शनिवार, १९ एप्रिल, २०१४

अहिरानी भाषेवरील चार पुस्तकांचे प्रकाशन


                                                       -         डॉ. सुधीर रा. देवरे

          बर्‍याच दिवसांपासून प्रकाशनाची वाट पहात असलेली माझी चार अहिरानी पुस्तके नुकतीच पुणे येथील पद्मगंधा प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात आलीत.
          अहिरानी लोकसंस्कृती, अहिरानीच्या निमित्ताने: भाषा, अहिरानी गोत  अहिरानी वट्टा  अशी या चार पुस्तकांची नावे असून दोन ‍पुस्तके संपूर्ण अहिरानी माध्यमात तर दोन मराठी माध्यमात आहेत. या चार संदर्भ ग्रंथांसह माझी आतापर्यंत एकूण नऊ पुस्तके प्रकाशित झालीत.   
            अहिरानी लोकसंस्कृती या पुस्तकात एकूण अठरा लेख असून शोधनिंबधाच्या स्वरूपातील या लेखांतून अहिरानी भाषा व संस्कृतीतील अनेक रहस्य उलगडली गेली आहेत. अहिरानी प्रदेशातील दैवते, समाज, कला आणि संस्कृती यांचे परस्पर अनुबंध येथे स्पष्ट होतात. लोकसंस्कृतीतील काही मिथके समजून घेण्यासाठीही अभ्यासकांना- संशोधकांना हा ग्रंथ संदर्भांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. यातील काही निबंध वेगवेगळ्या राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये वाचले गेले आहेत तर काही लेख महाराष्ट्र साहित्य पत्रिका, ‘परिवर्तनाचा वाटसरू आणि मी संपादित करीत असलेल्या अहिराणी ढोलमध्येही या आधी प्रकाशित झाल आहेत.     
            अहिरानीच्या निमित्ताने: भाषा या पुस्‍तकात अठरा लेख समाविष्‍ट केले आहेत. हा लेखसंग्रह अहिरानीच्या निमित्ताने असला तरी यातील घटकांगे भारतातील सर्वच भाषांवर भाष्य करतात. बोलीभाषा, लोकसाहित्य, आदिवासी साहित्य, लोकसंस्कृती, लोकजीवन आदी क्षेत्रांतील भाषाभ्यासकांना व संशोधकांना हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल. या विषयावर आतापर्यंत माझ्याकडून जे जे लिखाण झाले, ते सर्व या पुस्तकात आले आहे. विविध चर्चासत्रात मांडलेले विचार, भाषा आणि जीवन, अनाघ्रात, परिवर्तनाचा वाटसरू ढोल आदी नियतकालिकांतून यातील काही लेख आधीच प्रकाशित झाले आहेत. अहिरानी बोलीवर लेखन करताना सर्वच बोलींवर अर्थात सर्वच भाषांवर भाष्य होऊ लागले. इतर भाषांचाही अभ्यास होऊ लागला आणि त्यातून समान बाबींवर प्रकाश पडू लागला. यातून सर्वच भाषा जोडण्यासाठी लेखांचे माध्यमही साहजिकच मराठी वापरले गेले.
            अहिरानी गोत या पुस्तकात  सोयीसाठी  चार  विभाग  केले  असून  पहिल्या भागात अहिरानी लोकपरंपरा, दुसर्‍या भागात अहिरानी लेख, तिसर्‍या भागात  तवपावत  काढवा  याळ हा अहिरानी कथासंग्रह आणि चौथ्या भागात  जठे नही येकी हा अहिरानी बालकथा संग्रह यांचा समावेश केला आहे. लोकपरंपरा या भागात अहिरानी  लोकपरंपरेविषयीचे  लेखन  समाविष्ट  असून  यात  सतरा लेख आहेत.  दुसर्‍या भागात आदिवासी साहित्य, अहिराणी साहित्य    सामाजिक विषयाचे असे नऊ लेख समाविष्ट आहेत.
            तवपावत काढवा याळया कथासंग्रहात एकूण दहा कथा सामाविष्ट आहेत तरजठे नही येकीया बालकथा संग्रहात आठ कथांचा  समावेश आहे. या कथा बालकथा इसापनिती सारख्या बोधप्रध असून त्या माझ्या बालपणाच्या जगण्यातून आलेल्या आहेत. या कथांना मी बालकथा म्हणतो म्हणून त्या फक्त लहानांनीच वाचाव्यात अशा नाहीत. त्या प्रौढांनीही मुद्दाम वाचल्या पाहिजेत. त्यासाठी शेवटची कथा पोपट महाराज तर प्रत्येकाने वाचावी असा माझा आग्रह राहील.
            अहिरानी गोत या पुस्तकातील लोकपरंपरा आणि अहिरानी लेख ह्या दोन्ही भागातील संपूर्ण लिखाण मी संपादित करीत असलेल्या अहिरानी ढोल मध्ये प्रकाशित झालेले आहे तरतवपावत काढवा याळया कथासंग्रहातील काही कथाही ढोल मध्ये  प्रकाशित  झाल्या आहेत. बालकथा संग्रहातील कथा मात्र अप्रकाशित आहेत. या पुस्तकाचे माध्यम म्हणून साहजिकपणे अहिराणी बोलीत आहे.  गोत  म्हणजे नाते. जवळच आणि दूरच शी काही आपल नातेसंबंध असतात, ते सर्व गोत.  यात मैत्र हा घटकही असतोच. लोकपरंपरा, लोकसंस्कृती, लोकसमज, लोकरूढी, लोकरीती, लोकविधी, लोकदैवते, सामाजिक भान आदिसहीत त्यांच्या कथा आणि व्यथा एकत्र करून मांडल्या म्हणून या पुस्तकाचे शीर्षक अहिरानी गोत असे देण्याचे मी नक्की केले.
            अहिरानी वट्टा या पुस्तकात २००३ ते २००५ या दरम्यान सत्त्यायनचे प्रतिबिंब नावाच्या साप्ताहिकात माझ्या अहिरानी सदरासाठी संपादकांनी गळ घातली. तात्पुरता एक लेख लिहून दिला आणि त्यावर सदराचे नाव म्हणून अहिरानी वट्टा असे खूप विचार न करता लिहून टाकले. दुसर्‍या अंकासाठी पुन्हा त्यांचा फोन. पुन्हा लेख. असे पुन्हा पुन्हा होत राहिले आणि हे अस्सल अहिरानी भाषेतील सदर मी विनाखंड वर्षभर लिहिले. वेळ नसल्याने मी ते सदर लिहिणे बंद केले. पण संपादकांच्या आग्रहामुळे पुन्हा मर्मभेद नावाचे मराठी माध्यमातील लेख देत गेलो. हे सदरही वर्ष होताच मी बंद केले आणि नंतर नवीन सदरही हाती घेतले नाही. या दोन वर्षात कोणत्याही मानधनाशिवाय केवळ सामाजिक प्रबोधनाखातीर मी ही दोन सदरे लिहिली. या नंतर काही कारणाने ते साप्ताहिक प्रकाशित होणे पुढे बंद झाले.
            अहिरानी वट्टा या सदरात बावन्न लेख असून ते सर्व अहिरानी माध्यमात आहेत. वट्टा म्हणजे ओटा. अहिरानी ओट्यावर रंगणार्‍या गप्पा, चर्चा, घडणार्‍या घटना म्हणजे अहिरानी वट्टा. यात अहिरानी भाषा, अहिरानी लोकजीवन आणि लोकसंस्कृती यांचे दर्शन आहे. हा वट्टा अहिरानी लोकांना तर आवडलाच पण पुण्या मुंबईतील बिगर अहिरानी माणसांकडूनही त्यावर प्रतिक्रिया आल्यात. सटनानी जत्रा, हाऊ फोटूक कोन्हा, इच्चू इच्चू, पठावाना शाऊस का, मधरी आंधळी, लोकसंस्कृती जपाले पाहिजे आदी लेखांवर खूप चांगली दाद मिळाली.
            जगात फक्त एकच एक भाषा बोलली जात असावी आणि ती फक्त आपली मायबोली, अशी मानणारी अजूनही सर्वत्र भोळी भाबडी पिढी आहे. कारण त्यांच्या आयुष्यात कधी शाळा नसते आणि दुसर्‍या  भाषेचा संपर्कही. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ते आपली एकच एक भाषा बोलतात आणि तिच्यातच आपला व्यवहार करतात. अर्थात ह़ी अभिमानाची गोष्‍ट नसून शोकांतिका आहे. अशा लोकांकडे लक्ष वेधण्‍यासाठी हे पुस्तक मी त्यांना अर्पण केले आहे. हे सर्व लेख स्वतंत्र कथा म्हणूनही वाचता येतील.
            या चारही पुस्तकांच्या उपलब्धतेसाठी: पद्मगंधा प्रकाशन, सदाशिव पेठ, पुणे- 30, फोन: 020- 24450260, मोबा. 7350839176 यांच्याशी संपर्क साधता येईल.
- डॉ. सुधीर रा. देवरे       
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा