भेळभत्ता, मिठाई, खाऊ, मसाल्याचे पदार्थ, विविध भांडी, डालके, कढया, शिराया, झाडू, बांगड्या, नकली दागिने, कपडे असे सगळे काही एकाच जागी विकायला आलेले असते. दोन जवळच्या गावातल्या लोकांना भेटायचा हा दिवस असतो. रोजच्या कामधंद्यात अडकल्यामुळे जवळच्या गावी खास वेळ काढून जाऊन एखादी बोलणी करता येत नाही. म्हणून बाजाराच्या निमित्ताने असे नातेसंबंध जोडण्याचं कामही बाजाराच्या आसपास बसून होत असतं. बाजारात विविध विक्रेत्यांच्या रांगा मिळून अनेक तात्पुरत्या गल्ल्या तयार होऊन लोक दाटीवाटीने आपला माल विकत असतात. या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून हातात कापडी पिशव्या घेऊन लोक आपापल्या गरजेनुसार जिनसा विकत घेतात. यात शेतमजूर, अन्य मजूर, शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, कारू नारू, अन्य व्यावसायिक लोक आपापल्या गरजेच्या वस्तू खरेदी करायचे- करतात. आपला माल विकून आलेल्या पैशातूनही आपल्याला लागणार्‍या अन्य जिनसा लोक विकत घेतात. या सर्व व्यवहारात देण्याघेण्याच्या किमतीविषयी घासाघीस होत असते. कोणत्याच मालाची किंमत ही दुकानातल्या वस्तुवरच्या छापलेल्या किमतीसारखी पक्की नसते. बाजारातल्या मालाच्या किमती लवचिक असतात.
     ग्रामीण बाजार हे केवळ साप्ताहिक व्यवहाराचं केंद्र नसून आजही एक सांस्कृतिक वैभव आहे. काही ठिकाणी बाजाराला हाट म्हणतात. आठ दिवसांनी भरतो तो हाट. काही ठिकाणी बाजार-हाट असे दोन्ही शब्द बाजारासाठी वापरतात. ग्रामीण बाजार हे सर्व वर्गीय लोक एकमेकांत मिसळण्याचं केंद्र आहे. बाजारात व्यक्‍तीगत दु:ख परिहार होतो. म्हणून ज्या स्त्रियांना दु:ख झालेलं असायचं (म्हणजे घरातलं कोणी वारल्यावर दहाव्या दिवसानंतर) त्यांना बाजाराच्या दिवशी बाजार फिरवण्याची पूर्वी पध्दत होती. बाया बजार भवडाले गयात’, बजार भवडाले घी जानं शे असे खास शब्दसमूह म्हणजे वाक्प्रचारच यासाठी वापरले जात होते. अशा दु:खीत महिलांना घेऊन बाजार फिरवून आणला की बाहेरची जगरहाटी पाहून आपलं दु:ख हलकं होईल अशी यामागे समजूत होती. खूप पूर्वीपासून ग्रामीण भागात बाजार भरत आला. त्याचं स्वरूप आता थोडं बदललं असलं तरी आतून बाजाराचा गाभा आणि उद्देश तोच आहे.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/