शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

लैंगिक विषयाचा शास्त्रीय लेख




- डॉ. सुधीर रा. देवरे


         ग्रंथप्रेमी लोकांची दिवाळी म्हणजे दिवाळीअंक वाचून ताजेतवाणे होणे. या वर्षाच्या (2013) दिवाळी अंकांत मनोविकास प्रकाशनाचा इत्यादी हा दिवाळी अंक वाचण्यात आला. हा संपूर्ण अंक दर्जेदार विचार- समीक्षा- साहित्याने भरगच्च आहेच. पण यातील एका लेखाने माझे लक्ष वेधून घेतले. मंगला सामंत यांनी लिहिलेला लैंगिक धर्म -व्यक्त आणि अव्यक्त या शीर्षकाचा लेख. हा लेख प्रत्येकाने म्हणजे आई- वडील- मुलगा- मुलगी या संगळ्यांनी वाचायलाच हवा. 14 वर्षांवरील प्रत्येक मुलामुलींनी जरूर वाचावा असा हा अभ्यासपूर्ण शास्त्रीय लेख आहे.
         कुठे बलात्कार झाला, विनयभंग झाला वा छेडछाड झाली की आपण सगळेच हादरतो. आपली पहिली प्रतिक्रिया असते आरोपींचा उध्दार करण्याची  जी स्वा‍भाविक प्रतिक्षिप्त क्रिया असते. संस्कारांना नावे ठेवणे, संस्कृतीच्या गप्पा मारणे, पोलिसांना दोषी ठरवणे, नवीन कायदे करण्याच्या मागण्या करणे, अशा आरोळ्या मारण्याचे काम सगळ्या पातळ्यांवर सुरू होते. पण ही मानसिकता नेमकी कुठून येते याचा खोलात जावून कोणीच विचार करताना दिसत नाही.
         मंगला सामंत यांनी आपल्या लेखात डार्विनच्या नॅचरल सिलेक्शन सिध्दांताची स्थूल ओळख देऊन वनस्पती- प्राणी यांच्या लैंगिक जीवनाचा दाखला देत वि. का. राजवाडे यांच्या भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकाचा संदर्भ घेत वेदकालीन स्त्री-पुरूषांचे लैंगिक संबंध उदृत केले आहेत. आदिवासी समाज, लैंगिक भाषा, भारतीय इतिहास, पूर्वकालिन भारतातील स्त्री-पुरूष संबंधांचा मोकळेपणा, विवाहसंस्था, विवाहाचे फायदे आणि तोटे, लग्नाचे वाढलेले वय, मानवी शरीरातील हार्मोन्स, सायन्स ऐवजी आजच्या युगात कामभावना दडपण्यासाठी देवधर्म- बाबा-बुवा यांच्या मागे धावून उत्तरे शोधण्याचा केविलवाना प्रयत्न, आदींचा संक्षिप्त आढावा घेऊन आपली स्वत:ची मतेही ठामपणे या लेखात मांडलेली आहेत. आपली लैंगिकता समजून घेण्यासाठी धार्मिकतेऐवजी सायन्सच्या मार्गाने जावे आणि लैंगिकतेला विकृत, अस्पर्शीत वा अश्लील विषय मानू नये असा या लेखाचा सारांश सांगता येईल.
         असा विषय सामाजिकतेच्या अंगाने मोकळेपणाने कोणी मांडला तर आधी आपण दचकतो. अशा व्यक्तीकडे संशयाने पहात दूर जातो. मात्र धार्मिकतेच्या नावाखाली बुवाबाजीतून अशाच हरकतींना अनेक स्त्रिया बळी पडतात आणि त्यानंतर त्यांना ब्लॅक मेल करून आयुष्यभर सतावले जाते.
         खरे म्हणजे आपल्याला हे सगळे कळते पण वळत नाही. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची हा खरा प्रश्न आहे. कारण या प्रश्नाला जो कोणी हात घालेल तोच आज विकृत ठरवला जातो. केंद्र शासनाने मागे एकदा शाळांमधून लैंगिक शिक्षण देण्याविषयीचे विधेयक आणण्याचा एक क्षीण प्रयत्न करून पाहिला. पण कोणतीही गोष्ट करायची ती मतांसाठी वा सत्तेसाठीच असा राजकीय पायंडा पडल्यामुळे असा धाडसी निर्णय घेणे राजकारण्यांना परवडणारे नव्हते. या कायद्यामागे फक्त पुरोगामीच नव्हे तर शास्त्रीय दृष्टीकोन होता. पण यावर घेतलेल्या आक्षेपांना शासनाला उत्तरे देता आली नाही‍त. उत्तरे न देता येण्याचे कारण शासनाकडे उत्तरे नव्हती असे मात्र नाही, तर अवघड जागेच्या दुखण्यावरचा इलाज सगळ्यांच्या पचनी पडेल याची शाश्वती नसल्यामुळे तसे उत्तरे न देता ते विधेयकच मागे घेणे सोपे होते. असो.
         आज समाजात लैंगिक निकोप वातावरण तयार करायचे असेल तर वि. का. राजवाडे यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. अथवा किमान वर उदृत केलेला लेख तरी इच्छुकांनी जरूर वाचावा.

   - डॉ. सुधीर रा. देवरे         
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा