-
डॉ. सुधीर रा. देवरे
दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणूकीचा निकाल पाहून काँग्रेस आणि
भाजपने घाईघाईने लोकपाल विधेयक संसदेत पास करून टाकले. हे विधेयक पास होण्याच्या
मुहुर्तावर इकडे आण्णा हजारेंनी उपोषण केले. विधेयक पास होताच राहुलगांधी, सोनियागांधी
आणि सुषमा स्वराज यांना धन्यवाद देत आण्णांनी उपोषण मागे घेतले. सदर विधेयक हे
जनलोकपालाइतकेच प्रभावी आहे असेही आण्णांनी त्यावेळी जाहीर केले होते. (नंतर केजरीवालांचा
पगडा भारी होताच आण्णा केजरीवालांना पाठींबा देऊ लागले होते. आता केजरीवालही मागे
पडले आणि ममता बॅनर्जी आण्णांना जवळच्या वाटू लागल्या.) लोकपाल विधेयक संसदेत पास
होताच केजरीवालांची हवा निघून जाईल आणि त्यांच्या पक्षाचा काही अजेंडा उरणार नाही
असा समज सगळ्यांनी करून घेतला होता. पण केजरीवालांना हे विधेयक मान्य नव्हते. ते
या विधेयकाला ज्योकपाल म्हणत होते.
केजरीवाल
यांना तोंडघशी पाडण्यासाठी काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठींबा देऊन सरकार बनवायला
भाग पाडले. पण दीड महिण्याचे सरकार चालवताना केजरीवाल जसजसे घेरले जात होते तसतसे
त्यांनी नवनवीन धक्के देण्याचे तंत्र अवलंबले आणि त्यात ते काही प्रमाणात यशश्वीही
झाले. शेवटी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष आणि त्यांच्या अनेक पोटशाखा
असलेले पक्ष ह्या आपल्या स्वार्थासाठी कशा पध्दतीने एकत्र येतात हे सिध्द करून
केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ज्या देशात मोठमोठे गुन्हे करूनही
राजीनामे दिले जात नाहीत तिथे ह्या वागण्याला त्याग म्हणावाच लागेल.
भारताच्या
इतिहासात आतापर्यंत जी राजकीय आंदोलने झालीत ती सगळी प्रामुख्याने काँग्रेसच्या
विरोधात आणि विरोधी पक्षांना पुरक ठरलीत. 1977 ला जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन
असो की 1989 चे विश्वनाथ प्रताप सिंग यांचे आंदोलन असो. या आंदोलनांमुळे काँग्रेस
सत्ताभ्रष्ट झाली आणि विरोधी पक्षांचा गट सत्तेवर आला. परंतु आताच्या
केजरीवालांच्या आंदोलनाने सत्ताधारी काँग्रेससह सगळ्याच छोट्या मोठ्या विरोधी
पक्षांनाही उघडे पाडले आहे.
अरविंद
केजरीवाल आणि त्यांचा पक्ष पूर्णपणे चांगला आहे असे येथे दूरान्वयानेही म्हणायचे
नाही. काही ठिकाणी तांत्रिक तर काही वेळा प्रोटोकॉल संदर्भात ते चुका करतात हे खरे
आहे. पक्षात काही लोक वाचाळ तर काही संधीसाधू असल्याचेही उघड झाले. पण ह्या
झोपलेल्या भ्रष्ट व्यवस्थेला हलवून जागे करायचे काम ते अगदी ठरवून करताहेत हे
महत्वाचे वाटते. केजरीवालांच्या पक्षामुळे जर इतर पक्षांची धार्मिक-जातीय वोट बँक
ठिसूळ होणार असेल तर ते भारतीय लोकशाहीला ते हवेच आहे. म्हणूनच सर्वसामान्य माणूस
या शातंतापूर्ण आंदोलनाचे सर्वत्र स्वागत करताना दिसतो.
(या
ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर
संदर्भ द्यावा ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा