बहिणाबाईंची "गुढी उभारनी": एक आस्वाद
- डॉ. सुधीर रा. देवरे
मराठी विकिपीडियाचे माहीतगार यांनी
गुढी पाडव्याच्या दिवशी मला पुण्याहून फोन केला. फोनवर ते म्हणाले, ‘बहिणाबाई चौधरी यांच्या गुढी
उभारनी ह्या कवितेचा अर्थ मला नीट लागत नाही. जरा विश्लेषण करून सांगाल का? सदर
कवितेतील ‘कसे पडले घोरत
असे निस्सयेलावानी’ या ओळीपासून
पुढे मला अर्थ लागत नाही. लागला तर तो अर्थ गुढी पाडव्याच्या पवित्र दिवशी विपरीत
होताना दिसतो. आपण या कवितेवर आस्वादात्मक लिहाल तर बरे होईल. म्हणजे विकिपीडियातील
लेखात लेखन करणे सोपे पडेल.’ माहीतगार
यांच्यासाठी मी सदर कवितेचा आस्वाद करायचे ठरवले. तो आस्वाद मी इथे सर्वांसाठी देत
आहे.
खानदेशातील लेवा पाटीदार गणबोलीतून
बहिणाबाई चौधरी यांची ही काव्यरचना आहे. खानदेश आणि सर्व अहिरानी भाषा पट्ट्याच्या
अंतर्गत अजून काही जातीय- जमातीय बोली आढळतात. पण या सर्व बोलींवर अहिरानीचा
जबरदस्त पगडा आहे. म्हणून बहिणाबाईंच्या कवितांचे वर्गीकरण महाराष्ट्रात अगदी
पाठ्यपुस्तक मंडळासह सर्वच वाचक अहिरानी भाषेत करताना दिसतात. ह्या बोलीत आढळणार्या
अहिरानीच्या शब्द साम्यामुळे असे होताना दिसते.
गुढीपाडव्याचा
सन
आतां उभारा रे गुढी नव्या वरसाचं देनं सोडा मनांतली आढी
गुढी
पाडव्याचा सण असल्याने आज आपण सर्वजण गुढी उभारू या. गुढी पाडव्यापासून आपण मराठी
नववर्षाची सुरूवात होते असे मानतो. म्हणून या नवीन वर्षाच्या शुभमुहुर्तावर आपल्या
मनात कोणाबद्दल आजपर्यंतची जी अढी निर्माण झाली असेल- गैरसमज असतील, ते विसरून जाऊ
आणि नवीन वर्षाचा नवा विचार करूया असे बहिणाबाई कवितेच्या सुरूवातीलाच आवाहन
करतात.
गेलसालीं गेली
आढी
आतां पाडवा पाडवा तुम्ही येरांयेरांवरी लोभ वाढवा वाढवा
गेल्या
साली म्हणजेच ह्या मागच्या काळात आपल्या मनात एखाद्याबद्दल आढी निर्माण झाली असेलही.
पण आज पाडवा हा शुभ दिवस नवीन वर्षाची सुरूवात घेऊन आल्यामुळे आपण सगळ्यांनी एक
व्हावे आणि एकमेकांशी आपला लोभ वाढवावा, जुने मतभेद विसरून जावेत असे बहिणाबाई
पुढे म्हणतात. (येरांयेरांवरी हा शब्द अहिरानीसह काही बोली भाषांमध्ये आढळतो.
येरांयेरांवरी म्हणजे एकमेकांवर.)
अरे, उठा झाडा आंग गुढीपाडव्याचा सन आतां आंगन झाडूनी गेली राधी महारीन
आज
पाडवा हा सण असल्यामुळे बहिणाबाई अगदी पहाटेच आजूबाजूला झोपलेल्या लोकांना आवाहन
करतात, झोपेतून ऊठा, आंग झाडा म्हणजे आळस झटका, अंघोळी करा. आत्ताच बाहेर राधी
महारीन आंगन म्हणजे गल्ल्या झाडून गेली आहे. कविता पारंपारिक अर्थाची असल्याने
ज्या काळात कवयित्रीने कविता लिहिली त्या काळी विशिष्ट एका गावी राधी महारीन
नावाची महिला पहाटे गल्ल्या झाडत असावी, तो उल्लेख इथे आला आहे. बहीणाबाईंच्या
तात्कालीन काळातली विशिष्ट जीवन जाणीव- गावपरंपरा ह्या कवितेत अधोरेखित झाली आहे.
(जातीयवाद नव्हे.)
कसे पडले घोरत असे निस्सयेलावानी
हां हां म्हनतां गेला रे रामपहार
निंघूनी
ज्यांना
कवयित्री झोपेतून उठायचे आवाहन करीत आहे ते लोक इतक्या सुंदर पहाटेला अंथरूनात
घोरत पडले आहेत. निस्सायेल- निसवायेल हा शब्द अहिरानी बोली भाषेसह अजून काही बोलींमध्ये
आढळून येतो. त्याचा अर्थ आहे निर्लज्ज अथवा कोनतीही काळजी नसलेला. निष्काळजी
माणसासारखे झोपून राहिल्यामुळे, घोरत पडल्यामुळे घरावर गुढी उभारायचा जो मुहुर्त
असतो रामपहार- रामाची पहार- पहाट तो मुहुर्त निघून चालला आहे, असे कवयित्री
आपल्या कवितेत म्हणतात.
आतां पोथारा
हे घर सुधारा रे पडझडी करीसन सारवन दारीं उभारा रे गुढी
घर
पोतारणे ही एक लोकपरंपरा आहे. पूर्वी ग्रामीण भागात मातीची घरे असत. मातीच्या
भिंती असत. अंगण, ओटा, घराची जमीन जशी शेणाने सारवली जात, तशा मातीच्या भिंती
सणासुदीच्या दिवशी पांढर्याशुभ्र मातीच्या पाण्याने कापडाच्या साहाय्याने पोतारत
असत- सारवत असत. त्याला ‘पोथारा हे घर’ असे बहिणाबाई म्हणतात. भिंतींच्या
पडझडी झाल्या असतील तर त्या सुधारा, डागडुजी करा, सारवन करा आणि मग गुढी उभारा असे
आवाहन कवितेत आहे. पडझडी सुधारा याचा लक्षणार्थ- व्यंगार्थही इथे दिसतो. नात्यागोत्यांमध्ये
जर काही पडझडी झाल्या असतील तर ह्या शुभ मुहुर्तावर त्या सुधारा. एकमेकांशी गोड
व्हा असा संदेश देण्याचा प्रयत्न कवयित्री करतात.
चैत्राच्या या
उन्हामधीं जीव व्हये कासाईस रामनाम घ्या रे आतां रामनवमीचा दीस
चैत्राच्या
सुरूवातीला पाडवा आणि लगेच नऊ दिवसांनी रामनवमी येते. चैत्र महिना म्हणजे उन्हाळा.
उन्हाळ्यात जीव कासावीस होतो म्हणून रामनवमीच्या निमित्ताने तरी रामाचे नाव घ्या
म्हणजे जीवनातला नकोनकोसा उन्हाळाही थोडा हलका होईल अशी पारंपारीक लोकसमजूत कवयित्री
इथे उदृत करतात.
पडी जातो तो 'पाडवा' करा माझी सुधारनी
आतां गुढीपाडव्याले म्हना 'गुढी उभारनी'
गुढी
पाडव्याची गुढीच आपल्याशी बोलते आहे अशी ही रचना असून पडतो तो पाडवा असा जर पाडवा ह्या संज्ञेचा सरळ
अर्थ असेल तर मला पाडवा असे न म्हणता ‘गुढी उभारनी’ असे म्हणावे
अशी सुधारणा करण्याचे आवाहन स्वत: पाडवा हा सण आपल्याला करताना दिसतो.
काय लोकाचीबी
तर्हा कसे भांग घोटा पेल्हे
उभा जमीनीच्या मधीं आड म्हनती उभ्याले
पाडवा हा शब्द जसा गुढीला छेद देतो, म्हणजे
पाडवा याचा अर्थ पडून जाणे असा असूनही गुढी मात्र उभारली जाते. तसाच आड हा जमिनीच्या
पोटात सरळ खोल असा उभा गेलेला असूनही लोक त्याला आड म्हणजे आडवा म्हणतात, अशी
टिपणी कवयित्री करतात. आणि ज्या लोकांनी आड आणि पाडवा अशा उलट्या संज्ञा तयार
केल्यात ते लोक भांगेच्या नशेत होते की काय अशी आपली शंका बोलून दाखवतात.
लोकपरंपरेने- लोकसंचिताने दिलेल्या संज्ञाच कशा विपरीत आहेत याची चिकित्सा करत
आपल्या काही पारंपारिक संज्ञा आणि कृती कशा परस्पर विरूध्द आहेत असे दाखवण्याचा
प्रयत्न इथे कवयित्री करताना दिसतात.
आस म्हनूं नही
कधीं
जसं उभ्याले आडवा गुढी उभारतो त्याले कसं म्हनती पाडवा ?
आणि
म्हणून शेवटी कवयित्री आपल्या सगळ्यांना आवाहन करतात की, माणसाने उभ्याला आडवे
म्हणू नये तसे पाडवा ह्या सणालाही पाडवा न म्हणता गुढी उभारनी असे म्हणावे.
शेवटच्या दोन कडव्यांमध्ये बहिणाबाईंनी त्या काळीही ब्लॅक कॉमेडी केली आहे असे
म्हणायला इथे वाव आहे.
(या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा
सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
Padwa cha artha Pratipada athava padya ya tyachya apabhraunsha varun ala aahe asa vatate.
उत्तर द्याहटवाअसू शकते. धन्यवाद.
उत्तर द्याहटवा