शनिवार, २९ जून, २०१३

देवाचा तडाखा 
-         डॉ. सुधीर रा. देवरे


         काही हजार वर्षांपूर्वी आजच्या हिमालयाच्या जागी टेथीस नावाचा समुद्र होता. भारतीय बेट अंटार्ट्रीका खंडातून तुटून उत्तरेकडे सरकू लागले. तिबेट भूखंड आणि भारतीय भूखंड यात हा समुद्र दाबला जाऊन त्याचा गाळ आणि त्यातील खडकांचा चुरा होत हा भाग वर उचलला गेला, तोच हा हिमालय पर्वत. या भागाची अजूनही हालचाल होतेय म्हणून या पर्वताची उंची दरवर्षी वाढत जाऊन त्याने आता जागतिक उंची गाठली. हिमालयाच्या अशा निमिर्तीमुळेच हा तीव्र भूकंपप्रवण प्रदेश तर आहेच पण तिथे होणार्‍या ढगांच्या कोंडीमुळे तो अतिपर्जन्य वृष्टीचाही प्रदेश आहे.
         हिमालय हा सह्याद्रीसारखा एकसंध दगडात नसून तो ठिसूळ पर्वत असल्याने त्याच्यावर कोणतेही कोरीव काम करता येत नाही. महाराष्ट्रातल्या पर्वतांत अनेक लेण्या कोरलेल्या दिसतात. अजिंठा वेरूळ ह्या लेण्या तर प्रत्येकालाच माहीत आहेत. अशा लेण्या म्हणूनच हिमालयात दिसत नाहीत.
         निसर्गाला देव मानण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. जिथे निसर्ग तिथे देव पहाण्याची आपली दृष्टी असल्यामुळे सर्व प्राचीन मंदिरे आणि तिर्थक्षेत्रे आपल्याला निसर्ग सानिध्यात आढळतील. देवराई नावाचे जंगलही तिर्थक्षेत्रांजवळ राखून ठेवलेले आढळते. देवाचे रान असा त्याचा अर्थ आहे. देवाचे असल्यामुळे हे जंगल कोणी तोडू नये असा अलिखीत दंडक असतो.
         निसर्ग तिथे देव ह्या सूत्रामुळेच निसर्गाचा राजा असलेल्या हिमालयाच्या कुशीत देवस्थाने निर्माण झाली. जो संसाराला कंटाळला, जीवनाच्या धबडक्यातून बाहेर पडू इच्छितो आणि जो शारीरिकदृष्ट्याही तंदुरूस्त आहे त्याने हिमालयाचा खडतर प्रवास पायी करून ह्या देवांच्या म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात लीन व्हावे यासाठी ही तीर्थक्षेत्रे निर्माण झाली होती. पण पुढे देवांचे सुलभीकरण सुरू झाले, व्यापारी दृष्टीकोनाने या परिसराला आता व्यावसायिक पर्यटनाचे स्वरूप आले. व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात इथे घोडे आणि खेचरे आणले गेलेत. वाहने त्या त्या जागी पोचावीत म्हणून ऐसपैस रस्ते तयार करण्याचा आग्रह धरण्यात आला. त्यासाठी प्रचंड वृक्षतोड झाली. रस्ते झाले. पर्यटकांची संख्या वाढू लागली म्हणून त्यांच्यासाठी हॉटेल्स निर्माण झालीत. यात्रेसारखी विविध दुकाने येऊन आधुनिक मार्केट तयार झाले. या सगळ्यांसाठी आधीच ठिसूळ असलेला पर्वत खोदायला सुरूवात झाली. झाडे तोडायला सुरूवात झाली. घोड्यांसाठी- खेचरांसाठी चारा म्हणून पुन्हा अतिरीक्त झाडे तुटू लागलीत. स्फोटकांनी दगड फोडून बांधकामे सुरू झालीत. तीव्र उताराच्या ठिसूळ नदी पात्रांवर ‍अतिक्रमणे होऊ लागलीत. विद्युत प्रकल्प आलेत.
         आपण ज्या रस्त्याने प्रवास करतोय, ज्या हॉटेलीत थांबलोय अशी ही सगळी बांधकामे ठिसूळ आणि कोरड्या गाळावर उभी आहेत हे तिथे जाणार्‍या लाखो भक्तांना माहीत नाही. (पैकी केदारनाथ मधील केदार या शब्दाचा अर्थच मुळी चिखल-गाळ असा आहे.) आजूबाजूला ज्या पर्वतरांगा आहेत त्यांच्या नेहमी दरडी कोसळतात आणि त्या दरडी किती वेगाने खाली येतात, पाऊस झाला तर पाण्याचा स्त्रोत किती वेगाने वाहतो याचे ज्ञान तिथे जाणार्‍या कोणत्याही पर्यटकाला वा भक्ताला नाही. वृक्षतोड, रस्ते, नवनिर्माण, बांधकामे, काँक्रेटीकरण, अतिक्रमण आदींमुळे डोंगराचे कडे धसण्याचे आणि झिज होण्याचे प्रमाण वाढले. तिथे निवारे आणि दुकानेच बांधायची तर ती ताप्तुरती आणि हलक्या वजनाच्या कुट्या उभारूनच करायला हवीत याचे भान स्थानिकांनी वा तिथल्या राज्यसरकारने बाळगले नाही.
         नैसर्गिक परिसर कसा, त्याची क्षमता कशी, पर्यावरण आपण नष्ट करीत आहोत की काय असे प्रश्न पैशांनी चंगळ करणार्‍या लोकांना जसे पडले नाहीत तसे व्यवसाय करणार्‍या लोकांनाही पडले नाहीत. चार रूपयाचा बिस्कीटचा पुडा, दहा रूपयाची पाण्याची बाटली हजारो रूपयांना विकणारे आणि मरणाच्या खाईत पडलेल्या लोकांची लुट करणारे जसे माणुसकीशून्य ठरतात, तसे पैशांच्या जोरावर कोणतेही पुण्य पदरात पाडून घेणारे लोकही तेवढेच माणुसकीशून्य आहेत. त्याची परिणीती आज आपण पहात आहोत. आपल्याजवळ विपुल पैसा आहे, स्वत:ची गाडी आहे आणि पुण्य पदरात पाडून घेण्याच्या उंचीवर पोचण्यासाठी रस्तेही आहेत तर मग चला आपणही पर्यटन करून येऊ ही वृत्तीच अखेर घातक ठरली.
         देव आणि पुण्य या फार लांबच्या गोष्टी झाल्या, पण आज साधी माणुसकी सुध्दा पाळली गेली नाही ही बाब या घटनेतून प्रकर्षाने लक्षात आली. निसर्गाच्या चक्रात नको इतका हस्तक्षेप केला तर निसर्ग तडाखा देतो. निसर्गाला आपण देव मानत असल्याने हा देवाचा तडाखा म्हणजे ही माणसाला मिळालेली ताकीद समजायला हवी.

-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, २२ जून, २०१३

पानकळा...


 
-         डॉ. सुधीर रा. देवरे


         पावसाळ्याला अहिराणी भाषेत पानकळा म्हणतात आणि पावसाला पानी म्हणतात. म्हणजे पाऊस पडला का तुमच्याकडे असे विचारण्याऐवजी पानी पडला का तुमच्याकडे असे विचारले जाते. अहिराणीतच नव्हे तर मराठीतल्या अनेक बोलींमध्ये पावसाला पानी पडणे आणि पावसाळ्याला पानकळा म्हटले जाते.
         पानकळा हा शब्द मला खूप भावतो. हा शब्द प्रमाण मराठी भाषेत सुध्दा रूढ व्हायला हवा. पाण्याच्या कळा येणे म्हणजे पानकळा. कळा हा शब्द विशिष्ट घटनेशी संबधीत आहे. पुरूषांपेक्षा स्त्रियांना हा शब्द अधिक जवळचा वाटेल. जशा नवनिर्माणसाठी- मूल जन्माला घालण्यासाठी ‍िस्त्रयांना कळा येतात, तशा पावसासाठी आख्या सृष्टीला कळा येणे सुरू होते. आणि मग त्यानंतर पानकळा सुरू होतो- पानी पडतो. पानकळा सुरू होण्यापूर्वी जमीन, वृक्ष आणि सगळी सजीव सृष्टीच उन्हाने होरपळून निघालेली असते. म्हणून या पानकळासाठी सगळेच उत्सुक होत पानी कोसळण्यासाठी आभाळाकडे डोळे लाऊन बसतात.
         चार महिण्याच्या रखरखीत उन्हानंतर पावसानेच नव्हे तर नुसत्या पावसाच्या वातावरणानेही माणूस उल्हसित होतो. आभाळाला पानकळाच्या-पावसाच्या कळा सुरू झाल्या की आभाळ हंबरू लागते, म्हणजे गरजू लागते. मग प्रत्यक्षात पाऊस पडला नाही तरी ते आल्हादायक वातावरण, भर उन्हातली सावली, गडगडणारे ढगाळ आभाळ सगळ्याच सजीवांना हवेहवेसे वाटते आणि त्यात तो कोसळलाच तर मग आंनदाला सीमा नाही. पानवार्‍याने येणारा मृदगंध माणसालाही सुखावतो. पहिल्या पावसात चिंब होण्याचा आनंद फक्त माणूसच घेत नाही तर सगळे सजीव या क्षणासाठी आसुसलेले असतात.
         निसर्गात प्रंचड ऊर्जा आहे आणि निसर्गाशिवाय आपण कितीही शोध लावले तरी ते अपूर्ण पडतील. म्हणूनच मी निसर्गालाच देव मानतो. माझ्या अहिराणी कविता संग्रहाचे नाव आहे, आदिम तालाचे संगीत. पावसाचा आवाजाला मी आदिम संगीत समजतो. या कविता संग्रहात मी एका कवितेत म्हटले आहे:
पावसाचा आवाज सुरू झाला की
मी बंद करून देतो
टीव्ही, रेडीओ आणि
घरातले सगळे बारके बारके आवाज
आणि ऐकत बसतो फक्त
आदिम तालाचे संगीत...
जेव्हा लोक बंद करून घेतात
दारे- खिडक्या
आणि पांघरून बसतात ब्लँकेट
आपलीच आपल्याला उब घेत
आपल्या आपल्या घरात...


-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, १५ जून, २०१३

अपंगत्वाच्या वेदना
-         डॉ. सुधीर रा. देवरे


         कोणी दाखवतं तर कोणी लपवतं. पण अपंगत्वाच्या वेदना या सगळ्या आयुष्याला वेढून असतात. आपलेच ओझे ओढत आयुष्यभर सामान्यपणे वावरणे ही साधीसुधी गोष्ट नाही. अशा अनेक समस्यांना समोरे जात स्वावलंबी होण्यासाठी पायाने अस्थिव्यंग असणार्‍या माणसाने अधिकृत वाहन बनवले तर त्या वाहनाच्या पासींगसाठी त्याला भली मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. मुख्य परिवहन अधिकारी श्री. अमर पाटील यांच्यासारखे काही सहृदय व समजूतदार लोक सोडले तर अपंगांच्या अडचणी कोणी समजून घ्यायलाच तयार नाही.
         अपंगाला गाडी पासींग करायची वा लायसन्स काढायचे असेल तर त्याला थेट हाजीअली मुंबईचे प्रमाणपत्र आणायला सांगितले जाते. पण शासकीय जिल्हा चिकित्सालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे असा जीआर असूनही तो संबधितांना माहीत नाही. मुख्य आरटीओ ऑफिस, मुंबई हाजीअली, जिल्हा चिकित्सालय अशा ठिकाणी चार चार वेळा अपंगांना खेटे घालावे लागतात. असे खेटे घालत असताना - प्रमाणपत्रे मिळवत असताना पासींग नको आणि हे जीणेही नको असे अनुभव अपंगांना येत असतात.
         अशा पासींगसाठी सीव्हील सर्जनचेच नव्हे तर ग्रामीण भागातील कोणत्याही खाजगी अस्थिव्यंग सर्जनचे प्रमाणपत्रही यापुढे ग्राह्य धरावे अशा आशयाचे इमेल मी केंद्र सरकार- दिल्ली, महाराष्ट्र सरकार- मुंबई व सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पाठवले होते. त्याला यश येऊन नुकताच दिनांक 12 जून 2013 ला महाराष्ट्र शासनाने अद्यादेश काढला आहे, तो असा:
         अशा प्रकारच्या पासींग व लायसन्ससाठी सर्व ग्रामीण व तालुका शासकीय रूग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमाणपत्रेही यापुढे ग्राह्य धरले जावेत. यापुढे मुंबईच्या प्रमाणपत्राचा आग्रह धरू नये.
         मी जो इमेल सर्वत्र पाठवला होता. तो खाली देत आहे:

Painful

Sir,
Some points send about disabled persons which would be discussed to your end please. And think on it seriously.  

1)      Disabled person means life time problems.
2)      For getting driving license, Vehicle Passing or getting permission for modifying authorized vehicle from RTO, there is very bad harassment from RTO office.
3)      All Taluka placed medical officers or private practitioners who are qualified  orthopedic surgeon would have authority for giving the medical certificate in which fitness of the handicapped person would be mentioned. So this authority would not be given to only for civil surgeon of district level. Because of it disabled persons are unable to moving here and there more. And these  persons (Disabled) may suffer from different problem while going through the way of government to gain driving license.


-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, ८ जून, २०१३

पदव्यांच्या वेतनश्रेण्या...-         डॉ. सुधीर रा. देवरे


         कधीतरी ऐकले होते की काही लोक दहावी बारावीचे गुण पेपर तपासणार्‍यांकडून वाढवून आणतात. नंतर पुन्हा कधीतरी हेच इंजिनियरींग आणि मेडीकल क्षेत्रात घडत असल्याचे ऐकले होते. काही प्रकाच्या सीइटींमध्येही हा प्रकार चालतो असे ऐकण्यात आले होते. आणि आता तेच एम.फिल./ पीएच. डी. बद्दल ऐकतोय.
         एम.फिल./ पीएच. डी. म्हणजे संशोधन. एम.फिल. मध्ये संक्षिप्त संशोधन असते तर पीएच. डी. च्या संशोधनाचा पट विस्तृत असतो. म्हणून एम.फिल. ही पीएच. डी. ची पहिली पायरी असल्याचे समजले जात होते. नंतर एम.फिल. अगदी कोणीही होऊ लागले. शंभरेक कागद लिहून काढले की एम.फिल. होता येते अशीही सर्वत्र चर्चा होऊ लागली. काही लोक याच पध्दतीने एम. फिल झालेत असेही ऐकू येत होते. नंतर विद्यापीठांकडून एम.फिल.च्या पदव्या बहाल करणार्‍या काही दलाली संस्थाही अस्तित्वात येऊ लागल्या होत्या. मात्र एम.फिल.ची घसरगुंडी झाली तरी पीएच. डी. चा दबदबा आताआतापर्यंत होताच.
          पीएच. डी. म्हणजे विद्यावाचस्पती होणे. यात संपूर्ण नवीन काही शोधून काढणे अपेक्षित नसले तरी याआधी जे संशोधन आहे त्यात नवीन थोडीफार भर टाकणे म्हणजेच रिसर्च. असे रिसर्च करायला चिकित्सक लोक दहा दहा वर्ष लावतात. अनेक जणांना पीएच. डी. करण्यासाठी दहा वर्ष लागलेले आहेत. विद्यापीठ दोन वर्षांसाठी नोंदणी करत असले तरी ही मुदत संशोधकालाच कमी पडत असल्यामुळे वेळोवेळी मुदतवाढ संशोधकाला करून घ्यावी लागते. असे असताना काही लोक मुदतवाढ न करता दोन वर्षांतच पीएच. डी. होऊ लागलीत. आणि आता तर कोणीतरी फक्त तीन महिण्यात पीएच. डी. झाल्याचे ऐकतोय.
         दोन वर्षांपूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे एकूण पीएच. डी. पध्दत समजून घेण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांना पीएच. डी. करण्याचे अ ब क ड सुध्दा माहीत नव्हते. त्यांच्याशी चर्चा करतांना माझ्या असे लक्षात आले की त्यांना संशोधनाची तांत्रिक माहिती तर नाहीच पण त्या क्षेत्रातला त्यांचा प्राथमिक अभ्यासही नव्हता. त्यांनी एम.फिल.ही केलेले नव्हते. आणि सहा महिण्यापूर्वी ते मला रस्यात भेटले तर म्हणाले, मी पीएच. डी. झालो बरका सर. यावेळी माझ्या चेहर्‍यावरील आश्चर्यही त्यांना सहज दिसले असेल.
         आपण कुठे चाललो आहोत. काय करतो आहोत. याचे भान आज कोणालाही उरले नाही. विकत घेणार्‍यांनाही नाही आणि विकले जाणार्‍यांनाही नाही. एम.फिल./ पीएच. डी. वर जर प्राध्यापकांना पाच पाच वेतनश्रेण्या मिळणार असतील तर हे कधीतरी होणारच होते. प्राध्यापकांचे शोधनिबंध नियतकालिकांत प्रकाशित झाले पाहिजेत असा युजीसीने नियम केला आणि पैसे घेऊन शोधनिबंध छापणारे नियतकालिके निघू लागलीत. आज गुणवत्तेसाठी कोणी शिकतच नाही. पैसे कमवण्यासाठीच तर हे शि‍क्षण आहे. ज्ञानासाठी हे शिक्षण नव्हे. फक्त पदव्यांच्या वेतनश्रेण्या घेण्यासाठी आजचे शिक्षण आहे.
  

-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

शनिवार, १ जून, २०१३

नक्षलवादी हे दहशतवादीच...                                                              -         डॉ. सुधीर रा. देवरे

         आजही काही चळवळींमधून, काही सामाजिक संस्थातून, काही राजकीय वर्तुळांतून तर काही वैचारिक वर्गातूनही नक्षलवादी चळवळीकडे छुप्या सहानुभूतीने पाहिले जाते. नक्षलवाद हा अन्यायामुळे वाढला असे बोलले जाते. काही उपेक्षित भागात भौतिक प्रगती होत नाही आणि त्यांच्या रास्त मागण्या मान्य होत नाहीत म्हणून स्थानिकांना नाईलाजाने हिंसक मार्गाने जावे लागते असे लोकांचे प्रबोधन करणारे तथाकथित विचारवंत देशाच्या कानाकोपर्‍यात सापडतील.
         पण एंकदरीत या नक्षलवाद्यांचे वर्तन पाहिले तर ते दहशवाद्यांइतकेच क्रूर आहेत हे त्यांनी वेळोवेळी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. आदिवासी दुर्गम क्षेत्रात रस्त्यांचे काम सुरू झाले तर त्या कामावरचे वाहने- साहित्य ते रातोरात जाळून टाकतात. गरीब आदिवासींवर दहशत बसवून बळजबरी त्यांना हिसेंत सामील करून घेतात आणि तसे न करणार्‍यांचा पाशवीपणे काटा काढतात. भारतीय निमलष्करी जवानांची आणि पोलिसांची निघृण कत्तल करतात. एका निमलष्करी जवानाची हत्त्या केल्यानंतर त्याच्या पोटात बाँब ठेवल्याचे उदाहरण ताजे आहे.
         अन्याय झालेले लोक गरीबीत खितपत पडतात. रागाने तात्कालीन आंदोलन करतात. पण आजच्या नक्षलवाद्यांकडे असणार्‍या पैशांनी त्या त्या राज्याचा कायमचा विकास होईल इतकी प्रंचड संपत्ती या नक्षवाद्यांकडे आहे. यांच्या हातात चीन- पाकिस्तानने बनवलेले अत्याधुनिक शस्त्रे कसे येतात? भारतीय व्यवस्थेविरूध्द लढण्याचा त्यांचा नेमका हेतू काय आहे? हे देशाशीच युध्द करायला निघालेत असे त्यांच्या वर्तणुकीतून दृग्गोचर होते. ज्या लोकांचा भारतीय राज्यघटनेवर विश्वास नाही ते देशभक्त कसे असू शकतील आणि ते यशश्वी झालेच तर कोणाचे भले करू शकतील? ज्या आदिवासींसाठी त्यांनी बंड पुकारले आहे असा त्यांचा दावा आहे तेच स्थानिक आदिवासी त्यांच्याच धाकाने रोज जीव मुठीत धरून जगताहेत.
         गरीब आदिवासी आणि नक्षलवादात सहभागी झालेले काही लोक वापरले जात आहेत आणि त्यांच्या मोरख्यांचे उद्दीष्ट मात्र वेगळेच आहे हे लक्षात येते. पाहता पाहता देशातील नक्षलवादाने आज संपूर्ण देशावर दहशत निर्माण केली आहे. नक्षलवाद म्हणजे शुध्द दहशतवाद आणि देशद्रोह ठरवून तो कठोरपणे आणि तात्काळ मोडून काढला तरच आपला तरणोपाय आहे.

-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/