- डॉ. सुधीर रा. देवरे
लता
मंगेशकर, सचिन तेंडुलकर आणि यू आर अनंतमुर्ती. एक थोर गायिका, एक चांगला खेळाडू
आणि एक थोर साहित्यिक- कलावंत. या तीन व्यक्ती आपण प्रातिनिधीक म्हणून घेऊ. या
तिघांनी फक्त आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक रहावे, दुसर्या क्षेत्रात लुडबूड करू
नये असे कोणी म्हणणार नाही. लता मंगेशकर यांनी फक्त गाणेच गायला हवीत का? बाकी
क्षेत्रात त्यांनी ब्र ही काढू नये, असेही कोणी म्हणणार नाही. म्हणून भारताचे
पंतप्रधान कोणी व्हावे असा विचार स्वत:शी करायला त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहेच.
पण-
कलावंत- साहित्यिक यांच्याकडून सर्वसामान्य
लोक विचार घेत राहतात. इतर क्षेत्रांतील घटनांबद्दल अशा कलावंत व्यक्तींची मते काय
आहेत हे सामान्य लोक आपल्या मतांशी पडताळून पाहतात. विशेषत: राजकीय क्षेत्रात
घडणार्या घटनांबाबत असे थोर लोक काय प्रतिक्रिया देतात याबाबत देशातील सर्व
स्तरातील लोक कानोसा घेत राहतात. अशा पार्श्वभूमीवर कलावंतांनी सार्वजनिक ठिकाणी
काय बोलावे आणि काय बोलू नये हे त्यांनी स्वत: ठरवायचे असते.
लता
मंगेशकरांना एखाद्या राजकीय पक्षाने राज्यसभेत पाठवणे हा त्यांचा मान आहे आणि तो
यथायोग्यही होता. सचिन तेंडुलकर यांनाही राज्यसभेत पाठवले गेले हा त्यांचा मान आहे
आणि तो यथायोग्यही आहे. पण ज्या राजकीय पक्षाने त्यांना राज्यसभेत पाठवले वा
ज्यांनी त्यांना भारतरत्नाने सन्मानित केले त्या पक्षाचा सचिन तेंडुलकर कडून निवडणूक
प्रचार केला जावा अशी जर कोणी अपेक्षा व्यक्त केली तर त्या पक्षातील प्रामाणिक सदस्यालाही ते आवडणार
नाही. तीच बाब लता मंगेशकर यांना ज्यांनी राज्यसभेत पाठवले त्या पक्षाचा त्यांनी
प्रचार करावा ही सामान्य माणसाला वेदना देणारी घटना ठरेल.
राजकीय
लोक गोड गोड बोलतात. तोंडासमोर गोड बोलून पाठीमागे कारस्थाने करणे (अपवाद गृहीत
धरून) हे आजच्या राजकीय लोकांचे राजकारण समजले जाते. पण कलावंताने अशी तोंडपूजा का
करावी? म्हणजे जिथे कटू बोलणे गरजेचे आहे तिथे गोड का बोलले जाते? अशा गोड
बोलण्याचा अर्थ काय समजायचा? राजकारणी लोकांसारखे कलावंतही सत्य लपवून वर वर गोड बोलू
लागले तर सामान्य लोकांनी खरी परिस्थिती कोणाकडून समजून घ्यायची? लोकांना प्रबोधन
करण्याचे, देश घडविण्याचे आणि माणुसकी शिकवण्याचे काम ज्या कलावंताकडे आहे तोच जर
गोड बोलून राजकारण करू लागला तर या देशाचे काय होईल?
म्हणून एक थोर साहित्यिक यू आर
अनंतमुर्ती यांनी काही दिवसांपूर्वी एक कठोर भूमिका घेतली. सत्य हे कटू असते
म्हणून ते कटू बोलले. कटू बोललेले कोणालाही झोंबते. आपला व्यक्तीगत कोणताही
स्वार्थ नसताना त्यांनी भारतीय मतदारांना जागृत करण्याचे काम केले. लता मंगेशकर
यांना तोंडावर गोड बोलून भारताचे पंतप्रधान कोणी व्हावे असे जाहीर करण्याचा जसा
हक्क आहे तसा अंनतमूर्ती यांना कटू बोलून कुपमंडूक राजकारण्यांसमोर स्वच्छ आरसा
दाखवण्याचा हक्क आहेच. नुसता हक्कच नाही तर देशाच्या ऐक्यासाठी काय योग्य आणि काय
अयोग्य याचे प्रबोधन करणे अनंतमूर्ती यांचे कर्तव्य होते, ते त्यांनी पार पाडले. मात्र
त्यांचेच फक्त ते काम नाही. हे आव्हान सर्व कलावंतांना आहे. पण कलावंतच विकले गेले
तर भारताच्या नशिबी वाईट दिवस खूप लांब नाहीत.
- डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा