शनिवार, १ एप्रिल, २०२३

आश्चर्यकारक प्रतिभा

 

 

- डॉ. सुधीर रा. देवरे     

 

                रंगनाथ पठारे यांचा त्यांच्या पहिल्या पुस्तकापासूनचा मी वाचक आहे. श्याम मनोहर आणि रंगनाथ पठारे हे दोन्ही सायन्स शाखेचे अध्यापक असूनही मराठी साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. पठारे यांची प्रतिभा सकस, महत्तम तर आहेच पण वेगवानही आहे. जो जास्त लिहितो त्याचे लिखाण साहित्यिक दर्जा टिकवू शकत नाही, असे काही ढोबळ निष्कर्ष मराठी समीक्षेत रूढ आहेत. 'मोजकेच पण सकस लिहिणारे' सारखे शब्दसमूह समीक्षेत वाक्प्रचाराची जागा घेऊ पाहतात. मात्र पठारे यांनी हा समज सपशेल चुकीचा ठरवला आहे. त्यांची प्रतिभा बहुप्रसव असूनही सकस आहे. 

               पठारे यांचा लेखक म्हणून परिचय मी विद्यार्थीदशेत असतानाच वाचनातून झाला आणि तो एकतर्फी माझ्या बाजूने वाढत राहिला. त्यांच्या 'अनुष्टुभ' दिवाळी १९९० मधील 'सटाणा ते सटाणा' या कथेमुळे आमचा पत्र संवाद सुरू झाला. पण प्रत्यक्ष परिचय फक्त एकदाच आणि तोही उभ्याउभ्याच झाला, तो सुमती लांडे यांच्या 'कमळकाचा' कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी. श्रीरामपूरला. बस इतकाच परिचय. नंतर भेट नाही. आणि आधीही नाही. या भेटीत ते अतिशय मितभाषी असल्याचे लक्षात आले. म्हणून 'नामुष्कीचे स्वगत' वाचताना हेच का ते रंगनाथ पठारे असा मला सहाजिकच प्रश्न पडला. हे श्रेय त्यांच्यातील आश्चर्यकारक  प्रतिभेला द्यावे लागेल.

               प्रतिभेला सर्व श्रेय एकदा देऊन झाले की पठारे यांचे काही योगदान बाकी उरत नाही, असे अर्थातच म्हणता येणार नाही. प्रत्येक कथेसाठी व कादंबरीसाठी लागणाऱ्या प्रतिभेमागील त्यांचे परिश्रम, पुनर्लेखन, विविध तांत्रिक गोष्टी माहीत करून घेण्यासाठीचा अभ्यास, चिंतन या गोष्टीही प्रतिभेइतक्याच महत्त्वाच्या असतात. त्यांच्या 'ताम्रपट', 'दुःखाचे श्वापद' या कादंबऱ्यांमध्ये प्रचंड अभ्यास, श्रम आणि चिंतन असल्याचे लक्षात येते. ''निर्मितीची गोष्ट: 'दुःखाचे श्वापद' च्या निमित्ताने" या त्यांच्याच लेखातून याची प्रचिती येते. 

                आपल्या लिहिण्याच्या परिपाठाविषयी पठारे म्हणतात, "रोज अमुक वेळेला लिहितो असे नाही. संधी मिळाली की लिहितो. संधी नसते तेव्हाही लिहितो म्हणजे त्याचा विचार करतो. सगळ्या प्रकारचे सगळे काम करताना कथानकातलं डोक्यात असतंच. पुष्कळ वेळा तर असं होतं की काहीतरी भन्नाट असं डोक्यात आलेलं असतं- किंवा मनात ते तसं वाटत असतं- आणि लिहिताना ते अगदीच नेहमीचं असं होतं. ते पटकन फाडायचं... गुंतलेलो असेपर्यंत त्यासंबंधी काही ना काही विचार करीत राहणं भागच असतं. लिहिताना त्यातलं सारं येत नसलं तरी बिघडत नाही. न लिहिलेलंही लिहिलेल्या सोबत येत असतंच. मोकळी जागा म्हणून ते येतं."

        "मला लिहितांना एकांत, आवाजरहित शांतता असं काहीही लागत नाही. विषय डोक्यात बसलेला असतो तो सारं पुरवतो. तो साऱ्या अडथळ्यांवर स्वार होतो. एरवीही दुनियेत माणूस म्हणून आपण जितके असतो वा दिसतो त्यापेक्षा आपल्या आत, अंतर्मनात आपण कितीतरी जास्ती असतो. किंबहुना आपलं दुनियेतलं असणं आपल्या आपल्यातील असण्याचा फार लहान भाग असतो. लिहिण्याच्या काळात तर बाहेरचं जग आपल्या दृष्टीने आणखीनच बिन महत्त्वाचं होऊन जातं. त्याच्या असण्या / नसण्याचा ताप होत नाही."  (‘‘निर्मितीची गोष्ट : 'दुःखाचे श्वापद' च्या निमित्ताने’’- रंगनाथ पठारे, अनुष्टुभ, जानेवारी- फेब्रुवारी १९९९, पृ. ४४) असे एकूण लिखाण प्रक्रियेविषयी त्यांचे प्रतिपादन आहे. प्रत्येक कलाकृतीत नवा आविष्कार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न पठारे करीत असतात.

              विषय, आशय यांच्याबरोबरच भाषेचाही वेगवेगळ्या प्रकारे वापर करून पठारे वाचकाला कलाकृतीत बांधून ठेवतात. कुठे ओघवती भाषा, कुठे विनोदी, क्वचित उपहासात्मक, कुठे सरळ तर कुठे तिरकस अशा पद्धतीने वाक्यांचा धबधबा सुरू असतो. त्यांच्या सरळ भाषेत तिरकसपणा जाणवतो तर कुठे तिरकसपणातील सरळता लक्षात येते. ज्ञात असूनही अनोखी भासणारी भाषाशैली, वक्तृत्वपूर्ण व तर्कपूर्ण निवेदन खास पठारे यांची म्हणता येईल अशी घडवलेली भाषाशैली, संस्कृत भाषेतील शब्दांचा जाणीवपूर्वक वापर, दीर्घ- पल्लेदार वाक्यरचना, गांभीर्य, चिंतनशीलता हे त्यांच्या भाषाशैलीचे स्थायीभाव आहेत.

                रंगनाथ पठारे यांच्या सुरुवातीच्या कथांवर भालचंद्र नेमाडे यांचा क्वचित प्रभाव दिसला पण तोही पूर्णपणे पचवून आलेला. सुरुवातीच्या 'अनुभव विकणे आहेत',  'ईश्वर मृतात्म्यास शांती देवो' अशा कथांतून त्यांच्या कथांचा कस लक्षात आला. 'गाभ्यातील प्रकाश', 'वैकुंठीची माती', 'चोखोबाच्या पाठी', 'सटाणा ते सटाणा' या त्यांच्या जबरदस्त आविष्काराच्या कथा आहेत. पैकी 'वैकुंठीची माती' या संत तुकाराम संबधीत लिहिलेल्या कथेवर बरेच प्रतिकूल प्रतिसाद उमटले होते- वाद झाला.

                संत तुकारामांवरील दैहिक कथेइतकीच 'चोखोबाच्या पाठी' ही 'शब्दालय दिवाळी १९९७ मधील कथा एक थोर विष्कार आहे. या कथेतील उदाहरणार्थ म्हणून एकच वाक्य उद्धृत करतो, "आपल्या क्रिया आणि प्रतिक्रियांतील आत्मविश्वासाच्या सापेक्षतेचं प्रकरण अखेर जातं कुठं?" (शब्दालय, दिवाळी १९९७)

               'दिवे गेलेले दिवस', 'रथ', 'चक्रव्यूह', 'टोकदार सावलीचे वर्तमान', 'ताम्रपट', 'दुःखाचे श्वापद', 'नामुष्कीचे स्वगत' आदी सर्वच कादंबऱ्यांतून लेखकाच्या प्रकृतीचे- पिंडधर्माचे एक अंतस्थ सूत्र लक्षात येते. मानवी प्रवृत्ती, विकृती, मानवी वर्तन, सहजता, नैसर्गिक नियम, सहानुभूती, करूणा, नर- मादीची नैसर्गिक लैंगिकता विकृत पद्धतीने आविष्कृत होत असल्याचे अधोरेखन, माणूस, त्याचे आदिमपण, नाते, संबंध, समाज, राजकारण, जागतिकता, वैश्विकता, प्रादेशिकता, देशीयता, खाजगीपण, देहधर्म, कामभाव, वासना, हव्यास, प्रेम, द्वेष, अस्तित्व, परात्मता, असंगतता, वास्तवता, उपरोध इत्यादी आशयसूत्रे रंगनाथ पठारे यांच्या कथा-कादंबरीच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसते. त्यांच्या कलाकृतीतून भाषिक कौशल्याचा आणि कलात्मकतेचा आविष्कार दृग्गोचर होतो.

                कथा- कादंबरी यांच्याइतके पठारे समीक्षा क्षेत्रातही तितक्याच अधिकाराने वावरतात, हे त्यांच्या 'सत्वाची भाषा' या ग्रंथाने सिद्ध केले आहे.

                "आपली वाड्.मयीन परंपरा" या लेखात पठारे साहित्याविषयी म्हणतात, "साहित्य ही एक सामाजिक वस्तू आहे. लिहिणारा समाजात जन्म घेतो, वाढतो. त्याच्या जगण्यात त्याच्या काळातल्या समाजाविषयी, त्यातल्या माणसांविषयी, त्यांच्यातल्या नात्याविषयी वेगवेगळ्या प्रकारे त्याला जे प्रश्न पडतात, त्यांच्या अनुषंगाने एक प्रतिक्रिया म्हणून तो समजावून घेण्याचा एक भरीव प्रयत्न म्हणून तो लिहित असतो. असे हे लिहिणे वा रचना करणे तो एकट्याने करीत असला तरीही तो सुटा असा नसतो आणि लिहून झाले की जे काही तयार होते ते साऱ्या समाजाचे असते / होते. त्याला सामाजिक मूल्य मिळते. लिहिणे हा समाजाविषयी, मानवी नात्यांविषयी काही सत्य शोधण्याचा, त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग असतो. साहजिकच हा रस्ता या ना त्या प्रकारे समाजातूनच जातो. त्याच्या बाहेर त्याला काहीही महत्व व अर्थ असतच नाही. साऱ्या लेखनाची प्रेरणाच मुळी या ना त्या प्रकारे सामाजिकच असते व तिची मुळे लेखकाच्या वर्तमानातच असतात. त्यामुळे लेखनाचे सामाजिक वास्तवाशी नाते असणे स्वाभाविकच आहे."

               ("आपली वांड्.मयीन परंपरा"- रंगनाथ पठारे, 'प्रतिष्ठान', मार्च- एप्रिल १९९७, पृ. २५)

               पठारे यांच्या समग्र वाड्.मयातून त्यांच्या जीवनविषयक दृष्टीचा प्रत्यय येतो. कोणत्याही कलाकृतीत तत्कालीन सामाजिक जीवन जाणिवांच्या भावविश्वाचे स्पष्ट प्रतिबिंब पडलेले असते, असे द. ग. गोडसे यांचे मुख्य सूत्र आहे. गोडसे यांच्या कलामीमांसेचा एक अभ्यासक या नात्याने रंगनाथ पठारे यांचे उपरिनिर्दिष्ट प्रतिपादन मला खूप महत्त्वाचे वाटते. पठारे यांच्या समग्र साहित्याचा 'पोत' सूत्राच्या अनुषंगाने अभ्यास केला तर निष्कर्षात त्यांच्या या अवतरणाचेच प्रतिबिंब दिसेल.

               (प्रकाशित : स्त्रग्धरा, ऑगष्ट- सप्टेंबर 2000, रंगनाथ पठारे विशेषांकात प्रकाशित. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

संदर्भ :

१) रंगनाथ पठारे यांचे समग्र साहित्य

२) अनुष्टुभ दिवाळी 1985, 1986, 1990

३) शब्दालय दिवाळी 1997 

४) अनुष्टुभ जानेवारी- फेब्रुवारी 1999

५) प्रतिष्ठान मार्च-एप्रिल 1997

 

© डॉ. सुधीर रा. देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/