शुक्रवार, १५ मे, २०२०

‘मी गोष्टीत मावत नाही’: नवा प्रयोग
-   डॉ. सुधीर रा. देवरे

    मी गोष्टीत मावत नाही हा आगळा आविष्कार अस्तित्वात येण्याची पार्श्वभूमी म्हणजेच निर्मिती प्रक्रिया सांगण्याचा हा प्रयत्न. १९८२ पासून मी वहीत काही मजकूर लिहीत आलो. पण मी नक्की काय लिहितोय याचं मला थेट आकलन होत नव्हतं. यात केव्हा एखादा प्रचलित नसलेला विचार असायचा. मनात नवीन तयार झालेलं एखादं सुभाषित असायचं. नंतर लिहून पूर्ण होईल या आशेने काही अचानक सुचलेल्या कवितेच्या ओळी असायच्या. काही वेळा नाटकाचे संवाद वाटावीत अशी काही सुचलेली वाक्य असायची. (निसटून किती गेलं ते मोजता येणार नाही.) या समग्र लिखाणाच्या आविष्काराला पुढे नक्की काय वळण मिळेल मला त्यावेळी माहीत नव्हतं. मात्र मी हे वेळोवेळी सुचलेलं सगळं जाणीवपूर्वक लिहीत होतो. सुटून जाऊ नये म्हणून कागदापर्यंत पोचेपर्यंत मनातल्या मनात सुचलेलं त्याच शब्दक्रमांसह (वर्ड ऑर्डर) घोकत रहायचो.  
    बातमी मागची बातमी समजायची- दिसायची. त्या बातमीचा वेध घेत नवीन बातमी मनात तयार व्हायची. यात देशातल्या आणि जगातल्या घडामोडींचाही अंतर्भाव होता. घटनेमागची घटना, तिचे पडसाद, या सगळ्यांच्या चिंतनातून वहीत आणखी तिसरंच उतरायचं. काही वेळा फक् त्याचा सारांश हाताशी लागायचा. तरी ते ही कुरवाळत मी दस्ताऐवजीकरण करत जपायचो. नवीन दिसायचं ते टिपायचो. त्या त्या वेळी लिहून झाल्यावर वहीची काळजी घेत बाजूला ठेवायचो. पुन्हा चिंतनातून तसं काही आलं की वही उघडायची आणि तिच्यात मनात गवसलेलं ओतायचं.
    पण ही दैनंदिनी (डायरी) नक्कीच नव्हती. डायरी लिहिण्याचा प्रयत्नही केला अधून मधून. डायरी लिखाणाची वही वेगळी आणि असं काही गवसलेलं लिहिण्याची वही वेगळी असायची. डायरीत कायम रुक्ष नोंदी यायच्या. या स्वतंत्र वहीतलं लिखाण मात्र वेगळं काहीतरी आनंद द्यायचं. जाणीवपूर्वक काहीतरी रूजतंय, हे लक्षात येत होतं. म्हणूनच असे त्रोटक अर्धे-मुर्धे विष्कार लिहिण्याची वेळ सुचेल त्या त्या वेळेची, आणि डायरी लिहिण्याची वेळ रात्रीची झोपताना ठरलेली. हे त्या त्या वेळीच नेमकं कोणत्या वहीत काय लिहायचं हे कळायचं. ते जाणीवपूर्वक जसंच्या तसं टिपायचो. वेगळं लिहीत असलेल्या अशा या मजकुराच्या सात वह्या भरल्या. आणि आता कुठंतरी थांबावं असं म्हणण्यापेक्षा, या सात वह्या नीट पुन्हा वाचताना 2003 ला थांबलो. या लांबलचक आविष्काराला वळण द्यायचं ठरवलं. असं वळण देता देता बराच भाग स्वत:लाच अनावश्यक वाटला. तो वगळला.
या लिखाणाला कुठल्यातरी साच्यात बसवायचं म्हणून मी कादंबरी म्हणतोय. या कादंबरीत अनेक आवाज ऐकू येऊ लागले, म्हणून अनेक नायक वा पात्र निर्माण करण्याचाही विचार केला. पण या नवीन फॉर्ममध्ये बसवताना अनेक पात्रांचे नाटकासारखे संवाद होतील की काय अशी भिती वाटली. शेवटी समष्टीचा सुधर्म देवकिरण नावाचा एकच प्रातिनिधीक नायक तयार झाला. त्याला अनेक गोष्टीत पारंगत व्हायचंय असं दाखवत, त्या त्या वेळी त्या त्या भिन्न आवाजात बोलू दिलं. (उदा. हा नायक केव्हा वृत्तपत्र लेखक, केव्हा पत्रकार, केव्हा वार्ताहर, केव्हा कवी, केव्हा लेखक, केव्हा सामाजिक कार्यकर्ता, केव्हा वायरमन, केव्हा प्रचारक, केव्हा विज्ञानाचा विद्यार्थी, केव्हा सामान्य नागरिक, केव्हा राजकीय भाष्यकर्ता, केव्हा धार्मिक, केव्हा नास्तिक, केव्हा देवभक्, केव्हा मी मी म्हणणारा प्रेषित, केव्हा विचारवंत, केव्हा चळवळ्या, केव्हा कुटुंब प्रमुख तर केव्हा उन्मादीत तरूण आदीत परिवर्तीत होत राहिला.)
नायकाचं सुधर्म देवकिरण हे नाव विशिष्ट भूमिका घेऊनच ठरवलं. लहानपणी वाचत असलेल्या शिवलिलामृत नावाच्या पोथीतून मला सुधर्म हे नाव सापडलं. पण त्या नावामागचा वेगळा अर्थ मी शोधला. धर्माचा म्हणजे कर्तव्याचा अथवा तत्वाचा चांगल्या प्रकारे पालन करणारा तो सुधर्म या अर्थाने हे नाव नक्की केलं. (सुधर्म असला तरी त्याचा धर्म नेमका कोणता हे कळू देता.)
 नाव नक्की होताच आता सुधर्मचं आडनाव- कुळ काय असावं, हा प्रश्न समोर आला. कोणतंही उपलब्ध कुळ द्यायचं नव्हतं. अलीकडच्या आधुनिक जगात सुध्दा आडनावावरून जात ओळखली जाते. तशी या पात्राची जात कोणाला ओळखता येऊ नये म्हणून खबरदारी घ्यायची होती. अशा बिनजाती-धर्माचा इसमच वैश्विक चिंतन करू शकेल म्हणून हा खटाटोप होता. हे आडनाव मला देवकिरण या शब्दात सापडलं. कोणी कशात देव पाहतो तर कोणी कशात. नास्तिक लोक माणसात देव पहातात तर काही निसर्गात. कोणी देव भजत नसला तरी देवत्वावर विश्वास ठेवतो. असा देवरूपातला एक किरण असलेला. जो माणसाच्या भावनेतून- हृदयातून, काहीवेळा मेंदूतून डोकावतो म्हणून देवाचा किरण- देवकिरण. (कोणत्या धर्माचा देव हे ही गुलदस्त्यात.) आडनाव सापडलं. 
2003 ला हा विचार थांबवला तरी या आविष्कारात अनेक परिष्करणं होत राहिली. काळ तसाच ठेवत काळाला समांतर मजकूर इकडे तिकडे फिरवला. पण मूळच्या त्या त्या मजकुराच्या आत्म्याला धक्का लागणार नाही ते पाहिलं. सुधर्म देवकिरण हा आपलं आत्मकथन मांडत असल्यासारखी एकंदरीत कादंबरीची रचना आपोआप झाली. आविष्कार मागेल तो फॉर्म पुरवला. मांडणीत कारागिरी होऊ दिली नाही. कादंबरीत मोजकेच पण महत्वाचे असे काही अहिराणी बोलीभाषेतले शब्द, भाषिक सौष्ठवासाठी जाणीवपूर्वक पण योग्य ठिकाणी, आविष्काराची मागणी म्हणून उपयोजित होत गेले.
शेवटी आता या आविष्काराला नाव काय द्यावं म्हणून विचार सुरू झाला. आविष्काराला साजेशी अनेक नावं देऊन पाहिली, पण समाधान होईना. कोणत्याच गोष्टीत- कोणत्याच कॅटेगरीत हे कथानक आणि पात्रही बसत सल्यामुळे मी गोष्टीत मावत नाही या नावावर स्थिरावलो. हा आविष्कार एखादा कलाविष्कार ठरू शकेल की नाही, मी साशंक होतो. म्हणून हे लिखाण जी. के. ऐनापुरे यांच्याकडे पाठवलं. त्यांनी वाचून लगेच फोनवर कळवलं, ह्या कादंबरीमुळे तुम्हाला कादंबरीकार म्हणून आख्खा महाराष्ट्र ओळखेल. अनेक आवाजात अनेक विषयांवर बोलणारी ही महाकादंबरी ठरू शकते! (ही सगळी प्रक्रिया 2003 ते 2007 पर्यंत चालली.) 
जी. के. ऐनापुरेंच्या या बोलण्याने उभारी येऊन पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाच्या अरुण जाखडे यांच्याकडे हे लिखाण 2007 ला सोपवलं. आणि आता 2019 ला प्रकाशित झाली, तीच ही कादंबरी. (ऐन प्रकाशनावेळी जी. के. ऐनापुरे यांनीच कादंबरीला ब्लर्ब लिहिलं.) या कादंबरीचा सुधर्म देवकिरण हा नायक तुमच्या आमच्या सगळ्यातला प्रातिनिधीक आहे. म्हणून कादंबरीच्या प्रास्ताविकात म्हटलंय:
‘‘हा मी म्हणजे मी नव्हे
मी म्हणजे कथाकवितांर्गत मी ही नव्हे
आणि हा मी म्हणजे मी नाहीच असंही नाही
पण मी हा तू अथवा
तुम्ही ही असू शकाल!’’
        - मी’’ 
आणि या व्यतिरिक् मला काही सांगायचं उरलं असेल तर ते सगळं कादंबरीत आहेच.

(दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका जाने.- फेब्रु.- मार्च 2020 च्या अंकात प्रकाशित. या  लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/