मंगळवार, १५ जुलै, २०१४

सामाजिक बांधीलकी म्हणजे काय?



- डॉ. सुधीर रा. देवरे


       समाजात मिसळणे म्हणजे काय? मिळून मिसळून वागणे म्हणजे काय? एकमेकांना धरून राहणे म्हणजे काय? सोशल असणे म्हणजे काय? सामाजिक बांधीलकी पाळणे म्हणजे काय? हे जे सर्व प्रश्न आता उपस्थित करण्यात आले त्यांची फार सोपी उत्तरे आपण आधीच आपल्यासाठी शोधून काढलेली असतात.
         आत्मतुष्टीसाठी प्रसिध्दी मिळवणे, कार्यालयीन वा कॉलनीच्या छोट्याश्या कुंपणातच कुपमंडूक राजकारण करणे वा चार लोकांत निरर्थक चर्चा करणे म्हणजे आपण सामाजिक असतो का? भ्रष्ट व्यवहाराच्या साखळीत अडकलेले लोक समाजात एकमेकांशी कायम मुखवटे लावून चांगले वागण्याचे नाटक करतात, त्याला आपण एकमेकांना धरून राहणे वा सोशल असणे मानतो का? आपल्यात गैरहजर असणार्‍या लोकांची उणीदुणी काढण्यासाठी सातत्याने एकत्र जमणे याला आपण लोकांत मिसळणे असे समजतो का? व्यसनांची तहान भागविण्यासाठी विशिष्ट स्थळी जमणे, छोटे मंडळे काढणे, गेट टुगेदर करणे, कोणत्याही क्षुल्लक सेलिब्रेशनच्या निमित्ताने उठता बसता पार्ट्या करण्यासाठी एकत्र येणे याला आपण सामाजिक बांधीलकी पाळणे समजतो काय? दोन तीन कुटुंब एकत्र येऊन वीकएंड साजरे करत फिरणे म्हणजे आपल्यात सामाजिक बांधीलकी असते काय?
         आपल्या कळपात न राहणार्‍या माणसाला आपण एकतर्फी पण बहुमताने एकलकोंडा वा किडखाऊ वृत्तीचा ठरवून टाकतो. म्हणजे समाजात जे लोक वाईट असतात ते आपल्या बहुमताने एखाद्या चांगल्या माणसाला सहज वाळीत टाकू शकतात. एखादा चांगला प्रामाणिक माणूस केवळ आपल्या घोळक्यात मिसळत नाही म्हणून अशा लोकांकडून तो वाईट स्वभावाचा ठरवला जाऊ शकतो. समाजातील वाईट चालीरीतींवर टीका करणार्‍याला, वाईट प्रवृत्तींशी फटकून वागणार्‍यालाच आपण समाजाविरूध्द असल्याचे ठरवून टाकतो. खरं तर हे बहुसंख्येने वाईट विचारांचे लोकच समाजाला अधिक घातक असतात.
         एखादी चारचौघात न मिसळणारी व्यक्‍ती आपल्यापेक्षा विचारांनी, वागण्याने प्रामाणिक असेल तर ती आपल्यापेक्षा सामाजिक बांधीलकी जास्त पाळते असे मानावे लागेल. येता जाता माणसात न मिसळणारा पण माणूस जातीसाठीच कोपर्‍यात चिंतन करणारा वा लिखाण- कला माध्यमातून प्रबोधन घडवणारा माणूस आपल्यापेक्षा कितीतरी पटीने सामाजिक असतो.
         वर वर माणसांत मिसळून राहणे वेगळे आणि माणूस जातीच्या कल्याणासाठी तत्वांशी तडजोडी न करता वागणे वेगळे. म्हणून कोणी कोणाला एकलकोंडा, माणूसघाना, माणूसकीहीन म्हणाला, की मी त्या व्यक्‍तीकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने न पाहता त्या माणसाच्या खूप जवळ जातो. आणि त्या व्यक्‍तीत मला जे दर्शन घडते ते खूपच उच्च प्रतीच्या सामाजिक भानाचे असते!

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/