मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

चक्र पूजा


-     डॉ. सुधीर रा. देवरे

     चक्र म्हणजे युध्दाची व्युहरचना. देवीचं असुरांशी झालेलं युध्द म्हणजे चक्रपूजा. फक्‍त अहिराणी पट्ट्यातच म्हणजे जुन्या खानदेशी भागातच (बृहन्‍खानदेशातच) चक्र पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. चक्रपूजा ही आपापल्या कुलदैवताची-देवीची पूजा असून ती नवरात्रांत केली जाते. नवरात्रींमध्ये रोज कुठेना कुठे अहिराणी भागात चक्र पूजा असते. त्यातही परंपरेने विशिष्ट माळेलाच चक्र भरण्याची वेगवेगळ्या घराण्यांची प्रथा असते. सप्तमी आणि अष्टमीला चक्र पूजेचे प्रमाण जास्त असते. प्रत्येकाची ठरा‍वीक तिथी- विशिष्ट दिवस ठरलेला असतो. त्या त्या कुळाचे, वाड्याचे पूर्वजांप्रमाणे पारंपरिक पध्दतीने चक्र भरले भरले जातात. ज्यांना नवरात्रांत चक्र भरणे शक्य होत नाही, अशांनी नरक चतुर्दशीला चक्र भरायचे असतात. पण काही कुळांत नरक चतुर्दशीलाच चक्र भरण्याची परंपरा आहे. ही चक्रपूजा आर्थिक दृष्ट्या खर्चिक असल्यामुळेही असेल कदाचित पण चक्र दरवर्षी भरता एक वर्षाआड अथवा तीन वर्षांतून एकदा अशा पध्दतीने केली जाते.
     चक्रपूजेचे साहित्य: चक्रपूजेसाठी अनेक पदार्थ तयार करावे लागतात. खाद्य पदार्थ लागणार्‍या वस्तू ढोबळपणे पुढीलप्रमाणे असतात. नागवेलीची अकरा पाने, पुरणाच्या अकरा पोळ्या (मांडा, खापराची पोळी), अकरा केळी, गव्हाच्या पीठाने बनवलेली डाळींबाची फळे, सांजोरी (करंजी), सोळ्या (गव्हाच्या पीठाच्या पापड्या), भजे, कुरडई, मनोका (हरभर्‍याची उस्सळ), उडदाच्या डाळीच्या पीठाची भजी, गव्हाच्या पीठापासून तयार केलेले दिवे. (दिवे व मेढ्या गरम पाण्यात उकडून घेतले जातात.) दिवे उकडल्यावर ते पाण्यातून काढून घेतल्यावर उरलेल्या त्याच गरम पाण्यात गव्हाची खीर तयार केली जाते. ओले गहू अर्धवट कांडून वरून साखर घालून गव्हाची खीर बनवतात. सार, भात, दहा दिवे अकरावा मेढ्या (मोठा दिवा). अशा सर्व वस्तू, साहित्य पूजेच्या नैवेद्यांसाठी केलेल्या पदार्थांतून सायंकाळी चक्र पूजेची मांडणी केली जाते.
     घरात शेणाने सारवलेल्या जागेवर (आता फरश्या बसवलेल्या घरात फरशी धुवून) चक्र पूजेची मांडणी करताना, तांदुळ (मूळ पांढर्‍या रंगातले) आणि गुलालाने रंगवलेले लाल तांदुळ घेऊन, एकात एक असे अकरा गोल (वर्तुळ) तयार करतात. म्हणजे लाल रंगाच्या तांदळांचा गोल तयार झाला की लगेच पांढर्‍या तांदळांचा गोल असे एकात एक अकरा गोल तयार केले जातात. सुरूवातीचा पहिला लहान गोल लाल रंगाच्या तांदळांचा असतो. हे सर्व गोल म्हणजेच देवीचे चक्र. सर्वात मोठ्या बाहेरच्या वर्तुळाच्या चहू बाजूंना (चारी दिशांना) चार दरवाजे ठेवले जातात. चारही दरवाज्यांसमोर चार बाहुले तयार केले जातात. एक बाहुले मठ या कडधान्याने तयार करतात. दुसरे राखेपासून, तिसरे उडदापासून आणि चौथे हरभर्‍याच्या डाळीचे.
     नंतर तांदळाच्या चक्रांवर नागवेलीची अकरा पाने अंथरली जातात. त्या पानांवर पाच झाडांची पत्री आणि पाच फळे ठेवली जातात. पत्रीवर स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थ अकरा-अकरा संख्येने मांडतात. खाद्य पदार्थांचा नैवेद्य चक्रांवर ठेऊन झाल्यावर त्यावर दहा दिवे मध्यभागी मेढ्या ठेवला जातो. दिवे आणि मेढ्यात फुलवाती, तूप टाकून झाल्यावर कापुरच्या ज्योतीने मेढ्या पेटवला जातो. मग मेढ्यावरून बाकीचे दिवे पेटवले जातात.
     चक्राची मांडणी सुरू केली की, वर्तुळाकार बसलेल्या माणसांपैकी त्यातला एक जण अखंडपणे आग्यॉव असं म्हणतो तर चक्रपूजेच्या चहुबाजूने बसलेले पाहुणे-नातेवाईक उत्तरादाखल विसराग्यॉव म्हणतात. उदाहरणार्थ, एक जण, आग्यॉव. सर्वजण, विसराग्यॉव. आग्यॉव म्हणजे आज्ञा हो- असो. आणि विसराग्यॉव म्हणजे ईश्वर आज्ञा हो. हे अपभ्रंश आहेत. चक्रपूजेची मांडणी म्हणजे युध्दाच्या रणांगणाची मांडणी. देवी आणि दैत्य यांचं हे युध्द. चार वेगवेगळ्या पदार्थांचे बाहुले म्हणजे चारी दरवाज्यांवर चार विशिष्ट वर्गातले शिपाई. मधला तांदळाचा भाग म्हणजे देवीचा गड. देवी गडावरून युध्द करते. देवीला तृप्त करण्यासाठी ही पूजा केली जाते. दैत्याला मारून झाल्यावर शेवटी देवी अग्नीत विलीन होते.
     ही सर्व मांडणी पूजा पुरूष लोक करतात. स्त्रिया करत नाहीत. यावेळी पाच ते नऊ वर्षाच्या लहान कुमारीकेला देवी म्हणून पाटावर बसवतात. तिचे पाय धुवून पूजा करतात. त्या कुमारीकेला दक्षिणा अथवा कपडे दिले जातात. कुमारीकेची पूजा मात्र स्त्रिया करतात.
     चक्रपूजा मांडून झाल्यावर बाजूला होम पूजा केली जाते. या पूजेला एक नारळ, पाच वेगवेगळ्या झाडांच्या काटक्या, चंदनाचे लाकूड, उद, गुगुळ इत्यादी होमात टाकून होम कापूर ज्योतीने पेटवला जातो. होम पेटताच दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी ही सर्वदूर प्रसिध्द असलेली देवीची आरती म्हटली जाते. (देवी अग्नीत विलीन होते.)
     सर्व नातेवाईक, भाऊबंद घरोब्याच्या लोंकाना चक्र पूजेच्या जेवणाचं निमंत्रण दिलं जातं. चक्र पूजा झाल्यावर आधी कुमारीका जेवायला बसते. नंतर निमंत्रित जेवायला बसतात. जेवण वाढताना चक्रपूजेवरील नैवेद्यच उचलून ताटांत वाढला जातो. जेवताना उष्ट टाकायचं नसतं. जेवण झाल्यावर बाहेर कुठंही इतरत्र हात धुता जेवणाच्या ताटातच धुवायचे असतात. ताटातलं खरकटं पाणी एकत्र साचवून त्यात उष्टंमाष्टं, खरकटं दिव्यांतल्या वाता टाकून ते सर्व गंगेत- म्हणजे नदीत विसर्जन करतात. अथवा एखाद्या ठिकाणी खड्‍डा खोदून त्यात ते बुजतात.
     मेढ्या मेढ्याखाली ठेवलेले पदार्थ चक्र भरण्याच्या जागेवरच रात्रभर झाकून ठेवतात. दुसर्‍या दिवशी तो मेढ्या फक्‍त घरातील पुरूष माणसांनी खायचा असतो, असा पारंपरिक रीवाज आहे.
     चक्राचा तांदुळ, उडीद हरभर्‍याची डाळ यांची नंतर केव्हातरी खिचडी शिजवली जाते. गुलालाचा तांदुळ स्वच्छ धुतला जातो. गुलालाचे पाणी, राख, मिठ, दिव्यातल्या वाती यांचंही विसर्जन केलं जातं. ही पूजा सगळ्या बहुजन समाजात भक्‍तीभावाने केली जाते.
     (‘अहिराणी लोकपरंपराढोल या प्रस्तुत लेखक लिखित पुस्तक- नियतकालिकातून. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
 ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/