शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

अ भा मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष निवड



 - डॉ. सुधीर रा. देवरे


         अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दरवर्षी निवडणूक होते. साहित्य संमेलन, संमेलनापूर्वी होणारी निवडणूक आणि निवडून येणारे अध्यक्ष यांच्या बातम्या सामान्य लोकच नव्हे तर रसिक-वाचक आणि आजचे साहित्यिकही पहात- वाचत असले तरी हा सगळा प्रकार त्यांना अगम्य असतो. आजचे अनेक साहित्यिक या सगळ्या प्रक्रियेपासून लांब आहेत. मराठी साहित्य संमेलन ‍हे अखिल भारतीय पातळीवरचे म्हटले जात असले तरी त्याचे मतदार फक्त एक हजाराच्या आसपास आहेत.
         पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई आणि बृहन्‍महाराष्ट्राच्या साहित्य संस्थांना ही मते वाटून दिलेली आहेत. या व्यतिरिक्त जिथे साहित्य संमेलन भरवले जाते त्या मंडळाला- संस्थेला विशिष्ट मतदार कोटा ठरवून दिलेला असतो. अनेक वेळा हा स्थानिक मतदार कोटाच अध्यक्ष निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरत असतो.
         प्रांतीय समतोल राखण्यासाठी हे मतदार वाटपाचे सामंजस्य आहे असे महामंडळाकडून सांगितले जाते. उदाहरणार्थ, पुण्यातला साहित्यिक अध्यक्षपदासाठी उमेदवार असेल आणि पुण्यातील साहित्यिक जर मोठ्या प्रमाणात मतदार असतील तर पुण्याचाच साहित्यिक संमेलन अध्यक्ष म्हणून निवडून येईल, अशा भीतीमुळे ही मतदारसंख्या त्या त्या विभागात समान वाटून दिली आहे, अशी महामंडळाच्या घटनेत तरतूद आहे म्हणे.
         पण साहित्यिक हा असा संकुचित विचार करणारा नसतो. तो प्रांतीय, जातीय विचार करून मतदान करेल हे गृहीतक चुकीचे वाटते. यात अपवाद असतील हे खरे असले तरी कलावंतांकडे- साहित्यिकांकडे असे संशयाने पाहणे चुकीचे ठरते. आजचे अनेक चांगले साहित्यिक या महामंडळाशी बांधील नाहीत म्हणून त्यांना मतदानाचा अधिकार नाही. आणि असे अनेक साहित्यिक या प्रक्रियेपासून लांब असल्यामुळे संमेलन अध्यक्षपदी चांगले साहित्यिक निवडून येतातच असे नाही.
         या निवडणूक सदोषतेमुळे आतापर्यंत निवडणुकीला उभे राहूनही इंदिरा संत, बा. भ. बोरकर सारख्या साहित्यिकांना हा मान शेवटपर्यंत मिळाला नाही तर जी. ए. कुलकर्णी, द. ग. गोडसे, दिलीप चित्रे आदी या प्रक्रियेपासून आयुष्यभर लांब राहिलेत. गणेश देवी, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर, विलास सारंग, किरण नगरकर, विश्वनाथ खैरे असे साहित्यिक यापुढेही या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे वाटत नाही. आणि उतरले तर ते निवडून येतील याची शाश्वती देता येत नाही. निवडणूक घेणे हे जीवंत लोकशाहीचे उदाहरण असले तरी अधूनमधून श्रेष्ठ आणि जेष्ठ साहित्यिकांना हा मान बिनविरोध पध्दतीने प्राप्त करून दिला तर साहित्य संमेलनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होऊ शकेल.
         कोणी सुचवतं की पुस्तकांच्या संख्येवरून अथवा पुस्तकांच्या खपावरून अध्यक्षांची निवड व्हावी. पण असे केले तर रहस्यकथा, भयकथा, लोकप्रियकथा म्हणजेच अशी साहित्य निर्मिती करणारे लेखकच फक्त साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होत राहतील, ही भीती आहेच. म्हणून  साहित्यिकांचा दर्जा, मतदारांचा दर्जा यांच्याबरोबरच मतदारांची संख्या वाढवून ही कोटा पध्दत निकालात काढणे गरजेचे झाले आहे.
  
   - डॉ. सुधीर रा. देवरे         
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

अभिजात मराठी





-         डॉ. सुधीर रा. देवरे

         आज जगात मराठी बोलणार्‍यांची संख्या 90 दशलक्ष इतकी असून मराठी भाषा जगातील 10 व्या क्रमांकाची भाषा समजली जाते. असे असूनही केंद्र सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का देत नाही असा प्रश्न इथल्या सर्वसामान्य मराठी माणसाला पडणे स्वाभाविक आहे. परंतु केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांनी त्यासाठी काही निकष ठरवले आहेत. अशा अटी पूर्ण झाल्या की त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून भाषेच्या अभिवृध्दीसाठी पाचशे कोटी रूपयांचे अनुदान केंद्र सरकार देते. आतापर्यंत तमीळ, तेलगू, कन्नड व संस्कृत या भाषांना केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
         अभिजात भाषेसाठी प्रमुख चार निकष असून त्यापैकी दोन अधिक महत्वाचे ठरतात. ते असे:  अ) भाषेची प्राचीनता दीड ते दोन हजार वर्ष जुनी असावी, ब) भाषेची मौलिकता आणि सलगता क) भाषिक आणि वाड्‍.मयीन परंपरेचे स्वयंभूषण- म्हणजेच भाषेत अभिजात ग्रंथ असावेत. ड) प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांची सांगड दिसायला हवी. त्यात ओढून ताणून आणलेला संबंध नसावा.
      वरील निकष पहाता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे अवघड नाही. मात्र त्यासाठी हे संशोधनात्मक पुरावे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला प्रभावीपणे पटवून देत सादर करायला हवीत.
         मराठीचा भाषिक प्रवास महारट्टी भाषा, मरहट्टी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी, आजची मराठी असा झाला आहे. मराठीत आज उपलब्‍ध असलेला आणि दोन हजार वर्ष जुना असलेला ग्रंथ म्हणजे गाथासप्तमी. पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेकडे सुमारे तीस हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध आहेत. त्यातील 80 ग्रंथ ‍दीड ते दोन हजार वर्ष इतके जुने आहेत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. रामायण - महाभारतातही शेकडो मराठी शब्द सापडतात. मराठी भाषेतला पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा आहे. तो ब्राम्ही लिपीतून असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटात हा शिलालेख आहे. तसेच लीळाचरित्र व ज्ञानेश्वरी या ग्रंथांना याआधीच युनोने अभिजात ग्रंथांचा दर्जा दिलेला आहे. मराठी भाषेच्या भौगोलिक क्षेत्रात ‍65 प्रकारच्या विविध बोली असून या बोलींनी प्रमाण मराठी दिवसेंदिवस श्रींमत होत आहे.
         या सगळ्या संशोधनानुसार मराठी भाषा इ. स. 600 ते 700 च्या सुमारास   अस्तित्वात आली असावी असा कयास बांधता येतो. असे जर सिध्द झाले म्हणजे हे   सगळे प्रभावीपणे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले तर मराठीला अभिजात   भाषेचा दर्जा मिळणे अवघड नाही.
   संदर्भ: 1) श्री. व्य. केतकर, राजारामशास्त्री भागवत, वि. का राजवाडे, इरावती कर्वे,
         कृ. पा. कुलकर्णी, दत्तो वामन पोतदार, वि. ल. भावे, रा. भि. जोशी या
         संशोधकांच्या संशोधनानुसार. तसेच महाराष्ट्र शासनाने या कामासाठी गठीत
         केलेली समिती.
         2) मराठी भाषा: उद्‍गम आणि विकास- कृ. पा. कुलकर्णी

       - डॉ. सुधीर रा. देवरे           
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३

शौचालय आख्यान




                                  - डॉ. सुधीर रा. देवरे

         आजपर्यंत नरेंद्र मोदी यांच्या एकही उद्‍गाराची दखल घ्यावीशी वाटली नाही. परंतु परवा ते जे काही आपल्या भाषणात देवालयाला जोडून शौचालयांविषयी बोलले आणि त्या उद्‍गारावर जी देशभर चर्चा सुरू झाली त्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. याआधी दोन व्यक्तींनी असा उल्लेख केला असला तरी त्यांच्या विशिष्ट दृष्टीकोनामुळे त्यांना अशोभनिय ठरवले गेले. मात्र देवालय अजेंड्यावर असलेल्या मोदींच्या शौचालय आख्यानामुळे देशात अनेक छोटे छोटे भूकंपाचे धक्के बसले. घरचा आहेर म्हणून हे धक्के बसणे गरजेचेच होते.
         शौचालयासाठी पायपीट करण्याचा ओझरता उल्लेख मराठी ललित साहित्यात मला तरी दया पवारांच्या बलुतं मध्ये वाचल्याचं आठवतं. त्याआधी साहित्यात असा उल्लेख आलेला असेल तर तो माझ्या तरी वाचण्यात नाही. माझ्या पंख गळून गेले तरी या 2007 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात हा प्रश्न मी सुचकतेने हाताळलेला आहे तर सहज उडत राहिलो या माझ्याच पण अजून प्रकाशित न झालेल्या पुस्तकात हा प्रश्न मी सविस्तरपणे लिहिला आहे.
         खरं तर हा प्रश्न इतका भयानक असूनही ललित वाड्‍मयाबरोबरच नाटक, चित्रपट आदी कलांमध्ये हा विषय गांभीर्यांने कधी उपयोजित झाला नाही आणि वैचारिक लेखनामध्येही तो जाणूनबुजून आणला जात नाही की काय अशी शंका यावी इतपत हा विषय वाळीत टाकलेला दिसतो.
         शौचालयांच्या अजिबात नसण्यामुळे, त्यांच्या कमतरतेमुळे वा अस्वच्छतेमुळे अनेक गंभीर प्रश्न उद्‍भवतात, हे जो या गोष्टीला मुकला आहे त्याच्याही लवकर लक्षात येत नाही. शौचालये उपलब्ध नसल्याने लज्जेमुळे महिलांचे तर शारीरिक व्याधीमुळे अपंगांचे अतोनात हाल होतात.
         देशातील अनेक मुलींनी शाळेत शौचालये नसल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडले आहे. आजही अनेक शासकीय आश्रम शाळांमध्ये मुलींना उघड्यावर अंघोळी कराव्या  लागतात. उघड्यावर लघवीला बसावे लागते. दिवसभर लघवीला जावे लागू नये म्हणून आजही शहरातील स्त्रिया सुध्दा गरज असूनही कमी पाणी पितात. दिवसा शौचासला बाहेर जावे लागू नये म्हणून आजही खेड्यातल्या महिला कमी जेवण घेतात. अनेक अपंग लोक शौचासची धास्ती घेऊन आपल्या खाण्यावर नको इतके नियंत्रणे आणतात.
         नैसर्गिक विरेचनाची अशी अनैसर्गिक कोंडी केल्याने अनेक शारीरिक व्याधींना लोक सामोरे जात राहतात. यात किडनी स्टोन पासून पोटांचे आजार या अवरोधाने होतात. तर उघड्यावरील शौचासमुळे जंतू संसर्ग आणि पाणी दुषीत होऊन अनेक रोगांना आपण निमत्रंण देत असतो.
         अभ्यासकांच्या एका निरिक्षणानुसार आजही भारतात फक्त 40 टक्के लोक आधुनिक शौचालये वापरतात. बाकी 60 टक्के लोक उघड्यावर शौचासला जातात. भारतातली ही स्थिती बांगलादेश आणि ब्राजिल यांच्यापेक्षा वाईट आहे हे ही आताच उजेडात आलंय. महासत्तेचे स्वप्न पाहणार्‍या भारतासाठी ही लज्जास्पद गोष्ट आहे.
         अगदी प्राचीन काळापासून भारतात देवालये तर आहेतच. भारतातच नाही तर सर्व जगात देवालये आहेत. आणि मार्केटींगसाठी रोज प्रचंड प्रमाणात देवालये उभारली जात आहेत. एकाच धर्माची नाहीत तर सर्वच धर्मांची ही देवालये आहेत. या सगळ्या भावनिक आणि श्रध्देच्या आभासातून जागे होऊन आपल्याला शौचालयांचा गांभीर्याने विचार करावाच लागेल. याचे श्रेय कोणी जरी घेतले तरी हरकत नाही. पण या भयाण वास्तवापासून आपल्याला खूप काळ दूर राहता येणार नाही. आणि नैसर्गिक अवरोधात दिर्घ काळ जगणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण असते.

- डॉ. सुधीर रा. देवरे            
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

भारत आमचा सगळ्यांचा देश आहे !




-         डॉ. सुधीर रा. देवरे


         भारताला स्वातंत्र्य देताना इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण केले. त्यांचे म्हणणे होते की भारत हे एक राष्ट्र नाही तर त्यात दोन राष्ट्रे आहेत. हिंदू आणि मुसलमान हे ते दोन राष्ट्रे. हा व्दिराष्ट्रवाद इंग्रजांनी जिनांना विश्वासात घेऊन राबवला. जिना नावाची ही व्यक्ती तशी पूर्णपणे आधुनिक जीवनशैलीतले जीवन जगणारी होती. जिना कधी नमाज पढत नव्हते आणि मुस्लीम धर्माला निषिध्द असलेले मद्यसेवनही  करायचे. मात्र मुस्लीम धर्माच्या नावाने जिनांनी आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेपोटी स्वतंत्र देशाची मागणी लावून धरली आणि लाखो लोकांच्या कत्तलीला कारण झाले.  शेवटी 15 ऑगस्ट 1947 ला भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकड्यांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य स्वीकारावे लागले.
         परंतु भारताचा इतिहास पाहता प्रदिर्घ काळापासून इथे हिंदू- मुसलमान गुण्यागोविंदाने नांदत होते. मुसलमान राजा असला तरी हिंदू लोक सुखी होते आणि हिंदु राजांच्या अमलाखालील मुस्लीम जनताही आनंदात होती. काही सत्ता थोड्याफार अपवाद असू शकतील. मात्र हिंदू मुस्लीम येथे एकत्र नांदूच शकत नाहीत असे वातावरण भारतात कधीच नव्हते. आपसात ज्या लढाया होत होत्या त्या दोन राजांच्या सत्ता संघर्षासाठी असत. धर्मासाठी नव्हे.
         भारतात आलेल्या मुस्लीम राजांनी इथली संपत्ती लुटून इंग्रजांसारखी मायदेशात पाठवली नाही. त्यांनी इथेच बस्तान बसवून आपली राजवट सुरू केली व या भूमीला आपली कर्मभूमी मानले. अनेक चांगल्या वास्तू निर्माण झाल्या. त्यापैकी एकच उदाहरण द्यायचे झाले तर आग्य्राच्या ताजमहालाचे देता येईल. जो आज जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
   या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा विचार केला तरी भारतात हिंदू- मु्स्लीम गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ज्या काही दंगली झाल्या असतील त्या राजकीय हेतूने प्रेरित होत्या. दोन्ही बाजूंच्या काही राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी अशा दंगली वेळोवेळी घडवून आणल्या आहेत, हे कोणाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.
      व्दिराष्ट्रवाद स्वीकारून मुस्लीमांसाठी स्वतंत्र पाकिस्तान निर्माण झाला तरीही  पाकिस्तानातील जनतेपेक्षा संखेंने जास्त असलेले मुस्लीम भारतीय प्रजासत्ताक पध्दतीने गुण्यागोविंदाने भारतात आपले जीवन व्यतीत करत आहेत. याचा अर्थ जिनांच्या मदतीने इंग्रजांनी जो व्दिराष्ट्रवादाचा मुद्दा मांडला होता तो काल्पनिक होता आणि तो आज पूर्णपणे निकालात निघाला आहे, हे स्पष्ट होते. म्हणून आज पाकिस्तानच्या निर्मितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
      या कृत्रीम देशाची निर्मिती भारत व्देषातून झाली असल्यामुळे पाकिस्तान हा त्याच्या निर्मितीपासूनच आपल्या अस्तित्वासाठी भयग्रस्त होऊन भारताच्या खोड्या काढतोय. भारतात भाडोत्री दहशतवादी तर घुसवतोच पण भारतातील धार्मिक सहिष्णुतेत व्यत्यय आणण्यासाठी काही वाट चुकलेल्या नागरीकांना चिथावून भारतात दंगे घडवून आणण्याचा मुद्दाम प्रयत्न करीत आहे. भारताच्या नागरीकांनाच भारताविरूध्द भडकावणे हा या कटाचा भाग असून त्याच उद्देशाने पाकिस्तान भारतात दहशतवादी पेरतो. भारतात हिंदू-मुस्लीम भांडणे होत राहिली तर पाकिस्तान निर्मितीचे कारण योग्य होते असे पाकिस्तानला आतंरराष्ट्रीय स्तरावर सांगता येते.
      पाकिस्तानची ही चाल लक्षात घेऊन इथल्या प्रत्येक राजकीय पक्षाने आणि नागरिकांनी त्याचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. भारतातला मुस्लीम हा प्रथम भारतीय नागरीक आहे. आम्ही सगळे भारताचे आहोत आणि भारत हा आमचा सगळ्यांचा देश आहे, हेच खरे सत्य आहे.

      - डॉ. सुधीर रा. देवरे            
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/