शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१३

दिल्ली ते मुंबई व्हाया कोणतेही गाव 
-         डॉ. सुधीर रा. देवरे


         नरेंद्र दाभोळकरांच्या निधनाने महाराष्ट्र सावरला नाही तोच फक्त दोनच दिवसानंतर मुंबईत सामुहीक बलात्कार झाला. फक्त आठ महिण्यांपूर्वी झालेल्या दिल्लीतील भीषण बलात्कारानंतर जे जे काही झाले त्यानंतर असे भयानक बलात्कार तरी यापुढे होणार नाहीत असे वाटू लागले होते. वेगवान न्यायालयीन निकालापासून तर नवीन कायदा करेपर्यंत. पोलिसांच्या तैनातीपासून तर विविध स्तरांवर झालेल्या प्रबोधनापर्यंत. हातातील शिट्टी वाजवल्याने लक्ष वेधून घेण्याच्या पध्दतीपासून तर मिरचीपुडीच्या प्रयोगापर्यंत जनमानसात सर्व शक्यता अजमावण्यात आल्या होत्या. आणि यापुढे देशात सर्वत्र लोक सजग होतील अशी भाबडी समजूत सगळ्यांनी करून घेतली होती.
         दिल्लीतला बलात्कार रात्री धावत्या बसमध्ये झाला तर मुंबईतला भर शहरातील संध्याकाळी सुनसान मिलच्या जागी. दिल्लीतही त्या अभागी तरूणीसोबत पुरूष मित्र होता तर मुंबईतल्या तरूणीसोबतही एक पुरूष मित्र होता. दिल्लीत सहा बलात्कारी होते तर मुंबईत पाच बलात्कारी. दिल्लीतील बलात्कार्‍यांमध्ये एक जण अल्पवयीन ठरला तर इथेही त्याचीच पुनरावृत्ती.
         या बलात्कारानंतरही राजकीय लोकांनी अनेक सल्ले दिले. कोणी म्हणाले की महिलांनी बुरख्यातच रहायला हवे म्हणजे तिचे सौंदर्य कोणाला दिसणार नाही. कोणी म्हणाले की महिला या सोने असल्यामुळे त्यांना सोन्यासारखे घरात जपून ठेवावे. बाहेर पडू देऊ नये. कोणी म्हणाले की सर्व महिलांना पोलिस संरक्षण देऊ. मध्यंतरीच्या काळात भारतात इंदिरा गांधी या महिला नेतृत्वाचे 17 वर्ष सक्षम सरकार येऊन गेले तरी आजच्या सरकारला बांगड्यांचा आहेर आम्हाला पाठवावासा वाटतो. आम्ही कोणत्या मनोवृत्तीत जगत आहोत हे पुन्हा पुन्हा सिध्द होत राहते.
         या घटनेच्या आसपास खुद्द मुंबईत अशा दखलपात्र मोठ्या घटना घडूनही या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्या मोठ्या प्रमाणात चर्चिल्या गेल्या नाहीत. परदेशी महिलेवर ब्लेडने हल्ला. रेल्वेत नशाप्रयोग केलेले जोडपे सापडणे, मुंबईतच एका मुलीवर सशस्त्र हल्ला, पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलीवर कल्याणला बलात्कार आणि काही दिवसांपूर्वी रेल्वेस्थानकावर झालेला अँसिड हल्ला. ज्या हल्ल्यात ती तरूणी जीव गमावून बसली. पण हल्लेखोर मुंबई पोलिसांनाही अजून सापडलेला नाही.
         याच दरम्यान पुण्याजवळच्या एका खेड्यात शाळेतून परतणार्‍या पाचवीत शिकणार्‍या मुलीवर बलात्कार करून, तिचा खून करून तिला ऊसांच्या शेतात फेकून दिले. दुसर्‍या एका खेड्यात एका वयस्क एकट्या राहणार्‍या महिलेवर तिच्याच घरात घुसून सामुहीक बलात्कार झाला. अजून एका खेड्यात विवाहीतेवर सामुहीक बलात्कार झाला, तोही तिच्याच घरात.
         याच आठवड्यात आपल्याच मतदारसंघातील एका कुटुंबवत्सल आमदाराने टोल नाक्यावरील महिलांचे कपडे उतरवण्याची भाषा केली. यापैकी अनेक महिलांनीच याला मतदान करून निवडून दिले हे तो आमदार विसरला. आणि तरीही त्याचे नेतृत्व अशा माणसाला कुटुंबवत्सल संबोधतो. आहे की नाही गम्मत या महाराष्ट्रात.
         म्हणून लोकहो, विशेषत: महिलांनो, सांभाळून रहा. रात्र वैर्‍याची आहे. ज्या माझ्या देशात 50 टक्क्यांपेक्षा जास्त पोलिस राजकीय नेत्यांच्या संरक्षणात गुंतलेले आहेत तिथे तुम्हाला संरक्षण मिळेल अशी आशा न केलेली बरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या राजकीय क्षेत्रातल्या पुरूष लोकांना सुध्दा प्रचंड सुरक्षा लागते, तिथे तुम्ही अबला महिला कोणत्याही सत्तेत नसताना बिनधास्तपणे कुठेही फिरता ही खरी तर तुमचीच चूक आहे.
         यापुढे आपली काळजी आपण घेतली नाही तर दिल्ली ते मुंबई व्हाया देशातील कोणतेही लहान मोठे गाव या प्रसंगांना बळी पडत राहील. अशा घटना घडल्यानंतर इतर पक्षीय राजकीय लोक राजकारण करतील. सत्ताधारी लोक तुमचा इलाज शासकीय पैशांनी करतील आणि मेलात तर घरच्यांना दोन लाख रूपयांची मदत मात्र नक्कीच करतील.

      - डॉ. सुधीर रा. देवरे            
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा