शनिवार, ८ मार्च, २०१४

वातावरण बिघडले आहे! सावधान !!!


                                                                                         -         डॉ. सुधीर रा. देवरे

       आज देशात वातावरण बदलले आहे. भौगोलिक वातावरण जसे बदलले आहे तसे देशातल्या जनमानसातही काही तरी बदल झाल्याचे स्पष्ट दिसते. काही तज्ज्ञांच्या मते तर हे वातावरण बदलले नसून बिघडले आहे. या बिघडलेल्या वातावरणामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहेच आणि देशातल्या नागरिकांच्या शारीरिक व्याधीही वाढल्या आहेत. या नैसर्गिक वातावरणाच्या फटक्याप्रमाणे देशातल्या गोडी गोडी वातावरणाचा देशातील नागरिकांना अजून मोठा फटका बसतो की काय अशी भीती वाटणेही रास्त आहे.
         शेवटचा दिवस गोड व्हावा असे संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे संसदेच्या शेवटच्या दिवशी आपले सगळे लोकप्रतिनिधी किती शालीन आहेत याचे दर्शन देशवासियांना घडले. प्रत्येक सत्रात असे वातावरण आपल्या संसदेत दिसले असते तर कितीतरी पडून राहिलेली कामे मार्गी लागली असती आणि विकासाने देश पुढे गेला असता. सभागृहाचे कामकाज संपताच बाहेरही अचानक अकल्पित गोष्टी घडू लागल्या. अनेक शत्रूंनी हात मिळवत दोस्त्या केल्या. ज्यांनी आयुष्यभर कधी राम म्हटले नाही अशा काही फक्त नावाने राम असणारे लोक राम भक्तांना राम राम म्हणत लोटांगण घालू लागलीत. (प्रत्येक निवडणूकीआधी असे आयाराम गयाराम आपले सौदे करून घेतात.)
         यांना असा अचानक साक्षात्कार होण्याचे कारण काय असावे? समुद्रात कुठे लाट दिसत नव्हती. अजूनही दिसत नाही. मात्र हवा बदललेली दिसते. हवेची दिशा बदललेली दिसू लागली. हवेतल्या प्रमुख झाडाची उंची वाढलेली दिसू लागली. झाडाला पहायला लोक गर्दी करू लागले. काय सांगावे, या झाडाला उद्या फळे येऊही शकतात. या शंकेला दुजोरा देण्यासाठी देशातला मिडियाही धावून आला. झाडाची उंची वाढल्याची मिडिया ग्वाही देऊ लागला. मग आजूबाजूची खुरटी झाडी मनातल्यामनात म्हणू लागली, पाच वर्षे विजनवासात जाण्यापेक्षा या झाडाला फळे लागण्याची चिन्हे दिसतात तर खाऊ आपणही. नाहीतरी आपले ध्येय तेवढेच तर आहे!
         ही हवा आणि हे मोठमोठे पण खुरटे वृक्ष, यांना काही तत्वे आहेत का? सत्तेत येण्यासाठी जे लोक देवाला आणि थोर ऐतिहासिक पुरूषांनाही वापरून घ्यायला मागे पुढे पहात नाहीत ते सामान्य माणसांचे काय भले करतील? जे लोक सत्तेसाठी नुसते तत्वच सोडत नाहीत तर लाजही सोडतात अशा लोकांपासून म्हणूनच सावधान! 
         (या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा