गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

लक्ष्मी : हिंस्त्र पात्र आणि खलनायिका

 

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

          हिंसेचा विषय काढला की विजय तेंडुलकर यांचं नाव प्रत्येकाला हमखास आठवणार. तेंडुलकरांची बहुतांश नाटकं हिंसेवर- क्रौर्यावर उपयोजित झालेली आहेत. सटाण्याच्या साहित्य संमेलनात आम्ही त्यांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं होतं, त्यावेळी ते मानवी हिंसेवर विस्तृतपणं बोलले होते. त्यांची बरीचशी नाटकं वाचली आहेत- नाटकाचे प्रयोग पाहिलेले नाहीत. सटाण्यासारख्या गावात रहात असल्यानं असं कलात्मकच काय कोणतंच नाटक पाहणं सहज शक्य नाही. वाचलेल्या नाटकांत शांतता, कोर्ट चालू आहे हे आतून जास्त परिणामकारकतेनं भावलेलं, भिडलेलं आणि सर्वात उच्च कलात्मक पातळीवरचं नाटक. त्या खालोखाल घाशीराम कोतवाल’.

           सखाराम बाइंडर नाटकाचं पुस्तक वाचायला मिळालं नाही, विकत घेण्यासाठी उपलब्ध झालं नाही. पण एकदा अपघातानं टीव्हीवर (सुरू होऊन बराच वेळ झाल्यानं अपूर्ण का होईना) पहायला मिळालं. ते अपूर्ण नाटक पाहून, केव्हा एकदा हे नाटक पूर्ण बघेन असं झालं. उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. ते तात्काळ यू ट्युबवर शोधून काढलं आणि मोबाईलवर लगेचच पूर्ण पाहिलं. या नाटकाचा पहिला प्रयोग १९७२ ला झाला आहे, त्यानंतर पुस्तकही प्रकाशित झालं असावं. हे नाटक प्रचंड वादग्रस्त ठरलं. अनेकदा बंद पाडण्यात आलं. वाद कोर्टात गेला होता. (यावेळी प्रस्तुत समीक्षक खेड्यात पहिली दुसरीत शिकत होता. म्हणून इथं समकालीन वाद-आकलन येऊ शकत नाही. पण थोडक्यात इतिहास माहीत आहे.) 

           सखाराम बाइंडर नाटकात मोजून फक्त पाच पात्रं आहेत. स्वत: सखाराम, लक्ष्मी, चंपा, चंपाचा नवरा आणि दाऊद ही ती पाच पात्रं. पहिल्यापासून शेवटपर्यंत नाटकाचं नेपथ्य, पार्श्वभूमी, घराची रचना, प्रॉपर्टी सहसा बदलत नाही. नाटकभर एकच एक दृश्य दिसत राहतं. नेपथ्यात विविधता नाही आणि तशी गरजही नव्हती. कळकट- मळकट घर, घरातील जुनाट वस्तू आणि समाजातल्या खालच्या आर्थिक स्तरातील दबलेली- पिचलेली ही सर्व पात्रं. ओंगळ बिभत्सता या संपूर्ण नाटकातून स्त्रवत- बंबाळत राहते. सारांश, पात्रांसह दृश्यांत संपृक्ततेनं केलेली कंजूषी म्हणजे सखाराम बाइंडर हे नाटक!

           आता या नाटकातली हिंसा नेमकी कोणती? हा प्रथम कोणालाही बाळबोध प्रश्न वाटू शकतो. कारण नाटकभर जी भडक हिंसा आहे ती तर उघडच प्रतीत होत राहते : सखाराम बाइंडर हे पात्र नाटकभर जी शिवराळ- बिभत्स- हिंसक भाषा वापरतं, ती हिंसा. महिलांबद्दल त्याची जी दृष्टी आहे, ती हिंसा. भोगण्यासाठी स्त्रिया बदलत राहणं, ही हिंसा. घरी आणलेल्या महिलेवर तो जो रोज बलात्कार करतो, हो बलात्कारच, ती हिंसा. (त्याच्या मैथुनात प्रेमाला कोणतंही स्थान नाही. फक्त शारीरिक रांगडी भूक.) गणपतीची आरती करताना लक्ष्मीला तो आधी हातानं आणि नंतर पट्ट्यानं झोडपून- फोडून काढतो, ती प्रत्यक्ष हिंसा. लक्ष्मीला तिच्या इच्छेविरूध्द घरातून बाहेर काढतो, ती हिंसा. चंपाला रागात मारताना आणि नंतर संतापात तिचा गळा दाबताना त्याच्या हातून प्रत्यक्ष खून होतो, ती हिंसा. म्हणूनच या नाटकाचा वेध घेतांना या सगळ्या हिंसा कोणालाही सहज प्रतीत होतील अशा दृश्यात्मक स्वरुपात असतील तर हा प्रश्न पडायला नको, असं कोणी म्हणू शकतं. हिंसेचा प्रत्यय अशा अनेक प्रसंगातून नाटकभर येत राहतो. आणि या सर्व घटनांचा हिंसा म्हणून उल्लेख झाला की नाटकावरचं भाष्य संपू शकतं. मात्र या व्यतिरिक्त नाटकात प्रस्तुत समीक्षकाला वेगळंच दिसलं- वेगळंच भावलं... त्यासाठीच हा समीक्षा प्रपंच...

           ...ह्या नाटकाचा प्रयोग संपूनही ते मनातून संपता संपत नव्हतं. नाटकाचे वेगवेगळे अर्थ जाणवू लागले होते. पात्रांबद्दल जाणीव- नेणीवेत सखोल चिंतन अविरत सुरूच होतं. पात्रांच्या अंतरंगात डोकावू लागलो. विचार करत होतो, जे जे आकलन बिंदू सापडत आहेत, ते या आधी एखाद्या समीक्षकानं शब्दबध्द केले आहेत की नाहीत, माहीत नाही. या नाटकाच्या शेवटाचा प्रस्तुत समीक्षकाला जाणवू लागलेला अर्थ, आकलन, अनुमान हे फक्त प्रस्तुत समीक्षकाचेच आहेत की असं या आधी कोणी मांडलं आहे तेही आता माहीत नाही. तशी समीक्षा वाचनात आली नाही. म्हणून नाटकाच्या शेवटाचा अर्थ, हा आज- आता (2022 ला) प्रस्तुत समीक्षकानं काढलेला अर्थ आहे असं म्हणतोय. या टिपणाचा यापुढील उत्तरार्ध विशेषत: शेवटचा निष्कर्ष वाचून जर कोणी कळवलं, की असं समीक्षण या आधीच अमूक अमूकनं केलं आहे, तर हे टिपण मागे घेईल. अथवा यापूर्वी अमूक समीक्षकांनीही असं निरिक्षण स्पष्टपणं नोंदवलं आहे, असा यात आवर्जून साभार उल्लेख करीन...

          नाटकातल्या लक्ष्मी पात्रानं विशेष लक्ष खेचून घेतलं आहे. (एका दैवताचं- देवीचं नाव पात्राला नाटककारानं मुद्दाम दिलं की काय, अशीही शंका आली.) या सगळ्या भडक हिंसेत लक्ष्मी नावाची बाई नाटकभर खूपच अहिंसक वृत्तीत चित्रित झालेली दिसते. देव देव करणं, देवाचा धावा करणं, देवाजवळ मनातलं सांगणं, रात्री भलत्या वेळीही देवापुढं बसून भक्ती करत टाळ्या वाजवत राहणं, मुंगळा- मुंग्यांना जीव लावणं, कावळ्यांना प्रेम देणं, कावळ्या- मुंग्यांना खाऊ पिऊ घालणं, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणं, चंपाच्या दारूड्या नवऱ्याला खाऊ पिऊ घालत त्याला माया- ममता देणं. ह्या घटना नाटकातील हिंसक वातावरणाला छेद देत त्या देवभोळ्या- माणुसकीच्या वाटू शकतात. लक्ष्मी ही साधी, भोळी, भाबडी, सश्रध्द स्त्री असून नाटकाच्या शेवटातूनही ती नवऱ्याला (नव्हे), म्हणजे ज्याच्या घरात आश्रयाला राहते, त्या सखारामला आधार देणारी स्त्री, अशी तिची स्थूल- ढोबळ प्रतिमा प्रेक्षकमनात तयार होते. (ती मनातून सखारामला पती समजते, हे ती नाटकात दोन वेळा गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत त्याला सांगते.) प्रेक्षकांनाही नाटक संपल्यावर लक्ष्मीबद्दल असंच उदात्त वगैरे वाटत असलं पाहिजे. पण ती ढोबळपणे ज्या पध्दतीनं माया-ममताळू स्त्री, अशी नाटकातील संवादांतून- वागण्यातून चित्रीत झाली आहे, तशी मात्र ती साधी भोळी अजिबात नाही, असं चिंतनातून प्रत्ययास येत राहतं...

           नाटकाच्या समाप्तीनंतर लक्ष्मी ही साधी- सरळ- सालस- प्रेमळ वगैरे मुळीच वाटली नाही. उलट या नाटकाची खरी खलनायिका लक्ष्मीच असल्याचं लक्षात येत होतं आणि विचारांती याच मतावर ठाम राहून हे टिपण लिहीत आहे. काही निरिक्षणं पुढील प्रमाणे आहेत :

           (लक्ष्मी) ही वेगळी आहे. हे सखारामनं ओळखलं होतं. हे तिचं वेगळं असणं चांगल्या अर्थानं वेगळी असं त्यालाही अभिप्रेत नसावं, असा तो उद्‍गार आहे. तिचं वेगळं असणं संदिग्ध आहे. गोगलगाय पोटात पाय! नखं बाहेर काढते! असंही सखाराम लक्ष्मीबद्दल बोलतो. तिच्या पुढच्या वागणुकीवर हे उद्‍गार नक्कीच सुचक ठरतात.

           घरात गणपतीची आरती सुरू असताना लक्ष्मी, सखारामच्या सच्चा दोस्ताला- दाऊदला आरती म्हणू देत नाही. त्याला टाळ, टाळ्या वाजवू देत नाही. सखारामनं हटकताच, तो मुसलमान आहे, त्याला नको. असं लक्ष्मी सांगते. तिचे हे कोते- संकुचित विचार ऐकताच अल्प शिक्षित असूनही रांगडा सखाराम आरतीचं ताट जमिनीवर फेकून आरती- थांबवून तिला तिथल्यातिथं गणपतीसमोर बेदम झोडपून काढतो. या प्रसंगापासूनच ती खलनायिकीच्या भूमिकेत आहे, असं निरिक्षण नोंदवता येतं.

           लक्ष्मीला घरातून काढून दिल्यानंतर चंपा नावाची दुसरी बाई सखाराम घरी घेऊन येतो. (सखाराम ठराविक कालखंडानंतर बाया बदलतो, हे सुतोवाच नाटकात उघडपणे आहेच. त्याच्या म्हणण्यानुसार लक्ष्मी अकरावी बाई तर चंपा बारावी ठरते. अशा एक डजन महिला त्याच्या आयुष्यात येतात.) मात्र लक्ष्मी काही दिवसांनंतर पुन्हा याच घरात स्वत:हून परत येते. सखारामच्या परोक्ष आणि त्याचा रोष पत्करून चंपानं तिला घरात आश्रय दिलेला असतो. (मी राहू कायमची इथे?’ असे लक्ष्मी चंपाला विचारते. चंपा हो म्हणताच तिचा पाया पडते. तेव्हा चंपा लक्ष्मीला म्हणते, मला घराबाहेर काढू नको म्हणजे झालं! (या संवादात प्रेक्षकाच्या मनात पुढील नाट्याची शंकेची पाल चुकचुकते. पुढं लक्ष्मी चंपाला फक्त घरातूनच बाहेर काढत नाही, या जगातूनच बाहेर ढकलून ठार मारते.)

              नाटकातील चारही पात्रांच्या भाषिक व्यवहार- संवादाच्या तुलनेत लक्ष्मीची भाषा ही ब्राम्हणी, धार्मिक, सोज्वळ, नम्र आणि कमावलेली अशी शिक्षित प्रमाणभाषा वाटत राहते. म्हणून भाषिक दृष्ट्यासुध्दा तिचे बोलणे कमालीचे नाटकी होताना दिसते. शेवटी ह्या भाषेचा हिंस्त्रपणा आणि परिणामकारताही भयावह स्फोटक होत जातो.

           चंपा भडक आहे. बोल्ड आहे. बोलायला फटकळ आहे. सखारामसारखीच तिची भाषा शिवराळसुध्दा आहे. आणि तिच्यात सखारामसारखीच किंश्चित माणूसकीही आहे. पण ती कपटी नाही. खुनशी नाही. मनात अढी न ठेवता तिचं वागणं पारदर्शक आहे. वरून फटकळ वागत असली तरी तिला आतून स्त्री- समवेदनेची जाणीव आहे- प्रेमाचा ओलावा आहे. म्हणून सखारामचा रोष पत्करून ती लक्ष्मीला घरात आसरा देते.

           खरं तर चंपाच्या मेहरबानीनंच आता ती सखारामच्या घरात राहत असूनही संधी मिळताच चंपाच्या खऱ्या नवऱ्याजवळ ही लक्ष्मी, चंपाच्या कागाळ्या करु लागते. कळस म्हणजे ‘चंपा मुसलमानाशी- दाऊद सोबत आहे’, असं सखारामला सांगून त्याच्याकरवी चंपाचा निघृण खून करून घेते. (ते ‘सांगणं’ खरं असावंही, तरी लक्ष्मीचं वागणं भयानक आहेच.) म्हणून चंपाचा खूनी हा सखाराम आहे की लक्ष्मी, असा उपोद्‍बलक प्रश्न उपस्थित होतो. सखारामकडून चंपाचा प्रत्यक्ष खून झालेला असला तरी खरं तर लक्ष्मीच्या कागाळ्यांमुळं तो केला जातो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या लक्ष्मीनेच चंपाचा खून घडवून आणलेला आहे! 

           सखारामकडून चंपाचा काटा काढून झाल्यावर तिचं प्रेत स्वयंपाक घरात खड्डा करून पुरण्याचा तंत्रशुध्द थंड डोक्यानं ठरवलेला बेतही खुद्द लक्ष्मीचाच! (लक्ष्मीचं या घरातलं स्थान चंपानं घेतल्यामुळं) तिला आडव्या आलेल्या चंपाचा काटा नियोजनबध्दतेनं लक्ष्मीनं काढलाच, पण त्याच वेळी चंपाशी संबंध ठेवणाऱ्या दाऊदला- सखारामच्या एकुलत्या एक सच्चा दोस्तालाही कायमचं दूर करून सखारामच्या घरात तिचं स्वत:चं स्थान ती पक्क करू पहाते.

     नाटकातलं हे शेवटचं दृश्य भयानकपणे चित्रित झालं आहे. लक्ष्मीचे संवाद बघा:

महापापी आहे ती (चंपा), मी पुण्यवान आहे!

ही (चंपा) बरी नाही, तुम्हाला फसवते.

ही (चंपा) त्या मुसलमानाशी आहे. रोज दुपारी जाते.

कोण मुसलमान?’ (सखाराम).

दाऊद. मी या डोळ्यांनी पाहिलं.

(हे ऐकताच क्रोधात सखाराम चंपाचा गळा दाबून तिला ठार मारूनच थांबतो.)

बोलू नका. पापीच होती ती. बरं झाली मेली. मी तुमच्या सोबत राहील. ती नरकात जाईल. तुम्ही पुण्यवान आहात.

तिला घरात पुरू, निघून गेली म्हणून सांगेन, ईश्वरसाक्ष सांगेन.

कुदळ आणा. माणसं पापी असतात. माणसं नीच असतात.

देव तुम्हाला क्षमा करीन. माझं ऐकतो तो (देव). आत्मा नरकात पोचला असेल तिचा (चंपाचा). पापी’. खणा, खणा, खणाना (म्हणजे चंपाच्या प्रेताला पुरायला खड्डा खोदा.)

           हिंस्त्र चेहऱ्यानं एकामागोमाग एक असे भयानक भाष्य-वाक्य ती अखंडपणे उद्‍गारत राहते. 

           मागं, जेव्हा लक्ष्मी सखारामच्या घरी पुन्हा काही‍ दिवसांनी परत येते तेव्हा सखाराम तिला लाथेनं मारतो- तुडवतो, त्यावेळी चंपा आडवी येत तिला वाचवते. घरात आश्रय देते. पण आता सखाराम चंपाला केवळ हातानं झोडतो तेव्हा लक्ष्मी, तिला जिवानिशी ठार मारायला सखारामला प्रोत्साहन देते. संधीचा फायदा घेत लक्ष्मीच्या वागण्यात असा महाभयंकर विध्वंसक- हिंसक विरोधाभास दृगोचर होताना दिसतो. लक्ष्मी हिंसकतेनं पागल झाल्याचा प्रत्यय येऊ लागतो.

           नाटकभर केवळ छटाकी हिंसेचा- शिवराळ भाषेचा बादशहा म्ह़णून वावरणारा संतापग्रस्त सखाराम, या प्रसंगात त्याच्या हातून असा क्रोधानं- अपघातानं नकळत खून (खरं तर त्याच्या हातून लक्ष्मीच चंपाचा खून करून घेते.) होताच तो जागच्याजागी गर्भगळीत होतो. पश्चातापदग्ध होतो. पण याच वेळी कुपोशीत कृश झालेल्या- म्हातारपणाकडं झुकलेल्या लक्ष्मीला नवी उभारी येताना दिसते- तिला अचानक दहा हत्तींचं बळ आलेलं दिसतं. चंपाच्या प्रेताची विल्हेवाट कशी लावायची, याचा अतिशय थंड डोक्यानं ती सखारामला सल्ला देऊ लागते. सखाराम खुनाच्या धक्क्यातून बाहेर येत नाही हे लक्षात येताच, दिवस उजाडण्याआधी चंपाचं प्रेत पुरण्यासाठी हातात कुदळ घेऊन ती स्वत: स्वयंपाक घरात खड्डा खोदू लागते! या शेवटच्या संपूर्ण प्रसंगात तिचा चेहरा, तिची देहबोली, तिचे हावभाव अतिशय क्रूर होत जातात. हे तिचं भयानक हिंसक रूप पाहून मुंग्या- कावळ्यांवर प्रेम करणारी आणि सिताराम सिताराम, जय जय सिताराम म्हणत रात्रभर टाळ्या पिटत देव देव करणारी हीच का ती दयाळू- देवभोळी स्त्री, हा प्रश्न चिंतकाला सतावू लागतो! रसिक जागच्याजागी विस्मयीत होतो!

           सारांश, लक्ष्मी ही सखाराम बाइंडर या कलात्मक नाटकातील सर्वात हिंस्त्र पात्र ठरते आणि खलनायिकाही!

          (ही समीक्षा सखाराम बाइंडर नाटकाच्या संहितेवरची नसून प्रयोग पाहून लिहिलेली आहे. या नाटकात सयाजी शिंदे- सखाराम, सोनाली कुलकर्णी- लक्ष्मी, चिन्मयी सुमित- चंपा, विनोद लवेकर, मिलिंद शिंदे यांच्या भूमिका असून दिग्दर्शन संदेश कुलकर्णी यांनी केले आहे.)

                    (‘संपृक्त लिखाण दिवाळी अंक २०२२ च्या हिंसा विशेषांकात प्रकाशित झालेली समीक्षा. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा- अंकाचा अचूक संदर्भ द्यावा ही विनंती. विशेषत: पीएच. डी. विद्यार्थी.)

 © डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/