शनिवार, १५ फेब्रुवारी, २०१४

विवाहांचा थाटमाट


                               - डॉ. सुधीर रा. देवरे


       सोने कितीही महाग होवो, मंगलकार्यालयांचे भाडे कितीही वाढो, जेवणावळीत अन्न कितीही वाया जावो, बँड कितीही महाग होवो वा कितीही ध्वनी प्रदुषण करो, पैसे खर्च करण्याची आमची कुवत असो वा नसो आमच्या घरातले विवाह आम्ही जोरदार थाटामाटातच काढणार अशी जन्मताच शपथ घेतल्यासारखे लोक आपल्या घरातली लग्ने दणकेबाज पध्दतीने साजरी करताना दिसतात.
         भारतात हुंडा‍ विरूध्द कायदा 1961 साली अस्तित्वात आला आणि आज 2014 सालीही सर्रासपणे दहा दहा लाख हुंडा देऊन- घेऊन सर्वत्र लग्ने होताना दिसतात. कायद्याने अज्ञान आहेत म्हणून फक्त सर्वसामान्य लोकच हुंडा देतात घेतात असे नाही, तर ज्यांचा कायद्याशी रोजचा संबंध येतो त्या पोलिस, वकील आणि न्यायाधिशांमध्येही हुंडा देणे- घेणे राजरोसपणे सुरू आहे.
         कितीही गाजावाजा करून, गर्दीचे शक्तीप्रदर्शन करून आणि पोकळ प्रतिष्ठेचा प्रश्न करून सांस्कृतिक पध्दतीने लग्ने झालीत तरी लग्नपत्रिका वा लग्नातले फोटो वा व्हिडीओ हे विवाह झाल्याचा ढळढळीत पुरावा म्हणून आज कायद्याने ग्राह्य धरले जात नाहीत. त्यासाठी किमान ग्रामपंचायत वा नगरपालिकेचा दाखला मिळवणे गरजेचे झाले आहे. तरीही आम्ही यापासून कोणताही बोध न घेता प्रचंड गर्दीला जमवून आणि मगंलाष्टके म्हणून लेखाजोखा केलेला कोणताही पुरावा मागे न ठेवता तोंडी लग्ने लावत आहोत.
         नोंदणी पध्दतीने विवाह करायचा नसला तरी वधू-वरांचे दोन कुंटुंबे आणि काही नातेवाईक- मित्र मंडळी यात साध्या पध्दतीने विवाह होणे आज गरजेचे झाले आहे. किमान अकरा लोकांच्या उपस्थितीत विवाह करणे हा आज आदर्श विवाह समजायला हवा. यात लग्नपत्रिका छापणे, मंगल कार्यालय घेणे, वाजंत्री, हुंडा, सोन्याचे दागिने, मानपान, वरमाया, कपडे, अनावश्यक जेवणावळी अशा खर्चाला फाटा द्यायला हवा. असा साध्या आदर्श पध्दतीने विवाह समारंभ करून ग्रामपंचायत वा नगरपालिका यांच्याकडे विवाह नोंदणी करून तसे प्रमाणपत्र घेण्यासाठी सजग रहायला हवे.
         अशा पध्दतीने विवाह समारंभ सुरू झाले तर सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या माणसाला लग्नांसाठी कर्ज काढावे लागणार नाही, पुढे हुंडा कुठून आणायचा म्हणून पालकांडून गर्भातच मुली मारल्या जाणार नाहीत आणि लग्नानंतर अतिरिक्त हुंड्यासाठी सुना आणि बायकाही मारल्या जाणार नाहीत, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
         (या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा