शनिवार, १५ मार्च, २०१४

निवडणुकीतला जाहीरनामा



 
  - डॉ. सुधीर रा. देवरे


       कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांचे जाहीरनामे झळकू लागतात. या जाहीरनाम्यात काय असते? स्वस्त धान्य देऊ, चांगले रस्ते देऊ, पाणी देऊ, गटारी बनवू, वीज देऊ, मोबाइल देऊ, लॅपटॉप देऊ इत्यादी. या व्यतिरिक्त काही द्यायचेच झाले तर एखादा पक्ष स्थिर सरकार देऊ पाहतो. यापेक्षा अजून काही द्यायचे असते हे राजकीय पक्षांनाही माहीत नसते आणि ज्यांच्यासाठी ते सत्तेवर येऊ पाहतात त्या जनतेलाही ते माहीत नाही. माहीत आहे पण ते मागायचे असते हे माहीत नाही की काय अशी परिस्थिती आज पहायला मिळते.
         खरं तर राजकीय नेत्यांना विसर पडला असला तरी आपण मागाव्यात अशा अनेक गोष्टी आपण मागत नाही. वृक्ष कर घेतला जातो पण आपल्या आजूबाजूला वृक्षच नाहीत. ‍साफसफाई कर घेतला जातो पण सफाई होत नाही. झाडे लावा अशी कोणी मागणी करत नाही आणि आपण स्वत:ही वृक्ष लागवड करत नाही. आमच्या नद्या जशा होत्या तशा करून द्या, त्यांची गटारं करू नका असे आपण म्हणत नाही. गटारींची मागणी आपण करतो आणि आपल्या सगळ्या गावासहीत नद्यांच्याही गटारी आपल्या वाट्याला येतात. अशाच गटार नद्यांचे पाणी आपण पित असतो आणि आपल्या आरोग्याची वाट लावतो. पाणी अडवण्यासाठी आपण आपली मागणी करत नाही. पावसाचे पाणी वरून पडते आणि वाट सापडेल तिकडे वाहून जाते. आपण नदी-नाल्यात पाणी अडवत नाही. शेतात अडवत नाही. गावात अडवत नाही.
         जंगल राखून ठेवल्याची मागणी आपण करत नाही. डोंगरांना संरक्षण देण्याची मागणी आपण करत नाही. नद्यातली वाळू रक्षणाची मागणी आपण करत नाही. वीजेचे भारनियमन होऊ नये हा मुद्दा असतो, पण देशात नवीन वीजनिर्मिती करण्यासाठी आपले काय धोरण आहे हा प्रश्न कोणी राजकीय पक्षांना विचारत नाही. सारांश, पर्यावरण वाचेल अशा मागण्या आपण करत नाहीत आणि म्हणून राजकीय पक्षही त्याकडे लक्ष देत नाहीत. गावात चांगली ग्रंथालये हवीत अशी मागणी आपण करत नाही.
         लाच न देता काम व्हायला हवीत अशी मागणी आपण करत नाही. शिक्षणात देणग्या घेऊन प्रवेश दिले जातात ते बंद करण्याची मागणी आपण करत नाही. शासकीय सेवेत पैसे देऊन नोकर्‍या दिल्या जातात ते बंद करण्याची मागणी आपण करत नाही. किराण्यात आणि सगळ्याच खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये जी सर्रास भेसळ होते ती होऊ नये अशी आपण मागणी करत नाही. दूध आणि मिठाईतल्या भेसळीबद्दल कोणी बोलत नाही. खोट्या औषधांबद्दल कोणी बोलत नाही. नफेखोरी, साठेबाजी, नकली माल अशा सगळ्या गोष्टी आपण अधिकार्‍यांच्या चांगुलपणावर सोडून दिल्या आहेत. जर चांगले कर्मचारी असतील तर ते अशा गोष्टी रोखतील नाहीतर बाकींच्यांना म्हणजे आपल्या व्यवस्थेला याच्याशी काही घेणेदेणे नाही असे सगळे चित्र दिसते. आणि आपण ते विनातक्रार मान्य केले आहे. राजकीय जाहीरनाम्यात या गोष्टी आपल्याला वाचायची सवय नाही, मागायची सवय नाही आणि राजकारण्यांच्या विचारात या गोष्टीला थारा नाही.
         (यातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
 
      - डॉ. सुधीर रा. देवरे            
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा