शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

आजच्या विचारांची दिवाळी-         डॉ. सुधीर रा. देवरे

         प्रथमत: सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
         दिवाळीला पारंपारीक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहेच आणि ती सगळ्यांना माहीत आहे. याच परंपरेने दिवाळी साजरी करणे हा वाक्‍प्रचारही भारतातील प्रत्येक भाषेला दिला आहे. एखादी आनंदाची घटना घडली की आपण दिवाळी साजरी करतो. एखादे यश मिळाले की दिवाळी साजरी करण्यासारखे आपण आनंदी होतो. दिवाळी सणाच्या अशा आनंदी पार्श्वभूमीमुळे ऐन दिवाळीत कोणी कोणाला शब्दानेही दुखवत नाही.
         महाराष्ट्रात दिवाळीच्या निमित्ताने साहित्य दिवाळीही साजरी केली जाते. विविध विषयांवरील दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. दिवाळी अंक प्रकाशित होण्याची संख्या आज महाराष्ट्रात चारशेच्या पुढे गेली आहे. दिवाळीच्या आनंदात वितुष्ट येऊ नये म्हणून दिवाळी अंकामध्ये पूर्वी शोकांतिका असलेले साहित्य छापण्याचे सपांदक टाळत असत. अजूनही काही संपादक असा सांस्कृतिक संकेत पाळतात.
         प्रत्यक्ष वास्तव जीवनात सुध्दा ऐन दिवाळीत शत्रूचेही कोणी वाईट चिंतीत नाही. एखादी सार्वजनिक चांगली गोष्ट निर्माण करतानाही कोणी एखादा दुखावला जाणार असेल तर त्याची दिवाळी दु:खात जावू नये म्हणून अशी गोष्ट दिवाळी उलटून गेल्यावर केली जाते. सारांश, सणासुदीला- दिवाळीला कोणाचे वाईट करणे तर दूर पण वाईट विचार करणे, वाईट चिंतणे सुध्दा पाप, अशी आपली समृध्द पारंपारिक रूढी आहे.
         पण प्रत्येक समाजगटाअंतर्गत अजून काही छोटे दहशवादी गट असतात. इतरांच्या दु:खात त्यांना सुख मिळण्याची विकृती जडलेली असते. मग ते ऐन सणासुदीत- गर्दीच्या ठिकाणी दहशत पसरवण्याचे काम करत असतात. आणि लोकांच्या डोळ्यातले अश्रू पाहून आनंदातिरेकाने हसत हसत ते आपली दिवाळी साजरी करतात.
         हातात बंदूक घेऊनच दहशतवाद पसरवला जातो असे मात्र नाही. बाँबस्फोट करूनच दहशतवाद पेरला जातो असेही नाही. तर शिस्तबध्द योजना आखून एखाद्याविरूध्द कट कारस्थान करून त्याला योजनाबध्द पध्दतीने जीवनातून उठवणे हा ही दहशतवादच आहे. आणि अशा योजनाबध्द पध्दतीने काही शक्ती आपला दहशतवाद समाजात राबवीत असतात. सार्वजनिक जीवनात वड्याचे तेल वांग्यावर काढून कोणाला अडचणीत आणण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. ऐन दिवाळीत एखाद्याला दु:ख देऊन गम्मत पाहणे, अशा प्रवृत्तीही समाजात असतात. वाईट प्रवृत्तींवर चांगल्यांनी विजय मिळवला की दिवाळी साजरी केली जाते हा पारंपारिक अर्थ झाला. पण आज सर्रासपणे याचा व्यत्यास साधूनही दिवाळी साजरी करणार्‍यांची संख्या वाढते आहे. अशांना तसे वाईट उत्तर देण्यापेक्षा त्यांना तसा आनंद मिळू देणेही काही काळासाठी आवश्यक असते.
         म्हणून आताच्या दिवाळीला आजच्या विचारांची दिवाळी अशी टिपणी जोडून आपल्याला दु:खात लोटणार्‍या लोकांनाही आपण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पाहिजेत. त्या गटात बसणार्‍या अशा सगळ्यांसहीत आपणा सगळ्यांना दिवाळीच्या पुनश्च हार्दिक शुभेच्छा. आपली दिवाळी सकस, दर्जेदार, वैचारिक दिवाळी अंक वाचण्यात आनंदी जावो.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा