- डॉ. सुधीर रा. देवरे
दोन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार अकराला दिल्लीत जन लोकपालासाठी आण्णा हजारे
यांच्या नेतृत्वाने जे आंदोलन झाले तेव्हापासून देशात अरविंद केजरीवाल हे नाव ऐकू
येऊ लागले. आधी आयआयटीचे इंजिनियर, नंतर इनकमटॅक्स ऑफिसात एक कर्मचारी, त्यानंतर
परिवर्तन नावाच्या एनजीओचे संस्थापक, पुढे आम आदमी पक्ष स्थापन करणारा नेता आणि
आता दिल्लीचे मुख्यमंत्री अशी त्यांची वाटचाल. राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर फक्त
तेरा महिण्यात ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.
दोन
प्रकारचे लोक जगात कायम अस्तित्वात असतात. एक, लोकजागरण करून प्रबोधनाने जड व्यवस्थेला
बाहेरून धक्का देणारे आणि दोन, बिघडलेल्या व्यवस्थेच्या आत प्रवेश करून ती व्यवस्था
आतून ठाकठीक करणारे. हे दोन्हीही प्रकारचे लोक नागरिकांना दिशा देण्याचे काम करीत
असतात. अरविंद केजरीवाल यांनी प्रथम पहिल्या प्रकारचा रस्ता धरला आणि नंतर नाइलाजाने
त्यांना दुसर्या प्रकारच्या रस्त्यावर उडी घ्यावी लागली.
भारतात
बहुपक्षीय राज्यव्यवस्था असली तरी फक्त दोनच पक्ष यापुढे आलटून पालटून सरकार बनवू
शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापैकी एका पक्षाला स्वातंत्र्यपूर्व
सव्वाशे वर्षाची महान परंपरा असून दुसर्याला पन्नास वर्षाची परंपरा आहे. या
व्यतिरिक्त अनेक छोटे मोठे प्रादेशिक पक्ष देशात असूनही त्यांच्या भाषा, धर्म,
जात, प्रादेशिकता आदी संकुचित उद्देशांमुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती.
या दोन राष्ट्रीय पक्षांसह सगळ्या प्रादेशिक पक्षात भ्रष्टाचार, अनाचार, जातीय-धर्मांधता
अतोनात माजल्याचे पुन्हा पुन्हा सिध्द होऊ लागले. अनेक नेत्यांना सत्तेची नशा
चढल्याचे दिसत होते. अशा पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी अस्तित्वात येणे ही देशाची
गरज होती.
कोणत्याही जाती-धर्माशी बांधिलकी नसणे, कमी
खर्चात निवडणूका लढवणे, नागरिकांशी थेट संवाद, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणे, कोणतीही
गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे, साधी राहणी, साधे कपडे, सामान्य लोकांत मिसळणे, कोणताही
बडेजाव नसणे, सामान्य माणसांच्या वाहनातून प्रवास करणे, लोकांच्या समस्यांविषयी
जागरूक असणे, सामान्य माणसाशी संवाद साधणे, अल्पमतातले सरकार येईल म्हणून सरकार
स्थापनेसाठी जनमत चाचपणी घेणे आदी आम आदमी पार्टीच्या भूमिका दाद देण्यासारख्या
आहेत.
दिल्ली राज्याचे सरकार यापुढे टिको वा
पडो. (विश्वासदर्शक ठराव पास झाल्यामुळे आता ते किमान सहा महिने तरी स्थिर राहील.)
त्यांना आपल्या जाहीरनाम्यातील तरतुदी पूर्ण करता येवो वा न करता येवो. हे सरकार
आता सहा महिण्यांनी गेले तरी हरकत नाही. पण इतर राजकीय पक्षांपुढे या छोट्याश्या
पक्षाने जो आरसा धरला तो फार महत्वाचा आहे. इतर पक्षात आता अंतर्मुख होण्याची
प्रक्रिया सुरू झाली आहे. या देशातील नागरिकांना फक्त मतदार म्हणून मोजता येणार
नाही असा संदेश इतर पक्षात पोचायला सुरूवात झाली ही सुध्दा काही कमी महत्वाची घटना
नाही.
स्वांतत्र्य मिळवून दिल्यानंतर देशातली
त्यागी, धेयवादी राजकारणातली पहिली पिढी निघून गेली, दुसरी पिढीही निघून गेली. आणि
आता फक्त (अपवाद वगळता) संधीसाधू उरले होते. आपल्या देशाचे या पुढे कसे होईल अशी
अनेकांना चिंता लागली होती. अशा काळात असा एखादा पक्ष पुढे येणे ही काळाची गरज
होती. रविंद्रनाथ टागोरांची एक कविता आहे:
मावळतीला
जाताना
सूर्याने
एक प्रश्न केला
‘आता माझ्या जागी कोण
या
पृथ्वीला प्रकाश देईल?’
शरमले
ग्रह तारे
शरमले
नक्षत्र सारे
तेवढ्यात
मिणमिणती
एक पणती
पुढे आली
आणि
म्हणाली,
‘प्रभु मी माझ्या परिने प्रयत्न करीन!’
सूर्याची
जागा तर कोणी घेऊच शकत नाही. परंतु आपल्या परीने जेवढा उजेड देता येईल तेवढा प्रकाश
आपण इतरांना दिला पाहिजे. दिल्लीत अरविंद केजरीवाल एक पणती झाले. पण आपल्या देशात
अशी एकच पणती नाही. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात संथपणे तेवणार्या अशा अनेक पणत्या
आहेत. राजकीय क्षेत्रात झटपट प्रसिध्दी मिळते, तशी इतर क्षेत्रात मिळत नाही. आणि
स्वस्त प्रसिध्दीच्या मागे न लागता असे अनेक लोक आहेत की ते पणती सारखे काम
अहोरात्र करीत आहेत. (चांगली माणसे मोजण्यासाठी माझ्या हाताला अजून बोटे हवीत! अशा
आशयाची भालचंद्र नेमाडे यांची एक कविता आहे. खरं तर आपल्यात इतकी चांगली माणसे
आहेत की ती दिसण्यासाठी आपली नजर कमी पडते.)
आपणही
त्यापैकी एक पणती होऊ अथवा अशा पणत्या विझू नयेत म्हणून त्यांना दोन्ही हातांचा
आडोसा करून उभे तरी राहू या.
- डॉ. सुधीर रा.
देवरे
“ सामान्यांना निराश करू नका ”
उत्तर द्याहटवा-सरत्या वर्षी राजधानीत सार्या देशाला आशेचा किरण दिसला.कानांनी ऐंकल,डोळ्यांनी बघीतल,मनाने अनुभवले,यावर विश्वास बसत नव्हता.
-चेहरे आनंदाने फुलले होते,भय,भीती,नैराष्य कुठेही दिसत नव्हते.आनांदोस्तव साजरा होत होता.
-त्याचेसाधवागणं,सफेदप्रतिमा,प्रामाणिकपणा,तळमळ,भाषण,घोषणा,आश्वासने,लोकांना भावत होते.
-गरीब,दुर्बल,सामान्यांना विश्वास वाटतो की त्यांच्यामुळे भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी हद्दपार होणार,यादेश्यात रामराज्य येणार.
-त्यांनी देशाला आशावाद दाखविला,लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिल .प्रस्थापितांना डावलून त्यांना सत्तेवर बसविल होत.
-प्रथमच घडत होते,नवशिक्यामागे बलाढ्य फरफरट जात होते.जनता मात्र त्याच्यावर मनापासून प्रेम करीत होती,कौतूक करत होती.
“त्यांनी सामान्यांना आता निराश करू नये”.
-नाहीतर लोकांचा देशावरील,लोकशाहीवरील,मानसा-माणसावरील विश्वास नाहीसा होईल.
-तुमच्या यश्याबद्दल अभिनंदन, तुमच्या प्रयत्य्नाना नववर्षानिमित्य[२०१४] शुभेछ्या.
thanks so much ahirani kasamade
उत्तर द्याहटवा