शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

सगळीकडे तहलका


                                -         डॉ. सुधीर रा. देवरे


         गावगुंडापासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत आणि धर्मगुरूंपासून ते पत्रकारांपर्यंत सगळ्यांचेच पाय मातीचे. सगळेच कशात ना कशात फसलेले. रोज नवीन नवीन तहलका देशात खळबळ माजवून देतात. नवनवीन स्कँडल गाजरगवतासारखे उगवतात. हे कधी थांबेल कोणाला माहीत नाही. दिल्लीतला बलात्कार शेवटचा ठरेल असे तात्कालिक जनभावनेतून वाटले होते. पण बलात्कारातील क्रौर्याची ती सुरूवात होती की काय असे आज वाटू लागले आहे. रोज भयानक घटना घडताहेत. कोणीही आणि कुठेही सुरक्षित नाही.
         सार्वजनिक जीवनात आतापर्यंत कोणताही डाग नसलेल्या एका नवीन राजकीय पक्षाच्या लोकांनी देणगी म्हणून रोख पैसे घेण्याची सीडी असो. एका सामान्य मुलीवर पाळत ठेवणारी एका राज्याची सरकारी यंत्रणा असो. टेलिफोन टॅपिंगच्या घटना असोत. गरीबांसाठी असलेले धान्य राजरोस बाजारात विकणारे लोक असोत. कोणाला फसवण्यासाठी ब्लॅक मेलींग करण्याची सीडी असो. कॉलेजमधील रॅगींग असो. एटीएम मध्ये महिलेवरील हल्ला असो. अँसिड हल्ला असो. मार्जिनसाठी केला जाणारा कागदोपत्रीचा विकास असो. कोणाला आयुष्यातून उठवण्यासाठी केलेला खोटा आरोप असो. आपल्या आजूबाजूला सगळ्याच वैताग आणणार्‍या घटना घडत आहेत. आणि आता एका महिला नवोदित पत्रकाराचा तिच्या बॉसने- तहलकाचे संपादक तरूण तेजपाल यांनी केलेला विनयभंग.
         असा सगळीकडे तहलका असल्यावर विश्वास नेमका कोणावर ठेवावा हे ही आता समजेनासे झालंय. आरोप असणार्‍यांवर का फसवल्या गेलेल्या व्यक्तींवर. जीवनात वैचित्र्य असू शकते आणि कोणत्याही पदावर असणार्‍या माणसाला निसर्ग चुकलेला नाही. पण अनुनय करून निखळ आनंद मिळवणे वेगळे आणि कोणाच्या इच्छेविरूध्द वा सत्तेच्या-पैशाच्या जोरावर कोणाच्या मजबूरीचा गैरफायदा घेऊन अमिष दाखवून हवे ते मिळवणे वेगळे.
         रोज रोज घडणार्‍या अशा घटनांबाबत आपण एकांगी विचार तर करत नाही ना, हे ही समजायला मार्ग नाही. कोणतीही व्यक्ती शंभर टक्के बरोबर कधीच असू शकत नाही. आणि कोणतीही व्यक्ती शंभर टक्के चूक असू शकत नाही. कोणाला किती ‍समजून घ्यायचे आणि कोणाला किती मोकळीक द्यायची वा कोणाला किती खेचायचे हे कोणी ठरवायचे? दिवसेंदिवस माणूस आपल्यातच घुसमटून आपल्या चाकोरीबध्द आयुष्यातून मोकळे होण्यासाठी त्याचा एकदम तोल जाऊन स्फोट होतोय की काय?
         शेवटी प्रश्न उरतो, सत्य काय आहे? कोणाच्याही बाबतीत आणि कोणत्याही घटनेत सत्य काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे असते. अगदी सामान्य माणूसही आपल्या पातळीवर सत्य जाणून घेण्यासाठी सत्याचे संशोधन करीत असतो.  आपल्या लोकशाहीमुळे- लोकशाहीतील चौथ्या स्तंभामुळे म्हणजेच मिडीयामुळे आपण निखळ सत्यापर्यंत पोचत नसलो तरी घटनेतले अर्धसत्य आपण समजू शकतो. अशा या अर्धसत्य का होईना पण प्रसार माध्यमांच्या वार्तांच्या प्रक्षेपणातून काही प्रमाणात तरी पुढे होणार्‍या अशाच काही वाईट कृती टळत असाव्यात असे म्हणायलाही वाव आहेच. सत्य मेव जयते!

  
   - डॉ. सुधीर रा. देवरे         
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा