शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

भारतात गरीब कोणीही नाही...




-         डॉ. सुधीर रा. देवरे
  

         लाच देण्यासाठी इथल्या सगळ्याच लोकांना रोज सरासरी शंभर रूपये खर्च करावे लागतात, तर इथे कोणाला गरीब कसे म्हणता येईल? इथल्या मजूरांना रोजची कमीतकमी शंभर रूपये मजूरी मिळते तर या मजूरांना गरीब कसे म्हणता येईल? इथल्या अनेक गरीब, अपंग, वृध्द लोकांना चालताच येत नसल्याने आणि धावपळीची बसही पकडता येत नसल्याने त्यांना रिक्षातून रोज महागडा प्रवास करावा लागतो, तर अशा लोकांना गरीब कसे म्हणता येईल?
         इथल्या सगळ्याच लोकांना दोन वेळा जेवण करावे लागते. अशा दोन वेळेस जेवणार्‍या लोकांना गरीब कसे म्हणता येईल? काम करण्यासाठी ऊर्जा यावी म्हणून दिवसातून कमीतकमी दोन वेळा चहा पिणार्‍या लोकांना गरीब कसे म्हणता येईल? रोज दूध विकत घेणार्‍या लोकांना गरीब कसे म्हणता येईल? शा‍रीरिक दुखण्यांमुळे इथल्या काही लोकांना रोज सकाळी गरम पाण्याने अंघोळ करावी लागते. पाणी तापवण्यासाठी जो त्यांच्याकडून पैसा खर्च होतो, त्यावरून त्यांना गरीब कसे म्हणता येईल? इथले सगळेच लोक -झोपडपट्टीतले सुध्दा नगरपालिकेची घरपट्टी भरतात- पाणीपट्टी भरतात. अशा लोकांना गरीब कसे म्हणता येईल?
         इथल्या अनेक लोकांचे मुलं सरकारी वा शासकीय मान्यताप्राप्त संस्थेंच्या शाळेत जातात. तिथे प्रवेशापासून तर विकासनिधीपर्यंत अनेक वेळा पैसे भरावे लागतात. आणि ज्याअर्थी लोक ते मुकाट्याने भरतात त्याअर्थी त्यांना गरीब कसे म्हणता येईल? आठवीपर्यंत शासन पुस्तके देत असले तरी मुलांना वह्या घ्याव्या लागतात. दप्तर घ्यावे लागते. अनेक सरकारी शाळांनी मुलांना गणवेष ठरवून दिला आहे. ज्या अर्थी लोक मुलांना गणवेष घेऊन देतात, त्याअर्थी त्यांना गरीब कसे म्हणता येईल? दूरच्या शाळेत जाण्यासाठी काही लोक बचत करून आपल्या मुलांना सायकली घेऊन देतात. अशा लोकांना गरीब कसे म्हणता येईल?
         अनेक लोक वर्षातून नवीन कपडे घेतात. अनेक लोक वर्षातून चप्पल घेतात. अनेक लोक आजारी पडले की आधी तब्बेतीकडे दुर्लक्ष करतात. पण आजार आपोआप बरा होत नाही म्हणून नाईलाजाने दवाखान्यात जातात वा औषधांच्या दुकानातून परस्पर औषधे घेतात. अशा लोकांना गरीब कसे म्हणता येईल? प्रत्येक गावात सरकारी दवाखाने नाहीत आणि जिथे आहेत तिथे कोणी भेटत नाही वा भेटले तरी लाच दिल्याशिवाय इलाज होत नाही.
         इतक्या वितृत आणि असंख्य उदाहरणांनी आपल्याला पटवून देता येईल की या देशात आता कोणीही गरीब राहिला नाही. कारण कोणत्याही खेड्यातला माणूस रोज सरासरी 27 रूपयांपेक्षा जास्त आणि शहरातला माणूस 33 रूपयांपेक्षा जास्त खर्च करतो. आणि मजूरी मात्र दिवसाला शंभर रूपये घेतो. याचाच अर्थ भारतातला सगळ्यात खालच्या आर्थिक वर्गातला माणूस सुध्दा भारतातल्या गरीबीच्या व्याख्येतील माणसापेक्षा तीन पटीने श्रीमंत आहे.
         म्हणून आता या देशातील नोकरदार गरीब नाही, मजूरही गरीब नाही. इथल्या भिकार्‍यांना तरी गरीब म्हणता येईल का? अनेक भिकार्‍यांना महिण्यातून काही दिवस तरी 33 रूपयांपेक्षा जास्त भिक मिळत असेल आणि तोही त्या त्या दिवशी श्रीमंतासारखी चैन करत असेल तर त्यालाही गरीब म्हणता येणार नाही. तरीही अजून २१.९ टक्के गरीब लोक भारतात कसे शिल्लक राहू शकतात, याचेच आश्चर्य वाटते. खरे तर दारिद्र्य रेषेखाली आज शून्य टक्के लोक असायला हवे होते.

संदर्भ: भारतीय योजना आयोगाचे मर्कटीय तर्कट.

ताजा कलम: 12 रूपयात जेवणासाठी राज बब्बरांकडे चला. 5 रूपयात जेवणासाठी      रशीद मसूद यांच्याकडे चला. 1 रूपयात जेवणासाठी फारूक अब्दुलांकडे रांग लावावी लागेल. आणि एक हजार रूपयाचे जेवण फक्त 10 रूपयात घेण्यासाठी आपल्याला संसदेतच जावे लागेल.
(नुकतीच आलेली बातमी: आदिवासी पट्ट्यात कुपोषणाने अनेक बालके मरताहेत. पण भारतीय योजना आयोगाच्या व्याख्येनुसार हे लोकही गरीब नाहीत.)


     - डॉ. सुधीर रा. देवरे       
 इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

1 टिप्पणी: