-
डॉ. सुधीर रा. देवरे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फक्त आठ दिवस पुढे होते अशा एका संध्याकाळी
मला मोबाइलवर एक एसेमेस आला. ‘खालील
इमेल आयडी वर आपला बायोडेटा पाठवावा.’
मी
एसेमेसनेच विचारले, ‘उद्या पाठवला तर चालेल का?’
एसेमेसने
उत्तर आले, ‘हो चालेल. साहित्य संमेलनाच्या परिसंवादासाठी
हवा होता.’
कोणते
संमेलन वगैरे न विचारता मी दुसर्या दिवशी माझा बायोडेटा इमेलने पाठवून दिला.
त्यानंतर मी एसेमेसनेही कळवले, ‘बायोडेटा
इमेलने पाठवला आहे. मिळाला का?’ या
एसेमेसचे वा इमेलचे उत्तर मात्र मला अद्यापही मिळाले नाही.
यानंतर दोन तीन दिवसांनी मुंबईहून माझ्या
एका मित्राचा फोन आला, ‘आत्ताच साहित्य
संमेलनाची पत्रिका मिळाली. परिसंवादात तुमचे नाव वाचून फोन केला. तुम्ही तीन
तारखेला सासवडला येणार आहात का चारला? मग आपण भेटू तिथे.’ याबद्दल मला काहीच माहीत नसल्यामुळे मी म्हणालो, ‘अजून माझे नक्की नाही. पण आलो तर तुम्हाला फोन करीन.’
मित्राच्या या फोनमुळे माझ्या लक्षात आले
की परवा माझ्याकडे जो बायोडेटा मागितला गेला तो अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या
परिसंवादासाठी असावा. नंतर मला असे अजून काही फोन आले. पण मलाच नक्की माझ्या
सहभागाविषयी माहिती नसल्यामुळे गुळमुळीत उत्तरे देण्यापलीकडे मी जास्त बोलत नव्हतो.
मंडळाकडून मला अशा आशयाचे अजूनही पत्र
नाही. साहित्य संमेलनाची कार्यक्रम-निमंत्रण पत्रिका आली नाही आणि फोनही नाही. मी
कोणत्या परिसंवादात आहे त्याचे नावही मला माहीत नाही. पण मला काही मित्रांचे आणि
ओळखणार्यांचे फोन येत होते.
दिनांक
4-1-2014 ला दुपारी मला सासवडहून एका मित्राने फोन केला ‘मी सासवडहून बोलतो. तुम्ही परिसंवादासाठी आलेले आहात का?’ मी नाही म्हणालो. त्यांनी ‘का’ असे विचारले. म्हणून मी सांगितले की ‘परिसंवादात माझा सहभाग आहे हेच मला माहीत नाही आणि
परिसंवादाचा विषयही माहीत नाही.’
दिनांक
4-1-2014 ला सासवडच्या अ भा मराठी साहित्य संमेलनात माझा ज्या परिसंवादात सहभाग
होता तो होऊन गेल्यानंतर माझे कवी मित्र
प्रा. संतोष पवार यांच्याकडून मला फोनने सविस्तर कळले, ‘मराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न आणि मराठी बोली’ या विषयाच्या परिसंवादात मला बोलायचे होते.
कोणत्याही
वक्त्याने आपल्याला दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलण्यासाठी आपली मते लिहूनच
मांडली पाहिजेत म्हणजे वक्ता इतरत्र भरकटत नाही, अशी माझी भूमिका असल्यामुळे
कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी मी आधी माझे बोलणे लिहून घेतो. टिपणे काढतो. यासाठी
किमान पंधरा दिवस हवे असतातच. मात्र या परिसंवादासाठी मला कोणतेही अधिकृत निमंत्रण
नसल्यामुळे आणि विषयही माहीत नसल्यामुळे तशी टिपणेही मी काढलेली नव्हती. ऐनवेळी
कोणाकडून समजले म्हणून मी केवळ हजेरी लावण्यासाठी संमेलनाला जाण्याचा प्रश्नच येत
नव्हता. साहित्यिकाला असे गृहीत धरणे योग्य आहे का? (ज्या वेळी माझ्याकडे बायोडेटा
मागितला गेला त्यावेळी जरी मला परिसंवादाच्या विषयाविषयी सविस्तर सांगितले असते
तरी ते समजण्यासारखे होते. पण तसे झाले नाही. घाईघाईने हा परिसंवाद निश्चित झाला
असावा, असे म्हणावे तर परवा एका आक्षेपावर मंडळाने स्पष्ट केले की संमेलनाची
कार्यक्रम पत्रिका तीन महिण्यापूर्वीच छापली गेली होती.)
आपण
कुठल्या परिसंवादात आहोत का? माझ्या परिसंवादाचा विषय कोणता आहे? असे मंडळाला
फोनने वा पत्राने स्वत: अभ्यासकाने विचारून वा इतरत्र परस्पर पत्रिका पाहून-ऐकून
संमेलनाला यावे, असे जर मंडळाला अभिप्रेत असेल तर तसे मी केले नाही.
- डॉ. सुधीर रा. देवरे
lekhakanno sammelanacha nad soda, jiwant anubhaw eika
उत्तर द्याहटवाthanks santosh padmakar ji. khare aahe aapale mhanane.
उत्तर द्याहटवा