मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

हिंसेचे पाय

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

                    संपृक्त लिखाणचा दुसरा अंक म्हणजेच दिवाळी- ऑक्टोबर २०२२ चा हिंसा विशेषांक म्हणून प्रकाशित करण्याचा विचार आधीपासूनच जाहीर केलेला होता. यात प्रत्यक्ष हिंसा, राजकीय हिंसा, परराष्ट्रीय हिंसा (युध्द), सामाजिक हिंसा, कौटुंबिक हिंसा, भाषिक हिंसा, साहित्यातली हिंसा, मानसिक हिंसा, निसर्गातील हिंसा, चित्रपटातील हिंसा आदी सर्व प्रकारच्या हिंसेचा विचार अभिप्रेत होता.

                    प्रत्यक्ष हिंसेला नेहमी विरोध करणारे लोकही आपल्या बोलण्यातून अजानता भाषिक हिंसा करत असतात. मात्र आपण हिंसक वागलो, हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते, हे खूप भयानक आहे. उदाहरणार्थ,

                    एक : एका शहर होऊ घातलेल्या गावात एक संमेलन झाले. विविध क्षेत्रात महत्वाची कामे केलेल्या व्यक्तींचे तालुक्याच्या आमदाराच्या हस्ते संमेलनात सत्कार होत होते. या सत्कारांत पोलिओने अपंग असलेल्या एका युवकाचे नाव पुकारले गेले म्हणून तो त्याच्या विशिष्ट चालीत व्यासपीठाकडे चालू लागला. यावेळी आमदार महाशय त्याला पाहून एकदम स्पिकरवरच मोठ्याने बोलले, अरे हा तर पेंद्याच आहे! हे उद्‍गार ऐकून संपूर्ण सभागृह हसायला लागले. अशा वेळी त्या युवकाला काय वाटले असेल? तो त्याचा सत्कार झाला की अपमान? त्याच्या अपंगत्वाची जाणीव करुन देण्यासाठी त्याचा हा सत्कार होता का?    

                    दोन : एका कार्यालयात नवीन बदलून आलेला बॉस. बॉसच्या हाताखालचा शिपाई रंगाने सावळा होता. ऑफिसातल्या इतरांसह ओळख करून घेत बॉसने शिपायाला नाव विचारले. शिपाई म्हणाला, तेजेंद्र.

बॉस तात्काळ उत्तरला, अरे व्वा. तेजाचा इंद्र. तेच म्हटलं इतकं तेज कुठून पडलं ऑफिसात! आपण खूप मोठा विनोद केल्यासारखा बॉस इतरांकडे पहात जोरात हसला. काही सहकाऱ्यांनाही बळजबरी हसावे लागले. बॉस इथेच न थांबता पुढे म्हणाले, रंगाचं आपल्या हातात नाही, पण नाव ठेवणं आपल्या हातात असतं. तुझं नाव छान ठेवलं तुझ्या वडिलांनी! हा तर हिंसेचा कळसच झाला. पण याचे कोणालाही काही वाटले नाही. कारण अशा बोलण्याला आपण विनोद समजतो आणि असे बोलणाऱ्याला विनोदी माणूस. असा माणूस जर बॉस असला तर मग आणखीच कठीण. कर्मचाऱ्यांनी नको तिथे पुढे पुढे खुशमस्करी करणे वगैरे आलेच. त्या शिपायाच्या मनाचा विचार बॉसने केला नाही. शिपायाला काय वाटले असेल, हे कोणी त्याला विचारणार नाही आणि तोही कोणाला सांगणार नाही.

                    अशा अगणित हिंसा राजरोस, रस्तोरस्ती, घरोघरी होत राहतात आणि अशा घटनांचे आपल्याला काही विशेष वाटतही नाही. अशा हिंसा अगदी शाळेत- विद्यार्थी दशेत असल्यापासून आपण ऐकत असतो. काही वार आपण स्वत: झेलत- सोसत असतो. शिक्षकांकडून, समाजाकडून, शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून, नातेवाईकांकडून, मित्रांकडून आणि अगदी घरातल्याच अशा जवळच्या लोकांकडून ही हिंसा कायम होत राहते. आपण सहन करत राहतो. अशी हिंसा दुसऱ्यावर होत असेल तर केव्हा केव्हा आपण आपली अनायासे करमणूकही करून घेत असतो, हे भयानक असले तरी रोजचे सत्य आहे!

                    काळानुसार माणूस पुढे जसजसा सुशिक्षित होत जाईल तसतसा तो मानवी समाजात अधिकाधिक माणुसकीने वागेल, असे अनेक चांगल्या सकारात्मक विचार करणाऱ्या माणसांचे गृहीतक असते! पण आता कमी शिकलेले लोक हे राजकारणातील- सत्ताकारणातील गुंड आणि जास्त शिकलेले सशस्त्र दहशतवादी असे चित्र सर्वदूर दिसू लागले आहे. (असे विधान करताना अपवाद आपण कायम गृहीत धरत असतो.) असे रक्तरंजीत चित्र एखाद्‍दुसऱ्या देशातच पहायला मिळते असे नाही. अलीकडे असे हिंसेचे पाय जिकडे तिकडे जास्तीतजास्त प्रदेश पादाक्रांत करताना दिसताहेत. या हिंसक पायांना कोणत्याही देशाच्या सीमा रोखू शकत नाहीत. हे सगळ्याच क्षेत्रातील- सगळ्याच देशातील चित्र पाहून सामान्य विचारी माणसाला धडकी भरली आहे. 

                    मराठी साहित्यात अशा हिंसेचे प्रकट उपयोजन बहुतकरून झाल्याचे आढळत नाही. विजय तेंडुलकर यांची नाटके वगळली तर जाणीवपूर्वक हिंसेचे उपयोजन मराठी साहित्यात दिसून येत नाही. या गोष्टीची केवळ उजळणी करण्यासाठी या अंकाचा हा विषय केलेला नाही. आजचे जग, आजचा भारत, आजचा महाराष्ट्र आणि एकूण राजकारण- सत्ताकारण यांची दिशा नेमकी काय आहे, यावर भरभरून लिहून अंकासाठी साहित्य आले. तरीही भ्रमनिरास झाला.

                    वरील बहुतांश विवेचन झाले शाब्दीक- भाषिक हिंसेचे. पण प्रत्यक्ष हिंसेचे स्वरुप यापेक्षा कितीतरी पटीने भयानक आहे! प्रत्यक्ष हिंसा आपण रोज वृत्तपत्रांतून- टीव्हीतून पहात- वाचत असतो. अशा हिंसेचे प्रमाण आपल्याकडे संख्येने जास्त असल्याने भाषिक हिंसेकडे बघताना आपण उदार होतो की काय? अथवा भाषिक हिंसा ही हिंसाच नाही असेही अनेकांच्या सहज वागण्यातून दिसून येते.

                    विषय हिंसा असल्याने साहित्यकारांकडून साहजिकच अहिंसेवरही लिखाण अपेक्षित होते. साहित्यकारांनी या विषयावरील आपले लिखाण विपुल प्रमाणात पाठवले असले तरी या ना त्या कारणाने अनेक लेख- बरचसे साहित्य बाजूला ठेवावे लागले.

                    या अंकात अशा समग्र हिंसेचे काही ठळक पडसाद वाचायला मिळतील, तरीही ते खूप प्रामाणिक आणि महत्वपूर्ण आहेत. काही प्रातिनिधीक बाबी दिसतील. समष्टीतली समग्र हिंसा कोणीच, कुठेच शब्दांत पकडू शकत नाही, हीसुद्दा आपली मर्यादा आहे.

                    संपृक्त लिखाणसाठी कोणाकडूनही मुद्दाम साहित्य मागवले जात नाही. साहित्य पाठवायचे सार्वजनिकरित्या आवाहन करण्यात येते. या आवाहनाला साहित्यकारांनी प्रतिसाद देत आपले साहित्य आपणहून पाठवावे अशी अपेक्षा असते.   या अंकात सुरूवातीला हिंसेवरचे साहित्य घेतले आहे. नंतर कविता आणि कवितांनंतर हिंसा विषयावर नसलेले साहित्य समाविष्ट करण्यात आले आहे.      

                    हिंसा विशेषांकासाठी विचारणा करताच चित्रकार मित्र सरदार जाधव यांनी आनंदाने आणि लगेच खास मेहनत घेऊन चित्र काढून पाठवले. अंकातील साहित्यिकांचे आभार.

                    संपृक्त लिखाण’चा दिवाळी अंक Amazon, Flipkart वर पुस्तक स्वरूपात, तर kindle वर ई-बुक स्वरूपात (स्वस्तात) उपलब्ध आहे. अंक मागवण्यासाठी लिंक : https://notionpress.com/read/samprukt-likhan-two

                    (‘संपृक्त लिखाण दिवाळी अंक २०२२ चे संपादकीय. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/