रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

सरगोंड्यांची झिंग

 


- डॉ. सुधीर रा. देवरे 

                    विरगावला पद्मनाभ स्वामींची समाधी आहे. ह्या समाधीकडे जाण्याचा रस्ता अतिशय छान उतारवळणाचा आहे. दर वर्षी आषाढी आमावस्येला वा दीपअमावस्येला (जिला आपल्या भागात गटार अमावशा म्हणतात) तिथं यात्रा भरते. म्हणजे मी लहान होतो तेव्हा भरत असे. यात्रेच्या दिवशी तिथं लळितही साजरं होत असे. ‘ळि म्हणजे एक प्रकारचं नाटक असतं. भारूड सादर करायची कला म्हणजे ळि’. आता ते होणं बंद झालं. त्या भाग घेणारे कलावंतही एकेक करत वारले.

                    दीपअमावस्येच्या आठ दिवस आधीपासून समाधीत भागवत बसायचा. दूरून कुठूनतरी देहू, आळंदी, पैठण, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा गावांहून आलेले महाराज भागवत वाचायला येत. गावातली देवभोळी माणसं, धार्मिक माणसं, बायाबापड्या आणि वृध्द लोक भागवत ऐकायला येत असत. ऐकता ऐकता पोथी ऐकणारे देवभोळे लोक, बायाबापड्या घरुन आणलेल्या कापसापासून फुलवाता- साध्या वाता तयार करत असत. (महाराज सकाळी आपल्याच विशिष्ट नादात लयबध्द पोथी वाचत. म्हणून ते काय वाचतात ते कोणाला समजत नसे. पण दुपारच्या सत्रात सकाळी वाचलेल्या अध्यायांचं गोष्टीरुप निरुपण करीत. म्हणून मी दुपारच्या सत्रात कथा ऐकायला जायचो.) लहान लहान मुलं समाधीच्या बाहेर ढेंगड्यांवर सरगोंड्या खायचे. ‘सरगोंड्या खाणं म्हणजे सरगोंड्यां खेळणं’.

                    ही समाधी आमच्या गावाला कान्हेरी नदीच्या काठावर आहे. तेव्हा ही नदी वाहती होती. समाधीच्या एका बाजूला कान्हेरी नदी तर दुसर्‍या बाजूला मोठमोठे ढेंगडे आहेत. ढेंगड्यांची माती खारी-तांबूस आहे. ही माती ओली झाल्यास तिच्यावरून पाय पटकन सरकतात. म्हणून सरगोंड्या खेळता खेळता ती निसटाळी होते. पावसाचं थोडं फार भुरकं आलं तर मग पहायलाच नको. निसटाळ्या मातीमुळं सरकन पाय घसरून आपण केव्हा पडतो ते कळतही नाही. या मातीवरून सरंगोंडी भुरकन खाली निघून जात असे. खूप मजा यायची.

                    सरगोंडी खेळ्ण्यासाठी बांबूची कामडी वापरावी लागते. अथवा कोणत्याही लाकडाची चिप्पट फळी. सुरूवातीला कामडी अथवा फळी सरगोंडीतून निट पळत नाही. जसजशी तिची मातीतली बाजू घासली जाते तसतशी सरगोंडी पळायला लागते. पटकन निसटून खाली जाते.

                    कामडीवर अथवा फळीवर एकामागे एक पाय ठेऊन तिच्यावर उख्खड बसून सरगोंडीच्या दोन्ही कडेला हातांच्या रेटाने पळवावी लागते. दोनही हात आधारासाठी इकडे तिकडे टेकावे लागतात. म्हणजे झोल जाऊन आपण इकडेतिकडे पडत नाही.

                    खाली शेवटच्या टोकाला सरगोंडी आली की मग ती कामडी अथवा फळी हातानं उचलून पुन्हा सरगोंडीच्या बाजूनं ढेंकड्यावर चढत यायचं. आणि तिथून सरगोंडी खात पुन्हा खाली यायचं. वर चढायचं. पुन्हा सरगोंडी घेत खाली. असं सारखं रहाटगाडगं सुरूच असतं. वर चढून येण्याचे श्रम सरगोंडीच्या मजेत कुठल्याकुठं पळून जात असत.                         

                  लहान होतो तेव्हा हे आठ दिवस सकाळपासून दुपारपर्यंत आणि दुपारपासून संध्याकाळपर्यंत मित्रांसोबत सारखा सरगोंड्या खेळत असायचो. जेवण्याची शुध्दी राहात नव्हती. इतका आनंद या सरंगोंड्या खेळात मिळायचं. मध्ये जेवण्यासाठी थोडं घरी येत असू. समाधी मधले हे आठ दिवस कुठं निघून जायचे कळतही नव्हतं. हे आठ दिवस शाळा बुडायची. शाळा बुडवून आम्ही सरगोंड्या खेळत असू. तेव्हा यात आम्हाला काही गैरही वाटत नव्हतं. खरं तर या समाधीच्या आठ दिवसात आम्हाला सुट्टी द्यायला हवी असं आमचं मत होतं. पण मुलांच्या मताला विचारतो कोण? आणि शाळेला सुट्टीही मिळत नव्हती. तरीही आम्ही आमची सुट्टी आपणहून घेत असू.

                    सरगोंड्यांची मजा सोडून गुपचूप शाळेत जाऊन बसणारी जी मुलं होती, ती शाळेतल्या गुरूजींजवळ आमच्या चुगल्या करायचेत. ‘गुरूजी, ही मुलं कनी समाधीजवळच्या सरंगोंड्या खायला जातात.’  खायचं नाव काढताच गुरूजीही तोंडांतली सुपारी खायचं काम थांबवून विचारायचेत, ‘काय खायला जातात? मुलं सांगायची, सरगोंड्या खायला जातात.’ गुरूजी विचारायचे, म्हणजे?’  मग मुलं आपापली कल्पना लढवत आणि आपली अभिनय कला दाखवत सरगोंड्यांचं वर्णन करायची. मग गरूजी ते वर्णन जुळवून म्हणायचे, ‘म्हणजे ही मुलं घसरगुंडी खेळायला जातात का?’  मुलं म्हणायची, ‘हो गुरूजी.’  गुरूजी म्हणायचे, उद्या त्यांना शाळेत बोलवून आणा. ऐकेकाला चांगलं बुकलूनच काढतो.’  मुलं अहिराणी मिश्रीत मराठीत म्हणायचे, हो गुरूजी, आम्ही त्यांना उद्या लऊन येतो. गुरुजी कपाळावर आठ्या पाडत विचारायचे, लऊन येतो म्हंजे?’ मग एक दोन मराठीत हुशार असलेले मुलं सांगायचे, घेऊन येतो. दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी शाळेतली प्रामणिक मुलं आम्हाला बोलवायला घरी येत असत. पण तोपर्यंत आम्ही सरगोंड्यामध्ये तुडुंब बुडून जात होतो. आम्ही घरी नसायचोत. 

                    समाधीतला एक अध्याय वाचून संपला की महाराज म्हणायचे, ‘श्री राम जय राम जय जय राम आहारऽ विठ्ठलऽऽ...’ पोथी ऐकणारे लोकही महाराजांसोबत हे म्हणायचे.  सरगोंड्याजवळ आम्हाला हे आल्हाद ऐकू येत असे. म्हणून सरगोंडी खेळताना आम्हीही हा झील त्यांच्यासोबत ओढत असू.

                    अशा सरगोंड्या खेळता खेळता आठ दिवस कुठं निघून जात असत आणि यात्रेचा दिवस केव्हा उगवून येत असे, आम्हाला कळतही नव्हतं.

                    आषाढी अमावस्येचा दिवस उगवला की समाधीच्या आजूबाजूला आणि कान्हेरी नदीच्या काठावर यात्रेतली दुकानं सकाळपासून यायला सुरूवात व्हायची. यात्रेच्या दिवशी मात्र आम्ही सरगोंड्या खेळत नसू. कारण सरगोंड्यांपेक्षा यात्रेत जास्त मजा असायची. यात्रेच्या दिवशी शाळेलाही सुट्टी असायची. म्हणून शाळेतले सर्व मित्र यात्रेत भेटायची. दुपारपर्यंत यात्रा फिरायची. शिट्टी, चेंडू, सामबोरं, पेढा, गुळीशेव घ्यायचे. आणि दुपारनंतर श्यामदेऊळमध्ये ळि पहायचं कधीही टाळलं नाही. समाधीत हे लळित दुपारपासून संध्याकाळपर्यंत चालत असे. ळित सुरू होण्यापूर्वी एका लहान मुलाला श्रीकृष्णासारख सजवून समाधीजवळ बसवलं जायचं. ‘ळि संपलं की तो श्रीकृष्ण समाधीच्या बाहेर निंबाच्या झाडाला टांगलेली दहीहंडी फोडायचा. दही हंडी फोडण्यासाठी श्रीकृष्णाला कोणीतरी खांद्यावर बसवून घेऊन जात असे. (विरगावचं लळित म्हणजे काय, ह्याचं वर्णन अहिराणी लोकपरंपरा  या पुस्तकात आणि एका स्वतंत्र ब्लॉगमध्ये आलं असल्यामुळं ते इथं पुन्हा देत नाही.)

                    हे आठ दिवस संपले की आम्हाला शाळेचं भान येत असे. आठ दिवस शाळा बुडवायच्या छड्या खाव्या लागत असत. शाळेतला राहून गेलेला अभ्यास पूर्ण करावा लागायचा. ह्या सरगोंड्यांमधून वेळेवर भानावर आलो. म्हणजे स्वत:च स्वत:ला भानावर आणलं. नाहीतर अजून अशाच कुठल्यातरी नशेच्या सरगोंडीवर अडकून पडलो असतो. अशा सरगोंड्यांची नशा करूनही वेळेवर आपण स्वत:च या गोष्टींपासून परावृत्त झालं तर बरं नाहीतर काही खरं नाही. पुन्हा आपली वाटच सापडत नाही.

                    (सहज उडत राहिलो या पुस्तकातला मजकूर. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

          © डॉ. सुधीर रा. देवरे

          ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

‘‘डंख व्यालेलं अवकाश’’

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

                    ‘‘डंख व्यालेलं अवकाश’’ या कवितासंग्रहाची व्दितीय आवृत्ती तब्बल बावीस वर्षांनंतर चेन्नईच्या नोशन प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झाली आहे.

                    २६ जानेवारी १९९९ ला या संग्रहाची प्रथमावृत्ती महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानाने (परस्पर) नागपूरच्या लाखे प्रकाशनाने प्रकाशित केली होती. पहिल्या आवृत्तीत १९८९ ते १९९२ या चार वर्षातील निवडक सत्तर कविता समाविष्ट होत्या. या आधीच्या आणि नंतरच्या कविता पहिल्या आवृत्तीत समाविष्ट नव्हत्या. आता डंख... सोबत नाळ जुळणाऱ्या आणखी सदतीस कविता दुसऱ्या आवृत्तीत समाविष्ट केल्या आहेत.

                    पहिल्या आवृत्तीसाठी ज्येष्ठांकडे प्रस्तावना मागितली नव्हती. ऐन वेळी प्रकाशकानं मागितल्यामुळं संत तुकाराम यांच्याकडून आयती प्रस्तावना घेऊन पाठवली होती. ती प्रस्तावना:

धोंड्यासवे आदळिंता फुटे डोके

तो तों त्याच्या दु:खे घामेजेना ।।।।

इंगळासी संन्निधान अतित्याई ।

क्षेम देता काई सुख वाटे ।।।।

सप्रेमें कुरवाळी महाफणी व्याळ ।

आपुले तो ढाळ सांडी केवी ।।३।।

तुका म्हणे आम्हांसवे जो रुसला ।

तयाचा अबोला आकाशाशी  ।।४।।

               - तुकाराम
                    (आळशीपणा इतका की प्रस्तावना जरी कोणाकडं मागायची होती, पण प्रकाशक पुन्हा पुन्हा मागत असूनही त्यांना पुस्तकामागं छापायला पासपोर्ट फोटोही दिला नाही. पहिलं पुस्तक फोटोशिवाय प्रकाशित झालं.)

                    या दुसऱ्या आवृत्तीला समीक्षक डॉ. शशिकान्त लोखंडे आणि ज्येष्ठ कवयित्री सुनंदा भोसेकर यांच्या प्रस्तावना प्राप्त झाल्या. (आदिम तालनं संगीत अहिराणी, मराठी आणि इंग्रजी या तीन पुस्तकांसोबत ‘डंख व्यालेलं अवकाश’सह चार पुस्तकांचं ऑन लाईन प्रकाशन विख्यात भाषातज्ज्ञ व साहित्यिक डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते नुकतंच बँगलोरहून करण्यात आलं आहे.) 

          ‘‘डंख व्यालेलं अवकाशा’’तून पाच कविता :

 

पोरगं

 

पोरगं पहात राहतं चाट पडून

व्यासपीठावरच्या माणसांचा थयथयाट

त्याला कळत नाही

भाषण म्हणजे काय वगैरे

न्याय अन्याय हक्क वगैरे

पण ही माणसं भयंकर बोलताहेत

याची त्याला होते

थंड जाणीव

समूहात पेटत जाणाऱ्या शब्दांमुळं

हवेचा स्फोट होतो

पोरगं वादळ मेळ्यात...

- व्यासपीठावरील माणसं

शांती यात्रा सुरु करतात

तेव्हा पोरगं

झोपी गेलेलं असतं

रस्त्यावर...

रक्‍ताच्या थारोळ्यात...

0

 

कावळ्याची गोष्ट


१.

बाप सांगतो पोरीला

कावळ्याची गोष्ट

खरं तर अजून तिला

कावळा कळलेला नसतो.

पण हावभाव हातवारे करुन

तिला कावळ्याकडं आकर्षित करतो बाप.

आता कावळा म्हणताच

ती हावभाव हातवारे करते.

              २.

पुढं पुढं

तोंडानं कावकाव करीत

बोटांची चोच दाखवीत

पोरगीच सांगू लागते गोष्ट बापाला

स्वत: रचल्यासारखी. 

              ३.

          गोष्टीतला कावळा

          इतका आगाऊ निघाला की

          गोष्ट पूर्ण होण्याआधीच

          पोरीला शिऊन गेला

          आणि बाप

          कावळ्यावर फक्‍त 

          पहारा करीत बसलेला!

          0

 

युद्ध

 

विनंतीची वेळ टळून गेली

आता बळाची परवानगी...  

शांततेच्या रात्री चंद्र खुडून

शेजारचं शत्रूचं घर पेटवायचं

मग शेजारी आपसूक बाहेर येतील...

उगवत्या सूर्याच्या साक्षीनं

मागील दारानं

आपण आत घुसायचं

नंतर आपलं घर पेटलं तरी  

युद्ध आपण जिंकलंच म्हणायचं!

0

 

रेडिओ दुखवटा पाळतो

 

रेडिओ दुखवटा पाळतो

तेव्हा सर्व घर उदास होतं

अंघोळ करुनही

गुदमरल्यासारखं वाटतं

नक्की कोण गेलंय

माहीत नसतानाही

रेडिओ काळजाला घरं पाडत राहतो

रेडिओचा दुखवटा

परतत्वस्पर्शासारखा

सृष्टीतला वैश्विक दुखवटा होत जातो

रेडिओतल्या रेकॉर्डस् 

फार प्रामाणिक असतात

ऑपरेट करणाऱ्या हातांचा

विनोद ऐकूनही

त्या समंजसपणं रडत राहतात

मोले घातलेचे लादलेले सूर

फेकून देण्याची नसते

त्यांना मानुषी ताकद

कित्येकदा तो गेल्यावरच रेडिओला

प्रकर्षानं जाणवतं

त्याचं प्रत्यक्ष अस्तित्व

आणि मग उकरत बसतो

पहिल्यांदाच

शंभर वर्षांपूर्वीचं त्याचं जन्मत्व

सर्व यंत्रणा दुःखात बुडून जातात

आपले डोळे तुडुंब होतात

पाणी नसलेल्या रोपट्यांसारखे

ध्वजही माना टाकतात.

संगीत प्रथम दर्जाची कला आहे’,

असं मर्ढेकर म्हणाले होते!

0

 

डंख व्यालेलं अवकाश

 

कोऱ्या कागदासारखं

करकरीत कोरं आकाश

आणि हिरव्या पानांशिवाय

एखादंही फूल नसलेलं

विरक्‍त झाड

बाकी सगळं

मेंढ्या आभाळासारखं

डंख व्यालेलं अवकाश

पाऊसहीन

दमाग्रस्त...

- आतल्याआत धुमसत

खदखदणारं धुमसणारं

आतल्याआत दुखणारं... 

0

 पुस्तकाची लिंक:

                       डंख व्यालेलं अवकाश, मराठी : Notion Press :

            https://notionpress.com/read/dankh-vyalele-avkash

 

                 (लेखातल्या कवितांचा इतरत्र वापर करताना कवीच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

          © डॉ. सुधीर रा. देवरे

          ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/