शुक्रवार, १५ मार्च, २०१९

पाणी आंदोलन




-         डॉ. सुधीर रा. देवरे

     या लेखात सटाणा शहराचा विचार केला असला तरी सर्वदूरच्या (महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र) वाचकांनी सटाणा हे शहर उदाहरणार्थ म्हणून समजावं. ज्यांनी दूरदृष्टीने जल व्यवस्थापन केलं नाही अशा सर्व गाव- शहरांत कमी अधिक प्रमाणात या वर्षी पाणी टंचाईची अशीच भीषण अवस्था आहे :    
     सटाणा शहराचा पाणी प्रश्न तीस- चाळीस वर्षांपासून तसाच टांगणीला पडला आहे. ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या वाक्‍प्रचारासारखं सटाण्याचं झालं आहे. पाणी टंचाई झाली की बोलायचं. नदीला आवर्तन सुटलं की आपल्यापुढे पाण्याचा प्रश्नच नाही असं वागायचं.
     जमिनीत बोरवेल करून जो तो आपापला पाणी प्रश्न सोडवू पाहतो. काही अपवाद वगळता बरेच लोक प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरतात. पाण्याची भरमसाठ नासधूस करतात. गावातल्या लोकांना प्यायला पाणी नाही, हे माहीत असूनही आपल्याला बंगल्यात गार वाटावं म्हणून भर दुपारी नळीने बंगल्यांच्या आजूबाजूला पावसाळा वाटावा इतकं पाणी सांडतात. टाक्या ओसंडून छताच्या पन्हाळातून पाणी वाहतं. नळी लावून रोज वाहनं धुतली जातात. (हे पाणी आता जास्त दिवस टिकणार नाही हे त्यांना माहीत असायला हवं.) नदीला पाण्याचं आवर्तन आलं, की शहरांच्या रस्त्यांतून- गटारीतून पिण्याचं पाणी वाहतं, पण नळ कोणी बंद करत नाही. पिण्यासाठी नदीत धरणांतून पाणी सोडलं की नदीकाठचे शेतकरी वीज मोटर लावून नदीचं पाणी शेतात खेचून घेतात. नदीकाठी विहिरी खोदून पाईप लाईन करून दूरवरून पाणी शेतात घेऊन येतात. आवश्यकते इतकं पाणी वापरायला हरकत नाही. पण अतिरेक होतोय. पाण्यासारखा पैसा खर्च करणे असा मराठी भाषेत पारंपरिक वाक्‍प्रचार आहे. मात्र या पुढे हा वाक्‍प्रचार उलटा करावा लागेल. आता पाणी पैशांसारखं काटकसरीने वापरावं लागेल.
     काही वर्षांपूर्वी प्रयत्न करुनही केळझर योजना बारगळली. चणकापूरच्या पाणी आवर्तनांवर सटाणा शहर पहिल्यापासून तग धरून आहे. हे आवर्तन फक्‍त सटाण्यासाठी नाही. मालेगावला याच गिरणा नदीतून पाणी पुढे वाहतं. मालेगाव पस्तीस किमी पुढे असूनही हे पाणी मालेगावला पुढील आवर्तनापर्यंत पुरतं. सटाण्यापेक्षा मालेगावची लोकसंख्याही जास्त आहे. मालेगावला पाण्याचे कोणतेच स्त्रोत नाहीत. तरीही तिथं पाणी टंचाई नाही. कारण आधीपासूनच दूरदृष्टीने तयार करुन ठेवलेले तिथं तलाव आहेत. मालेगावच्या तुलनेने सटाण्याच्या आसपास पाणी स्त्रोत आहेत. ते आपण आतापर्यंत अडवले नाहीत. मुक्‍तपणे वाहून जाऊ दिले. याचाच अर्थ सटाण्यात पाण्याची कृत्रिम टंचाई आहे. नैसर्गिक नाही.
     आता सटाणा शहर पुनंद जलवाहिनी योजनेच्या आशेवर जगत आहे. ही योजना पूर्ण झाली पाहिजे. कोणत्याही शहराला- गावाला सनदशीर मार्गाने पाणी मिळायला हवं. सटाणा तालुक्यातलं थोडंफार प्रमाणात पाणी पुनंद धरणात येतं, याचा अर्थ सटाण्याला पाण्यावर हक्क सांगता येत नाही’, असं कळवणवासी म्हणतात. समजा, तसं असलं तरी पिण्यासाठी पाणी मिळणं हा सटाणा वासियांचा हक्क आहेच. बागलाणचा पश्चिम भाग हा विधानसभेच्या कळवण मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. आमदार ए. टी. पवार हे बागलाणच्या मतदानामुळेही निवडून येत होते. ते अर्ध्या बागलाण तालुक्याचेही प्रतिनिधीत्व करीत होते, हे विसरून चालणार नाही. म्हणून त्यांनी निर्माण केलेल्या या धरणावर सटाण्याचा हक्क आहेच.
      नाशिक जिल्ह्यांतील धरणांमुळे संपूर्ण मुंबईची तहान भागते. गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं जातं. कर्नाटकातून तामिळनाडूला पाणी सुटतं. इतकंच काय चीनचं पाणी भारतात आणि भारताचं पाणी पाकिस्तानात जातं. मात्र कळवणचं पाणी सटाण्याला मिळू नये असं कळवणवासी म्हणतात! (नद्या, धरणं, भूगोल, खगोल ही राष्ट्रीय मालमत्ता असते. खाजगी नव्हे.) ह्या योजनेतून पाणी मिळेलच, अशी खात्री असली तरी आपण पर्यायी व्यवस्था आज राबवली पाहिजे. एकाच कुठल्यातरी योजनेवर विसंबून राहता कामा नये. (आतापर्यंत अशा होऊ घातलेल्या योजनांवर अवलंबून राहिलोत म्हणून आज हा भीषण प्रसंग उद्‍भवला.)
     ठेंगोड्याजवळील (गिरणा नदीत) आपल्या विहिरीजवळ (मातीचा का होईना) बांध घालायला हवा. तसेच आरम नदीत विशिष्ट अंतरावर चार बांध घालून पाणी अडवा- पाणी जिरवा योजना जन आंदोलनातून म्हणजे श्रमदानातून स्वयंत्स्फूर्तीने राबवू या. नदीकाठी दोन विहिरी खोदाव्या लागतील. (आरमकाठी कोणी विधींना जाणार नाही याचीही खबरदारी घ्यावी लागेल.) दोन्ही थड्यांवर झाडं लावून देवराई निर्माण करू या. या देवराईमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल, नदीतल्या पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही आणि देवमामलेदारांच्या मंदिराची शोभा वाढेल. (संदर्भ: ‘माणूस जेव्हा देव होतो’ ग्रंथ.) सटाण्याच्या आसपास सरकारी जमीन ताब्यात घेऊन पाण्याचा साठा करण्यासाठी तलाव उभारला पाहिजे. (जुन्या अमरधामजवळ आसपासच्या गावातील वा सटाण्यातील नागरिकांनी विहिरींसाठी जमिनी घेऊन शेतीसाठी जलवाहिन्या टाकल्या असतील; त्या पाणी टंचाई असतानाच्या काळात सक्‍तीने बंद करून पाणी पिण्यासाठी राखीव ठेवता येईल. पाणी विकणार्‍या वाहनांनाही इथून पाणी घ्यायला मनाई असावी.) पावसाळ्यातील पाणी वाहू न देता साठवलं पाहिजे. नदी नुसती नांगरली तरी खूप पाणी मुरतं आणि गावाजवळची पाणी पातळी उंचावते. बांध घातले तर त्याचा परिणाम लगेच दिसून येईल. रेन हार्वेस्ट योजना शहरांत राबवायला हवी. हे मी सर्व पाच वर्षांपासून मांडत आहे. पण अजून प्रतिसाद मिळत नाही.
     पृथ्वीवर जवळपास सत्तर टक्के पाणी व्यापलेला भाग आहे. हेच पाणी पाऊस रूपाने गोड होत आपल्याला मिळतं. म्हणून उरलेल्या तीस टक्के भागात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला नको. पण ते जगभर जाणवू लागलं आहे. याचं कारण मानवाची हावरट वृत्ती. माणसाने निसर्गाला अतोनात ओरबाडले- ओरबाडतो आहे. अजूनही वेळ गेली नाही. अशा वृत्तीवर संयम ठेऊन मानसाने निसर्ग जपला पाहिजे. जंगलतोडीला आळा घालून वृक्षरोपण व संवर्धन मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे. वाहून जाणारं पाणी जागोजागी अडवलं पाहिजे. जमिनीत जिरवलं पाहिजे. तेव्हाच पुढील पिढ्या पाणीदार जीवन जगू शकतील.
     सामाजिक बांधिलकी पाळणार्‍या सटाण्याच्या सर्व तटस्थ नागरिकांनी आता एक निर्णय घेतला. पाणी प्रश्न सुटला नाही तर या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा असा हा निर्णय आहे. हे हत्यार खूप प्रभावी ठरू शकतं. यात कोणतंही राजकारण नसून ही स्वयंस्फूर्त लोकचळवळ आहे. हे हत्यार सर्वसामान्य लोकांना उपसावं लागावं हे दुर्दैव आहे. पण पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी हा निर्णय नाईलाजाने नागरिकांना घ्यावा लागला. पाणी आंदोलन हे जन आंदोलन असेल. यात कोणी नेता नसेल. अध्यक्ष नसेल. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही. कोणाविरूध्दही नाही आणि कोणाच्या बाजूनेही नाही. हे आंदोलन फक्‍त पाणी टंचाईच्या विरूध्द आहे आणि हक्काचं पाणी मिळण्याच्या बाजूने आहे. सटाण्यातील सर्व नागरिकांनी यात उत्फूर्तपणे भाग घ्यायचा आहे. सर्वांनी आता श्रमदान करुन आपली तहान भागवावी, त्याला इलाज नाही.
     आधी सांगितल्याप्रमाणे उदाहरणार्थ म्हणून इथं सटाण्याची समस्या मांडली असली तरी, सर्वदूर जिथं जिथं अशी पाणी टंचाई आहे, त्या त्या गावा- शहरातील नागरिकांनी अशा पध्दतीने श्रमदानातून पाणी अडवा- पाणी जिरवा ही लोक चळवळ उभी करावी.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शुक्रवार, १ मार्च, २०१९

मानवतेचे शत्रू




- डॉ. सुधीर रा. देवरे

     आज सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट असेल तर ती जागतिक दहशतवाद! एखाद्या देशाने समोरून हल्ला केला तर त्याला तशाच कृतीने उत्तर देता येतं. आपल्याशी कोण लढतं, त्याचं बळ किती, हे आपल्याला कळतं.  पण दहशतवादाचं स्वरूप वेगळं असतं. दहशतवादी कपटाने हल्ला करत असल्यामुळे संखेने कमी असूनही ते खूप मोठं नुकसान करू शकतात. सैन्यालाच नव्हे तर सर्वसामान्य माणसांनाही लक्ष्य केलं जातं. एक दहशतवादी शेकडो बेसावध निशस्त्र लोकांना मारून मग स्वत: मरतो. आपल्याला  अजून जागतिक दहशतवादाचं स्वरूप समूळ कळलं नाही, हे अनेक घटनांमधून लक्षात येतं.
मानवतेचे शत्रू आपल्या उंबरठ्यावर उभे आहेत. अनेक दहशतवादी भारतात कार्यरत आहेत. काही दबा धरून बसलेत. केवळ इराक- सिरियाच नव्हे तर जर्मनी, फ्रांस, तुर्कस्थान, इराण, अफगानिस्तान, नेपाळ, बांगलादेश, समुद्री अशा मार्गाने दहशतवाद आपल्या दारावर धडका देत आहे. पाकिस्तानला दहशतवादाव्यतिरिक्‍त कोणतंच धोरण नसल्याने आपल्यासाठी हा देश कायमची डोकेदुखी होऊन बसला. पाकिस्तानच्या पंतप्रधानाला प्रत्यक्षात कोणतेही अधिकार नसतात. म्हणून त्यांच्याशी बोलणी करणंही नेहमी निष्फळ ठरतं.
दहशतवाद्यांचे डाव यशस्वी झालेत तर आपण जीवंत असलोत तरी असं लिखाण करायला स्वतंत्र राहणार नाही. एकतर दहशतवादाचं स्वरूप आपल्याला अजून नीट कळलं नाही, त्याचं गांभीर्य जाणवलं नाही वा आपल्या छोट्या मोठ्या जातीय- धर्मीय- राजकीय- सामाजिक स्वार्थांसाठी आपण दहशतवाद्यांचं अप्रत्यक्षपणे समर्थन करीत नसलो तरी कानाडोळा करीत असतो.
     जगात वहाबी पंथाचे लोक दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. हिंसेवर विश्वास असलेले कट्टर पंथीय लोक दुसर्‍यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात. सुन्नी शियांना मारताहेत. काश्मिरातल्या अमन सेतूवर भारत- पाकिस्तान व्यापार चालतो. ह्या व्यापाराचा फायदा घेऊन अनेक काळे उद्योग इथं सुरू असतात. तस्करी- हवाला मार्गाने आलेला पैसा दहशतवादी कृत्यात ओतला जातो. दलाल पैदा केले जातात. काश्मिरात कट्टरता- दहशतवाद उगवण्यासाठी पाकिस्तान (अनैतिक मार्गाने मिळवलेला) प्रचंड पैसा पाठवतो. म्हणून हा व्यापारमार्ग आता दहशती मार्ग होत चालला. शिया- सुफी हे नेमस्थ पंथ आहेत. यांची संख्या काश्मिरात कमी होत आहे. (काश्मीरमध्ये वाट चुकलेले लोक कमी आहेत, हे नेहमी लक्षात ठेवावं.)
     धर्म कोणताही असो- धर्म विकायला काढणारे लोक, धर्माचा शस्त्राप्रमाणे वापर करणारे लोक, धर्माचा सत्तेसाठी उपयोग करणारे लोक, धर्माचे भांडवल करणारे लोक, धर्माचा व्यवसाय करणारे लोक, धर्माची ढाल धरणारे लोक, धर्माचा व्यापार करणारे लोक, काही काळ यशस्वी होत राहतात. पण कायमस्वरूपी यशस्वी होत नाहीत; हे सत्य असलं तरी या दरम्यानचा काळ मानवतेसाठी फार भयानक असतो. हा काळ खूप मोठं नुकसान करून जातो. ते नुकसान कधीही भरून निघणारं नसतं.
     धर्मासाठी माणसं मारणार्‍याला फक्‍त नरक निश्चित असू शकेल. माणूसपणाचा आनंदही असे आतंकी या जन्मात घेऊ शकत नाहीत. दहशतवादी पशूसारखे मरतात. माणसाच्या उत्थापनासाठी निर्माण झालेल्या धर्माला काही लोक नरक बनवून टाकतात. मरणानंतरच्या सुंदर आयुष्याच्या अमिषाने कुत्तेकी मौत मरणार्‍या आतंकींना माहीत नसतं, की मेल्यानंतर त्यांना नरकात सुध्दा सरड्याचा जन्मही पुन्हा मिळणार नाही. चिरंजीव होणं आणि स्वर्गातल्या पर्‍या उपभोगायला मिळण्याच्या कल्पना करणारे फक्‍त मुर्खांच्या नंदनवनात सापडतील. तरीही अनेकांचे ब्रेनवॉश करून दहशतवादाचे कारखाने पाकिस्तानात राजरोस सुरू आहेत. त्याची आग आपल्याला बसल्या जागी दिसते. त्या आगीचा धूर आपल्यापर्यंत पोचला आहे. अशा मानवतेच्या शत्रूंना वेळीच रोखायला हवं.
            14 फेब्रुवारीच्या पुलवामा दहशती हल्ल्यानंतर आताच 26 फेब्रुवारी 2019 ला पाकिस्तानातील काही दहशतवादी तळ आपल्या वायूदलाच्या हल्ल्यांनी नष्ट करण्यात आले. पाकिस्तानच्या निरपराध नागरिकांना यात झळ बसणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. म्हणून हवाई दलाचे अभिनंदन. पाणी नाकातोंडाशी आलं होतं. अशा वेळी जगातला कोणताच देश स्वस्थ बसला नसता. असा वार करणं आवश्यक झालं होतं. अमेरिकेच्या बदलत्या परराष्ट्रीय धोरणांमुळे हे दोन सर्जिकल ट्राइक करणं आपल्याला शक्य झालं, हे ही लक्षात घ्यावं लागेल.
     मात्र या कारवाईमुळे दहशतवादी संपले असा समज करून घेणं चुकीचं ठरेल. उलट आता पूर्वीपेक्षा जास्त खबरदारी घ्यावी लागेल. (पाकिस्तान हा जबाबदार आणि नेक देश असता तर त्याने दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारताची मदत घेतली असती.) 27 फेब्रुवारीच्या सकाळपासून येणार्‍या बातम्या पुन्हा अस्वस्थ करणार्‍या होत्या. 28 तारखेला वैमानिक अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेच्या घोषणेने थोडा‍ दिलासा मिळाला. युध्द टाळून दहशतवादी कारवाया बंद करायला पाकिस्तानला भाग पाडलं पाहिजे. यासाठी आयात- निर्यात, वाघा सरहद्द, काश्मिरातला अमन सेतू, दळणवळण, कलाकार, क्रिकेट, हुर्रियत आदींवर निर्बंध घातले तरी खूप काही साध्य होऊ शकतं. (काश्मिरातले नेते सत्तेत असताना भारताच्या बाजूने बोलतात आणि सत्तेबाहेर असताना पाकिस्तानची सहानुभूती मिळवतात. अशा नेत्यांमुळे काश्मिरी नागरिक गोंधळतात. पाठिंबा देतानाच अशा नेत्यांना वगळून काश्मीरचा मुख्यमंत्री निवडायला हवा.) या हवाई हल्ल्यांचं देशात (कोणत्याही बाजूने) राजकारण होणार नाही, अशी आशा बाळगू या.   
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/