शनिवार, ३१ मे, २०१४

सर्वसामान्यातले गर्दीचे राजकारण




- डॉ. सुधीर रा. देवरे


         गर्दी का हवी असते माणसाला. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गर्दी हवी असते. साहित्य संमेलनाला गर्दी हवी असते. राजकारणात तर गर्दी हवीच असते. व्यासपीठावर गर्दी हवी असते. जाहीर सभेला गर्दी हवी असते. मग ही गर्दी भाडोत्री असली तरी चालेल. हे झाले सार्वजनिक- सांस्कृतिक कार्यक्रमांसंदर्भात. अशा कार्यक्रमांना गर्दीची अपेक्षा करणे तसे रास्त ठरते. पण सर्वसामान्य माणसाला आपल्या घरातल्या विवाहासारख्या आणि अन्य घरगुती- कौटुंबिक कार्यक्रमातही गर्दी हवी असते. माणसाच्या अंत्ययात्रेला किती गर्दी होती हे सुध्दा नातेवाईक लोक प्रौढीने सांगतात. माझा एक मित्र म्हणाला की त्याच्या मुलीच्या लग्नाला चार हजार लोक उपस्थित होते.
         लोकांना गर्दी आवडण्याचे कारण काय हा माझा कायम चिंतनाचा विषय आहे. गर्दी घडवून आणली म्हणजे त्या गर्दीतला प्रत्येक माणूस आपल्या विचाराशी सहमत असतो का? आपल्या सुखदु:खात सामील झालेला असतो का? आपल्यासाठी झालेल्या गर्दीतला माणूस आपल्यावर प्रेम करतो का? ते कोणत्या प्रकारचे प्रेम असते? तो कोणत्या कारणाने आपल्या गर्दीत सामील झालेला असतो. आतून त्याला वाटले म्हणून तो गर्दीत आला का? उत्स्फूर्तपणे आला का? आपण निमंत्रण दिले म्हणून आला? का आपल्या सत्तेमुळे आला? का उसनवारी फेडायला आला? लादलेल्या संबंधांनी आला की अगदी आतून त्याला शुभेच्छा द्यायची इच्छा झाली म्हणून आला. का काही व्यावसायिक संबंधांना बाधा येऊ नये म्हणून मनधरनीसाठी आला. या सर्वांची खातरजमा न करता आपण आपल्या कार्यक्रमात किती लोकांची गर्दी होती एवढीच चर्चा वा एवढाच हिशोब का करतो? गर्दी ही प्रतिष्ठेची बाब होऊ शकते का? आपल्याकडच्या कार्यक्रमाला अमूक इतके लोक आले म्हणून आपली प्रतिष्ठा अमूक इतक्या इंचांनी वाढली असे आपल्याला वाटते का? वास्तव प्रतिष्ठा गर्दीने मोजता येईल काय?
         ह्या गर्दीत आपण का रमतो? आपण खरोखर सामाजिक बांधिलकी पाळतो म्हणून अशा पारंपरिक कार्यक्रमांना गर्दी करतो का यात अगदी आतूनचा जिव्हाळा कारणीभूत असतो. अशी गर्दी आपण जमवली नाही तर सामाजिक व्यवस्थेतून आपण बाहेर फेकले जाऊ अशी भीती यामागे असते का? आणि अशा गर्दीत आपण नाही गेलो तर आपल्याकडील कार्यक्रमात अशी गर्दी होईल की नाही या भीतीतून आपण दुसर्‍याच्या कार्यक्रम गर्दीत हजेरी लावतो का? ह्या तात्पुरत्या गर्दीत माणसाचे एकटेपण संपते? आपण एकटे नाहीत असा आधार त्याला आतून मिळतो?
         मुळात घरगुती कार्यक्रमात म्हणजे विवाह सोहळा, गोंधळ, मांडव, सत्यनारायण आदी पारंपरिक कार्यक्रमात गर्दी जमवावी की नाही? का ठरावीक लोकांमध्ये हे कार्यक्रम उरकून घ्यावे? म्हणजे यजमानांवरचा अतिरिक्त ताण आणि खर्चही कमी होईल? पण यजमानालाच अशी गर्दी हवी असेल तर? असे सगळे प्रश्न माझ्या मनात कायम गोंधळ घालतात. या निमित्ताने यावर सार्वमत घेऊ या.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा