शनिवार, १२ एप्रिल, २०१४

शांतिवन: एक सेवाभावी शैक्षणिक प्रकल्प





-         डॉ. सुधीर रा. देवरे


       महाराष्ट्रात एक अतिशय मोठे सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. त्यांचे नाव आहे बाबा आमटे. महाराष्ट्रात बाबा आमटे आणि त्यांनी स्थापन केलेली आनंदवन ही संस्था कोणाला माहीत नसेल अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ. ज्यांनी कोणी आनंदवनला भेट दिली नाही तरी त्यांना हे नाव ऐकून तरी माहीत असतेच. बाबा आमटेंकडून सामाजिक दृष्टीकोन असलेल्या काही व्यक्तींनी प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आपल्याला पेलवतील अशी छोटी मोठी सामाजिक कामे आपापल्या परिसरात सुरू केली आहेत.
         एखाद्याने हाती घेतलेले सामाजिक काम आपल्याला कितीही छोटे वाटले तरी सामाजिक कामे करणे ही छोटी गोष्ट नाही. आयुष्य पणाला लावून अशी कामे करावी लागतात. इथे तासांचा हिशोब नसतो. कामाचे तास ठरलेले नसतात. दिवसाचे चोवीस तास फक्त समाजाशी बांधून घ्यावे लागते.
         आर्वी ता. शिरूर जि. बीड येथील असेच एक कार्यकर्ते श्री दीपक नागरगोजे यांनी आंनदवनला एकदा भेट दिली. तिथल्या एका शिबीरातही त्यांनी काम केले आणि त्याचवेळी त्यांनी ठरवले की आपल्या परिसरात आपण असेच काम करायचे. पुढे त्यांचा विवाह कावेरी नागरगोजे यांच्याशी झाला. पत्नीला विश्वासात घेऊन त्यांनी आपली कल्पना बोलून दाखवली आणि कावेरी नागरगोजे यांनी तात्काळ ही कल्पना उचलून धरली. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांशी हे दोघे जण परिचित होते. त्यांची परवड, कामासाठी पश्चिम महाराष्ट्रात दीर्घकाळ स्थलांतर, त्यांची आर्थिक स्थिती आणि परिस्थिती यामुळे या कामगारांच्या मुलांचे शिक्षण होत नाही. जे चिकाटीने करतात त्यांचेही शिक्षण अर्ध्यावर सुटते. अशा मुलांच्या शिक्षणावर सर्वप्रथम या दांपत्याने आपले लक्ष केंद्रीत केले.
         स्वत:ची आठ एकर जमीन संस्थेला देऊन शांतिवन नावाची संस्था जून 2001 साली स्थापन केली. सुरूवातीला साधे पत्र्यांचे शेड उभारून या मुलांसाठी शिक्षण सुरू झाले. फक्त ऊस कामगारांच्या मुलांसाठी सुरू झालेली ही वस्तीशाळा पुढे सर्वसमावेशक होऊ लागली. अप्रगत मुले, तमाशा कलावंतांची मुले, एड्‍सबाधित मुलांचा प्रकल्प, देवदासी महिलांची मुले, अंध, अपंग, मूकबधीर, अनाथाश्रम, निराधार महिलाश्रम आदी विभाग या प्रकल्पात आज सुरू झाले आहेत. हे जोडपे संस्थेत बसून अशा मुलांची वाट पहात नाही, तर अशा मुलांची चाहूल लागताच त्या गावाला जावून अशी मुले प्रेमाने संस्थेत आणली जातात. अजून शासनाची कोणतीही आर्थिक मदत नसताना पत्र्यांच्या शेड पासून सुरू झालेली ही संस्था आज स्वत:च्या सात इमारतीत पसरली आहे.
आता पहिली ती दहावी पर्यंत शिक्षण घेणारी 700 मुले-मुली, एकोणावीस महिला आणि बावीस कार्यकर्ते या संस्थेत आहेत. लवकरच ही  संस्था बारावी पर्यंत शाळा सुरू करणार असून काही व्यावसायिक प्रकल्पही हाती घेणार आहे. आपल्या संस्थेतून शिकलेल्या मुलांसाठी काही स्वतंत्र रोजगार उपलब्ध करता येतील काय याची चाचपणीही प्रकल्पात सुरू आहे.
शांतिवन मधील प्रौढ झालेल्या मुलांच्या वैवाहीक जीवनासाठीही संस्थेत  प्रयत्न होताहेत. आतापर्यंत तीन अनाथ मुलींचे विवाह संस्थेने लावून दिलेत. शांतिवन  मधून शिकून मेडिकल, इंजिनियरिंग आणि जर्नालिझमच्या शिक्षणातही इथली काही मुले उतरलीत. या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या दु:खाची गोष्ट वेगळी आहे. (या सर्व वास्तव कथा आज कावेरी नागरगोजे आपल्या शब्दात शब्दबध्द करीत आहेत.) आपले
   स्वत:चे घर नसलेल्या या मुलांसाठी म्हणूनच गुरूकुल पध्दतीने शिक्षण शांतिवनात
   दिले जाते.
ही संस्था लोकवर्गणीतून सुरू आहे. देणगीदारांच्या औदार्यामुळे संस्थेची वाढ
होत आहे. पण अशी मदत मिळवण्यासाठी काय खटाटोप करावे लागतात ते असे सामाजिक काम करणार्‍या लोकांनाच माहीत असते. जिथे ही संस्था सुरू आहे तिथून शिर्डी आणि शनिशिंगणापूर फक्त  150 किमीच्या आसपास आहेत. भगवान गड नावाचे धार्मिक स्थळ सुध्दा  फक्त 30 किमी अंतरावर आहे. अशा धार्मिक स्थळी जाणार्‍यांची संख्या  जशी प्रचंड आहे तशी त्यांच्या दानपेटीत रकमाही रोज प्रचंड प्रमाणात येत असतात. अशा भाविकांनी थोडी वाट वाकडी करून अशा प्रकल्पांना भेटी देऊन थोडीफार आर्थिक मदत केली तर अशा संस्था अधिक जोमाने आपले कामे करू शकतील असा विश्वास वाटतो. म्हणूनच सामाजिक दृष्टीकोन असलेल्या वाचकांसाठी त्यांचा पूर्ण पत्ता मुद्दाम इथे देत आहे: कावेरी नागरगोजे, शांतिवन, आर्वी ता. शिरूर कासार- 431122, जि. बीड.     भ्रमणध्वनी: 9421282359       

    - डॉ. सुधीर रा. देवरे        
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा