शनिवार, १८ जानेवारी, २०१४

राजकारणापासून दूर राहणे शक्य आहे काय?




-         डॉ. सुधीर रा. देवरे

         दोन माणसात सुरू होणार्‍या राजकारणाबद्दल मला बोलायचे नाही. एखाद्या कार्यालयात चालणार्‍या राजकारणाबद्दल मला बोलायचे नाही आणि एखाद्या गावातील संकुचित राजकारणाबद्दलही मला बोलायचे नाही. आज काही लोक अगदी आत्मप्रौढीने सांगतात, की मला राजकारणाबद्दल काहीही बोलायचे नाही, मला राजकारण आवडत नाही, राजकारणी लोक मला आवडत नाहीत आणि राजकारणात जाणेही आवडत नाही, अशा तटस्थ प्रवृत्तीबद्दल मला बोलायचे आहे. राजकारणाविषयी व्देषाचे बोलणे आणि ऐकणेही आपल्याला आवडत असले तरी देशाच्या राजकारणापासून दूर राहणे आज आपल्याला शक्य आहे काय?
         व्यक्तीगत पातळीवरच्या डबक्यातल्या राजकारणापासून सगळ्यांनी लांब असायलाच हवे. पण देशाच्या राजकारणापासून दूर राहिलोत तर आपण आपल्या देशाबद्दल अज्ञानी राहण्याची शक्यता तर आहेच, पण देश काय करतोय आणि त्याची दशा- दिशा काय आहे याबद्दलही आपण अनभिज्ञ असू शकतो. व्यापक राजकारणाची काही माहितीच नसली तर आपण कोणाला मतदानही करू शकणार नाही. कारण मतदान करताना आपली राजकीय प्रणाली काय आहे हेच आपल्याला समजणार नाही. काही लोक आज मतदान न करणे यालाही म्हणूनच प्रतिष्ठा मानतात. असे लोक राजकारणाकडे डोळेझाक करतील हे ओघाने आलेच.
         आपण आपल्यापुरता असा कितीही अराजकीय वाद स्वीकारला तरी तो आमलात आणणे शक्य आहे काय? आपण आपल्या गावातील पंचाला निवडून देणार नसू, नगरसेवकाला निवडून देणार नसू, जिल्हा परिषद- पंचायत समितीचे सभासद निवडून देणार नसू. आमदार-खासदाराला निवडून देणार नसू, तर मी अराज्यवाद पाळतो म्हणून माझ्याकडे कोणी कोणताच कर मागू नये असे आपल्याला म्हणता येईल का? आपल्या गावातील भौतिक प्रगती आपण कोणाकडून करून घेणार? सरकार नाकारून आपल्याला शासनात राहता येईल का?
         राजकारण करणे हे आपले काम नाही. भल्या माणसाचा तो प्रांत नाही. असे म्हणत आपण राजकारणापासून लांब रहायचे आणि राजकारणात गुंड, गुन्हेगार, भ्रष्टाचारी, लुटारू, व्यसनी लोकांचे प्रताप पहात  त्यानांच मुकाट्याने मतदान करत रहायचे.  त्यांच्याकडून चांगली कामे होण्याची मात्र अपेक्षा करत रहायची, असा हा सगळा प्रकार आहे.
         आंतरराष्ट्रीयच नव्हे तर भारतातील होऊन गेलेल्या राजकीय लोकांच्या नावावरून नजर फिरवली तरी फक्त राजकारणी लोक आणि राजकारण असे समीकरण दिसत नाही. राजकारणात अनेक पैलू असलेले लोक भेटतात. गांधी, टिळक, सुभाषचंद्र बोस, रानडे, नेहरू, अब्राहम लिंकन, चर्चिल, मंडेला, डॉ राजेंद्र प्रसाद, योगी अरविंद, आंबेडकर, सावरकर, शास्त्री, पी व्ही नरसिंहराव, व्ही पी सिंग, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, ग प्र प्रधान, एस एम जोशी, डांगे आदी नावे डोळ्याखालून घातली तरी हे लोक फक्त राजकारणी नाहीत. यापेक्षा ते अजून कोणीतरी आहेत. कोणी कवी, कोणी साहित्यिक, कोणी गणिती, कोणी तत्वज्ञ, कोणी विचारवंत, कोणी समाजकार्यकर्ता, कोणी समाजसुधारक अशा विविध क्षेत्रातून राजकीय व्यक्तीमत्वे तयार होत जातात. आणि अशा विविध स्तरातून राजकारणात येणारे लोकच इतिहास घडवत असतात. दुर्गा भागवत अशा राजकारणापासून अलिप्त राहिल्या असत्या तर त्यांना आणीबाणीला विरोध करता आला नसता.
         तात्पर्य, विचारवंत, साहित्यिक, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, संशोधक, मीमांसक आपल्याला राजकारण्यांमध्ये पहायचे असतील तर आपण सक्रीय राजकारणापासून लांब राहिलोत तरी चालेल पण एकूण राजकारणातल्या घडामोडींपासून आपल्याला लांब पळता येणार नाही. किमान राजकारणाबाबत सजग राहून त्यावर भाष्य करण्याचे काम तरी आपल्याला करावे लागेल.
   (या ब्लॉगमधील मजकूराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)


  - डॉ. सुधीर रा. देवरे          
     इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

२ टिप्पण्या: