शनिवार, २२ जून, २०१३

पानकळा...


 
-         डॉ. सुधीर रा. देवरे


         पावसाळ्याला अहिराणी भाषेत पानकळा म्हणतात आणि पावसाला पानी म्हणतात. म्हणजे पाऊस पडला का तुमच्याकडे असे विचारण्याऐवजी पानी पडला का तुमच्याकडे असे विचारले जाते. अहिराणीतच नव्हे तर मराठीतल्या अनेक बोलींमध्ये पावसाला पानी पडणे आणि पावसाळ्याला पानकळा म्हटले जाते.
         पानकळा हा शब्द मला खूप भावतो. हा शब्द प्रमाण मराठी भाषेत सुध्दा रूढ व्हायला हवा. पाण्याच्या कळा येणे म्हणजे पानकळा. कळा हा शब्द विशिष्ट घटनेशी संबधीत आहे. पुरूषांपेक्षा स्त्रियांना हा शब्द अधिक जवळचा वाटेल. जशा नवनिर्माणसाठी- मूल जन्माला घालण्यासाठी ‍िस्त्रयांना कळा येतात, तशा पावसासाठी आख्या सृष्टीला कळा येणे सुरू होते. आणि मग त्यानंतर पानकळा सुरू होतो- पानी पडतो. पानकळा सुरू होण्यापूर्वी जमीन, वृक्ष आणि सगळी सजीव सृष्टीच उन्हाने होरपळून निघालेली असते. म्हणून या पानकळासाठी सगळेच उत्सुक होत पानी कोसळण्यासाठी आभाळाकडे डोळे लाऊन बसतात.
         चार महिण्याच्या रखरखीत उन्हानंतर पावसानेच नव्हे तर नुसत्या पावसाच्या वातावरणानेही माणूस उल्हसित होतो. आभाळाला पानकळाच्या-पावसाच्या कळा सुरू झाल्या की आभाळ हंबरू लागते, म्हणजे गरजू लागते. मग प्रत्यक्षात पाऊस पडला नाही तरी ते आल्हादायक वातावरण, भर उन्हातली सावली, गडगडणारे ढगाळ आभाळ सगळ्याच सजीवांना हवेहवेसे वाटते आणि त्यात तो कोसळलाच तर मग आंनदाला सीमा नाही. पानवार्‍याने येणारा मृदगंध माणसालाही सुखावतो. पहिल्या पावसात चिंब होण्याचा आनंद फक्त माणूसच घेत नाही तर सगळे सजीव या क्षणासाठी आसुसलेले असतात.
         निसर्गात प्रंचड ऊर्जा आहे आणि निसर्गाशिवाय आपण कितीही शोध लावले तरी ते अपूर्ण पडतील. म्हणूनच मी निसर्गालाच देव मानतो. माझ्या अहिराणी कविता संग्रहाचे नाव आहे, आदिम तालाचे संगीत. पावसाचा आवाजाला मी आदिम संगीत समजतो. या कविता संग्रहात मी एका कवितेत म्हटले आहे:
पावसाचा आवाज सुरू झाला की
मी बंद करून देतो
टीव्ही, रेडीओ आणि
घरातले सगळे बारके बारके आवाज
आणि ऐकत बसतो फक्त
आदिम तालाचे संगीत...
जेव्हा लोक बंद करून घेतात
दारे- खिडक्या
आणि पांघरून बसतात ब्लँकेट
आपलीच आपल्याला उब घेत
आपल्या आपल्या घरात...


-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

1 टिप्पणी: