- डॉ. सुधीर रा. देवरे
बरोबर
दोन वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 ला मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला
सुरूवात केली. योगायोगाने या दोन वर्षात एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही.
म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड जाऊ न देता आणि शनिवार संध्याकाळ ही वेळही न टाळता
नियमितपणे ब्लॉग लिहीत आलो. खूप लांबलचक लेख लिहिण्यापेक्षा विचारांची थोडक्यात व
संपृक्त मांडणी करायची शिस्त स्वत:ला लावून घेतली आणि ती शिस्त आजपर्यंत पाळतोय.
या
सर्व छोटेखानी लेखांत सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक,
भाषिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण आदी विषय येत गेले. देशात (वा विदेशात) त्या
त्या वेळेला घडलेल्या घटनांवर प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया म्हणून हे लेखन प्रासंगिक
भाष्य असले तरी हे लेख केवळ प्रासंगिक आहेत असे म्हणता येणार नाही. हे लेख
केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात कालाय ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन मी लिहीत
गेलो. म्हणजे घटना विशिष्ट काळातली असली तरी तिचा परिप्रेक्ष आजच्या अन्य घटनांकडे
नक्कीच निर्देश करेल याचा विचार लिखाण होताना केला आहे.
या ब्लॉगचे आंतरजालावर हे स्वतंत्र संकेतस्थळ
तर आहेच पण हेच ब्लॉग मी तात्काळ त्या त्या दिवशीच ग्लोबल मराठी या संकेतस्थळासह
फेसबुकवरही टाकतोय. फेसबुकच्या भिंतीसोबतच जवळ जवळ पन्नास गटांवर हे लेख मी टाकत
असतो. त्यामुळे आंतरजालावर ब्लॉग साइट, ग्लोबल मराठी आणि फेसबुक या सर्वांवर
प्रत्येक लेख जवळपास दोन हजार वाचक वाचतात असा माझा अंदाज आहे. तरीही या ब्लॉगला
प्रायोजक मिळविण्याच्या खटाटोपात मी अजूनही पडलो नाही. भारताच्या संविधानाने
दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अनुसरून व्यक्त होणे आणि अप्रत्यक्षपणे
झालेच तर प्रबोधन एवढ्याच धेयाने प्रेरित होऊन हे लिखाण मी करतोय. यातून मला जो
आनंद मिळतो त्याचे वर्णन मी इथे शब्दात मांडू शकणार नाही.
दोन
वर्षातील या छोट्या लेखांची संख्याच सांगायची झाली तर ती एकशेआठ इतकी झाली आहे.
पैकी काही निखळ प्रासंगिक स्वरूपाचे लेख वगळून या ब्लॉगचे पुस्तक प्रकाशित व्हावे
असे मला वाटते. (कोणी प्रकाशक हे पुस्तक काढण्यासाठी उत्सुक असतील तर त्यांनी माझ्याशी
संपर्क साधावा ही विनंती.) या पुढेही मी ब्लॉग लिहीत राहीन. पण दर शनिवार
संध्याकाळ हे सातत्य या पुढेही पाळता येईल की नाही या बद्दल मीच साशंक आहे. आपल्या
सर्वांच्या अभिप्रायांमुळे, प्रतिक्रियांमुळे, टिपण्यांमुळे आणि विशेषत: आपल्या
प्रेमामुळे मला ऊर्जा मिळत गेली, म्हणून ब्लॉगचे लेखन सातत्य मी आतापर्यंत तरी
टिकवून आहे. यापुढेही सर्व वाचकांचे असेच प्रेम मिळत राहील अशी आशा बाळगतो.
धन्यवाद.
- डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा