शनिवार, १ जुलै, २०२३

गल‍िच्‍छ राजकारण आणि साहित्यिक

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

           सध्याचं राजकारण हे संवेदनशील मनाला भयानक व्यथीत करणारं आहे. उव्देगातून कितीही टाळलं तरी तत्कालीन घटना, प्रसंग, चिंतनातून काही प्रतिक्षिप्त क्रिया आपोआप आतून येत राहतात. या स्व-प्रतिक्रिया समविचारी मित्रांशी जोडाव्यात, समविचारी नसलेल्यांना दुसर्‍या बाजूची कल्पना देत वेगळ्या दिशेनं विचार करायला प्रवृत्त करावं, या विचारानं शब्दबध्द करून सोशल मीडियावर (जबाबदारीनं) पोस्ट केल्या जातात. हे कोणत्याही काळात नैसर्गिक तर आहेच पण आवश्यकही आहे. (देशाच्या व्यापक भल्यासाठी असलेल्या पोस्ट इथं अभिप्रेत आहेत. विकृत प्रतिक्रिया नाही.)

          राजकारणावर लिहिलेली माझी अशी एक पोस्ट वाचून एका वाचक- लेखक- मित्रानं पोस्टवर टिपणी लिहिली : आपल्यासारख्या साहित्यिकानं राजकारणासारख्या पोस्ट करणं मनाला पटत नाही सरजी! त्यापेक्षा मग पुर्णवेळ खुल्या मनानं अशा राजकारणात उतरून घाणेरड्या राजकारणाची स्वच्छता करण्याचं सर्व साहित्यिकांना आवाहन करा म्हणजे सगळे मिळून ते काम चांगल्या प्रकारे होईल. आपण म्हणता तसं घाणेरडं राजकारण जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र पोहचलेलं दिसतं.

          अशा प्रतिक्रिया वाचून अचंबीत होण्यापेक्षा यासाठी तयार रहावं, असा हा काळ आहे. या प्रतिक्रियेत महत्वाचा घटक साहित्यिक आल्यानं हा लेख लिहीत आहे. साहित्यिकांनी राजकारणापासून दूर रहावं म्हणजे काय? उलट सर्वसामान्य नागरिकांपेक्षा जनजागृती करणं हे साहित्यिकांचं विशेष कर्तव्य आहे. (आ‍णीबाणीच्या काळात दुर्गा भागवतांसह अनेक साहित्यिक- विचारवंत तत्कालीन सत्तेविरूध्द स्पष्ट भूमिका घेत होते.) कष्टकरी नागरिकांना त्यांच्या व्यस्ततेमुळं राजकारणातलं सगळंच तात्काळ कळतं- पोहचतं असं नाही. म्हणून साहित्यिकांनी गलिच्छ राजकारणावर अगदी ठरवून प्रहार करायला हवेत. जनहितार्थ वेळोवेळी शक्य असेल तिथं प्रबोधन करायला हवं. उठसुठ चोवीस तास घाणेरडं राजकारण खेळणार्‍यांवर मुद्दाम बोललं पाहिजे. भूमिका घेतली पाहिजे. नुसतं काल्पनिक साहित्य लिहून गप्प बसलं म्हणजे कर्तव्य संपलं असं नव्हे. त्या त्या वेळी सामाजिक बांधीलकीसह योग्य अभिव्यक्तीतून भूमिका घेतली नाही तर साहित्यिकही संधीसाधूच ठरेल. वाचाळ- घाणेरडं राजकारण अनुभवून प्रत्येक साहित्यिकाच्या मनाला व्यक्तीगत हाणी झाल्यासारख्या आतून वेदना झाल्या पाहिजेत, इतकं आपल्या भोवती सगळं भयानक चाललं आहे!  

          राजकारण हे दूरून गंमत पहात करमणूक करून घ्यायचं साधन नाही. राजकारण म्हणजे व्यापक अर्थानं समाजकारणच असतं. समाजकारण करण्यासाठीच जनतेनं निवडून दिलेले लोक भौतिक सुधारणा, कायदे, लोकहित साधत असतात. जनकल्याणाच्या योजना आखतात. आपण निवडून दिलेले लोक समाजासाठी जे काम करतात ते राजकारण! अशा लोकांनी राजकारण लोकांच्या भल्यासाठी विधायक पध्दतीनं करायला हवं, अशी अपेक्षा असते. विघातक कामं करण्यासाठी लोक त्यांना निवडून देत नाहीत. आपसात कुरघोड्या करण्यासाठी नाही. रोज कोलांटउड्या मारण्यासाठी नाही. स्वत:ला विकण्यासाठी नाही. येता जाता पक्षांतर करण्यासाठी नाही. स्वार्थ दिसेल तिथं पळण्यासाठी नाही. टोले, कोपरखिळ्या मारण्यासाठी नाही. चिमटे काढण्यासाठी नाही. रिकामटेकड्या लोकांसारखी निंदानालस्ती करण्यासाठी नाही. हवेतल्याहवेत आरोप करण्यासाठी नाही. शिवराळ- अर्वाच्य बोलण्यासाठी नाही. जनहिताचा महामूर पैसा जाहिरातींवर खर्च करण्यासाठी नाही. हॉटेलींगवर खर्च करण्यासाठी नाही. विमानानं देशभर आणि विदेशात सहली काढण्यासाठी नाही. विशिष्ट श्रीमंत उद्योजकांना फायदा पोचवण्यासाठी नाही. (कर्जबुडव्यांना परदेशात पळवायला मदत करण्यासाठी नाही.) विधायक कामाच्या पैशांतून टक्केवारी घेण्यासाठी नाही. खोटी बिलं बनवण्यासाठी नाही. आमदार- खासदार विकत घेण्यासाठी नाही. सत्तेच्या बळानं येनकेन प्रकारे कायद्याच्या कचाट्यात ओढून विरोधकांचा काटा काढत कोणालाही ऊठसुट तुरूंगात डांबण्यासाठी नाही. सत्तेला गोचडीसारखं चिटकण्याचा प्रयत्न करताना आपल्याला कोण कोण कसं कसं आडवं आलं हे रोज टीव्हीवर सांगण्यासाठी नाही. विशिष्टतेची लॉबींग करण्यासाठी नाही की नागरिकांची फाळणी करण्यासाठी नाही. रोज निवडणुकाच होत असल्यासारखं कायम पक्षीय प्रचारकी भाषणं करण्यासाठी नाही. येता जाता कशाचंही नामांतर करण्यासाठी नाही. (नावं बदलायलाही सरकारी तिजोरींवर ताण येतो.) वा जातीयवादी- धर्मवादी होऊन विशिष्ट समुदायाचा व्देश करण्यासाठी नाही. राजकारण हे बिनभांडवली धंदा करण्यासाठी नाही. (गावागावातल्या व्हॉटसअॅप ग्रुपवर चाललेल्या तूतू-मीमी सारखं वातावरण आज उच्चस्तरीय राजकारणात दिसून येतं. आणि चॅनल्सही या राजकारणासारखेच दिवसेंदिवस गुणवत्तेनं खालची पातळी गाठत आहेत.) दहा- बारा वर्षांपूर्वी सत्ताधार्‍यांवर ‍टीका केली तर आपल्या आजूबाजूच्या माणसांना राग येत नव्हता, आता संबंध बिघडण्याइतका राग येतो. (हे सगळं कशातून होत आहे?) लोकशाहीचे चारही स्तंभ त्या त्या जागी तटस्थ काम करताना दिसले पाहिजेत. मग सरकार कोणाचंही असो.

          जास्तीतजास्त लोकांच्या वास्तव मतांनी राजकारण्यांना लोकशाही पध्दतीनं लोकप्रतिनिधीपद प्राप्त झालेलं असतं. या पदावर त्यांची वरिष्ठांकडून नेमणूक झालेली नसते, पण स्वकतृत्वासह विशिष्ट पक्षाच्या नावानंही ते निवडून आलेले असतात. (म्हणून लोक‍प्रतिनिधी असताना पक्षांतर करणं हा मतदारांचा विश्वासघात ठरतो.) सार्वजनिक जीवनात जनतेत कोणताही भेदभाव करणार नाही’, अशी या लोकप्रतिनिधींनी भारतीय राज्यघटनेला स्मरून लोकशाहीच्या मंदिरात म्हणजे संसदेत- विधानसभेत शपथ घेतलेली असते.  

          राजकारणानं लोकजीवनाचा प्रत्येक कोपरा व्यापलेला आहे. जनतेची प्रत्येक अत्यावश्यक गोष्ट, निवडून आलेले व बहुमत असलेले राजकारणी- सत्ताधारी ठरवीत असतात. राजकारणाचा जनतेवर रोज आर्थिक, शैक्षणिक, सामाजिकतेह सर्वांगीन असा प्रत्यक्ष परिणाम होत असतो. आपली जीवनशैली ठरवण्याचं अप्रत्यक्ष काम सामूहीक सत्ताकारण ठरवीत असतं. महागाई, स्वस्ताई, भ्रष्टाचार, रोजगार, बेरोजगार, विकास, वंशवाद, झुंडवाद, इतिहासाची छेडछाड, ज्ञान– अज्ञान प्रसार, अंधश्रध्दा प्रोत्साहन आदींना सरकार प्रत्यक्ष जबाबदार ठरतं. भारत हा शेतीप्रधान देश असल्यानं अर्थकारण शेतीकेंद्रित असायला हवं, पण अलीकडच्या धरसोड वृत्तीमुळं शेतीचं नुकसान होत आहे. (कोणाचं व्यक्तीमहात्म्य वाढवायचं आणि कोणाची प्रतिमा भंजन करायची हे सरकारवर अवलंबून असतं. प्रत्येक सरकारनं तत्कालीन आणि भवितव्याचा विचार करायचा असतो, अन्यथा भविष्यात कधीही भरून न निघणारं नुकसान होत राहतं.)    

          आपण राजकारणापासून कितीही कोस दूर राहण्याचा प्रयत्न केला तरी सत्ताधार्‍यांचे निर्णय थेट आपल्या घरात वास्तव्य करायला येतात. राजकारण्यांच्या- सत्ताधार्‍यांच्या निर्णयांचा थेट जनजीवनावर परिणाम होतो. अशा सर्वव्यापी राजकारणापासून नागरिकांतील विशिष्ट घटकाला दूर कसं राहता येईल? तटस्थ कसं राहता येईल? का रहावं? चुकीचे निर्णय आपण सहन का करावेत? आपण पावलोपावली भरत असलेल्या करानं सत्ताकारण होत असेल तर नागरिक अलिप्त कसा राहू शकतो? राजकारण हा इथल्या लोकांपासूनचा वेगळा प्रांत आहे का की, त्यापासून आपल्याला अलिप्त राहता येईल? की राजकारण हा विशिष्ट खेळ आहे म्हणून आपण ऐच्छिकतेनं त्यात सामील व्हायचं की नाही ते ठरवायचं? मला क्रिकेट आवडत नाही असं कोणी म्हणू शकतं. पण त्याच अर्थानं मला राजकारण आवडत नाही, म्हणून मी त्याकडं सपशेल दुर्लक्ष करीन’, असं कोणाला म्हणता यायला नको, इतक्या व्यापकपणे राजकारण हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आणि तरीही कोणीतरी आपल्याला शिकवतं की, आपण अमूक तमूक वा साहित्यिक असल्यानं राजकारणावर बोलू नये? 

          वाईट राजकारणावर मतभेद असलेल्या प्रत्येक मतदारानं म्हणजेच नागरिकानं मतप्रदर्शन करायला हवं. प्रत्येक साहित्यिकाला, विचारवंताला  राजकारणावर वचक ठेवावा लागेल. प्रत्यक्ष राजकारणात उतरणं आपल्याला शक्य नाही म्हणून आपण राजकारणावर बोलायचंच नाही? प्रत्येक जण राजकारणात उतरू शकत नाही पण चांगल्या विधायक राजकारणाची अपेक्षा करू शकतो. यासाठी नागरिकांचा वचक राजकारण्यांवर- सत्ताधार्‍यांवर असलाच पाहिजे. सत्ताधार्‍यांवर टीका करू नये, असं अप्रत्यक्षपणे कोणी सुचवू लागलं की समजावं आपली वाटचाल हुकुमशाहीकडं आहे. अथवा काल-परवा सहज व्यक्त होणारा समाजकार्यकर्ता- जागरूक नागरिक अबोल झाला की समजावं, लोकशाही धोक्यात येत आहे.               

लोकशाहीत साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सुजाण नागरिक यांचं पहिलं लक्ष्य हे सत्ताधारीच असतात, मग ते सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत. सत्ताधारी सत्ता राबवित असतात, निर्णय घेत असतात. त्यांच्या भल्या भुर्‍या निर्णयांचा जनतेवर तात्काळ परिणाम होणार असतो. म्हणून चुकलेल्या निर्णयांवर, सत्याचा अपलाप करत वास्तवतेपासून भलत्याच दिशेला नागरिकांच्या भावनेला डायव्हर्ट करण्याच्या प्रयत्नांवर वा केवळ दाखवेगिरीवर टीका करणं साहजिक ठरतं. राज्यकर्त्यांवर असं कोणी तटस्थतेनं बोलत असताना, बोलणारा हा विरोधी पक्षाचा माणूस आहे, असा आरोप करणं हा सत्ताधार्‍यांचा असंमजसपणा ठरतो.

          साहित्यिकांनी अशा राजकीय पोस्ट करू नयेत असं म्हणता म्हणता, साहित्यिक मतदान कसं करु शकतो, असंही उद्या कोणी सहज म्हणू शकेल. कारण मतदान एकाच उमेदवाराला करावं लागतं, ते तुम्ही कसं करू शकता? असं बोलण्याची हिंमतही उद्या कोणी उघडपणे दाखवू शकेल.  

     शेवटी या लेखातला सारांश पुन्हा एकदा अधोरेखित करावासा वाटतो : चुकलेल्या राजकारणावर- सत्ताकारणावर- सत्ताधार्‍यांवर साहित्यिकांनी, विचारवंतांनी, पत्रकारांनी बोललं पाहिजे. बाळबोध वा सुडबुध्दीनं वागणार्‍यांवर सडकून टीका केली पाहिजे. ज्यांना कुठल्या शासकीय मंडळांवर नियुक्त्या हव्या असतील, इतर फायदे हवे असतील ते साहित्यिक वा पत्रकार उघड बोलू शकणार नाहीत. तो त्यांचा व्यक्तीगत प्रश्न, असंही म्हणता येणार नाही. (सत्तेवर येणार्‍या लोकांच्या पुढं पुढं करून वेगवेगळ्या सरकारी मंडळांवर नियुक्त्या करून घेण्यात अनेक लोक पटाईत असतात. एका मंडळाची मुदत संपत आली की दुसर्‍या मंडळाची तजवीस होईल अशीही फिल्डिंग लावण्यात येते, त्यात ते यशस्वी होतात. सगळीकडं हात असावा म्हणून सगळीकडची एकेक पुस्तकं तयार करून ठेवतात. दुसर्‍याच्या क्षेत्रात घुसखोरी करतात. म्हणून महाविद्यालयीन अभ्यासापासून, सातवीच्या अभ्यासासहीत चौथीच्या अभ्यासातही तेच लोक दिसून येतात, ते सर्वदूर पुरस्कार घेत राहतात. एखादी मोकळी जागा देण्यासाठी आयुष्यभर काम केलेल्या अमूक एकाकडं आपणहून बोट दाखवावा असं यांच्या चुकूनही मनात येत नाही. यत्र तत्र सर्वत्र राक्षसी बळानं ते प्रभाव पाडत राहतात. राक्षसी महत्वाकांक्षेनं सत्ता बळकवणार्‍या लोकांत आणि अशा तथाकथित स्वकेंद्रित तज्ज्ञ लोकांत विशेष फरक दिसून येत नाही.) पण जो कोणी सामाजिक बांधीलकी पाळणारा लेखक असेल, तो समाजाच्या व्यापक भवितव्यासाठी– लोकशाहीसाठी स्वहिताचा त्याग करून बोलत राहील. गप्प बसणार नाही.

          थोडक्यात, कोणी उजवं असो की डावं, गल्लीतलं असो की दिल्लीतलं, घाणेरड्या राजकारणाला आपल्या पातळीवर विरोध केला पाहिजे. विशिष्ट विषारी  भावनेत संमोहीत होऊन देशाला धोकादायक ठरू शकतील अशा शक्य नसलेल्या संकल्पनेतील बागुलबुवांच्या नादी लागलेल्या- आहारी गेलेल्यांनाही वेळीच सावध केलं पाहिजे.

          कोणत्याही राजकीय पक्षात प्रत्यक्ष सक्रीय नसलेल्या- सभासदत्व न घेतलेल्या नि:पक्ष नागरिकांनी विशिष्ट भावनेनं एखाद्या राजकीय पक्षाशी कायमचं नातं जुळवून घेऊ नये. तसेच अधिकृत संदर्भ ग्रंथांतून ऐतिहासिक- राजकीय अभ्यास करावा. म्हणजे राजकारण्यांच्या चुका कळायला लवकर मदत होते. (सोशल मीडियावर फिरणार्‍या संदेशाची खात्री करून घ्यावी. केवळ चुकीच्या प्रचारकी व्हॉटसअॅप संदेशातून आपली मतं बनवू नयेत. असे अनेक संदेश- चित्रफिती ठरवून विकृत पध्दतीनं प्रसारित केल्या जातात.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/