शनिवार, ६ जुलै, २०१३

बदनामीचा दहशतवाद



-         डॉ. सुधीर रा. देवरे


         नाशिकला एका पित्याने आपल्या गर्भवती मुलीचा गळा आवळून खून केला. एका वर्षापूर्वी त्या मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केला होता. दोन दिवसांनी ती बाळाला जन्म देणार होती. पण एका वर्षापासूनचा राग डोक्यात ठेऊन त्या पित्याने मुलीचा जीव घेतला. मात्र भारतातील अशी पहिलीच घटना नाही. अशा असंख्य घटना आपण रोज वाचत- पहात असतो.
         या पित्याने आपल्या मुलीची हत्या का केली? अशा घटनेत इतर पालकांनीही हत्त्या का केल्या? याची उत्तरे त्यांनी स्वत:च दिलेली आहेत. समाजात होणार्‍या बदनामीने आपण अशा हत्त्या केल्याचे हे गुन्हेगार सांगतात. परंपरेने उच्च समजल्या जाणार्‍या जातीतच अशा हत्त्या होतात असे नाही. अगदी सगळ्या प्रकारच्या ओबीसीतल्या जातीतही अशी अमानुष शिक्षा दिली जाते.
         असे का घडते? आपल्याच छायेत वाढवलेल्या प्रेमाच्या व्यक्तीला आपल्याच हाताने मारण्याइतके हे लोक कठोर का होतात? बदनामीची भीती वाटताच असंख्य तरूणी आणि काही तरूण आत्महत्त्याही करतात. याचे कारण आपल्या आजूबाजूच्या सामाजिक जडणघडणीत सापडेल.
         मनुष्य समाजप्रिय प्राणी असल्यामुळे त्याने बनवलेल्या आचारसंहीतेत जो तो आपल्याला बसवण्याचा प्रयत्न करत राहतो. पण समाजातील आजूबाजूची तथाकथित नैतिक कुजबूज आणि आपल्याकडे कोणी बोट दाखवून काहीतरी बोलतेय ही बदनामीची दहशत माणसाला सामान्य राहू देत नाही. त्यातल्यात्यात भर म्हणून अनेक जातीत कार्यरत असणार्‍या जातपंचायती. या जातपंचायती तर सरळसरळ भारतीय राज्यघटना आणि कायद्याचे उल्लंघन करत परस्पर शिक्षा करतात. अशा वेळी त्या विशिष्ट घरातील व्यक्तींचे मानसिक संतुलन बिघडते. संवेदनाशील माणसाला तर ही बदनामी अजिबात सहन होत नाही. म्हणून आंतरजातीय विवाहांच्या विरूध्द समाजाने खाजगीत सुध्दा वाईट बोलणे टाळायला हवे.
         सोशल नेटवर्कचेच उदाहरण घ्यायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने हसत खेळत एखादे विधान आपल्या मित्राला उद्देशून केले. विधान करणार्‍याशीच वाद घालून ते मिटवण्याऐवजी मित्राच्या अपरोक्ष त्या विधानांमध्ये अधिकची भर घालून ते कोणाला तरी सांगितले जाते वा त्याची जाहीर वाच्यता केली जाते. ते विधान पुन्हा जेव्हा बोलणार्‍या व्यक्तीपर्यंत आडवळणाने पोचते तेव्हा इथेही बदनामीच्या दहशतीचे साम्राज्य सुरू होते. अनोळखी नेटवर जर असे होत असेल तर प्रत्यक्ष जीवनात बदनामीची दहशत काय असेल?
         आपल्या मोडक्या तोडक्या जातीचा फाजील अभिमान, लोक काय म्हणतील याची दहशत आणि आपल्या इज्जतीचा पंचनामा होतोय हा समज यामागे असतो. खरे तर एखादी तरूणी वा तरूण नैसिर्गिक नियमाने घसरले तर ते संस्कारांविरूध्द असले तरी निसर्गाविरूध्द नसते, म्हणून असे झाले अशा समजूतीने घडलेल्या घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहून पुढे असे घडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. पण निसर्गनियमालाच गुन्हा ठरवून माणूस मारणे वा आत्महत्त्या करणे या अनैसर्गिक आणि कायद्याविरूध्द गोष्टी असूनही त्यांचा आसरा शोधला जातो.
         आपल्या निंदेमुळे कोणी जीवानिशी जाऊ शकतो याचा विचार करून आपल्या कृत्याने वा आपल्या वाचेने कोणावर अशी वेळ येऊ नये याची दक्षता आपण सगळ्यांनीच घ्यायला हवी.
     - डॉ. सुधीर रा. देवरे       
 इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

३ टिप्पण्या: