शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

भाषा जपण्यासाठीचे प्रयत्न
-    डॉ. सुधीर रा. देवरे

      उत्तर महाराष्ट्रात- खानदेशात आणि आसपासच्या परिसरात अहिराणी बोलीभाषा बोलली जाते. अहिराणी भाषेचा इतिहास इसवी सनाच्या दुसर्‍या तिसर्‍या शतकापासून दिसून येतो. तरीही अहिराणी भाषेला स्वतंत्र लिपी नाही. कारण जगातल्या अनेक भाषा आपल्या आसपास अस्तित्वात असलेल्या लिपीचा आधार घेत आविष्कृत होत राहतात. आणि ज्या भाषा मौखिक असतात त्या प्राचीन असूनही लिपीचा अट्टहास धरत नाहीत. म्हणून काही शिलालेखात, ताम्रपटात वा लिखित काव्यात अहिराणी दिसून येत असली तरी ती स्वतंत्र लिपीत नाही. अहिराणीने देवनागरी लिपी स्वीकारली आहे. अहिराणी ही मूळ अभिर लोकांची भाषा. अहिराणी ही विशिष्ट जाती- जमातीची भाषा नसून मोठ्या क्षेत्रफळात बोलली जाणारी लोकभाषा आहे.
      200 मैल लांबी आणि 160 मैल रूंद इतक्या मोठ्या क्षेत्रफळात अहिराणीची व्याप्ती सामावलेली आहे. या पट्ट्यात जवळ जवळ एक कोटी लोक अहिराणी भाषिक आहेत. नाशिक जिल्ह्यातील उत्तर-पूर्व अर्धा भाग, जळगाव जिल्ह्यातील पश्चिम अर्धा भाग, धुळे आणि नंदुरबार अशा एकूण चार जिल्ह्यात अहिराणी बोलली जाते. परंपरेनुसार धुळ्याचा परिसर हा अहिराणीचा केंद्रवर्ती भाग समजला जातो. 
      ग्रामीण भागात अहिराणीचा व्यावहारिक वापर आजही मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. घरात, नातेवाईकांत, शेजारीपाजारी, गल्लीत, गावात, दुकानात, बाजारात, जत्रात, बसस्थानकात, प्रवासात, दैनंदिन व्यवहारात, शाळेत- महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आपसात, शेतात, ग्रामसभेत, सार्वजनिक ठिकाणी अहिराणी बोलली जाते. लिखाणात मात्र मराठी भाषा वापरली जाते.
      गावागावात राहणारा या परिसरातला कोणताही समुह अहिराणी भाषेत व्यवहार करतो. आपल्या जवळच्या नातेवाईकांत अहिराणी भाषेत बोलल्याशिवाय प्रेम व्यक्‍त होत नाही. आपल्या माणसाशी आपल्याच भाषेत बोललं पाहिजे आणि ती भाषा त्या त्या वेळी जिभेवर आपोआप येत असते. बोलणारा कोणीही असो, कोणत्याही जाती- जमातीचा, धर्माचा असो, या परिसरात सर्वत्र अहिराणी भाषा बोलली जाते. गावातले बारा बलुतेदार असोत की परंपरेने प्रतिष्ठित वगैरे समजले जाणारे लोक असोत, शेतकरी असोत वा शेतमजूर. प्रत्येक जण संवादासाठी अहिराणी भाषा बोलतो. अहिराणी ही लोकभाषा आहे. विशिष्ट जातीय भाषा नव्हे.
       अहिराणी भाषेत पारंपरिक मौखिक आणि अलीकडे व्यक्‍त होणारे लिखित असे बरेच साहित्य उपलब्ध आहे. वर्गीकरण करता येणार नाही इतके लोकसाहित्य अहिराणी भाषेत पहायला मिळते. अहिराणी बोलणारे लोकांचे क्षेत्रफळ प्रचंड मोठे असल्याने भाषेत विविध परिवेशात स्थानिक शब्द, उच्चार, हेल बदलतात. आणि हे बदल लोकसाहित्यातून टहाळबन लक्षात येतात. श्रीचक्रधर स्वामी, संत ज्ञानदेव, जयराम पिंडे, मोरीरना भाट, जैन कवी निंबा, कमलनयन आदी पूर्वसूरींनी अहिराणी भाषा आपल्या साहित्यातून- गद्या-पद्यातून उपयोजित करत समृध्द केली आहे.
      अहिराणीतील अलीकडील साहित्यिक वा अहिराणी उपयोजित करणारे लोकही दिवसेंदिवस वाढताना दिसतात, ही अहिराणीसाठी सुखद बाब आहे. समाधान मानता येईल इतके साहित्य अहिराणीत उपयोजित होत असून आज अनेक नवोदित लेखक अहिराणीत लिहिते झाले आहेत.
      अहिराणी भाषेचं सध्याचं अस्तित्व जाणवण्याइतकं आख्ख्या महाराष्ट्रात उठून दिसतं. आज या चारही जिल्ह्यात शहरीकरण वाढत असून अहिराणीचा र्‍हास होताना दिसतो. ग्रामीण भागात शेतकरी व अन्य लोक अहिराणीतच आपला दैनंदिन व्यवहार करतात. शिक्षणाचा वारा लागलेल्या काही लोकांना अहिराणी बोलायचा कमीपणा वाटायला लागला. आपण ग्रामीण भाषा बोलत नसून मराठी, हिंदी व इंग्रजीतून व्यवहार करतो असे मुद्दाम दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. भाषेच्या तथाकथित न्यूनगंडामुळे अहिराणीचे प्रचंड नुकसान होत आहे.
      अहिराणी भाषा वृंध्दीगत करण्यासाठी व भाषा जपण्यासाठीचे प्रयत्न या परिसरात सातत्याने सुरू आहेत. राष्ट्रीय पातळीवर गंभीर प्रकृतीचं अहिराणी ढोल नियतकालिक 1998 ला सुरू झालं. या नियतकालिकामुळे अहिराणीच्या संवर्धनासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. परिसरातील अनेक लोक अहिराणी भाषेचा अभ्यास करू लागले. स्थानिक वृत्तपत्रे व काही नियतकालिकातून अहिराणी सदरं- साहित्य आता प्रकाशित होऊ लागलं. गावशिवार नावाचं हलकं फुलकं का होईना मध्यंतरी एका नियतकालिकातून नवोदित लेखक- कवींना अहिराणीत लिहिण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झाला.  
      केवळ अहिराणीच नव्हे तर सर्वच बोलीभाषा जपण्याबाबत काही पर्याय शोधले पाहिजेत. त्यापैकी काही पर्याय सांगता येतील : बोलीभाषा बोलणे गावंढळपणाचे लक्षण आहे, हा लोकांच्या मनातला न्यूनगंड काढणे हे पहिले काम. गावात- ग्रामीण भागात गेल्यावर कोणीही (मूळ इथल्या) सुशिक्षिताने- अभ्यासकाने लोकांशी मुद्दाम त्या बोलीभाषेत बोललं पाहिजे. म्हणजे समोरचा ग्रामीण माणूस मोडक्या तोडक्या प्रमाणभाषेत बोलण्याचं टाळून आपल्या नैसर्गिक बोलीत बोलू लागेल. (अर्थात आपली बोली उपयोजित करत जो कोणी प्रमाणभाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असेल त्या भाषेचंही स्वागत आहेच.) आईवडिलांनी आपल्या मुलांना आपल्या बोलीभाषेच्या सौष्ठवाबद्दल गौरवाने सांगायला हवं. म्हणजे लहान मुलांच्या मनात भाषेबद्दल गैरसमज होणार नाहीत. शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्याला बोलीभाषेबद्दल विशेष माहिती सांगावी. मुलं घरी जी बोली बोलतात तो शाळेत चेष्टेचा विषय न होता खेळीमेळीच्या वातावरणात बोली आणि प्रमाण मराठी सहज बोलता येईल अशी परिस्थिती शिक्षकांनी निर्माण करावी. शाळेत भाषा शिकवताना पर्यायी शब्द देताना स्थानिक बोलीतले शब्दही मुद्दाम सांगावेत. उदाहरणार्थ, पेरूबद्दल शाळेत काही‍ शिकवायचं झालं तर शिक्षकाने विद्यार्थ्यांना सहज सांगितलं पाहिजे, की पेरू म्हणजे आपण अहिराणीत ज्याला जाम म्हणतो ते फळ. (अहिराणीसहीत अनेक बोलीभाषेत पेरूला जाम म्हणतात.) साहित्य संमेलनाच्या नावाखाली भाषेचे हिडीस उत्सव साजरे न करता ग्रामीण लोकांना (म्हणजे ग्रामीण स्त्रियांनाही) सहभागी करत त्यांचं लोकसाहित्य- मौखिक साहित्य ऐकायला जमावं. जे लोक नेहमी व्यासपीठावर असतात (भाषणं करतात) त्यांनी श्रोते व्हावं आणि लोकसाहित्य सांगणारे ग्रामीण लोक व्यासपीठावर असायला हवेत, तेव्हा भाषेचं संवर्धन होईल.  
      भाषा जपण्यासाठी अशा सगळ्या पर्यायांचा जसजसा उपयोग केला जाईल तसतश्या बोलीभाषा दिवसेंदिवस लयाला न जाता लोकांच्या भावनात (मूळ शब्द भावन) जपल्या जातील. नैसर्गिक बोली त्यातील विशिष्ट नजाकतीचे शब्द भाषेत टिकून राहिले तर प्रमाणभाषा मराठीही दिवसेंदिवस समृध्द होत राहील.
     (‘मराठी संशोधन पत्रिका जाने-फेब्रु-मार्च 2019 च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा संपादित अंश. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/