शनिवार, ८ जून, २०१३

पदव्यांच्या वेतनश्रेण्या...



-         डॉ. सुधीर रा. देवरे


         कधीतरी ऐकले होते की काही लोक दहावी बारावीचे गुण पेपर तपासणार्‍यांकडून वाढवून आणतात. नंतर पुन्हा कधीतरी हेच इंजिनियरींग आणि मेडीकल क्षेत्रात घडत असल्याचे ऐकले होते. काही प्रकाच्या सीइटींमध्येही हा प्रकार चालतो असे ऐकण्यात आले होते. आणि आता तेच एम.फिल./ पीएच. डी. बद्दल ऐकतोय.
         एम.फिल./ पीएच. डी. म्हणजे संशोधन. एम.फिल. मध्ये संक्षिप्त संशोधन असते तर पीएच. डी. च्या संशोधनाचा पट विस्तृत असतो. म्हणून एम.फिल. ही पीएच. डी. ची पहिली पायरी असल्याचे समजले जात होते. नंतर एम.फिल. अगदी कोणीही होऊ लागले. शंभरेक कागद लिहून काढले की एम.फिल. होता येते अशीही सर्वत्र चर्चा होऊ लागली. काही लोक याच पध्दतीने एम. फिल झालेत असेही ऐकू येत होते. नंतर विद्यापीठांकडून एम.फिल.च्या पदव्या बहाल करणार्‍या काही दलाली संस्थाही अस्तित्वात येऊ लागल्या होत्या. मात्र एम.फिल.ची घसरगुंडी झाली तरी पीएच. डी. चा दबदबा आताआतापर्यंत होताच.
          पीएच. डी. म्हणजे विद्यावाचस्पती होणे. यात संपूर्ण नवीन काही शोधून काढणे अपेक्षित नसले तरी याआधी जे संशोधन आहे त्यात नवीन थोडीफार भर टाकणे म्हणजेच रिसर्च. असे रिसर्च करायला चिकित्सक लोक दहा दहा वर्ष लावतात. अनेक जणांना पीएच. डी. करण्यासाठी दहा वर्ष लागलेले आहेत. विद्यापीठ दोन वर्षांसाठी नोंदणी करत असले तरी ही मुदत संशोधकालाच कमी पडत असल्यामुळे वेळोवेळी मुदतवाढ संशोधकाला करून घ्यावी लागते. असे असताना काही लोक मुदतवाढ न करता दोन वर्षांतच पीएच. डी. होऊ लागलीत. आणि आता तर कोणीतरी फक्त तीन महिण्यात पीएच. डी. झाल्याचे ऐकतोय.
         दोन वर्षांपूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे एकूण पीएच. डी. पध्दत समजून घेण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांना पीएच. डी. करण्याचे अ ब क ड सुध्दा माहीत नव्हते. त्यांच्याशी चर्चा करतांना माझ्या असे लक्षात आले की त्यांना संशोधनाची तांत्रिक माहिती तर नाहीच पण त्या क्षेत्रातला त्यांचा प्राथमिक अभ्यासही नव्हता. त्यांनी एम.फिल.ही केलेले नव्हते. आणि सहा महिण्यापूर्वी ते मला रस्यात भेटले तर म्हणाले, मी पीएच. डी. झालो बरका सर. यावेळी माझ्या चेहर्‍यावरील आश्चर्यही त्यांना सहज दिसले असेल.
         आपण कुठे चाललो आहोत. काय करतो आहोत. याचे भान आज कोणालाही उरले नाही. विकत घेणार्‍यांनाही नाही आणि विकले जाणार्‍यांनाही नाही. एम.फिल./ पीएच. डी. वर जर प्राध्यापकांना पाच पाच वेतनश्रेण्या मिळणार असतील तर हे कधीतरी होणारच होते. प्राध्यापकांचे शोधनिबंध नियतकालिकांत प्रकाशित झाले पाहिजेत असा युजीसीने नियम केला आणि पैसे घेऊन शोधनिबंध छापणारे नियतकालिके निघू लागलीत. आज गुणवत्तेसाठी कोणी शिकतच नाही. पैसे कमवण्यासाठीच तर हे शि‍क्षण आहे. ज्ञानासाठी हे शिक्षण नव्हे. फक्त पदव्यांच्या वेतनश्रेण्या घेण्यासाठी आजचे शिक्षण आहे.
  

-            डॉ. सुधीर रा. देवरे        
      इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा