शनिवार, २७ जुलै, २०१३

दुपारचे जेवण: शेवटचे 
-         डॉ. सुधीर रा. देवरे


         मंगळवार दिनांक 16 जुलै 2013. बिहार. छपरा नावाचा जिल्हा. त्यातील धर्मसती नावाचे एक छोटेसे गाव. तिथली प्राथमिक शाळा. शाळेतले दुपारचे जेवण. आणि जेवणानंतर पटापट मरणारे फक्त दहा वर्षांआतील मुले. रात्रीपर्यंत मरणार्‍या मुलांचा आकडा बावीसपर्यंत गेलेला. आता ही संख्या तेवीस झाली आहे. अजून काही मुले इस्पीतळात प्राणांशी झुंज देत आहेत.
         असे विषारी जेवण फक्त बिहारमध्येच दिले जाते असा कोणाचा गैरसमज असेल तर तो तात्काळ दूर करण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यातील शाळेला भेट द्या. सुदैवाने अशी भीषण घटना महाराष्ट्रात अजून घडली नाही इतकेच. विषबाधा कुठेनाकुठे रोज होतात. पण इतक्या मोठ्या प्रमाणात मुलांना अजून जीव गमवावा लागला नाही यातच आपल्याला समाधान मानावे लागेल.
         दोन हजार चार साली सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की, प्राथमिक शाळांमध्ये मुलांना दुपारचे जेवण द्या. त्याप्रमाणे शाळांमध्ये दुपारचे जेवण सुरू झाले. सगळ्याच योजना चांगल्या असतात. वाईट आहेत त्यांची अमंलबजावणी करणारे हात. सगळीकडे खाण्याची सवय लागलेल्या व्यवस्थेला खाण्याचे अजून एक कुरण मिळाले. प्रत्यक्षात जी यंत्रणा सडलेली आहे त्या यंत्रणेत दुपारच्या जेवणातील पदार्थही सडलेलेच येऊ लागलेत. दुपारच्या जेवणात फक्त खिचडी आणि दोन दिवस उस्सळ भात अथवा पोळी असे निकस दर्जाचे जेवण असूनही त्यावर डल्ला मारण्याचे काम होऊ लागले. शंभर मुलांसाठी फक्त एक किलो बटाट्याची भाजी होऊ लागली. काही ठिकाणच्या तांदूळ आणि डाळीला प्राणीही तोंड लावत नाहीत इतक्या निकृष्ट दर्जाचे अन्न शाळांना पुरवले जाते.
         आधीच शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामांनी वैतागलेल्या शिक्षकांवर खिचडी शिजवण्याचा भार पडला. काही प्रामाणिक शिक्षक हे ही काम व्यवस्थित करू लागलेत पण गावातील ग्रामसभेने हस्तक्षेप करून भ्रष्टाचार सुरू केला. गावातील अशा सभासदांच्या मुलींच्या लग्नात या तांदळाचा भात आणि तुरदाळीचे वरण शिजू लागले.
         इथपर्यंतही ठिक होते. पण जेव्हा तेल, मसाला, बटाटा, कांदा शेंगदाणे वगैरे खरे‍दी करताना- म्हणजे पैसे खिशात घालताना आपण निष्पाप मुलांच्या जिवाशी खेळतोय याचेही भान कोणाला राहिले नाही. ही यंत्रणाच किती संवेदनाशून्य आहे याचा प्रत्यय वेळोवेळी येऊ लागला. ज्या कुटुंबाचे मुले आज शाळेतल्या जेवणाने मारले गेले ते मनात म्हणत असतील, शाळेतल्या त्या जेवणापेक्षा घरी एका वेळी जेऊन- कदाचित अर्धमेली होऊन का होईना अजून काही दिवस तरी ही मुले सहज जगली असती.
         12 रूपये, 5 रूपये आणि 1 रूपयात पोटभर जेवण मिळण्याचा शोध आपल्या काही राजकीय नेत्यांनी आज लावलाच आहे. त्यांना अनुसरून शाळेतल्या या दुपारच्या जेवणाची एकूण गुणवत्ता पाहता एका जेवणाचे सरासरी मूल्य तीन ते चार रूपये असेल. या चार रूपयांच्या जेवणासाठी इतक्या मुलांना आपला जीव गमवावा लागावा यातच आपण आज किती प्रगती केली याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. शाळेत दिले जाणारे दुपारचे जेवण हे आयुष्याच्या संध्याकाळचे शेवटचे जेवण ठरू नये अशी अपेक्षा इथल्या गरीब जनतेने करायचीच नाही का?

     - डॉ. सुधीर रा. देवरे       
 इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा