शनिवार, १४ जून, २०१४

पर्यावरण दिन उरला शुभेच्छा देण्यापुरता




- डॉ. सुधीर रा. देवरे

       नुकत्याच येऊन गेलेल्या पर्यावरण दिवसाच्या मुहुर्तावर मला एक एसेमेस आला: जागतिक पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!  एसएमएस वाचून मी उडालोच. पर्यावरण दिवसाच्या शुभेच्छा? फक्त शुभेच्छा? शुभेच्‍छा दिल्या की आपले काम संपले. मग त्या पर्यावरणाचे वास्तवात काहीही होवो. वर्षातून फक्त एक दिवस जागृत राहून जागतिक पर्यावरण टिकेल काय?
         एका न्यूज चॅनलने गंगा शुध्दीकरण अभियानासाठी अशीच एसेमेस का फक्‍त मिस कॉल योजना राबवली आहे. आतापर्यंत किती मिस कॉल आलेत हे सांगताना ते चॅनल म्हणते, आजपर्यंत अमूक इतके लोक गंगाशुध्दीकरणाशी जोडले गेलेत!. मिस कॉल दिला की आपले काम संपले. फक्‍त एका मिस कॉलने गंगा शुध्द करता येत असेल तर आतापर्यंत शासनाने काही हजार कोटी रूपये खर्च करण्याचे कारण काय? आणि तरीही गंगा अजून अशुध्दच आहे. आपल्या फुकटच्या मिस कॉलने गंगा आता शुध्दच झाली असे समजणारे लोक आणि चॅनल वरून अमूक इतक्या लोकांचा मिस कॉल आकडा सांगितला की झाले आपल्या चॅनलचे काम. इतके हे पर्यावरणाचे काम सर्व बाजूने सोपे आणि स्वस्त झाल्याचे दिसते.
         पर्यावरण दिनानिमित्त केंद्रिय पर्यावरण मंत्र्याने सर्व मंत्र्यांना रोपट्यांची एकेक कुंडी भेट दिली. पंतप्रधानांना सुध्दा कुंडी भेट ‍देताना चॅनलवाल्यांनी दाखवले. पण त्या कुंड्यांचे पुढे काय झाले हे कोणालाच कळले नाही.
         आज सर्वत्र चमको संस्कृती रूजल्यामुळे दाखवण्यापुरते म्हणजेच प्रसिध्दीपुरते काम चमकवले जाते. नंतर त्या कामाचे काय होते याचे प्रसिध्दी मिळवणार्‍यांना जसे घेणे देणे नाही तसे प्रसिध्दी देणार्‍यांना देणे घेणे नाही. पर्यावरण दिवसाच्या मुहुर्तावर वृक्षरोपण करायचे आणि त्याचे संगोपन वार्‍यावर सोडून द्यायचे असे सर्वत्र चित्र दिसते. या पार्श्वभूमीवर मात्र जे लोक खरोखर पर्यावरण टिकवण्यासाठी प्रयत्न करतात ते अशा स्वस्त प्रसिध्दी पासून कितीतरी कोस लांब राहतात आणि त्यांचा प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिन असतो. मात्र अशा लोकांची दखल आपण होऊन मिडिया कधीच घेत नाही.
         सारांश, पर्यावरण दिन आता फक्त शुभेच्छा देण्यापुरताच उरला असे दिसते! म्हणून आपल्या जवळपास कायम चांगले पर्यावरण असो अशा शुभेच्छा देऊन थांबतो.


   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा