-
डॉ. सुधीर रा. देवरे
मोहनदास
करमचंद गांधी. एम. के. गांधी. महात्मा गांधी. गांधी. बापू. राष्ट्रपिता. ही नावे
उच्चारताच जी एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती इतकी भव्य आहे की ही
प्रतिमा एक तर आपण एक महामानव म्हणून मान्य करून सोडून देतो अथवा स्वत: अभ्यासाचा
कंटाळा करून काही विषारी प्रचारकांमुळे टपोर्यांनी ठेवलेल्या टुक्कार नावांच्या
प्रेमात पडून आपण गांधीना आपल्या आयुष्यातून हद्दपार करण्याचा प्रयत्न करतो.
गांधीची
प्रतिमा पार्यासारखी आहे. ती हातात येत नाही. आदरार्थी आणि सन्माननिय नावांव्यतिरिक्त
जनमानसाने अशी त्यांना अनेक हलकी नावे बहाल केली आहेत की जी इथे लिहिता येणेही
अभिरूचीला शक्य नाही. अशी ठेवलेली नावे जशी मानवी अज्ञानातून आली आहेत, तशी काही
नावे दूरत्वातून तर काही गांधी व्देषातून आलेली आहेत.
असे
व्देष सुध्दा किती उथळ कारणांवर आधारीत आहेत पहा: गांधी आमच्या उच्च जातीचे नाहीत
वा आमच्या उच्च जातीचे त्यांनी कधीच समर्थन केले नाही म्हणून गांधी त्यांच्या व्देषाचे
विषय होतात. तर दुसर्या बाजूने आमच्या मागे राहिलेल्या जातीला पुढे आणण्यासाठी गांधींनी
एकही आंदोलन केले नाही म्हणून त्यांना वाळीत टाकले जाते. तिसर्या बाजूने गांधी हे
जन्माने हिंदू होते म्हणून ते हिंदू धार्मिकतावादी होते, असा इतर धर्मांधतांकडून
प्रचार होतो. तर चौथ्या बाजूने गांधी पाकिस्तानकडून होते असा प्रचार करून गांधींना
शिव्या दिल्या जातात. (आणि शेवटी हिंदू धर्मांध व्यक्तीच त्यांचा खून करते.)
महात्मा
गांधी यांना जाहीरपणे शिव्या दिल्याने, गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्याने वा
त्यांच्यावर अश्लाघ्य लिखाण केले तरी शंभर टक्के गँरंटी देता येते, की या देशात कोणाच्याच
भावना दुखावून जातीय दंगली भडकणार नाहीत. गांधींनी कोणत्याही एका जातीचा कैवार न घेतल्याने
वा ज्या जातीत जन्माला आले त्या जातीचे संघटन न केल्याने आज कोणतीच जात
त्यांच्यासोबत नाही. कोणत्याच धर्माचा अतिरेक न केल्याने कोणताच धर्म त्यांना आपला
मानत नाही. महात्मा गांधी या नावाचा जप केल्याने कोणत्याही पक्षाचे एक दोन टक्के
मते आज वाढत नाहीत, हे लक्षात आल्याने राजकीय पक्षांनी त्यांचे नाव घेणे आता सोडून
दिले आहे.
असा
हा महात्मा. मनुष्याच्या आकलनापलिकडचा. काहींनी समजून न घेता व्देष करायला सुरूवात
केली, तर कोणी जाणूनबुजून गांधींना अडगळीत टाकले. सगळ्या जात, पात, गट, तट,
धर्मवाल्यांनी, डबकेवाल्यांनी आणि झेंडेवाल्यांनी त्यांच्याकडे कानाडोळा केला तर
कोणी गांधी म्हणजे आपल्या बु्ध्दीपलिकडील घटना म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
पण
या सगळ्यांपलिकडे पोचलेले गांधी आपल्या सर्वांचेच होते – अखिल मानव जातीचे होते. जगाचे होते. हा राजकारणातलाच नव्हे
तर आख्या जगाचा चालता बोलता मानवी संत होता हे अजूनही कोणाला कळत नाही, हे आपले
दुर्दैव. आपण संकुचित विचार करतो. महान विचार आपल्याला कधीच झेपवत नाहीत. अल्बर्ट
आईनस्टाईन या शास्त्रज्ञाने गांधी जीवंत असतानाच त्यांच्याबद्दल म्हटले होते, ‘असा हाडामांसांचा माणूस या पृथ्वीतलावर खरोखर होऊन गेला,
यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणार नाही!’
जगात
जर कोणी आतून आत्मशुध्दीसाठी उपोषण केले असेल तर ते गांधींनी. गांधी राजकारणात
गेले नसते वा या जगात इतरत्र कुठे जन्माला आले असते तर ते एखाद्या नव्या धर्माचे
प्रेषित ठरले असते, इतके ते महान होते.
भारतासारख्या
व्यक्तीपूजा करणार्या देशात जन्माला येऊनही आज महात्मा गांधींची भारतात मंदिरे
स्थापन झाली नाहीत याचे गुपीत भारतीय जनमानसात नसून गांधींच्या कार्यशैलीत होते हे
निर्वीवाद सत्य ठरते. त्यांना आपले व्यक्तीस्तोम माजवायचे नव्हते तर आलटून पालटून
कुठल्यातरी काल्पनिक श्रध्देला कवटाळणार्या लोकांच्या श्रध्देलाच धक्के देऊन
त्यांना ध्येयाप्रत न्यायचे होते. आणि त्यात ते स्वत:ची व्यक्तीपूजा होऊ न देण्यात
यशश्वी ठरले तरी त्यांना जे ध्येय अपेक्षित होते त्यात ते, म्हणजे त्यांच्या
मृत्यूनंतर आपण अयशश्वी ठरलो आहोत.
(या
लेखातील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ
द्यावा ही विनंती.)
- डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा