- डॉ. सुधीर रा. देवरे
आपले
काम करून घेण्यासाठी मी सगळीकडे लाच न देण्याचे प्रयोग करत राहतो. आपले काम
चौकटीतले आणि अधिकृत असल्यामुळे लाच देण्याचे काहीही कारण नसते. मी लाच कधी घेतली
नाही त्यामुळे देण्याचाही प्रश्न उद्भवत नाही. पण लाच न देण्याचे प्रयोग करताना
आपल्याला जबरदस्त किमत मोजावी लागते ती वेळेची, पाठपुरावा करण्याची, मनस्तापाची
आणि जिथे तिथे आपली भूमिका मांडण्याची.
आत्ताच
एक घेतलेला ताजा अनुभव इथे संक्षिप्ततेत उदृत करतो: गाडी घेतली. साधी दुचाकीच.
तिचे रजिट्रेशन आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे होते. पासिंग रजिट्रेशन डिलरकडे
असले तरी आरटीओ कँपच्या दिवशी आरटीओने वैद्यकीय प्रमाणपत्र हवे म्हणून पासिंगचे
कागदपत्रे स्वीकारायला नकार दिला. आरटीओ एंजटला विचारले तर साहेबांपुढे मी काय
बोलणार म्हणत त्याने त्यातून आपले अंग काढून घेतले. वाहन डिलरनेही तेच केले.
मी वैद्यकीय प्रमाणपत्र आणले आणि
आरटीओंशी संपर्क साधला. कोणत्याही एजंट मार्फत गेलो नाही. तुम्हाला प्रमाणपत्रे
हवे होते ना. आता ते आणले. मी एंजटला हाताशी धरणार नाही आणि जास्तीचे पैसेही देणार
नाही. शिकाऊ लायसन्सला 30 रूपयाची पावती घ्यावी लागते. ती घेतली. रजिस्ट्रेशनसाठी
कागदपत्रे दिली. ती आरटीओने चारचारदा तपासली. झेरॉक्स प्रमाणपत्रे दिली. त्याबद्दल
ते या वेळी काही बोलले नाहीत. पासिंगसाठी आणि शिकाऊ लायसन्ससाठी सगळे योग्य ते
कागदपत्रे असल्यामुळे ती त्यांनी माझ्याकडून स्वीकारलीत. मला वाटले माझे काम झाले.
नंतर महिण्यानेही पासिंग नंबर आणि
लर्निंग लायसन्स येत नाही म्हटल्यावर आरटीओ ऑफिसला तपास केला तर म्हणे तुमचे
कागदपत्रेच सादर झालेली नाहीत. मुख्य आरटीओ श्री अमर पाटील यांना भेटलो. त्यांनी
निमसे आरटीओंना यात लक्ष घालायला सांगितले. त्यांनी शोधाशोध करून माझी कागदपत्रे
शोधून काढली. नंतर काही दिवसांनी कळले की सही करणारे साहेब मूळ कागदपत्रे मागतात.
झेरॉक्स चालणार नाहीत. पुन्हा मूळ प्रमाणपत्रे सादर केली. सारखा पाठपुरावा करून मला
दीड महिण्याने गाडी नंबर मिळाला. दोन महिण्याने आरसी बुक मिळाले. पण अजून लर्निंग
लायसन्स मिळाले नव्हते. त्याचा पाठपुरावा सुरू झाला. त्याचेही कागद आता सापडत
नव्हते. पाठपुरावा करत ते सापडवले. मग काही दिवसांनी मला लर्निग लायसन्स मिळाले.
कायमचे लायसन्स मिळवण्यासाठी 222 रूपये
लागतात. ते पैसे भरून पावती घेतली आणि लर्निंग लायसन्स जमा करून कायमच्या
परवानासाठी पुन्हा कागदपत्रे सादर केली. फोनाफोनी करून विचारले तर आता सही करणारे
आरटीओ सही करत नाहीत असे समजले. त्यांना भेटलो. ते म्हणाले मी कामात होतो म्हणून सही
राहिली. शेवटी त्यांनी सही केली. सही झाल्यांनरही पुन्हा कागद हरवले.
दरम्यान मला एक आरटीओ म्हणाले की,
रेशनकार्ड मिळण्याचा जसा तुमचा राइट असतो तसा लायसन्स मिळण्याचा नसतो. तुमचे
लायसन्स आम्ही रिजेक्ट करू शकतो. मी म्हणालो की गाडी तुम्हाला सफाईदार चालवता येत
असेल तर लायसन्स मिळण्याचा अधिकार आपला आहेच. कागदपत्रे लपवून ठेवणे, सहीसाठी
योग्य जागी सादर न करणे, सही करणार्याने सही न करणे आदी प्रकार आपण लाच न
दिल्याने होत राहतात. हे सगळे सहन करत आपल्याला शासकीय नियमात आपले काम करून घेणे
अवघड जात असते.
गाडी
पासिंग आणि लायसन्ससाठी एक मे पासून सुरू झालेला माझा लढा बरोबर 31 ऑगष्ट 2013 ला
संपला. लायसन्स ऑगष्टच्या शेवटच्या दिवशी पोष्टाने मिळाले. या चार महिण्यात इतका
वैताग आला की यापुढे आयुष्यात कोणतीच गाडी घेऊ नये आणि लायसन्स तर मुळीच नको, असा
मी निर्णय घेतला. या लायसन्सची मुदत संपल्यावर नवीन मुदतवाढीचे लायसन्स घ्यायचे
नाही असेही मी आता ठरवतोय.
प्रत्येक
कार्यालयात कमी प्रमाणात का होईना पण चांगले-स्वच्छ कर्मचारी सुध्दा असतात. माझी
भूमिका पटल्यामुळे माझ्या बाजूने मुख्य परिवहन अधिकारी अमर पाटील उभे राहिले.
तरीही मला इतका त्रास झाला. ताप्तुरते आणि कायमचे लायसन्स मिळून मला शासकीय शुल्काप्रमाणे
252 रूपये खर्च आला. हाच खर्च एंजट मार्फत गेल्यावर 1500 ते 1800 रूपयांपर्यंत
येतो. पण मला ज्या दगदगी आणि यातनांना सामोरे जावे लागले त्याची पैशांत किमत होऊ
शकत नाही. हा ताण चार महिने पुरला. पण या यातना प्रत्येकाने सहन केल्या नाहीत तर
इथला भ्रष्टाचार कधीही समूळ नष्ट होणार नाही.
- डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा