शनिवार, ८ फेब्रुवारी, २०१४

मुर्तींचा उच्चांक आणि राजकारणाचा निचांक




- डॉ. सुधीर रा. देवरे

       माणसाला आपल्या भवितव्यात अंधार दिसायला लागला की तो भूतकाळात रमू लागतो. उदाहरणार्थ: माझे आजोबा असे होते. माझ्या वडिलांचा गावात दरारा होता. आमचा चिरेबंदी वाडा होता. संपूर्ण गाव माझ्या वडिलांना मानत असे. आमच्याकडे खूप वैभव होते. आमच्या घरात लोकांसाठी जेवणावळी उठायच्या. येणार्‍या जाणार्‍याला खाली हात जाऊ देत नसत. आमची पिढीजात श्रीमंती होती. वगैरे वगैरे...
         आणि आपल्या वाडवडलांचे आख्यान सांगणारा आज काय करतो: दिवसभर दारूच्या नशेत असतो. मटका लावतो. पत्ते खळतो. बापाने कमावलेल्या पैशांवर मजा करतो आणि चावडीवर बसून आपल्या पूर्वजांच्या बढाया मारतो.
         अशाच प्रकारची परिस्थिती आजच्या राजकीय नेत्यांची झाली आहे. भव्य आणि दिव्य मूर्ती उभारण्यासाठी आजच्या राजकारण्यांना आपल्या कतृत्ववान पूर्वजांची आठवण येते. त्यांच्याइतके कार्य करणे फार लांबची गोष्ट झाली. पण त्यांच्या एक शतांशपट कार्यही आपल्याला करता येत नाही हे लक्षात येताच, त्यांचीच भव्य मूर्ती बनवून आपण त्यांच्या मूर्तीसाठी तरी ओळखले जाऊ अशा मनिषेने देशात सध्या अनेक राजकीय लोकांना काम मिळाले आहे. जसजसा राजकारणाचा निचांक समोर येऊ लागला तसतशा मूर्ती देशात वाढू लागल्या आहेत.
         मी पंतप्रधान झालो तर!... (असा शालेय निंबध लिहून आता बरेच दिवस झालेत, पण हा लेख लिहिताना अशा निबंधाच्या रूपबंधाचा मला आधार घ्यावा लागतोय.) पहिल्यांदा अशा मुर्ती वा पुतळे उभारण्यासाठी कोणकोणते लोक पुढे येऊ शकतील याचा अदमास घेऊन मी देशात कुठेतरी एकाच जागी प्रचंड मोठी जमीन अधिग्रहीत करेल. या जागेत ज्या ज्या कोणाला मूर्ती उभारायच्या असतील, पुतळे उभारायचे असतील वा स्मारके उभारायची असतील, त्यांनी उभारावीत. त्यासाठी त्यांना विशिष्ट चौरस मीटरच जमीन दिली जाईल. त्या जमीनीवर ज्याला 182 मीटर वा 193 मीटर वा कोणाला अजून काही किलोमीटर उंचीची मूर्ती उभारायची असेल, त्याने तिथे जाऊन उभारावी. ती मूर्ती लोखंडाची असो की सिमेंटची, सोन्याची असो की चांदीची यावर शासन कोणताही आक्षेप घेणार नाही.
         काही अटी मात्र घालण्यात येतील. त्या अटी अशा: या मुर्तींसाठी शासकीय पैसा वापरता येणार नाही. लोकांकडे लोखंडासह कोणताही धातू वा पैसा मागता येणार नाही. आणि अशा मूर्तींची पशू- पक्ष्यांकडून विटंबना झालीच तर आपल्या भावना दुखावता येणार नाहीत. आणि अशा भावना दुखावण्याच्या भरात रस्त्यांवर आंदोलने करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करता येणार नाही, अशी प्रतिज्ञापत्रे मूर्ती उभारणार्‍यांना लिहून द्यावी लागतील...
         - असे माझे स्वप्न असले तरी ते कधीच पूर्ण होणार नाही. कारण पंतप्रधान पदासाठी लागलेल्या भल्या मोठ्या रांगेत या जन्मी माझा नंबर लागणार नाही.
         (या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)


   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा