शनिवार, २४ ऑगस्ट, २०१३

हा महाराष्ट्र पुरोगामी कधी होता?



 
-         डॉ. सुधीर रा. देवरे


         मंगळवार दिनांक 20-8-2013. सकाळी नऊ वाजता मला एका विद्यार्थी मित्राचा फोन आला:
सर, काही समजलं का?
नाही. काय झालं?
नरेंद्र दाभोळकरांचा पुण्यात खून झाला.
प्रचंड हादरलो.
         दाभोळकर कोणत्याही धर्माविरूध्द नव्हते. कोणाच्याही श्रध्देविरूध्द नव्हते. मी देव मानत नाही आणि तुम्ही पण मानू नका असे सांगणारे नव्हते. इतकेच काय ते कर्मकांडाविरूध्द सुध्दा नव्हते. फक्त जी कर्मकांडे वा चमत्कार कोणाच्या शरीराला इजा पोचवणारी असतील ती होऊ नयेत असे ते मांडत होते. ज्याला थोडीफार बुध्दी आहे अशा कोणत्याही माणसाला पटणार नाहीत असे जे काही धर्माच्या नावावर चालणारे अघोरी कृत्य आहेत त्यांना चाप बसावा एवढाच ह्या विधेयकामागे  उद्देश होता. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे साधे कार्यकर्ते सुध्दा नव्हते. आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी ते विशिष्ट धर्माला टारगेट करून अमूक एका धर्माचे मते मागण्यासाठी हे काम करत होते असेही नव्हते. म्हणजेच ते कोणत्याही टोकाच्या विचाराचे प्रचारक नव्हते तर ते केवळ समन्वयवादी व्यक्तिमत्व होते.
         नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्रात अंधश्रध्दा निर्मूलन समिती स्थापन केली. अंधश्रध्दा निर्मुलन विधेयक विधीमंडळात पास होऊन त्याचा कायदा व्हावा असा त्यांनी ध्यास घेतला होता. काही समान विचारांच्या सहकार्‍यांसोबत त्याचा खर्डा तयार करून तो संमत व्हावा म्हणून वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. विधेयकाची चिकित्सा होत राहिली. त्याच्या हेतूविषयी गैरसमज पसरत राहिले. चिरफाड झाली. काटछाट झाली. नाव बदलले. तरीही 18 वर्षांपासून ते फक्त चर्चेत राहीले. त्याचा कायदा तर झाला नाहीच पण नरेंद्र दाभोळकरांना आज आपला जीव गमवावा लागला.
         दाभोळकरांचा खून पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला आहे का? हा खून इथल्या नक्षलवादी संघटनांनी केला आहे का? व्यक्तीगत कारणांनी झाला आहे का? या तिन्ही प्रश्नांचे उत्तर एखादा शाळकरी मुलगाही देईल: नाही.  
         महाराष्ट्र हा पुरोगामी असल्याचे आम्ही ऐकत आलो आहोत आणि तसे स्वत:ही दुसर्‍याला सांगत आलो आहोत. पण हा महाराष्ट्र पुरोगामी कधीकाळी होता का याचा जरा इतिहास पहावा लागेल: संत ज्ञानेश्वरांसह त्यांच्या कोवळ्या भावंडांना वाळीत टाकणारी इथली प्रवृत्ती. संत तुकारामांना संपवून ते सदेह वैकुंठास गेल्याची दिशाभूल करणारी प्रवृत्ती. शिवाजी महाराजांना आपला राज्यभिषेक न करू देणारी प्रवृत्ती. छत्रपती शाहूंनाही धमक्या देणारी प्रवृत्ती. महात्मा फुल्यांवर दगड- शेणांनी मारा करून शेवटी त्यांच्यावर मारेकरीही पाठवणारी प्रवृत्ती. आगरकरांची जीवंतपणी प्रेतयात्रा काढली मात्र त्यांना जीवंत ठेवले म्हणून तरी या प्रवृत्तीचे आभार मानायला हवेत. पण महात्मा गांधीना या प्रवृत्तीने ही संधी दिलीच नाही. त्यांचा ‍जीव घेतलाच. डॉ. रघुनाथ कर्व्यांना पाण्यात पाहणारी प्रवृत्ती. संत गाडगे बाबा न पचलेली प्रवृत्ती. बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळ्याचा सत्याग्रह करावा लागला. काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलन करावे लागले. धर्म सोडण्याची घोषणा दिली तरी ही प्रवृत्ती वाकली नाही. प्रबोधनकार ठाकरेंच्या घरावरही दगडफेक करणारी प्रवृत्ती. आणि आता गांधीच्या हत्येची आवृत्ती म्हणजे दाभोळकरांचा खून.
         या सगळ्या उदाहरणांवरून स्पष्ट होते की, हा महाराष्ट्र सलग असा कधी पुरोगामी नव्हताच. ठराविक कालखंडाने इथे पुरोगामी व्यक्ती होत गेल्या इतकेच. त्यांना प्रतिसाद देणारा अल्प पुरोगामी समाज सोडला तर हा महाराष्ट्र सलग असा पुरोगामी कधीच नव्हता. म्हणून -

हा महाराष्ट्र
जो कालपर्यंत
मी पुरोगामी समजत होतो...
-आज माझी मान
या प्रतिगामी महाराष्ट्रात
शरमेने खाली झुकली आहे!!!

        
      - डॉ. सुधीर रा. देवरे            
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा