सोमवार, १ जानेवारी, २०२४

‘देबशिशु’ : धर्म बडव्यांचा वेठबिगार देव

 

-       डॉ. सुधीर रा. देवरे

                              धर्म ही अफूची गोळी आहे असं कार्ल मार्क्सनं म्हणून ठेवलं. मनुष्य जसजसा शिक्षित होईल तसतसं धर्माचं महत्व कमी होईल अशी आपली भाबडी समजूत असते. पण तसं होताना दिसत नाही. आज मनुष्य जसजसा शिक्षित होतोय तसतशी धर्मांची दाहकता वाढत आहे. उत्तरोत्तर आपण कितीही प्रगत होत गेलो तरी धर्मांची उग्रता पावलोपावली येत आहे- येत राहणार. देवांना महत्व येतंय. नवनवीन देव अस्तित्वात येताहेत. रोज गावोगावी देवांची दुकानं उघडताहेत. जुनी दुकानं कट्टर होताहेत. दिवसेंदिवस देव पंचतारांकीत आणि दहशती होत असल्याचा प्रत्यय येतोय. 

                              पंचवीस वर्षांपूवी एक बंगाली-हिंदी अभिजात चित्रपट पहाण्यात आला होता. चित्रपटाचं नाव ‘देबशिशु’ (१९८५) असल्याचं आठवतं. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री उशीरा विविध भाषेतील अभिजात चित्रपट दाखवले जात. त्यापैकी हा एक होता. उत्पलेंदु चक्रवर्ती लिखित व दिग्दर्शित असलेल्या या चित्रपटात ओम पुरी, स्मिता पाटील आणि काही बंगाली अभिनेत्यांनी काम केलं. (चित्रपट पटकथालेखक अक्षय उपाध्याय.) स्थुलपणे चित्रपटाचं कथानक असं :

                              एका छोट्याश्या खेड्यात मजुरी करणारं गरीब जोडपं. गावातल्या नदीला आलेल्या महापुरामुळं आख्खं गाव वाहून जातं. वाहून गेलेलं गाव सोडून गावातले लोक नेसत्या कपड्यांसह आपापल्या नातेवाईकांकडं इतर  गावांना परागंदा होतात. हा मजुरी करणारा माणूस- नायकही त्याच्या बायकोच्या भावाकडे आपल्या दोन कुपोशित बालकांसह सहकुटुंब पायी प्रवास करून दूरच्या गावी येऊन पोहचतो.

                              याच दरम्यान ‘बालशिशु’ नावाच्या देवाचा लवाजमा या शहराबाहेर आलेला असतो. शहराबाहेर आलेल्या देवाचा लांबून दिसणारा भव्य तंबू. प्रचंड मोठ्या प्रमाणात शहरभर या देवाची जाहिरात होतांना ऐकू येत राहते. चौकाचौकात आणि घराघरात लोक या देवाचीच चर्चा करताना दिसतात. केवळ या शहरातलेच नव्हे तर परिसरातल्या अनेक गावातल्या  लोकांचा ओघ सुरू असतो. देबशिशुच्या दर्शनासाठी लोक तिकीट काढून रांगा लावताना दिसतात. 

                              अशा वातावरणात पीडित कुटुंबातील गृहस्थ- नायक शहरातल्या देवशिशुच्या तंबुकडे आकर्षित होतो. जागृत जीवंत देवबालकाच्या जाहिरातीची ‘हवा’ त्यालाही मोहीत करते. त्या तंबुकडे जाणारी विविध वाहनं व पायी वाहणार्‍या जनसमुदायाकडे तो अचंबीत होत पहात राहतो. बालदेवाकडे धावणार्‍यांपैकी एक अपंग व्यक्‍तीही तिकडे पायी जाताना दिसते. त्याला नायक विचारतो, ‘हा काय प्रकार आहे?’ ती व्यक्‍ती सांगते, ‘देबशिशु नावाचा हा देव नवसाला पावतो. अनेक लोकांना त्याचा प्रत्यय आलाय. माझे पाय बरे व्हावेत म्हणून मी त्याच्या दर्शनाला चाललोय.’ देव पहायला प्रंचड गर्दी गावाबाहेरच्या तंबूकडे अखंड धावत असते. तंबूजवळ लांब रांगा लावलेली गर्दी दिसते. देव दर्शनासाठी तिकीट काढून तंबूत जावं लागतं. आपली विपन्नावस्था दूर व्हावी, चांगले दिवस यावेत या आशेनं हा गृहस्थही- नायक बालदेवाच्या दर्शनाला तिकीट काढून भव्य अशा तंबूत शिरतो.

                              नायकानं तंबूत प्रवेश करताच मंचावर जीवंत हालचाल करणारा एक बालकदेव त्याला दुरून दिसतो. देवापुढं वाढत जाणारा, सहज डोळ्यात भरणारा पैशांचा- नाण्यांचा मोठा ढीग खूप लांबूनच त्याला दिसू लागतो. (पैसे देऊन तिकीट काढायचं, रांग लाऊन तंबूत जायचं आणि पुन्हा देवासमोरही पैसे टाकायचे.) बालदेवाच्या मंचासमोर एक व्यक्‍ती कोणाशी तरी चर्चा करताना त्याला दिसते. अमूक ही व्यक्‍ती आणि मेकअप करून सजवलेला जीवंत हालचाल करत असलेला बालकदेव पाहून नायक अचंबीत होत जागच्याजागी थबकतो- हादरतोच. या कृतीनं तो दोन पावलं रांगेबाहेर गेल्यानं त्याच्या मागून माणसांची रांग देवाकडं हात जोडून पुढं सरकत राहते आणि तो गोठून गेलेल्या स्थिर पुतळ्यासारखा जागच्याजागी स्तब्ध उभा रहात, काही वर्षांपूर्वीची त्याच्या घरातली घटना त्याच्या डोळ्यापुढून सरकू लागते :

                              काही वर्षांपूर्वी या नायकाच्या घरात एक विचित्र बालक जन्माला आलं होतं. त्या बालकाला तीन तोंडं, सहा हात होते. तो घाबरून गावालगतच्या पंडिताकडे जातो. त्यावेळी पंडित आपल्या वयात आलेल्या प्रौढ आणि उनाडक्या करणार्‍या मुलाला ‘पोटापाण्यासाठी काही तरी धंदा कर’ असा उपदेश करत असतो. नायक त्याच्या बालकाबद्दल पंडिताला सांगतो. पंडित पीडिताचं ऐकून त्याला सल्ला देतो, ‘ते मूल घरात ठेवणं महाभयंकर पाप आहे. घरात ठेऊ नकोस. नाहीतर बरबाद होशील!’ यावेळी त्या पंडिताचा प्रौढ मुलगा पीडितामागे बाहेर येतो आणि ते बालक आपल्याकडे घेऊन यायला पीडिताला सांगतो. पीडित लगेच घरून ते बालक घेऊन येतो व त्या पंडिताच्या प्रौढ मुलाकडं सोपवतो. त्या वेळी पंडिताचा प्रौढ मुलगा पीडिताला तीस रूपये देऊन ‘हे कोणाला सांगू नको’ असा सुचक दम भरतो...

                              तीस रूपये आपल्याला देणारा हाच तो माणूस. आणि हा जीवंत ‘शिशुदेव’ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या घरी जन्माला आलेलं विचित्र बालकच आहे, हे तो पीडित नायक तात्काळ ओळखतो.

                              त्या बालकाला जीवंत शिशुदेव म्हणून तिकीट लावून त्याचं गावोगाव भव्य प्रदर्शनातून लोकांच्या दैवाधीन भाबड्या श्रध्देला खतपाणी घालत प्रचंड पैसे कमवण्याचं साधन बनवलेलं. आपण मजुरीनं कष्टाची कामं करून कसंतरी अर्धपोटी जगत आहोत आणि आपल्या ‘दिव्यांग मुलाचा’ उपयोग करून हा भोंदू माणूस लोकांच्या श्रध्देला हात घालून वैभवात लोळतो, असा साक्षात्कार नायकाला दर्शनासाठी ताटकळलेल्या त्या भक्तांच्या रांगेत होतो. (अपंगांसाठी ‘दिव्यांग’ शब्द वापरणं चुकीचं आहे. दिव्यांग म्हणजे दिव्य अंग. अपंग व्यक्‍तीच्या शरीरात काहीतरी कमी असतं. काही अवयव कमी असतात म्हणून त्याला अपंगच म्हणायला हवं. आपल्या शरीराव्यतिरिक्‍त अजून काही अवयव जास्तीचं असणं याला ‘दिव्यांग’ म्हणता येईल. म्हणून या चित्रपटात असलेलं बालक ‘दिव्यांग’ आहे. गणपती, दत्तात्रेय, ब्रम्हदेव, रावण, अनेक हात असलेल्या देव्या आदी मुर्तींना दिव्य अंग आहे.)

                              दिव्यांग मुलाचा धंदा मांडणार्‍या माणसाजवळ जाऊन पीडित नायक त्याला स्वत:ची स्पष्ट ओळख सांगत मुलगा परत मागतो. ‘इथून निघून जा नाहीतर पोलिस बोलवीन’, अशी धमकी देत तो धंदेवाईक माणूस पीडिताला हाकलू पाहतो. आता मुलगा परत मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्याच्याकडे थोडेफार पैसे तरी मागून पहावे असा विचार करत पीडित नायक त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागतो. मात्र पीडिताला चोर ठरवून चेल्यांतर्फे बाहेर हुसकवलं जातं. पाठलाग करत त्याला दूर जंगलात पिटाळलं जातं. कुत्रे- डुकरे आदी प्राण्यांवर करावा तसा त्याच्यावर दंगडांनी हल्ला होत राहतो. जंगलातल्या एका नाल्यातल्या पाण्यात डुबकी घेऊन नायक काही काळ तग धरतो म्हणून तो त्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचतो.

                              जंगलातून मार्ग काढत रात्री उशीरा तो घरी पोचतो आणि त्यानंतर बायकोसोबत होणार्‍या संवादाचा मानसिक संघर्ष आपल्याला अंतर्मुख करून सोडतो. सगळीकडे गाजत असलेला ‘देबशिशु’ हा आपला मुलगा आहे. गावोगावी जीवंत देव म्हणून त्याचं प्रदर्शन भरवत त्याच्या जीवावर कोणीतरी परका माणूस प्रचंड पैसा कमवतो हे वास्तवातलं सत्य हे जोडपं नुसत्या अशा कल्पनेतही सहन करू शकत नाही. ही घटना कोणाला ओरडून सांगता येत नाही. तसं केलं तर कोणी विश्वासही ठेवणार नाही. भर तंबूत चोर ठरवून नायकाला याआधी पशूसारखं हाकललंच गेलं होतं.

                              या कुटुंबाला पोटभर जेवण मिळत नाही. त्यांच्या लहान बालकाला दूध मिळत नाही. (बाळाला दूध मिळावं म्हणून ती महिला भावाच्या घरात त्याची बायको नसताना चोरून गायीचं दूध काढून मुलाला पाजते.) या वेळी मानसिक संघर्षाशिवाय आणि स्वप्नात बदला घेण्याशिवाय

हे जोडपं आपल्या मुलाचा बाजार मांडणार्‍याचं वास्तवात काहीही वाईट करू शकत नाही. मूल परत मिळण्याचा मार्ग बंद झालेला आणि सूडानं त्या माणसाचा काटा काढावा असं वास्तवात या जोडप्याकडून काहीच होणार नसतं. (म्हणून चित्रपटातील नायिका फक्त झोपेत सुडाचं स्वप्न पाहू शकते. त्या स्वप्नात : ही आई दुर्गा देवीच्या रूपानं हातात कोयता घेऊन त्या बालदेवाच्या पालखीला आडवी होते आणि तिचं बालक मिळवण्यासाठी हातातल्या कोयत्यानं त्या भोंदू माणसाचा शिरच्‍छेद करते.) इथं चित्रपट संपतो.  

                              बालशिशुच्या तंबुत येण्यापूर्वी रस्त्यात ज्या अपंग व्यक्‍तीकडे  हा नायक बालशिशुबद्दल विचारपूस करतो, तेव्हा तो अपंग युवक सांगतो, ‘जागृत व जीवंत दैवत आहे. माझे पाय बरे व्हावेत म्हणून मी देव दर्शनाला जातोय.’ खरं तर ज्याला देवाचं स्थान दिलं, ते दुर्दैवी बाळ जे स्वत:च अपंग असून आपलं स्वातंत्र्य गमावून बसलं, ते कोणा अपंगाचे पाय तंदुरूस्त कसं करू शकेल? हा देव म्हणजे‍ स्वत: दिव्यांग- अपंग बालक. त्या देव समजल्या जाणार्‍या परंतु अपंग असल्यानं देवाच्या रूपात कोणाची तरी वेठबिगारी करणार्‍या बालकाकडे, दुसरा एक शारीरिक वाढ झालेला अपंग, आपले पाय बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करतो.   

                              एक वेगळा अनुभव म्हणून हा चित्रपट मनाच्या कप्प्यात इतक्या वर्षांपासून पडून होता... या चित्रपटानं आपण होऊन धार्मिक वा भाबड्या श्रध्देवर काहीही उघड आणि स्पष्टपणे वेगळं असं भाष्य केलेलं नाही. चित्रपटाचं चिंतन करत त्यातून योग्य असे अर्थ काढायचे आहेत ते आपण.

                              सर्वसाधारण माणूस धर्माच्या विरूध्द गेला तर त्याला अदृश्य पातळीवर वाळीत टाकलं जातं आणि धर्माच्या आहारी गेला तरी कायम त्याचंच शोषण होत राहतं. धर्माचे व्यापारी झालेले काही लोक कायम लोकपरंपरा या धर्माच्या कोंदनात बसवण्याच्या प्रयत्नात असतात. लोकसमज- लोकश्रध्देमुळं ते कायम यशस्वी होत राहतात. धार्मिक श्रध्देत सर्वदूर सर्वसामान्य माणसांचंच प्रचंड नुकसान झालेलं दिसेल. धर्माला आपल्या कौशल्यानं वाकवणारे लोक धर्माचे पाईक होतात. ‘लक्ष्मी’ कशी घरात आणायची हे धर्माच्या ठेकेदारांना अवगत असतं आणि ते आपल्या पध्दतीनं धर्माचा व्यवहार करत राहतात. (अशा लोकांनी पैशाला ‘लक्ष्मी’ नावानं संबोधून तोही एक नवीन देव निर्माण करून ठेवला आहे; अथवा ‘देवी’ म्हणा. म्हणून अशा धार्मिक रंगाच्या भोवाड्यात विविध सोंगं नाचवणार्‍या लोकांची, पैसे कमवण्याची वा सत्ता प्रस्थापित करण्याची दानवी हौसही, श्रध्देच्या आवरणात आपल्याला सात्विक दिसू लागते.) तुम्ही कितीही प्रज्ञावान असू दे. एकतर तुम्ही धर्माचे शोषित आहात वा शत्रू. दोन्ही बाजूनं फक्‍त तुमचंच नुकसान होत राहणार. आज देवाच्या बडव्यांनी देवालाच वेठबिगार करून ठेवलेलं दिसेल. धर्म बडव्यांचा खरा वेठबिगार देव पहायचा असेल तर ‘देबशिशु’ आजही उघड्या डोळ्यांनी बघितला पाहिजे.

                              आजसुध्दा आपल्या आजूबाजूला काय चाललंय? (कोणत्याही निवडणुकांपासून दहशतवादी हल्ल्यांपर्यंत), सत्ता आणि पैशांचं केंद्र हे ‘धर्म’ असल्याचं लक्षात येईल. उन्माद जगभर वाढताना दिसतोय. शिक्षणानं माणूस फक्त वैज्ञानिक सुखसुविधा विकत घेतो, वैज्ञानिक चिंतन करत नाही.

२.

                               ‘देबशिशु’ या चित्रपटाच्या चिंतनानं एका कवितेला जन्म दिला. ही कविता एक आविष्कार म्हणून इथं मुद्दाम देत आहे.  

एका विटीत दोन कोल्या...

एकमेकाला चिकटलेलं जुळं..

इवसं वा दिव्यांग

जन्मताच कोणी मुक्‍ती देतं

गळ्याला नख लावून

रस्त्यात जीवंत हेळना

वा उसनं संगोपन करून

कोणी तिकीट लावतं जत्रेत

फक्‍त चरितार्थ नव्हे

खोर्‍यानं पैसे ओढण्यासाठी...

चार हात... चार पाय.. दोन तोंडं..

पाठीलापाठ चिकटली म्हणून

मादी देह एक..

आणि दोन भिन्न 

गर्भाशयांसाठी

दोन भिन्न योन्या

संबधोत्सुक... संभोगोत्सुक...

पुन्हा इवसंच जन्माला घालण्यासाठी की काय...

- एक नर घिरट्या घालतोय!...

एका विटीत

दोन कोल्या...

(आणि जत्रेत व्यावसायिक तिसरी..)

मारता येतील म्हणून...

                               तीन तोंडं, सहा हात असं (यापेक्षा थोडेफार अवयव कमी जास्त) काहीतरी वेगळंच जन्माला आलेलं बालक आजही ग्रामीण भागात तिरस्कृत ठरतं. आपल्यावर पुढं काही बला येणार आहे असा हा अपशकुन समजला जातो. असं बालक जास्त दिवस जगत नाही असा सर्वत्र समज. जन्माला येताच अशा जीवंत बालकाला ग्रामीण भागात जंगलात- रस्त्यावर टाकून देण्यात येतं. हे बालक अशा पध्दतीनं टाकून देण्यापेक्षा कोणी मागतं म्हणून त्याला सहज दिलं जाऊ शकतं.                  

                              पण हा चित्रपट पाहून लगेच ही कविता लिहिली नाही. एक

वेगळा अनुभव म्हणून हा चित्रपट मनाच्या कप्प्यात खूप दिवसांपासून पडून होता...

                              अशातच दूरदर्शनवरील ‘सुरभी’ या मालिकेत एकमेकांच्या पाठीला चिकटलेल्या दोन जुळ्या तरूण बहिणी दाखवण्यात आल्या. त्या मुलींचा उपयोग, यात्रेत तिकीट लावून लोकांना दाखवत पैसा कमवण्यासाठी, स्वत: त्या मुलींचा बापच करत असल्याचं समजलं. या दोन्ही मुलींशी लग्नाला इच्‍छुक असणार्‍या एका तरूणाचीही मुलाखत दाखवली. मुलींचा बाप मुलींच्या लग्नाला नकार देतो. कारण त्या मुली त्याच्या उत्पन्नाचं साधन होत्या. त्या एकमेकींना चिकटलेल्या जुळ्या मुलींशी लग्न करून हा तरूणही मुलींच्या बापाप्रमाणेच जत्रेत त्यांच्या प्रदर्शनानं पैसा कमावणार असल्याचं उघडपणे बोलून दाखवतो... म्हणजे या मुलींच्या लग्नानंतर पैसे कमवणारा मा़लक तेवढा बदलणार. आधी त्यांचा बाप पैसे कमवायचा, लग्नानंतर नवरा पैसे कमवणार!  

                              हे ‘सुरभी’त पाहून- ऐकून ‘देबशिशु’ चित्रपटाची आठवण पुन्हा ताजी झाली... मनाच्या अशा अवस्थेतच ‘एका विटीत दोन कोल्या’ ही कविता लिहिली गेली.

                              तरीही ही कविता म्हणजे चित्रपटाचा सारांश नाही आणि ‘सुरभी’त पाहिलेल्या दृश्याचं सरळ वर्णन नाही... अथवा या विवेचनाच्या आधारानंच ही कवि‍ता वाचली पाहिजे असंही नाही. हे संदर्भ पुसून टाकले तरी कवितेनं शिल्लक राहिलं पाहिजे. वरील दोन्ही गोष्टी फक्‍त कवितेच्या निर्मितीला कारणीभूत ठरल्या म्हणून त्यांचा निर्देश. हा काव्याविष्कार जर ‘कविता’ असेल तर तिच्यातून अजून काही ‘अर्थ’ दृगोचर झाले पाहिजेत... आणि ते अर्थ उलगडून दाखवणं हे कवीचं काम नाही... समीक्षकांचं आहे... कवी सांगेल ती फक्‍त कवितेची स्थूल निर्मिती प्रक्रिया...

                              या कवितेत दोन महत्वाचे अहिराणी शब्द आपोआप उपयोजित झाले आहेत... एक- ‘इवसं’ व दोन- ‘कोल्या’... हे दोन्ही शब्द कवितेत प्रभावी प्रतिकांचं काम करतात...

                              ‍विचित्र बालक जन्माला आलं की त्या बालकाला ग्रामीण भागात- अहिराणी भाषेत ‘इवसं’ म्हणतात. ज्या घरात ते जन्माला येतं त्या घरात ही घटना अशुभ समजली जाते... असं विचित्र बालक जन्मल्यानंतर सहसा जगत नाही असा सार्वत्रिक समज आहे. (का जाणूनबुजून जगू दिलं जात नाही?) आणि असं बालक वाचलंच तर (कोणाला समजू न देता) त्या घरातील लोक त्या बाळाच्या ‘गळ्याला नख लावून’ मारून टाकतात वा सुनसान रस्त्यावर नेऊन ठेवतात. ग्रामीण भागात अशा घटना नेहमीच घडत राहतात. हा अमानुषपणा आहे.

                              दुसरा शब्द ‘कोल्या’. मूळ अहिराणी ‘कोली’ या शब्दाचं कवितेत ‘कोल्या’ हे अनेकवचन झालं. विटीदांडू खेळतांना जमिनीवर जो छोटासा लांबट खड्डा खोदला जातो त्याला ‘कोली’ म्हणतात.

                              या कवितेच्या समीक्षेसाठी आणि अनेकार्थतेसाठी या दोन संज्ञांचा आधार घेणं- विचार करणं आवश्यक ठरावं, असं वाटतं.

          (संपृक्त लिखाण, दिवाळी अंक, नोव्हेंबर 2023 मध्ये प्रकाशित लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/