बुधवार, ३१ मे, २०१७

विवाह: परंपरा आणि प्रतिष्ठा





-         डॉ. सुधीर रा. देवरे

      विवाह कसे छोटेखानी असावेत, लग्न खर्च कसा कमी असावा, हुंडा घेणे बेकायदेशीर आहे अशा चर्चा नेहमी ऐकू येतात. पण प्रत्यक्षात परंपरा टाळण्याची उदाहरणे क्वचितच पहायला मिळतात. हा लेख दुसर्‍याला सांगण्यासाठीचा केवळ उपदेश नाही. आत्मप्रौढीचा दोष पत्करून मी माझ्या मुलीच्या विवाहाबद्दल बोलतो. (आधी केले मग सांगतोय):
      माझ्या मुलीचा विवाह ठरवताना मुलीच्या संमतीने मी काही अटी घातल्या होत्या. हुंडा देणार नाही, सोने-नाणे नाही, मानपान नाही, वरमाया नाही, वाजंत्री नाही, मिरवणूक नाही, घोडा नाही, पत्रिका नाही, गर्दी नाही, आहेर नाही, फटाके नाहीत आणि लग्न साध्या पध्दतीने फक्‍त दोन कुटुंबातील माणसांत लावायचे. ज्या ज्या कोणाला ह्या अटी मान्य असायच्या त्यानांच फक्‍त घरापर्यंत येऊ दिले.
      अटी ऐकून नातेवाईक आणि मित्र म्हणायचे, असे शक्य होणार नाही. तुम्हाला माघार घेऊन तडजोड करावी लागेल. मी ठाम राहिलो. शेवटी माझ्या अटी मान्य करणारे चांगले स्थळ मिळाले. चांगली माणसं मिळालीत. मुलीने साथ दिल्यामुळेच मला असे करता आले.
      मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मी मांडव घातला नाही. म्हणून एक वा अर्धे हिरवंगार झाड वाचले. वाजंत्री लावली नाही. म्हणून आजूबाजूच्या भागात ध्वनी प्रदुषण झाले नाही. नवरदेवाकडचे लोक सायखेडं घेऊन येतात त्यांना नाही म्हणालो. त्यांची दगदग वाचली. नातेवाईकांना आणि मित्रांना मांडव आणि लग्नासाठी दोन दिवस द्यावे लागले असते. त्यांचा एक दिवसाचा वेळ वाचला. घरच्या घरी हळद लावली. (हळद लावण्याचा कार्यक्रम आता कमर्शिअल झाला आहे). अशा बारीक सारीक अनेक बाबी सागंता येतील. असो.
      पूर्वी तीन दिवसाचे लग्न असायचे. तिसर्‍या दिवशी नवरदेव- नवरी तोंड धुवायला जाणे, मांडवफळ (आहेराचा कार्यक्रम), घरोघर चहापाणीला जाणे, गावभर मिरवणूक वगैरे. लग्नातला हा तिसरा दिवस आता लुप्त झाला. त्याप्रमाणे लग्नाआधीच्या दिवसाचा मांडव कार्यक्रमही बंद व्हायला हवा.
      हुंडा विरोधी कायदा 1961 ला झाला आणि हुंडा घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे, हे प्रत्येकाला माहीत असलं तरी छुप्या पध्दतीने सौदे केले जातात. (मुलीच्या विवाहानंतरही काही वर्ष प्रथेच्या नावाखाली अनेक प्रकारच्या न परवडणार्‍या बोळवणी करत रहाव्या लागतात. हा ही एक हुंड्याचाच प्रकार आहे.) वधू आणि वर यांचे सामाजिक स्थान एकच असताना वराकडील लोकांना मानपान देण्याचा प्रकार कधीपर्यंत चालणार. आज काळ बदलला. मुलींची संख्या घटली. (मुलींचीं संख्या कमी होण्यामागे अशा फालतू प्रथाच कारणीभूत आहेत!) मुलांप्रमाणे मुलींचे उच्च शिक्षण केले जाते. शिक्षणाला पैसा लागतो. स्त्रियाही आयुष्यभर पुरूषांसारख्याच नोकर्‍या- व्यवसाय करून कुटुंबासाठी पैसे कमवतात, (तरीही स्वयंपाक, धुणी, भांडी, झाडझुड, स्वच्‍छता, मुलांचे संगोपन अशी बरीच कामं फक्‍त महिलांचीच). समजा हुंड्याची प्रथा उलटी करण्यात आली. म्हणजे मुलाने मुलीला हुंडा द्यायचा, तर वधूपिता हुंडा घेईल का? नाही घेणार. त्याला ते लज्जास्पद वाटेल. तसे वराकडील लोकांना हुंडा घेणे कमीपणाचे वाटले पाहिजे. (मुलांकडून मुलीने हुंडा घेतला पाहिजे अशी टोकाची भूमिका न घेता मुलाने मुलीकडून हुंडा घेऊ नये.)
      विवाह खर्च वधूच्या वडलांनीच का करावा? लग्नात भरमसाठ खर्च करू नये. थोडाफार करायचा झाला तर तो दोन्ही कुटुंबांनी का करू नये. मुलगी आणि मुलगा असा आज भेद करायचा नसेल तर यापुढे आजपर्यंत चालत आलेल्या चुकीच्या प्रथांविरूध्द ठाम राहून बंड करायला हवे.  
      लग्नाच्या पंक्‍तीत जेवणावर प्रंचड खर्च केला जातो. पण वाया जाणार्‍या अन्नावर कोणीच बोलत नाही. पत्रावळीत मावत नाही इतके पदार्थ बनवले जातात. अन्न तसेच टाकून लोक निघून जातात. बफे जेवणामध्ये अन्न वाया जात नाही असा समज आहे. पण सर्वात जास्त अन्न बफे जेवणात वाया जाते. लोक हवे तसे प्रचंड वाढून घेऊन उरलेले अन्न टाकून देतात. भारतात वीस कोटी लोक रोज अर्धपोटी वा उपाशी झोपून जातात. या पार्श्वभूमीवर लग्नातल्या जेवणावळीकडे पहावे म्हणजे यातली भयानकता दिसून येईल.
      काही पैसेवाले लोक आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्नात भरमसाठ पैसा खर्च करतात. समाजात त्यांचा कित्ता गिरवत ज्यांची ऐपत नाही ते लोकही शेती विकून- कर्ज काढून मुलींचे लग्न करतात. समाजातल्या अशा वाईट प्रथा घालवण्यासाठी प्रत्येकाने आपल्यापासून सुरूवात करायला हवी.
      (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

रविवार, १४ मे, २०१७

विरगावचा भोवाडा



 
 
- डॉ. सुधीर रा. देवरे

      मी लहान होतो तेव्हा दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत- वैशाख महिण्यात आमच्या विरगावला भोवाडा व्हायचा. अजूनही भोवाड्याची परंपरा विरगावला कायम असली तरी पूर्वीसारख दरवर्षीच सातत्य आता उरलनाही. चैत-वैशाख म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यात शेतकर्‍यांना फारशी कामं नसतात. म्हणून खेड्यापाड्यांवर उन्हाळ्यातली लोकरंजन भोवाड्याची लोकपरंपरा आताआतापर्यंत टिकून राहिली असावी. मात्र अलिकडे रंजनाचे अनेक माध्यमं उपलब्ध झाल्याने हा लोकपरंपरेचा प्रकार क्षिण होऊ लागला.
      भोवाडा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून गावकर्‍यांमध्ये भोवाड्याचा उत्साह दिसून येत असे. चैत पुनवेला गावातून भोवाड्याची दांडी मिरवून पेठगल्लीतील भोवाड्याच्या नियोजित ठिकाणी पूजा- अर्चा करून ही दांडी रोवली जात असे. सागाच्या लाकडाच्या दांडीच्या वरच्या टोकाला वाळलेल्या रोयश्याचे गवत बांधून तयार केलेली दांडी वाजत गाजत नाचवत तिची मिरवणू गावभर काढली जात असे. यामुळे गावात भोवाडा होणार असल्याची वर्दी संपूर्ण गावाला मिळत असे.
      भोवाड्याच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सरूवात होण्याच्या दोन दिवस आधी गावात सोंगं आणली जा. विरगावजवळ खामखेडा नावाचं एक गाव आहे तिथून ही सोंगं (मुखवटे) भाड्याने आणली जात. दोन बैलगाड्यांमध्ये मोडतोड होणार नाही अश काळजी घेत ही सोंगं आणून चावडी जवळील शाळेत ठेवली जात असत. सोंगं पाहण्यासाठी आमच्यासारख्या लहान मुलांसोबत गावातील थोराडही त्या खोलीभोवती गर्दी करायचे. सोंग याचा अर्थ मुखवटा. कागदाचा भिजलेला लगदा आणि त्याला चिकटपणा येण्यासाठी मेथीचं पीठ एकत्र कालवून सोंगं तयार केली जात. काही सोंगांना मोठमोठ्या ताट्याही असत. ह्या ताट्या टोकराच्या म्हणजे बांबूच्या कामट्यांपासून बनवलेल्या असत. रावण, विराट, आग्यावेताळ अशा सोंगांना मोठ्या आकाराच्या ताट्या असत.
      भोवाडा सरू होण्याच्या दिवशी चावडीजवळ एकेका सोंगांचा लिलाव करण्यात येत असे. हा लिलाव मात्र फक्‍त एका रात्रीसाठीच अस. भोवाडा संपल्यानंतर पहाटेला दुसर्‍या दिवशीच्या भोवाड्यासाठी सोंगांचा पुन्हा लिलाव करण्यात ये. सर्वात जास्त बोली बोलणार्‍याला ते सोंग नाचवण्याचा मान मिळ. ह्या पैशांमधून भोवाड्याचा खर्च भागवला जात असे. सोंगांचं भाडं, टेंभ्याचं रॉकेल, सांबळ वाद्याचे पैसे, तमाशाचे पैसे, टेंभा धरण्यासाठी लावलेली माणसं या सर्वांचा पगार ह्याच लिलावाच्या पैशातून दिला जात असे.
      सोंग घेणार्‍या माणसाला सोंग बांधण्याअगोदर रात्री त्याला सजवतात. म्हणजे गणपतीच्या सोंगासाठी त्याला पितांबर नेसवतात. एकादशीचं सोंग घेणार्‍या माणसाला लुगडं नेसवतात, दागिने घालतात. मेकअप करतात.
      भोवाड्यात सर्वप्रथम बेलबालसलाम नावाचं तीन शिपायांचं सोंग निघतं. तोंडाला रंग दिल्याने यांच्या तोंडाला सोंग बांधण्याची गरज उरत नाही. हे शिपाई भोवाडा सुरू करण्यासाठीचे सूत्रधार असत. हे चावडीपासून पूर्वेकडे नाचत येऊन वडाच्या झाडापर्यंत येऊन परत फिरत आणि भोवाड्याच्या मध्यभागी येऊन होऽऽ असं म्हणत. असं म्हणताच सांबळ वाद्य बंद होत असे. शिपाई म्हणत, गणपतीची सवारी येऊ येऊ करीत आहे होऽऽ आणि पुन्हा वाद्य वाजू लागत. शिपाई नाचत चावडीकडे निघून जात. यानतर मग धोंड्या, गणपती, सरस्वती, दत्तात्रेय, एकादशी, दुवादशी, त्रयोदशी, खंडेराव, मगरमासा, कच्छ, मच्छ, तंट्याभील, विराट, रावण, वराह, मारूती, बिभिषण, आग्यावेताळ, हुरनारायन (नरसिंह), दैत्य, नंदी, अस्वल, चुडेल, इंद्रजित, जांबुवंत, नरशू, विरभद्र, चुडेल-डगरीन, बाळंतीण बाईची खाट, चंद्र, सूर्य अशी सोंगं येत. ही सोंगं पेठगल्लीत साधारणत: दोनशे मीटरपर्यंत नाचत पुढे जा आणि तसंच परत येत. प्रत्येक सोंग नाचण्याच्या सांबळावर वेगवेगळ्या चाली लावाव्या लागत. त्या चालींवर ती सोंग नाचत. पेठ गल्लीत अर्थात गावच्या मुख्य गल्लीत हा भोवाडा होतो. गल्लीच्या दोघं बाजूच्या ओट्यांवर, जमिनीवर खाटा टाकून, गोणपाट अंथरून संपूर्ण गाव आपल्या लेकराबाळांसह भोवाडा पाहण्यासाठी गर्दी कर. बाया-माणसं, म्हातारी-कोतारी, लहान सहान पोरं अशी ही गर्दी अस. तीन रात्री संपूर्ण गाव जागरण करून हा भोवाडा पाहत असे. भोवाडा पाहण्यासाठी आजूबाजूच्या ददूरच्या गावाची माणसंही येत अस.
      प्रत्येक सोंगाच्या मागे-पुढे टेंभे घेतलेली दोन दोन माणसं असत. परंतु आग्यावेताळ सारख्या सोंगाला आठ टेंभे लावले जात. टेंभा म्हणजे मशाल. टेंभ्याच्या उजेडातच सोंगं पहावी लागत. त्यासाठी बत्ती किवा कंदील लावण्याची पध्दत नव्हती. चंद्रे या वनस्पतीच्या ल्या फांद्यांच्या एका टोकाला कापडांच्या चिंध्या बांधून ते रॉकेलमध्ये बुडवून पेटवतात. त्याला टेंभा म्हणतात. टेंभ्यांबरोबर एकजण रॉकेलचे उघडं डबं घेऊन चालतो. टेंभ्याचं रॉकेल संपत आलं की टेंभावाला जळता टेंभा रॉकेलच्या डब्यात बुडवून पुन्हा टेंभा चांगल्या पध्दतीने पेटवतो. अशा ह्या टेंभ्याच्या प्रकाशात रात्रभर भोवाडा चालतो.  
      एका सोंगानंतर दुसरं सोंग येतं. ह्या दोन्ही सोंगांमध्ये वेळ शांत जाऊ नये म्हणून त्या वेळेत तमाशावाले प्रेक्षकांचं मनोरंजन करत. गाणी, लावण्या, लोकगीतं, पोवाडा, नाच, नकला असे प्रकार या तमाशात असत. भोवाड्याच्या मध्यभागी भोवाड्याची दांडी रोवलेली असते, ‍ितेथे एका बाजूला हा तमाशा थाटलेला असायचा. पडद्याचा उपयोग केला जात नाही. मोकळे अवकाश हाच ह्या तमाशाचा पडदा असतो. ह्या तमाश्याजवळ दोन बत्त्या टांगलेल्या असत. सोंग येण्याचे सांबळ वाजू लागलं की हा तमाशा बंद होत असे आणि सोंग येऊन गेलं की पुन्हा सुरू हो.
      जवळजवळ मध्यरात्रीच्या आसपास आग्या वेताळाचं सोंग निघत असे. ह्या सोंगाचा आकार मोठ आणि क्राळविक्राळ अस. त्याच्या उघड्या तोंडातल्या मोठ्या दातांतून लालभडक जीभ लोंबकळताना दिस. कंबरेला कांबडी रिंगन तयार करून त्याला चोहोबाजूंनी टेंभे लावलेले असत. दोन्ही हातात दोन मडके असतात. त्यातून जाळ निघत अस. हे सोंग घेणारी व्यक्‍ती गरजेपुरत अंग झाकून बाकी उघडीबंब अस. त्या उघड्या अंगावरच लालभडक रंगाचे पट्टे ओढलेले असत. असा आग्यावेताळाचा भयानक अवतार सर्वांना घाबरवून सोडत असे. वेताळ म्हणजे भुतांचा राजा. वेताळाचं सोंग भोवाड्याच्या मध्यभागी आलं की त्याची पूजा करून त्याला नारळ फोडलं जात असे.
      आग्या वेताळाचं सोंग निघण्यापूर्वी वातावरण निर्मितीसाठी चुडेलींचा खेळही दाखविण्यात येत असे. चुडेल ही ग्रामीण लोकांची काल्पनिक संकल्पना आहे. स्त्री लिंगी भूत म्हणजे चुडेल. भीती वाटेल असा विद्रुप काळा चेहरा, मोकळे सोडलेले केस, वेडेवाकडे शरीर अशी ही चुडेलीची संकल्पना आहे. चुडेलीचं हे सोंग देवराव महाले नावाचे गृहस्थ अप्रतिम साकारायचे. त्यांनी घेतलेलं सोंग बघून खरोखरची चुडेलही घाबरली असती इतका तो अभिनय अप्रतिम असायचा. केवळ रंगरंगोटी, अंगावरचे कपडे, हातात कडूनिंबाचा पाला आणि बीभत्स नाच याच्या बळावर ही चुडेल सर्वांना घाबरवून सोडत असे. चुडेलींची संख्या तीन चार पर्यंत असूनही देवराव महालेची चुडेल भाव खाऊन जायची. चुडेली पेठेतल्या कोणत्याही बोळतून एकदम भोवाड्यात प्रवेश करायच्या. म्हणूनच त्यांची दहशत भोवाड्यात सर्वाधिक असायची. चुडेली निघायच्या अगोदर भोवाड्याच्या मध्यभागात एक गवळी आणि गवळण लोणी काढायचं नाटक करत. तेव्हा ते गाणीही गात असत:
घुसळन घुसळन दे बाई, लोनी अजून का नाही
लोनी येईना ताकाला, माझा गवळी भूकेला
      ही लोणी खाण्यासाठी अचानक चुडेली निघत. चुडेलींच्या नाचानंतर आग्यावेताळ निघत असे. या चुडेलींच्या खेळाला आग्यावेताळची सपातनी असं म्हणत.    
      संध्याकळची जेवणं आटोपल्यावर भोवाडा सुरू झाला की सकाळी सूर्योदयाच्या वेळी बंद व्हायचा. रात्र संपूनही सोंगं मात्र संपत नाहीत, म्हणूनच रात थोडी सोंगं फार अशी म्हण रूढ आहे. ही म्हण मराठीतही रूढ झाली आहे. म्हण ही लोकपरंपरेंकडूनच भाषेला मिळालेली देणगी असते. अशा प्रकारच्या अनेक म्हणी/ वाक्प्रचार भाषेत लोकपरंपरतून आले आहेत.
      चंद्र, सूर्य, मारूती, बिभिषण, जांबुवंत, इंद्रजित, नरंसिं, देवी ही सोंगं फक्‍त शेवटच्या रात्रीच निघत. चंद्र-सूर्य दिवस उगवण्याच्या वेळी निघत. नरसिंहाचं सोंग पूर्वेकडून निघत असे. ह्या सोंगासाठी कागदांचा एक मोठा पडदा तयार केला जा. तो पडदा दोन्ही बाजूंनी लोक धरून ठेवत आणि नरसिंहाचं सोंग तो पडदा फाडून बाहेर ये. नरसिंह अवतार लाकडी खांबातून बाहेर आला या कथानकाला अनुसरत भोवाड्यात तो कागदाचा पडदा फाडून बाहेर येतो. नरसिंह जमिनीवर लोळण घे. पुन्हा उठून हातात ढाल असलेल्या माणसावर धावून जा. आपल्या हातातल्या लोखंडी कड्या त्याच्या हातातील ढालीवर आपटून जमिनीवर लोळण घे. त्याच्या मागेपुढे हातात ढाल घेतलेले दोन लोक असत.
      मग शेवटी सकाळी देवीचं सोंग निघत असे. दुपारपर्यंत सर्व गावभर ते मिरवलं जातं. देवीचं सोंग फक्‍त भोवाड्यापुरतं नाचत नाही. भोवाड्याच्या सुरूवातीपासून सकाळी ते निघालं की संपूर्ण गावातून मिरवणूक झाल्याशिवाय त्याची सांगता होत नसे. घरोघरी देवीची आरती, पूजा केली जात असे. देवीचं सोंग एकदा बांधलं की गावभर मिरवणूक पूर्ण होईपर्यंत सोडता येत नाही. म्हणून सोंग घेणार्‍याचा थकवा घालवण्यासाठी सोंगाच्या तोंडातून गव्हाच्या काडीने त्याला दूध पाजलं जात होतं. मिरवणूक पूर्ण होईपर्यंत त्याला काही खाता येत नसे. घरोघर देवीची पूजा करून खणानारळाने तिची ओटी भरली जात असे. संपूर्ण गावातून मिरवून झाली की जिथून भोवाडा सुरू होतो तिथे आणून पूजेनंतर देवीचं सोंग सोंडलं जायचं. तोपर्यंत त्या दिवसाची तिसरी प्रहर टळून जायची.
      देवांसोबत दैत्यांचेही सोंगांमधून अशा पध्दतीने दर्शन दाखवून गाव आणि परिसरातील लोकांचे मनोरंजन करत आमच्या गावातील तीन दिवसाच्या पारंपरिक भोवाड्याची सांगता होत असे.  
      (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/