हुंडा घेणे- देणे गुन्हा आहे!
-
डॉ. सुधीर रा. देवरे
अलिकडे समाजात स्त्री- पुरूष समानतेच्या खूप मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात.
स्त्री ही पुरूषाच्या बरोबरीने आर्थिक सक्षमही होत आहे. तरीही विवाह करायचे ठरले की पुरूष मुलगा नवरी
मुलीच्या जिवावरच नटायला थटायला सुरूवात करतो. मुलगी कितीही उच्च शिक्षित आणि
स्वत: आर्थिक सक्षम असली तरी लग्न मात्र नवरी मुलीच्या खर्चानेच व्हायला हवे असा
सर्वत्र भक्कम समज झालेला दिसतो. नुसता खर्चच नाही तर वरून चांगल्यापैकी भरभक्कम
हुंडाही घेतला जातो. पुन्हा नवरीच्या बापाने नवरीला सोन्याने सजवून दिले पाहिजे
असे आडवळणाने आणि केव्हा केव्हा सरळपणे सुचवले जाते.
एकीकडे
समानता पाळण्याचे ढोंग करायचे आणि दुसर्या बाजूला लग्नाचा बाजार मांडायचा, नवर्या
मुलाचा चक्क सौदा करायचा. असा दुटप्पीपणा आजच्या तथाकथित सुशिक्षित समाजात सुरू
आहे. साधेपणाने विवाह लावून लग्नाचा खर्च दोन्ही बाजूने उचलला गेला अशी उदाहरणे
अजूनही खूप दिसत नाहीत. आणखी हा हुंडा रोज नवीन संज्ञांनी रूढ होऊ लागला आहे.
उदाहरणार्थ, काही लोक हुंड्याला आता वरदक्षिणा म्हणू लागलीत.
मुलगी
मुलाला आणि मुलगा मुलीला पसंत असूनही खालील कारणांनी ठरलेले विवाह चक्क मोडली जातात:
एक:
मुलीचे वडील फक्त लग्न करून देण्यास तयार. सोने आणि हुंडा नाही म्हणतात. म्हणून
लग्न मोडले.
दोन:
नवरीचे वडील दोन तोळे सोने द्यायला तयार. नवरदेवाचे वडील पंधरा तोळे सोन्यावर अडून
बसले.
तीन:
नवरीचे वडील साध्या पध्दतीने लग्न लावून देण्याच्या मुद्दयावर अडून तर नवरदेवाचे
वडील दणकेबाज लग्नाच्या मागणीवर ठाम.
चार:
नवरीच्या वडिलांनी एक छोटेखानी मंगल कार्यालय ठरवले तर नवरदेवाचे वडील अमूक एक
भव्य मंगल कार्यालयच हवे अशा मतावर ठाम. वगैरे वगैरे. परिणामी अनेक लग्न संबंध
निकाली निघतात.
अशी
उदाहरणे पाहिलीत की, विवाह हा आयुष्यभरासाठी केला जातो की फक्त लग्नाच्या एका
दिवसाच्या हौसमौजेसाठी केला जातो, असा प्रश्न पडावा इतके महत्व आज विवाह कसा साजरा
करायचा या गोष्टीला दिले जाताना दिसते. खरे तर विवाह ठरविताना विवाहोत्तर आयुष्यात
दोघांची काय धोरणे असतील हे समजून घेतले पाहिजे. पण आज दोन्ही बाजूने पसंती झाली
की चर्चा होते ती देण्याघेण्याची आणि लग्न कसे भव्यपणे साजरे करायचे या मुद्द्यावर.
एखाद्या मालमत्तेचा सौदा करावा तशी.
हुंडा
घेणे आणि देणेही कायद्याने गुन्हा ठरतो. जे लोक लाच देत नाहीत आणि घेत नाहीत
त्यांनी हुंडा सुध्दा घेऊ नये आणि देऊही नये. हुंडा पध्दत जावी असे जर आजच्या
युवतींना मनापासून वाटत असेल तर जो कोणी मुलगा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हुंडा मागत
असेल अशा मुलाला मुलींनी लग्नासाठी नकार दिला पाहिजे. असे आजच्या युवतींनी स्वत:
ठरवले तरच ही अघोरी प्रथा भविष्यात बंद होऊ शकेल. अन्यथा नाही. (या ब्लॉगमधील
मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा
ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा