मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

पंतप्रधानांना पत्र

 

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

          माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आज दिनांक १ ऑगष्ट २०२३ रोजी ईमेलने पाठविलेले पत्र :

 

प्रति,

सन्माननीय नरेंद्र मोदीजी,

पंतप्रधान, भारत.

विषय : भारताच्या भवितव्यासाठी विनंती पत्र.

सर,

          आपण लोकशाही पध्दतीने निवडून येऊन पहिल्यांदा पंतप्रधान झालात त्यावेळी आपल्या अभिनंदनाचा मी ब्लॉग लिहिला होता. प्रत्येक भारतीय नागरिक आशेने, अभिमानाने आणि प्रेमाने आपल्या पंतप्रधानांकडे पहात असतो. इतर देशांत होणारा आपल्या पंतप्रधानांचा सन्मान, कोणताही नागरिक आपल्या देशाचा म्हणजेच स्वत:चा सन्मान समजतो. याच आपल्या सन्मानातून प्रेमाने तर काही घटनांमुळे व्यथीत होऊन, दर पाच वर्षांतून मतदान करणारा नागरिक या नात्याने आज आपल्याला हे पत्र ईमेलने पाठवीत आहे.

          काही वर्षांपूर्वी दूरचित्र वाहिन्यांवर आयसिस- इसिस (ISIS), तालीबानी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या – माणसं क्रूरपणे ठार मारण्याच्या - चित्रफिती पाहून अंगावर शहारे यायचे. या घटना दूरच्या देशांत घडत असूनही माणूस असल्याची लाज वाटायची. त्याच चित्रिकरणाच्या आज नवीन चित्रफिती पहात आहोत की काय असे वाटावे, अशा घटना आज आपल्या देशाच्या- भारताच्या काही प्रांतात (विशेषत: मणिपूर) वर्तमानात घडत आहेत. हिंदू धर्मासाठी ही (सशस्त्र) लढाई असेल तर अशी कृत्ये करणार्‍यांनी वरील नामोल्लेखातील दहशतवाद्यांच्या क्रूर गोटात धर्मांतरच केले आहे असे म्हणावे लागेल. मग आपण म्हणजे भारतीय लोक नक्की कोणत्या धर्माचा अभिमान बाळगत आहोत! भारतीय नागरिकांनी अशा दहशत माजवणार्‍या पाशवी लोकांकडून आपला धर्म शिकावा का!

          आज भारतीय नागरिकांत मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होत आहे, झालेले आहे. मनांची भावनिक फाळणी झाली आहे. विचारांनी लोक विभक्त झाले आहेत. हे गावागावातच नव्हे तर प्रत्येक कुटुंबातही झाले आहे. विरोधात कोणी ब्र काढला तर अश्लाघ्य- अशोभनीय उघड धमकी दिली जाते. अनेक व्यक्ती आणि अनेक संघटना देशात आपापसात व्देश पसरवताहेत, महापुरूषांचा अपमान करीत आहेत. असे यापूर्वी भारतात कधीही झालेले नव्हते.

          पंतप्रधानांवर काही लोक जीव ओवाळून टाकायला तयार आहेत तर काही लोकांना आपले पंतप्रधान परके वाटतात, असे का व्हावे. अगदी आणीबाणी काळातही भारताचे सर्वसामान्य नागरिक पंतप्रधानांचे टोकाचे भक्त वा टोकाचे मत्सरी झालेले नव्हते. तेव्हा विचारांची फूट पडलेली नव्हती. आज का व्हावे. आणीबाणीत इतर राजकीय पक्षांचे दमन केले गेले, नेत्यांना तुरूंगात डांबले गेले, परंतु सर्वसामान्य माणसाला (कामगार, मजूर, शेतकरी, महिला, आदिवासी आदींना) असुरक्षित वाटत नव्हते; महिलांवर दिवसाउजेडी सामुहिक लैंगिक अत्याचार होत नव्हते वा निघृणपणे ठार केले जात नव्हते. जवळपास तीन महिण्यांपासून (3 मे 2023) मणिपुरी महिलांवरील अत्याचाराच्या शेकडो घटना आपल्याला ज्ञात आहेतच. आज सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला हे का आले आहे! 

          आज देशासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या विषयांवर आपण बोलत नाहीत म्हणून उन्मादी, दहशती, सत्तांतर्गत भ्रष्ट, प्रतिमाभंजक, कर्जबुडवे आदी कृत्ये करणार्‍यांना वाटते की त्यांना आपली संमती आहे, तर इतरांना वाटते, पंतप्रधान अशा लोकांशी सहमत नसतील म्हणून ते काही बोलत नसावेत. पण आपली भूमिका नक्की काय आहे हे सर्वसामान्य लोकांना जाणून घ्यायचे आहे. तसा वेगळ्या भूमिकेचा प्रश्नच मुळी उद्‍भवत नाही. आपण पंतप्रधान असल्याने भारताच्या प्रत्येक नागरिकाचे हित ते आपले हित आहे!  

          १९१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये आपण फक्त विकासावर बोलत होतात. धर्म त्यावेळी कुठेच नव्हता. आज विकासाच्या सत्ताकारणात हा धर्म केंद्र स्थानी कसा आला, ते कळत नाही. राजकारणात धर्म असलाच तर तो राजधर्म आहे! सन्माननीय अटलबिहारी वाजपेयी साहेबांनी त्यांच्या सत्ताकाळात राजधर्म पाळला होता व आपल्यासह अनेकांना तो पाळायला सांगितला होता.

          आजही कोणत्याही भाषणांत आपण भ्रष्टार्‍यांविरोधात बोलतात ते नागरिकांना आवडते. विधायक कामे करून विरोधकांना नामोहरम करणेही कोणालाही आवडेल. पण विरोधी पक्षातील केवळ भ्रष्टाचारी लोकांनाच आपलेसे करत आपल्या पक्षात घेऊन मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री- मंत्री अशी पदे वाटत, पक्ष- सत्ता बळकट करण्याचे तंत्र नागरिकांच्या आकलनापलीकडे आहे. भ्रष्टाचारी असणार्‍यांची जागा तुरूंगात असली पाहिजे, ते मंत्रीपदांच्या खुर्चीत पहावे लागतात, यावर नागरिकांनी काय करावे. या भ्रष्टाचारी आयारामांना आपला सक्त विरोधच असेल हेही आपल्या भ्रष्टाचारविरोधी भाषणांतून लक्षात येते.

          अशा बर्‍याच गोष्टी आहेत सर. त्या आपल्यालाही ज्ञात आहेत. पण देशात यादवी होऊ नये म्हणून भारताच्या नागरिकांची बौध्दीक फाळणी व लैंगिक अत्याचारांसह हिंसा या गोष्टी आपण तात्काळ थांबवाव्यात, अशी भारताचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे. अशी हिंसा थांबवणे आपल्याला (म्हणजे पंतप्रधानांना) अवघड नाही. भारताच्या भवितव्यासाठी हे आवश्यक आहे.

          आपल्याला मराठी लिहिता बोलता येते हे माहीत असल्याने पत्र मुद्दाम मराठीत व आपल्याविषयीच्या आदरामुळे लिहीत आहे. धन्यवाद सर.

आपला विश्वासू,

डॉ. सुधीर राजाराम देवरे

(भारताचा सामान्य नागरिक व साहित्यिक)  

 © डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/