बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

लोकसंस्कृतीचा आदिम नाद (भाग दोन)
 -    डॉ. सुधीर रा. देवरे

            मित्राबरोबर दळवटजवळच्या कोसुर्डे गावाच्या रानखळीवर प्रत्यक्ष कोकणा लोकांच्या डोंगर्‍या देवाच्या भक्‍तांचा अनुभव घेतला. रात्रभर त्यांच्याबरोबर थंडीत थांबलो. त्यांच्या सोबत भुज्या नावाचा कुठलीही चव नसलेला पदार्थ खाल्ला. नागलीची भाकर खाल्ली. कडाक्याच्या थंडीत शेकोटी शेजारी बसून संपूर्ण रात्र डोंगर्‍या देवाच्या उपासकांचा नाच, अंगात घेण्याची पध्दत, काकडा आणि चिमटा उघड्या अंगावर मारून घेण्याची पध्दत, त्यांचे आदिम हुंकार, नाच पहात, थाळीवरची कथा ऐकत थंडीत कुडकुडत बसलो. शिवार देव, वाघ देव, नागदेव, भूते यांची लोकश्रध्देच्या मुळातून माहिती भक्‍तांकडून काढत होतो. गाणे ऐकले, मंत्र ऐकले आणि भक्‍तांच्या मुलाखतीही घेतल्या. मंत्र, गाणे लिहून घेतली. माझ्याकडे टेप नव्हता. हा कार्यक्रम पौर्णिमेच्या रात्री फक्‍त चंद्राच्या चांदण्यात होत असतो. डोंगरावर उजेडाची कोणतीही सोय नसते.
      जेजूरीचे खंडोबा हे लोकदैवत महाराष्ट्रात सर्वत्र लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील सर्व भागात खंडोबाचे भक्‍त आढळतात. त्या त्या भागातील वैशिष्ट्ये खंडोबा दैवताच्या पूजनात, विधीत आणि लोकगीतातही ठळकपणे दृगोचर होतात. अहिराणी भागात खंडोबाचे भक्‍त प्रत्येक रविवारी एकत्र जमतात. खंडोबाची गाणी डफ-  खंजिरीवर गातात. अशा वेळी भक्‍तांच्या अंगात येते. भक्‍त घुमतात. हे भक्‍त केव्हातरी एकदा आपल्या घरी आढीजागरणाचा कार्यक्रम आखतात. हा कार्यक्रम आपल्या घरी लग्नकार्य असल्यासारखा भव्यपणे साजरा केला जातो. या
कार्यक्रमाला लग्नकार्याइतकाच खर्च येत असतो. आढी म्हणजे जमिनीत खोदलेली चारी. चारीत खैराची लाकडे रात्रभर जाळून जो विस्तव तयार होतो, त्या विस्तवावरून भक्‍त अनवाणी पायांनी चालतात.
      कानबाईचा उत्सव तर खानदेशात प्रमुख उत्सव असतो. कानबाई बसवलेल्या घराच्या मंडपात सामुदायिक विवाह होतात. अशा विवाह उत्सुक जोडप्यांना अथवा त्यांच्या पालकांना कोणताही खर्च करावा लागत नसला तरी ज्या घरी कानबाई बसते त्या भक्‍ताला खर्च करावा लागतो. कानबाई हे खानदेशातील लोकदैवत असल्यामुळे बहुजन समाजातील कोणत्याही जाती-जमातीचे लोक कानबाई बसवतात. अनेक घराण्यात कानबाई आपल्या वडिलोपार्जित चालत आलेल्या वंशपरंपरेने दिलेली देणगी म्हणून बसवली जाते. आमच्या गावात माळ्यांच्या एका कुटुंबात कानबाई वंशपरंपरेने बसवण्याची पध्दत होती. तथापि मराठा, माळी, वाणी, सुतार, लोहार, साळी, कोष्टी अशा खानदेशातील कोणत्याही समाजात कानबाई बसवली जाते.
      भिलांमध्ये प्रचलित असलेली मृत व्यक्‍तीचे मुखदर्शन घेण्याची पध्दतही मला अपघाताने आणि अतिशय कोवळ्या वयात प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. बहुजन समाजाप्रमाणे भिलांचाही हा एक चिरा बसवण्याचा कार्यक्रम असेल, असे समजू या खेळता खेळता मजा घेत मी या मिरवणूकीच्या मागे मागे गेलो आणि भिलांच्या स्मशानात कबरींजवळ येऊन पोचलो. तिथे काही महिण्यांपूर्वी पुरलेले मृत व्यक्‍तीचे प्रेत कबरीतून खोदून काढण्यात आले. मृत व्यक्‍तीच्या सर्व नातेवाईकांनी त्याचे मुखदर्शन घेतले. या सर्व पध्दतीला तोंड पाहण्याचा कार्यक्रम साजरा करणे असं म्हणतात. अशा प्रथेबद्दल बालवयात तोपर्यंत मी कोणाकडूनही ऐकलं नव्हतं. एकदम हा अनुभवच प्रत्यक्षपणे अंगावर आला. हे सर्व पाहून त्या कोवळ्या वयात मी हादरून गेलो. घरी येताच मी अंथरूण धरलं. त्या कबरीतील प्रेताचे उग्र रूप माझ्या डोळ्यासमोर कितीतरी दिवस सारखे वाकल्या दाखवत होतं.
काही ठिकाणी अजून ही पध्दत टिकून असली तरी आता ही चाल हळूहळू बंद होत आहे. लग्नाच्या पत्रिका छापल्या जातात तशा पत्रिका छापून हा कार्यक्रम काही ठिकाणी आधुनिक होताना दिसतो. काही नागरी हवा लागलेले लोक आणि नोकरी वा व्यवसाय निमित्ताने शहरात स्थायिक झालेले लोक आता या लोकपरंपरा मानत नाहीत. त्यांना या परंपरा कमीपणाच्या वाटतात. काही परंपरा तोडता येत नाहीत आणि मुख्य प्रवाहही सोडवत नाही म्हणून असे कार्यक्रम चोरून लपून दूर आपल्या गावाला जाऊन करून येतात. आपली बोलीभाषा बोलायचंही आता अनेकांना कमीपणाचं वाटू लागलं. अनेक सुशिक्षित लोक आपल्या मुलांना आपली बोलीभाषा बोलू देत नाहीत.
      गावातले हे विश्व सोडून दूर शहरात गेल्यानंतर आदिवासी लोककलांचे आणि लोकपरंपरांचे महत्व मला जास्तच जाणवू लागलं. त्याच्यातील नैसर्गिकता आणि सहजता यांची ओढ वाटू लागली. काही अंधश्रध्दा सोडल्या तर ग्रामीण व आदिवासी जीवन जाणिवांच्या कला ह्या काळाला पुरून उरणार्‍या आहेत. लहानपणी प्रत्यक्ष अनुभवलेलं कागदावर हळूहळू उतरायला लागलं.
      गाव शिवारात राहणार्‍या आणि आपली बोली बोलल्या जाणार्‍या परिसरात लोकपरंपरेकडून जे उत्सव साजरे केले जातात ती लोकपरंपरा- लोकसंस्कृती असं या संकल्पनेमागचं सूत्र आहे. या लोकपरंपरेत देव, दैवते, विधी, पूजन, लोकश्रध्दा, लोकसमज, उग्र उपासना पध्दती, अहिराणी भागातील आदिवासी लोकजीवन लोकवाड्मय, बोली, सांकेतिकता, गूढता आदी सर्व अंगांचा समावेश होतो. त्याचा सांगोपांग विचार या सदरातून होत राहील.
      (महाराष्ट्र टाइम्स नाशिकच्या लोकधारा सदरात प्रकाशित झालेल्या लेखाचा संपादित अंश. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/