गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

आजारी पडणे मना आहे!




-         डॉ. सुधीर रा. देवरे

      कोणत्याही माणसाला कोर्ट, पोलिस स्टेशन आणि रूग्णालयाची पायरी चढावी लागू नये, असे म्हटले जाते. जनमानसात अशा भितीदायक प्रतिमा तयार व्हायला त्या त्या क्षेत्रातली कठोर वागणूक जबाबदार असते. एखादा आजार उद्‍भवला तर रूग्णालयात जायचे म्हणून अशिक्षित लोकांच्याच नव्हे तर उच्चशिक्षित- सुशिक्षित लोकांच्याही अंगावर सर्रकन काटा येतो. आजाराचे निदान चुकीचे होईल वा आपण अतोनात लुबाडले जाऊ, हा समज या मागचे कारण असते. म्हणून अनेक लोक आपले दुखणे एकतर अंगावर काढतात वा स्वत:च डॉक्टर असल्यासारखे मेडिकल स्टोअर्समधून त्या त्या आजाराच्या गोळ्या मागवून घरी बरे होण्याचा प्रयत्न करतात. यामुळे काही वेळा अनेकांवर जीव गमावण्याचीही पाळी येते.
      या वर्षात खाजगी रूग्णालयांतील ज्या चार घटना सामोर्‍या आल्या त्या भयानक आहेत: एका गर्भवती महिलेच्या बाळंतपणाला रूग्णालयाने एक कोटी बील आकारले. तरीही त्या महिलेच्या बालकाला रूग्णालय वाचवू शकले नाही. एक माणूस साध्या आजारासाठी रूग्णालयात गेला. त्याला अॅडमिट करून आयसीयूत ठेवले. तो वारला. बील झाले तेरा लाख रूपये. एका माणसाला डेंग्यू झाला. आठ दिवस रूग्णालयात. वारला. बील झाले सात लाख. आणि चौथी परवाची ताजी घटना: फोर्टिस रूग्णालयात आद्या नावाची सात वर्षाची मुलगी डेंग्यूने पंधरा दिवस आयसीयूत अॅडमिट होती. वारली. बील झाले सोळा लाख रूपये. म्हणजे प्रत्येक दिवसाला ह्या मुलीला सरासरी एक लाख रूपये खर्च झाला.
      मी व्हायरल न्युमोनियाने आजारी होतो. नाशिकच्या एका रूग्णालयात दोन ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर (2017) पर्यंत आयसीयूत अॅडमिट होतो. तीन तारखेच्या सकाळी डॉक्टरांनी माझ्या नातेवाईकांना बोलवून सांगितले: केस क्रिटीकल आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण दिसते. तीच ट्रिटमेंट सुरू आहे आता. कदाचित व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल. पंधरा ते वीस लाख खर्च येऊ शकेल. कदाचित पन्नास लाखही लागू शकतात. तुमची एवढी तयारी आहे का? तुमच्याकडे पाहून असं वाटत नाही की तुम्ही इतका भार पेलू शकाल. डिचार्ज मिळाल्यानंतर हे काही दिवसांनी मला नातेवाईकांनी सांगितले. मी सावध होतो. मला तिसर्‍याच दिवशी बरं वाटायला लागलं होतं. तरीही पंधरा दिवस रूग्णालयात होतो. बील झाले चार लाख. अँटीबायोटीक्सच्या मार्‍याच्या अशक्‍तपणामुळे मला अजूनही चालता येत नाही.  
      एका पेशंटच्या नातेवाईकाने सांगितले की, ज्या मेडिसिनची किंमत बाहेर सहा हजार रूपये आहे ती मेडिसिन विशिष्ट रूग्णालयात 25,850 रूपयाला मिळाली. अनेक मेडिसिन पाच पट, दहा पट आणि वीस पटीच्या वाढीव किमतीत खाजगी रूग्णालयात विकल्या जातात. (जेनेरिक औषधे लपवून बॅन्डेडच्या फुगवलेल्या एमआरपीची शिफारस केली जाते.) भारतात सरकारी रूग्णालयांमध्ये पेशंटकडे दुर्लक्ष होते. नीट ट्रिटमेंट मिळत नाही आणि खाजगी रूग्णालयांमध्ये अतोनात लुबाडले जाते. पेशंट रेफर करणे, कट प्रॅक्टीस, मेडिकल कमिशन, पॅथालॉजी कमिशन या सगळ्या गोष्टीत भरडला जातो तो पेशंट. मेडिक्लेम या इंश्युरन्सच्या कंपन्यांमुळेही अशी बीले भडकायला मदत होत असावी. आयुष्यभर नोकरी वा कामधाम करून माणूस जितके पैसे कमवत नाही,  ‍त्यापेक्षा जास्त पैसे एका वेळच्या आजारपणाला खर्च करावे लागत असतील तर लोक नाईलाजाने रूग्णालयात जाणे टाळतात.
      आजची आरोग्यसेवा भारतीयांच्या आवाक्याबाहेर आहे. पेशंट कोणीही असो, आजार कोणताही असो आणि हॉस्पिटल खाजगी असलीत तरी  हॉस्पिटल बीले आणि मेडिकल बीले यात इतका फुगवटा यायला नको. वाजवी बीले आकारायला हवीत. खाजगी रूग्णालये, मेडिसिन विक्रेत्यांवर शासनाचे नियंत्रण असायला हवे. वैद्यकीय क्षेत्रात या सगळ्या अनिष्ट प्रवृत्ती कार्यरत आहेत, हे इंडियन मेडिकल असोसिएशन मान्य करते. कोणी तक्रार केली तर त्याला शिक्षाही ठरलेली आहे. मात्र सर्वसाधारण माणूस जो यात भरडला जातो त्याला हे सिध्द करून दाखवणे खूप कठीण जात असते. सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्नांनी ही वैद्यकीय सिस्टिम बदलण्यासाठी कायदेशीर आवाज उठवायला हवा.  
      डॉक्टरकी पेशा हा आज पेशा राहिला नाही. तो व्यवसाय झाला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक डॉक्टर बरबटलेला आहे आणि तो अनैतिकच वागत असतो. वैद्यकीय क्षेत्रात असेही अनेक लोक दाखवून देता येतील की ते माणुसकीने पेशंटला हाताळतात. पण दुर्दैवाने अशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
      (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

माणूस आणि एकलेपण





- डॉ. सुधीर रा. देवरे
           

      माणूस नात्यांमुळे एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडते. विवाहाचा समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, कमीतकमी वधूवरांचे दोन कुटुंबे आणि दोन मित्र तरी त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकून घेता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला नातेवाईक लागतात आणि दु:खाचे सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे नातेवाईक लागतात.
            माणूस या जगात एकटा असू शकेल का? म्हणजे तो विनासंबंध- विनापाश असू शकेल का? माणसाशी कोणतेही नातेसंबंध न ठेवता कोणी एखादा सुखात जगू शकेल का? तो दुसर्‍या माणसाशी कायम फटकून वागू शकतो का? एखादा माणूस माणूसघाना असू शकतो का? तो एकलकोंडा असू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येऊ शकतात, तरीही आपल्याला असे रोज कोणाबद्दल तरी ऐकायला येते, की अमूक एक माणूस एकलकोंडा आहे. अमूक एकाला एकटे राहणे आवडते. अमूक एक माणूस आजूबाजूच्या माणसांत न मिसळता आपल्याच कोषात कायम गर्क असतो. आपल्याकडे माणसं येणं त्याला आवडत नाही आणि इतर माणसांकडे जाणंही तो हेतुत: टाळत असतो. वगैरे.
            अतिपरिचयात अवज्ञा म्हणून एखादा माणूस शेजार्‍यापाजार्‍यांशी फटकून वागत असेल वा वेळप्रसंगी भांडतही असेल कदाचित, तरी तो माणसात मिसळणाराच असतो. एखादा माणूस माणसांच्या कळपात राहणे टाळत असला तरी तो आतून अनेक लोकांशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात असतो. अपरिचित माणसाशी सोबती करावी असेच त्याला मनातून वाटत असते. माणसाशी प्रत्यक्षात फटकून वागणारा माणूस हा आतून समाजाशी जुळवून घेणाराच असतो. कोणताही माणूस तमाम मानव समाजाविरूध्द जात नाही. समाजातील काही प्रवृत्तींविरूध्द तो बंड करू शकतो पण आख्या मानवजातीच्या विरोधात जाणारा माणूस अजून जगात जन्माला आला नाही. जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात एकटा मनुष्य राहणे म्हणूनच अशक्य घटना वाटते.
            आपला स्वत:चा स्वभाव विसरून आपण इतर लोक आणि त्यांचे स्वभाव हा नेहमी चर्चेचा विषय करतो. एखादा माणूस कसा एकलखुरा आहे, तो समाजापासून कसा फटकून वागतो, तो माणसात मिसळत नाही, समाजात मिसळत नाही, नातेवाईकांकडे जात येत नाही. विवाह, अंत्यविधी आदी कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. अमूक हा आपण आणि आपले घर भले वा काम भले असा झापडे लावलेल्या विचारांचा माणूस आहे, अशा प्रकारचे कोणाबद्दलचे तरी वक्‍तव्य आपण कायम ऐकत आलो आहोत.
            माणूस हा निसर्गत:च समाजप्रिय प्राणी आहे, मग तो कोणताही माणूस असो. गरीब असो, श्रीमंत असो, आदिवासी ग्रामीण असो की शहरी सुशिक्षित असो. तो माणसाच्या कळपातच रमणारा आहे. कोणाकडे जात येत नसला तरी तो माणसांच्या वस्तीतच घर बांधतो. माणसाच्या गरजाच अशा आहेत की तो अंशत: का होईना परावलंबी आहे. पूर्णपणे स्वावलंबी नाही. त्याला कपडे शिवण्यासाठी शिंप्याकडे जावे लागेल तर डोक्याचे केस कापण्यासाठी न्हाव्याकडे जावे लागेल. तब्बेत तपासण्यासाठी डॉक्टरकडे जावे लागेल तर जेवण तयार करण्यासाठी बाजारात- दुकानात नाहीतर आयत्या जेवणासाठी हॉटेलीत तरी जावे लागेलच. कोणीही एकलखुरा माणूस जंगलात वा डोंगरात रहायला जात नाही. माणसांच्या गावात वा शहरातच तो वस्ती करतो. म्हणजे प्रत्यक्ष ओळखीत अथवा येता जाता कोणाशी गप्पा मारण्यात तो रमत नसला तरी आजूबाजूच्या माणसांचा कानोसा घेतच तो आपल्या कोषात आपले आयुष्य व्यतीत करत असतो. म्हणून मानवी संबंधांचा विचार आधी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही एका टोकाचा न करता साधकबाधक तारतम्याने घ्यावा लागेल.
            खरं तर हा एकटे राहणार्‍या माणसाचा स्वत:चा दोष नसून तो दोष काही प्रमाणात आपल्यात म्हणजे या समाजात आहे. आपण एखाद्या माणसाला मुद्दाम एकटे करून सोडतो. आपली तार त्याच्याशी जुळत नाही म्हणून तो आपल्यापासून दूर जातोय असे न समजता आपण तो त्याचा मूळ स्वभावच आहे असे समजून चालतो. तो सामाजिक असूनही आपण त्याला समाजापासून वेगळे पाडतो. आपल्या आणि त्याच्या सवयी-  छंद- व्यसनेही भिन्न असल्यामुळे केवळ तो दूर राहतो. आपल्यापासून तो अंतर ठेऊन असतो याचा अर्थ तो आपला व्देष करतो- मत्सर करतो असा होत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे.
            एखादी मानसिक धक्का देणारी घटना घडून गेल्यामुळेही एखादा माणूस कायमचा एकलकोंडा होऊ शकतो. पण या मानसिक पातळीवरच्या गोष्टी आपल्याला अज्ञात असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल गैरसमज करत तो मनुष्य कसा माणूसघाना आहे याची सर्वांकडे चावळ करून हा समज आपल्या मनाशी पक्का करून टाकतो. आणि तसा समज आजूबाजूच्या समाजातही कसा अधिक दृढ होईल असा प्रचार करत राहतो. आपण स्वत:ला सामाजिक- सोशल समजत असूनही आपल्यात ही सामाजिक पर्यावरणासाठी सर्वात प्रदुषणीय बाब आहे. अगदी एकट्या राहणार्‍या माणसापेक्षा असा प्रचार करणारा माणूस समाजाला जास्त धोकादायक ठरतो.
            आपल्या मताने सर्व माणसांपासून अंतर ठेऊन असणार्‍या माणसाच्या घरात सर्वात जवळची पत्नी असते, (अंतर ठेऊन असणारी स्त्री असेल तर तिला सर्वात जवळचा पती असतो.) मुले- बाळे असतात, आई- वडील असतात. या सर्वांशी रोज त्या व्यक्‍तीचा अगदी जवळून संबंध येत असतो. आणि या संबंधांत जिव्हाळ्याचा लवलेशही नसेल असेही आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही. प्रदर्शन करणे वेगळे आणि आतून प्रेम असणे वेगळे. म्हणजे त्या व्यक्‍तीची प्रेम अभिव्यक्‍तीची पध्दत आपल्यापेक्षा भिन्न असू शकते. पण तिच्या हृदयात प्रेमच नाही असे आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्यापरीने ती व्यक्‍ती घरदार चालवत- कर्तव्य पार पाडत आपल्या प्रेमाची अभिव्यक्‍तीच करत असते.
            आता एकदम एकटा राहणार्‍या माणसाबद्दल बोलुया. म्हणजे एखाद्या घरात एक माणूस कायम एकटाच राहतो. त्याला पत्नी नाही, (व्यक्‍ती स्त्री असेल तर तिला पती नाही.) मुले- बाळे नाहीत वा कोणत्याही नातेवाईकांसोबत न राहणारा एकटा माणूस. कोणत्याही नात्याशी आपली तार न जुळल्यामुळे हा मनुष्य एकटा राहत असेल असे आपल्याला वाटत असले तरी, हा माणूस कदाचित विशिष्ट परिस्थितीमुळेही एकटा राहत असेल अशी शक्यता गृहीत धरावी लागतेच. तो एकटा राहतो म्हणून त्याला एकलकोंडा असेही म्हणता येणार नाही. तसेच जंगलात वा पर्वतांच्या गुहेत राहणारा एखादा बुवा- साधुही आपल्यासोबत शिष्यगण घेऊन वावरतो. म्हणून अशा लोकांनाही आपल्याला निर्णायकपणे माणूसघाना ठरवता येणार नाही.
            कोणी एखादा माणूस आपल्याशी फटकून वागतो म्हणून तो एकलखुरा असाही युक्‍तीवाद इथे कोणी करू शकेल. पण तो अमूक एकाशी वा एखाद्या मनुष्य गटाशी फटकून वागतो म्हणून तो पूर्ण समाजाच्या विरूध्द आहे असे मानणे सयुक्‍तीक होणार नाही. त्याच्या एखाद्या तात्विक गोष्टीच्या आड येणार्‍या घटनांमुळे तो तुमच्याशी तसे वागत असेल तर तो एकलकोंडा नसून त्याच्या तत्वाविरूध्द तुम्ही आहात, त्या प्रवृत्तींच्या विरूध्द तो आहे असे म्हणावे लागेल. पण कोणाच्या तात्विक भूमिकेची आपण नेहमीच अशी गल्लत करतो आणि एखाद्याच्या वैचारिक बैठकीला निकाली काढत राहतो.
            आयुष्यात एखादे ध्येय साध्य करण्यासाठी वा अभ्यास करण्यासाठी कोणी एखाद्या माणसाने- कलावंताने आपल्यावर एकटेपणा लादून घेतलेला असतो. घरात समाधी लावून- स्वत:ला कोंडून घेऊन तो कलाकृती निर्माण करीत असतो. कलाकृती पूर्ण झाल्यावर ती रसिकांसाठीच म्हणजे शेवटी समाजासाठीच उपलब्ध होणार असल्यामुळे अशा कलावंतालाही म्हणूनच एकलकोंडा वा समाजात न मिसळणारा म्हणता येणार नाही.
            माणूस ज्या समाजात जन्माला येतो. ज्या परिस्थितीत तो वाढतो. ज्या परिवेशात त्याचे बालपण जाते. ज्या सांस्कृतिक वातावरणात त्याची भावनिक व मानसिक जडण घडण होते, तिथल्या स्थानिक जीवन जाणिवा त्याच्या आख्या आयुष्यात आविष्कृत होत राहतात. मग तो माणसात मिसळो वा आपण म्हणतो तसा तो एकलखुरा असो. कोणाला असे एकलखुरा- एकलकोंडा ठरवणे ही समाजातील काही लोकांची हेतुत: कोती राजकीय खेळी असते. अशा समजामागे वास्तवात मुळीच तथ्य नसते. माणूस जन्मताच अनेक धाग्यादोर्‍यांच्या संबंधात येऊन पडतो. आपली नाळ जशी त्याला कधी विसरता येत नाही, तसे हे नाते- संबंध त्याला नाकारता येत नाहीत. पुढे आयुष्यात जे औपचारिक- अनौपचारिक नाते होत जातात- जोडले जातात, ते ही त्याला कधीच समूळ उपटून फेकता येत नाहीत, काही लोक गर्दीत असूनही कायम एकटेपणा सोसत असतात आतून. कायम घाबरलेले असतात ते. परिस्थितीचा दबाव येतो. मानसिकता आकुंचन पावते. ही खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून मानवी संबंध आणि सामाजिकता ह्या संज्ञा फार जपून हाताळल्या पाहिजेत. नाहीतरी समाजात बहुमताने रूढ होणार्‍या सर्वच वाईट गोष्टींना आपण मान्यता देऊ आणि अल्पमतात असलेल्या चांगल्या गोष्टींना सोडचिठ्ठी देत राहू.
            (पुण्याच्या अक्षरवेध दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/