शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण: एक महाप्रकल्प आज प्रकाशन



 
-डॉ. सुधीर रा. देवरे

      बडोदा येथील भाषा संशोधन केंद्र या अशासकीय संस्थेची  स्थापना डॉ. गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली एकोणावीसशे सत्त्याण्णव साली झाली असल्यामुळे आज भाषा केंद्राला स्थापन होऊन पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. अशा या भाषा केंद्राशी मी अगदी सुरूवातीपासून म्हणजे एकोणावीसशे सत्त्याण्णव पासून जोडला गेलो आहे.
      भाषा केंद्राची स्थापना झाल्यानंतर एका वर्षाने म्हणजे एकोणावीसशे अठ्याण्णवला बडोद्यापासून पूर्वेला शंभर किलो‍मीटर अंतरावरील तेजगडला आदिवासी अकादमीची नावाची संस्थाही स्थापन केली. आता ज्या ठिकाणी आदिवासी अकादमीची भव्य वास्तु उभी आहे त्या खडकाळ व नापिक जागी सुरूवातीला आम्ही एक कुटी उभारून बैठका घेत होतो आणि रात्री तिथेच मुक्कामाला असायचो. आजूबाजूच्या जंगली ओसाड, चढउतार असलेल्या जागेवरील रानझुडपे, डोंगराळ आणि खडकाळ अशा भागात मन रमेल असे त्यावेळी काहीही आल्हाददायक नव्हते.
            लोकभाषा मरू नयेत म्हणून त्यांच्या संवर्धनासाठी भाषा केंद्राची स्थापना केली. जगभरात आज सहा हजार भाषा उपलब्ध आहेत तर भारतात पंधराशे पर्यंत भाषांची नावे सापडतात. या व्यतिरीक्त किती भाषा आतापर्यंत नामशेष झाल्या याचा हिशेब लागत नाही. भाषांच्या संवर्धनाचा एक भाग म्हणून ढोल नावाचे नियतकालिक भाषा केंद्रातर्फे एकोणावीसशे सत्त्याण्णवला सुरू केले. डॉ. गणेश देवी यांनी आयोजित केलेल्या एका बैठकीत ढोलची संकल्पना मांडली आणि भाषा केंद्राशी संबधीत आम्ही सर्वांनी ती उचलून धरली.
      सुरूवातीला सहा बोलींमध्ये ढोल छापायचे ठरले. एकोणावीसशे सत्त्याण्णवला त्यापैकी फक्त दोन बोलीत ढोल प्रकाशित होऊ शकले. एकोणावीसशे अठ्याण्णव पासून मी संपादित करीत असलेले अहिराणी ढोल निघू लागले. एकोणावीसशे अठ्याण्णवला चार तर दोनहजार पर्यंत सहा भाषेत ढोल सुरू झाले. त्यानंतर लवकरच ते दहा भाषांमध्ये काढण्याची आम्ही तयारी सुरू केली. ढोल मधू लोकसंस्कृती, लोकपरंपरा, ‍लोकजीवन, आदिवासी जीवन जाणिवा, बोलीभाषा, लोकभाषा, लोककला- आदिवासी कला, लोकवाड्मय, लोकदैवते, लोकश्रध्दा, आदिवासी लोकजीवन, आदिवासी कथा आणि व्यथा, आदिवासी संस्कृती यांचा वेध घेण्यात आला. सखोल चिंतनात्मक लेख, अभ्यास, संशोधन यातून येत राहिले. छापण्यासाठी न लिहिणार्‍यांना ढोल साठी लिहिते केले. प्रत्येक अंकात नवे लेखक ढोल मध्ये आणले. सुरूवातीच्या काळात षण्मासिक स्वरूपात सुरू झालेल्या या नियतकालिकाला चाकोरीबध्द साचलेपणाचे स्वरूप प्राप्त होऊ नये म्हणून आता ते अनियतकालिक केले.
      भाषांचा अभ्यास या केंद्रातर्फे होऊ लागला तरी अभ्यासाच्या व्याप्तीला काही अंगभूत मर्यादा पडत आहेत हे लक्षात येताच ढोल सोबत अनेक चर्चासत्रे- कृतीसत्रे भारतभर सुरू केली. भाषेविषयी ग्रंथ प्रकाशनाचा प्रकल्पही राबवला. तरीही अजून यापेक्षा व्यापकपणे भाषांचा अभ्यास करण्यासाठी भाषा केंद्रातर्फे आम्ही काही बैठका घेतल्या.  जेवढ्या भाषेत ढोल निघतात त्या भाषांचा सलग अभ्यास करण्यासाठी त्या त्या भाषेतील लोकसंस्कृतीतील समाजशास्त्रीय व मानववंशास्त्रीय दृष्टीकोनातून काही घटकांगांचा अभ्यास करायचे ठरवले. लोकसंस्कृतीच्या- लोकजीवनाच्या माध्यमातून भाषेच्या अंतरंगात डोकावता येते. म्हणून या घटकांगांच्या दृष्टीने अभ्यासाची मांडणी करावी असे भाषाभ्यासकांना सुचवले.
      असा अभ्यास फक्त दहा- बारा भाषांपुरताच मर्यादित न ठेवता या अभ्यासाची व्याप्ती अजून वाढवण्याची आवश्यकता वाटू लागली. पुढची पायरी म्हणून गुजराथ राज्यातील सर्व बोलींचा एक खंड आणि महाराष्ट्रातील सर्व बोलींचा दुसरा खंड अशा दोन खंडापर्यंत हा प्रकल्प वाढवला. या खंडांच्या कामासाठी बैठका होत असतानाच काही पुर्वोत्तर व दक्षिण भारतीय राज्यांच्या अभ्यासकांनी हा प्रकल्प आम्हीही आमच्या राज्यात राबवतो अशी तयारी दर्शवली आणि मग अखिल भारतीय पातळीवर संपूर्ण अठ्ठावीस राज्यात आणि सर्व केंद्रशासित प्रदेशात हा प्रकल्प एकदमच राबवण्याचे नक्की झाले. पुढील काही बैठकीत लोकसंस्कृतीतील घटकांगातही फेरबदल होत गेले आणि या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला. या महाप्रकल्पामुळे ढोलचे प्रका‍शन तात्पुरते थांबवण्यात आले. कारण ढोल ज्यासाठी काढला जात होता तेच ध्येय हा प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर पूर्ण करणार होता. सर्वानुमते लोक सर्वेक्षणातील घटक चर्चेअंती पुन्हा नव्याने पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले :
      भाषेचे नाव, भाषेचा भौगौलिक नकाशा, भाषचा संक्षिप्त इतिहास, संदर्भ सूची (भाषेच्या इतिहासाची), त्या भाषेतील साहित्य, लोकगीते ( चार ते पाच) , लोकगीतांचा मराठी अनुवाद, दोन लोककथा व त्यांचा मराठी अनुवाद, नातेवाईकांचे नावे, रंगांसाठी नावे, वेळ -काळ- क्षेत्र (नावे), सकाळ, दुपार, संध्याकाळ, ऋतू, महिने, वेळ आणि अवकाश, दिशा, अंक, दागिने, खाणं, पिणं, स्वैंपाक, शेती व वनस्पती, सामाजिक व्यवहार, गुणदोष, कपडे, अंतरे, मानवी शरीर अवयवांची नावे हे घटक त्या त्या भाषा अभ्यासकांना देऊन प्रकल्पाला सुरूवात झाली. पुढे काम सुरू झाल्यानंतर यात पुन्हा व्याकरणिक बाजू जोडण्यात आली. सर्वनामे , विभक्ती, स्वर, व्यंजने, क्रियाविशेषणं व विशेषणं, वाक् प्रचार  (चार ते पाच), म्हणी आदी घटक यात वाढवले. 
      या प्रकल्पाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाल्यामुळे आता सर्व भाषकांचा संवाद झाला तरच भाषांचा संगम होईल या कल्पनेतून पुढील योग्य दिशादिग्दर्शनासाठी भाषा संगम  नावाने सर्व सहभागी अभ्यासकांचे संमेलन भरविण्यात आले. सहभागी अभ्यासकांसोबत त्या त्या भाषेतील बोलीभाषिक देशाच्या कानाकोपर्‍यातून निमंत्रित करण्यात आले. यात संपूर्ण भारतातील तीन हजार लोकांचा सहभाग होता. फेब्रुवारी दोनहजार मध्ये हे कृतीसत्र  बडोदा येथे घेतले. महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून प्रत्येकाच्या हातात एकेका भाषेची पाटी देऊन बडोद्याच्या रस्त्यांतून भाषा संगमाची पायी फेरी काढण्यात आली. जगातील सगळ्या भाषा या एकमेकांना म्हणजे मानवांना जोडण्याचे काम करतात, तोडण्याचे नव्हे, हा संदेश या भाषा संगम फेरीतून देण्याचा प्रयत्न केला.
      पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया ( Peoples Linguistic Survey of India) याचेच संक्षिप्त नाव पी.एल.एस.आय.( PLSI) असे या प्रकल्पाचे यथार्थ नामकरण झाले. मराठीत भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण असे संबोधन झाले. सर जॉर्ज ग्रियर्सन यांच्या कामानंतर सुमारे शंभर वर्षांनी हा प्रयत्न होत असला तरी ग्रियर्सन यांची ही आवृत्ती असणार नव्हती. ग्रियर्सन हे परक्या भाषांचे सर्वेक्षण एकटेच करीत होते तर या प्रकल्पात ज्या त्या मातृभाषकाकडून हा सर्वे करून घ्यायचा असल्याने हे खर्‍या अर्थाने लोकसर्वेक्षण आहे. तसेच स्वत: बोलीभाषक हे सर्वेक्षण करत असल्यामुळे यात कमीतकमी चुका होऊन सर्वेक्षण जास्तीत जास्त अचूक होईल अशी आशा होती. या प्रकल्पात कोणत्याही राज्य शासनाचा वा केंद्र शासनाचा अंशत:ही सहभाग नाही. भाषा केंद्रासारख्या अशासकीय सामाजिक संस्था, भाषा तत्ज्ञ, साहित्यिक, अभ्यासक, संशोधक, विचारवंत, कार्यकर्ते आणि काही जाती जमातीतील सर्वसामान्य व्यक्ती , की ज्या कार्यशाळेतील मार्गदर्शनाने भाषिक सर्वे करू शकतील, अशा जवळजवळ तीन हजार व्यक्तींना बरोबर घेऊन हे काम सुरू करण्यात आले.       भारत सरकारतर्फे अकराव्या नियोजन आयोगानुसार अशा प्रकारच्या भाषा सर्वेक्षणासाठी दोनशे साठ कोटींचे बजेट दाखवण्यात आले होते. तरीही हे काम शासकीय पातळीवर होऊ शकले नाही. मात्र टाटा ट्रस्ट कडून मिळालेल्या फंडातून फक्त  ऐशी लाखांच्या आत भाषा केंद्रातर्फे हे सर्वेक्षण आज पूर्ण होत आले.
      आधी सर्व राज्य मिळून भाषा सर्वेक्षणांच्या खंडांची संख्या अठ्ठावीसपर्यंत निश्चित करण्यात आली होती. उत्तरभारतीय राज्यांसाठी हिंदी आवृत्त्या तर दक्षिण भारतीय राज्यांसाठी इंग्रजी आवृत्त्या प्रकाशित करायच्या असल्याने आता सर्व खंडांची संख्या पन्नास झाली असून दोनहजार चौदापर्यंत प्रकाशित होऊन देशभर उपलब्ध होतील. या सर्वेक्षणाचा असा प्रंचड आवाका आहे आणि म्हणूनच क‍दाचित हा जगातील सर्वात मोठा भाषा सर्वेक्षण प्रकल्प- महाप्रकल्प असू शकतो. या भाषा सर्वेक्षण प्रकल्पाचे अध्यक्षस्थान डॉ गणेश देवी भूषवत आहेत.
       सात व आठ जानेवारी दोनहजार बाराला बडोदा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषा जोड कार्यक्रम घेण्यात आला व त्याला नाव देण्यात आले होते, भाषा वसुधा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नऊशे भाषिक तत्ज्ञांनी या कृतीसत्रात सहभाग घेतला होता. कृतीसत्रात औपचारिकपणे महाराष्ट्रासोबत काही राज्यांचे भाषिक सर्वेक्षण खंडाचे प्रकाशन झाले असले तरी ही कामे अजून परिपूर्ण अवस्थेत पोचली नव्हती. महाराष्ट्राच्या खंडाचे प्रकाशन श्री कुमार केतकर यांच्या हस्ते झाले. पुण्याच्या अरूण जाखडे यांच्या पद्मगंधा प्रकाशनातर्फे या खंडाचे मुद्रण व प्रकाशन आज पूर्ण झाले असून महाराष्ट्राचा हा खंड आज परिपूर्ण अवस्थेत महाराष्ट्राला पहायला मिळेल. या व्यतिरिक्त महाराष्ट्रासह सर्वच खंडांचा इंग्रजी अनुवाद ओरीयंट ब्लॅकस्वॅन प्रकाशनातर्फे प्रकाशित होईल.
      महाराष्ट्रातील पासष्ट भाषांपैकी अठ्ठावण्ण भाषांचा समावेश या लोकसर्वेक्षण खंडात आहे. मराठीची विविध रूपे, आदिवासींच्या भाषा, भटक्या- विमुक्तांच्या भाषा अशी वर्गवारी करून हा खंड महाराष्ट्रातील भाषाभ्यासकांना आज दिनांक 17 ऑगष्ट 2013 रोजी उपलब्ध करण्यात येत आहे. देशातील सर्व राज्यांचे आणि त्यातून सर्व बोलीभाषांचे हे लोकसर्वेक्षण प्रकाशित होताच भाषा दस्ताऐवजीकरणाची ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे.


  - डॉ. सुधीर रा. देवरे          
 इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा