शनिवार, १ जून, २०१३

नक्षलवादी हे दहशतवादीच...



                                                              -         डॉ. सुधीर रा. देवरे

         आजही काही चळवळींमधून, काही सामाजिक संस्थातून, काही राजकीय वर्तुळांतून तर काही वैचारिक वर्गातूनही नक्षलवादी चळवळीकडे छुप्या सहानुभूतीने पाहिले जाते. नक्षलवाद हा अन्यायामुळे वाढला असे बोलले जाते. काही उपेक्षित भागात भौतिक प्रगती होत नाही आणि त्यांच्या रास्त मागण्या मान्य होत नाहीत म्हणून स्थानिकांना नाईलाजाने हिंसक मार्गाने जावे लागते असे लोकांचे प्रबोधन करणारे तथाकथित विचारवंत देशाच्या कानाकोपर्‍यात सापडतील.
         पण एंकदरीत या नक्षलवाद्यांचे वर्तन पाहिले तर ते दहशवाद्यांइतकेच क्रूर आहेत हे त्यांनी वेळोवेळी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. आदिवासी दुर्गम क्षेत्रात रस्त्यांचे काम सुरू झाले तर त्या कामावरचे वाहने- साहित्य ते रातोरात जाळून टाकतात. गरीब आदिवासींवर दहशत बसवून बळजबरी त्यांना हिसेंत सामील करून घेतात आणि तसे न करणार्‍यांचा पाशवीपणे काटा काढतात. भारतीय निमलष्करी जवानांची आणि पोलिसांची निघृण कत्तल करतात. एका निमलष्करी जवानाची हत्त्या केल्यानंतर त्याच्या पोटात बाँब ठेवल्याचे उदाहरण ताजे आहे.
         अन्याय झालेले लोक गरीबीत खितपत पडतात. रागाने तात्कालीन आंदोलन करतात. पण आजच्या नक्षलवाद्यांकडे असणार्‍या पैशांनी त्या त्या राज्याचा कायमचा विकास होईल इतकी प्रंचड संपत्ती या नक्षवाद्यांकडे आहे. यांच्या हातात चीन- पाकिस्तानने बनवलेले अत्याधुनिक शस्त्रे कसे येतात? भारतीय व्यवस्थेविरूध्द लढण्याचा त्यांचा नेमका हेतू काय आहे? हे देशाशीच युध्द करायला निघालेत असे त्यांच्या वर्तणुकीतून दृग्गोचर होते. ज्या लोकांचा भारतीय राज्यघटनेवर विश्वास नाही ते देशभक्त कसे असू शकतील आणि ते यशश्वी झालेच तर कोणाचे भले करू शकतील? ज्या आदिवासींसाठी त्यांनी बंड पुकारले आहे असा त्यांचा दावा आहे तेच स्थानिक आदिवासी त्यांच्याच धाकाने रोज जीव मुठीत धरून जगताहेत.
         गरीब आदिवासी आणि नक्षलवादात सहभागी झालेले काही लोक वापरले जात आहेत आणि त्यांच्या मोरख्यांचे उद्दीष्ट मात्र वेगळेच आहे हे लक्षात येते. पाहता पाहता देशातील नक्षलवादाने आज संपूर्ण देशावर दहशत निर्माण केली आहे. नक्षलवाद म्हणजे शुध्द दहशतवाद आणि देशद्रोह ठरवून तो कठोरपणे आणि तात्काळ मोडून काढला तरच आपला तरणोपाय आहे.

-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

२ टिप्पण्या:

  1. वेगवेगळ्या माध्यमातून समाज्यात अस्थिरता माजविण्याचे काम चालू आहे वृत्तपत्रातून वृत्तपत्राचे ठेकेदार समाज्यात जगभर असेच चालू आहे येथेही असेच चालणार त्यात बदल अवघड आहे मग त्यासाठी मोठ मोठ्या भ्रष्टाचाराची प्रकरणे सविस्तर वृतपत्राच्या मुख्यापृस्ठावर छापायची परंतु खोलात जावून त्यास मुलतः कोण जबाबदार आहे याचे विश्लेषण करत नाहीत उदा.ज्या अतिदुरगम खेडेगावात कोणत्याही प्रकारचे संपर्काचे साधन नाही तेथील माणूसही भ्रष्टाचारात पारंगत असतो . तो आपले भाऊ ,बहिणी ,आई, वडील यांना फसवतो.शुल्लक कारणावरून खून मारामाऱ्या करतो . तो हे( गाढ ज्ञान )कोणाकडून शिकला याचा खोलात जावून विचार/विश्लेषण आपल्या वृत्तपत्रात करत नाही, का ? राजकारणी मंडळी समाज्यातील वेगवेगळ्या गटात व्देष पसरवून त्यांच्यात दंगली घडवून अस्तीरता निर्माण करतात , का ?धर्माचे ठेकेदार एका धर्मा विषयी चांगले बोलतात त्याचवेळी दुसऱ्या धर्माविषयी व्देष निर्माण करीत नाहीत का ? त्यांचेही काम समाज्यात अस्तीरता माजविण्या सारखे नाही का ? म्हणजेच व्यवस्थेचे ठेकेदार व्यवस्था टिकविण्यासाठी वेगवेगळ्या ग्रुप व माध्यमांचा वापर करून आपले आसन स्थीर ठेवत नाही का ?

    उत्तर द्याहटवा