शनिवार, २९ जून, २०१३

देवाचा तडाखा



 
-         डॉ. सुधीर रा. देवरे


         काही हजार वर्षांपूर्वी आजच्या हिमालयाच्या जागी टेथीस नावाचा समुद्र होता. भारतीय बेट अंटार्ट्रीका खंडातून तुटून उत्तरेकडे सरकू लागले. तिबेट भूखंड आणि भारतीय भूखंड यात हा समुद्र दाबला जाऊन त्याचा गाळ आणि त्यातील खडकांचा चुरा होत हा भाग वर उचलला गेला, तोच हा हिमालय पर्वत. या भागाची अजूनही हालचाल होतेय म्हणून या पर्वताची उंची दरवर्षी वाढत जाऊन त्याने आता जागतिक उंची गाठली. हिमालयाच्या अशा निमिर्तीमुळेच हा तीव्र भूकंपप्रवण प्रदेश तर आहेच पण तिथे होणार्‍या ढगांच्या कोंडीमुळे तो अतिपर्जन्य वृष्टीचाही प्रदेश आहे.
         हिमालय हा सह्याद्रीसारखा एकसंध दगडात नसून तो ठिसूळ पर्वत असल्याने त्याच्यावर कोणतेही कोरीव काम करता येत नाही. महाराष्ट्रातल्या पर्वतांत अनेक लेण्या कोरलेल्या दिसतात. अजिंठा वेरूळ ह्या लेण्या तर प्रत्येकालाच माहीत आहेत. अशा लेण्या म्हणूनच हिमालयात दिसत नाहीत.
         निसर्गाला देव मानण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. जिथे निसर्ग तिथे देव पहाण्याची आपली दृष्टी असल्यामुळे सर्व प्राचीन मंदिरे आणि तिर्थक्षेत्रे आपल्याला निसर्ग सानिध्यात आढळतील. देवराई नावाचे जंगलही तिर्थक्षेत्रांजवळ राखून ठेवलेले आढळते. देवाचे रान असा त्याचा अर्थ आहे. देवाचे असल्यामुळे हे जंगल कोणी तोडू नये असा अलिखीत दंडक असतो.
         निसर्ग तिथे देव ह्या सूत्रामुळेच निसर्गाचा राजा असलेल्या हिमालयाच्या कुशीत देवस्थाने निर्माण झाली. जो संसाराला कंटाळला, जीवनाच्या धबडक्यातून बाहेर पडू इच्छितो आणि जो शारीरिकदृष्ट्याही तंदुरूस्त आहे त्याने हिमालयाचा खडतर प्रवास पायी करून ह्या देवांच्या म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात लीन व्हावे यासाठी ही तीर्थक्षेत्रे निर्माण झाली होती. पण पुढे देवांचे सुलभीकरण सुरू झाले, व्यापारी दृष्टीकोनाने या परिसराला आता व्यावसायिक पर्यटनाचे स्वरूप आले. व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात इथे घोडे आणि खेचरे आणले गेलेत. वाहने त्या त्या जागी पोचावीत म्हणून ऐसपैस रस्ते तयार करण्याचा आग्रह धरण्यात आला. त्यासाठी प्रचंड वृक्षतोड झाली. रस्ते झाले. पर्यटकांची संख्या वाढू लागली म्हणून त्यांच्यासाठी हॉटेल्स निर्माण झालीत. यात्रेसारखी विविध दुकाने येऊन आधुनिक मार्केट तयार झाले. या सगळ्यांसाठी आधीच ठिसूळ असलेला पर्वत खोदायला सुरूवात झाली. झाडे तोडायला सुरूवात झाली. घोड्यांसाठी- खेचरांसाठी चारा म्हणून पुन्हा अतिरीक्त झाडे तुटू लागलीत. स्फोटकांनी दगड फोडून बांधकामे सुरू झालीत. तीव्र उताराच्या ठिसूळ नदी पात्रांवर ‍अतिक्रमणे होऊ लागलीत. विद्युत प्रकल्प आलेत.
         आपण ज्या रस्त्याने प्रवास करतोय, ज्या हॉटेलीत थांबलोय अशी ही सगळी बांधकामे ठिसूळ आणि कोरड्या गाळावर उभी आहेत हे तिथे जाणार्‍या लाखो भक्तांना माहीत नाही. (पैकी केदारनाथ मधील केदार या शब्दाचा अर्थच मुळी चिखल-गाळ असा आहे.) आजूबाजूला ज्या पर्वतरांगा आहेत त्यांच्या नेहमी दरडी कोसळतात आणि त्या दरडी किती वेगाने खाली येतात, पाऊस झाला तर पाण्याचा स्त्रोत किती वेगाने वाहतो याचे ज्ञान तिथे जाणार्‍या कोणत्याही पर्यटकाला वा भक्ताला नाही. वृक्षतोड, रस्ते, नवनिर्माण, बांधकामे, काँक्रेटीकरण, अतिक्रमण आदींमुळे डोंगराचे कडे धसण्याचे आणि झिज होण्याचे प्रमाण वाढले. तिथे निवारे आणि दुकानेच बांधायची तर ती ताप्तुरती आणि हलक्या वजनाच्या कुट्या उभारूनच करायला हवीत याचे भान स्थानिकांनी वा तिथल्या राज्यसरकारने बाळगले नाही.
         नैसर्गिक परिसर कसा, त्याची क्षमता कशी, पर्यावरण आपण नष्ट करीत आहोत की काय असे प्रश्न पैशांनी चंगळ करणार्‍या लोकांना जसे पडले नाहीत तसे व्यवसाय करणार्‍या लोकांनाही पडले नाहीत. चार रूपयाचा बिस्कीटचा पुडा, दहा रूपयाची पाण्याची बाटली हजारो रूपयांना विकणारे आणि मरणाच्या खाईत पडलेल्या लोकांची लुट करणारे जसे माणुसकीशून्य ठरतात, तसे पैशांच्या जोरावर कोणतेही पुण्य पदरात पाडून घेणारे लोकही तेवढेच माणुसकीशून्य आहेत. त्याची परिणीती आज आपण पहात आहोत. आपल्याजवळ विपुल पैसा आहे, स्वत:ची गाडी आहे आणि पुण्य पदरात पाडून घेण्याच्या उंचीवर पोचण्यासाठी रस्तेही आहेत तर मग चला आपणही पर्यटन करून येऊ ही वृत्तीच अखेर घातक ठरली.
         देव आणि पुण्य या फार लांबच्या गोष्टी झाल्या, पण आज साधी माणुसकी सुध्दा पाळली गेली नाही ही बाब या घटनेतून प्रकर्षाने लक्षात आली. निसर्गाच्या चक्रात नको इतका हस्तक्षेप केला तर निसर्ग तडाखा देतो. निसर्गाला आपण देव मानत असल्याने हा देवाचा तडाखा म्हणजे ही माणसाला मिळालेली ताकीद समजायला हवी.

-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा